Saturday, June 11, 2011

दलित राजकारण आणि शरद पवार

महाराष्ट्रात कधी नव्हे एवढे महत्त्व आज दलित राजकारणाला आले आहे. दलित नेते रामदास आठवले यांनी भीमशक्ती शिवशक्तीच्या मागे उभी केली आहे. यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण करणा-यांच्या मक्तेदारीला मोठा हादरा बसला आहे. आणि स्वाभाविक गोचीही झालीय.

9 जून रोजी मुंबईत भीमशक्ती शिवशक्तीचा महामेळावा झाला. दुस-या दिवशी मुंबईतच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाचे निमित्त करून समता हक्क परिवर्तन परिषदेच्या नावाने कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत गेल्याने राष्ट्रवादी पूर्णत: गडबडून गेल्याचे मेळाव्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या देहबोलीतून दिसून आले.

स्वार्थाच्या साठमारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत समाजात जातीभेदाचे विष आणखी जहरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेबांचे विचार समाजात दरी निर्माण करण्यासाठी आपल्या सोयीने सांगीतले जात आहे. बुद्धीभेद केला जातोय. रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपशी जवळीक साधून बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचे सांगण्याचा प्रयत्न होतोय. वस्तुस्थिती अशी आहे काय? डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रकाशात या विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

महापुरुषांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांचा कधीही तुकड्या-तुकड्यांत विचार करायचा नसतो. तसे केल्याने नुकसानच होण्याची अधिक शक्यता असते. महापुरुषांचे जीवनविचार समग्रतेने समजून घ्यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक होते. संपूर्ण समाज एकसंध व्हावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले. स्पृश्यास्पृश किंवा दलित सवर्ण भेद मिटावा यासाठी बाबासाहेबांनी सतत प्रयत्न केला. त्यावेळच्या सवर्णांच्या हेकटपणामुळे आणि अविचारामुळे बाबासाहेबांनी याच मातीत जन्मलेल्या बुद्ध धर्माचा स्वीकार केला. दलित समाजात परिवर्तन येण्यासाठी विष्णू, शिव, राम, कृष्ण आदी देवतांना आता स्थान नको असे सांगितले. अंध रुढींच्या जोखडातून बाहेर काढण्याच्या दृष्टीनेही अनेक नियम सांगीतले. या कृतीमागे वर्षानुवर्षे गावकