अरुण करमरकर, मुंबई, हिंदुस्थान समाचार
पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या प्रचारक कार्यकर्त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील परंपरा अत्यंत समृद्ध आहे। ऐन उमेदीच्या वयात व्यक्तिगत आकांक्षा आणि निजी जीवनाची उभारणी (आजच्या परिभाषेत करिअर) पूर्णपणे बाजूला सारून नि:संगपणाच्या वाटेवर काही पावले चालण्याची प्रेरणा आजवर हजारो तरुणांंच्या मनात जागविण्यात ही संघ परंपरा यशस्वी ठरली आहे. अगदी प्रारंभीच्या काळात अनेकांनी याच वाटेवर आपली मार्गक्रमणा अखंडितपणे करून आपली जीवनयात्रा संपन्न केली. तर अन्य अनेकांनी काही वर्षांनंतर प्रचारकी दिनक्रम थांबवून व्यक्तिगत जीवनाचा मार्ग पत्करला. मात्र व्यक्तिगत जीवनाकडेही त्यांनी साधना म्हणूनच पाहिले. प्रचारकी जीवनाच्या काळात प्राप्त केलेल्या जीवनदृष्टीच्या प्रकाशातच प्रत्येक पाऊल टाकण्यात आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा प्रत्येक पैलू घडविण्यात इतिकर्तव्यता मानली. चं.प. तथा बापूराव भिशीकर हे अशा तपस्वी व्यक्तिमत्त्वांपैकीच एक.
एकूण 93 वर्षांच्या आयुष्यातील 5-6 वर्षे बापूसाहेब संघाचे प्रचारक राहिले। त्यानंतरच्या 65 वर्षांमध्येही प्रचारकी मानसिकतेचा एक क्षणासाठीही त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. सामूहिकता, अनामिकता, साधनसुचिता, गुणग्राहकता, मूल्यांबाबतच्या निष्ठा, प्रथमपुरुषी एकवचनी वृत्तीतून स्वत:प्रती कठोर आणि अन्यांप्रति क्षमाशीलतेचे औदार्य या साऱ्या बाबींचा विकटस्पर्श त्यांच्या वृत्तीप्रवृत्तींनी सतत जोपासून ठेवला. संघाच्या वाट्याला आलेल्या संघर्षात साहस, संयम आणि दृढनिष्ठेने सामोरे जाणाऱ्या आघाडीच्या फळीतले स्वयंसेवक ही भूमिकाही कधी सोडली नाही. विभाजनपूर्व कराची- सिंध भागात त्यांनी संघप्रचारक म्हणून काम केले, तो काळ तर सतत संघर्षाचा आणि जोखमीचा. नंतरही पत्रकार- संपादक या नात्याने ज्या तरुण भारतच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यालाही (तरुण भारतला) सतत संकटांनी घेरलेल्या वातावरणातच वाटचाल करावी लागत आली. तशाही स्थितीत सत्य जपत आणि स्वत्वाशी तडजोड न करता त्यांनी तरुण भारत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आणि लौकिकप्राप्त बनवला. पुढे ज्यांनी पत्रकार-स्तंभलेखक-लेखक म्हणून मानमान्यता मिळविली, अशा अनेकांना लिहिते करण्याचे श्रेय बापूसाहेबांच्याच नावावर लिहिले जाते. आणीबाणी आली, हुकुमशाहीचा बेजुमान वरवंटा लोकशाही मूल्यांना चिरडत निघाला, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. सुमार बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे सरकारी अधिकारी सेन्सॉरशिपच्या नावाखाली वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून मुजोर हडेलहप्पी करू लागले. अशा अत्यंत विपरित परिस्थितीत मोठ्या कुशलतेने पण खंबीरपणे मोजक्याच पत्रकारांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची नौका हाकत ठेवली. बापूसाहेबांचे नाव अशा पत्रकार/ संपादकांच्या यादीत अग्रभागी तळपले. संघविचारावरील अतूट, अविचल निष्ठा आणि अस्सल पत्रकाराची तटस्थता यांच्यातील समतोल सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी होते. अनिष्ट, अनौचित्यावर कठोर प्रहार करताना त्यांची लेखणी कधीच थरथरली नाही, पण भाषेचे साधन, सौष्ठव, सभ्यता, शालीनता, यांच्या मार्यादांचाही त्यांनी कधी अतिक्रम केला नाही.
शाश्वत नीतिमूल्ये, सुसंस्कार यांचा पाझर तर त्यांच्या लेखणीतून अखंड स्त्रवत असे. संपादकीय आणि विविध विषयांवर विविध नियतकालिकांमधून त्यांनी दीर्घकाळ केलेले स्तंभलेखन असो. साध्या, सोप्या, सुगम आणि नेमक्या शब्दांमध्ये अर्थगर्भ लिखाण कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच बापूसाहेबांचे लेखन साकार करीत आले. म्हणूनच सध्याच्या काळात पत्रकारितेत फोफावलेल्या सवंगपणाने आणि उथळपणाने ते व्यथित होत असत. दोनच वर्षांपूर्वी राष्ट्रीय पत्रकारिता न्यासातर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकाराचा नामवंत पुरस्कार त्यांना सांगली येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या ज्येष्ठ पत्रकार बापूराव लेलेंचे सहकारी, समकालीन या नात्यानेच बापूसाहेब भिशीकर संपादक म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरले. त्यामुळे बापूराव लेलेंच्या नावाचा पुरस्कार बापूसाहेब भिशीकर यांना हा एक अपूर्व समसमा संयोग होता. त्या समारंभात बापूसाहेबांनी केलेल्या भाषणामधून त्यांनी आजच्या पत्रकारितेवर केलेले भाष्य अतिशय मोलाचे होते. नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे त्यांनी आपल्या भाषणातून मुक्तपणे स्वागत केले, पण त्याचबरोबर यांत्रिक झगमगाटाने दीपून न जाण्याचा, पत्रकारितेच्या मूलमंत्रांचा विसर पडू न देण्याचा संदेशही आजच्या पत्रकारांना देण्यास ते विसरले नाहीत. एखाद्या मोठ्या समारंभात बापूसाहेबांनी केलेले बहुधा ते शेवटचेेच मोठे भाषण असावे. व्यक्तिगत संवादातून आजच्या साऱ्या ज्वलंत विषयांवर मनोज्ञ चर्चा करण्याचा क्रम आणि उत्साह मात्र त्यांनी अखेरच्या क्षणांपर्यंत टिकविला हे विशेष. त्यांच्यापाशी बसून ही उत्साही उद्बोधक चर्चा करण्याचे भाग्य मला अगदी अलीकडच्या दिवसांपर्यंत लाभत राहिले.
सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणाबाबतची त्यांच्या मनात दाटून राहिलेली खंत त्यांच्या गप्पांमधून जाणवत असे, पण तरीही त्यांचा सूर आणि त्यांच्या वृत्ती कधीही निराशावादाकडे झुकल्या नाहीत हे विशेष। कार्यकर्त्यांमधील अभ्यासूवृत्ती, व्यासंग कमी होत चालल्याबद्दल जशी त्यांच्या मनात व्यथा होती, तशीच अनौपचारिक स्नेहसंबंध, परस्परसंवाद, संपर्क आणि त्यातून परस्परांबद्दल निर्माण होणारा विश्वास यांना ओहोटी तर लागली नाही ना ही शंका त्यांना भेडसावत असे. अडवाणी- अटलजी यांच्याविषयी सरसंघचालकांनी दिलेल्या मुलाखतीवरून प्रसारमाध्यमांनी माजवलेला गदारोळ, अडवाणी यांनी जिनांविषयी, पाकिस्तान दौऱ्यात, काढलेल्या उद्गारांच्या विषयावरून स्वयंसेवकांच्या वर्तुळात निर्माण झालेले अस्वस्थतेचे वातावरण, अन्यान्य राजकीय पक्षांबरोबरच भारतीय जनता पक्षातही प्रसंगी अनुभवाला येणारे निराशाजनक प्रसंग अशा अतिशय नाजूक विषयांबाबत त्यांनी प्रत्यक्ष चर्चेत तेसच पत्रांच्या द्वारे केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी सदैव पथदर्शक राहील.
नव्वदी उलटल्यानंतरही शरीर मनाची सर्व गात्रे बऱ्यापैकी सक्षम स्थितीत राहिली हा अर्थातच त्यांच्या सात्विक आणि तपस्वी जीवनशैलीचा परिणाम होता। शेवटपर्यंत त्यांची लेखणी लिहिती होती हे विशेष. पत्रकार या नात्याने राजकारणावर जितक्या अधिकारवाणीने ते बोलू- लिहू शकत, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच अधिकाराने ते अध्यात्म सांगत- लिहित राहिले. हा अधिकार त्यांना अर्थातच व्यासंगाने आणि तपश्चर्येने प्राप्त झाला होता.
सर्वार्थाने बापूसाहेब "एक दीपस्तंभ' या विशेषणाला पात्र ठरतात. पत्रकार म्हणून स्वयंसेवक म्हणून आणि माणूस म्हणूनही त्यांचे जीवन सदैव दीपस्तंभासारखेच मार्गदर्शन करीत राहील, यात शंका नाही.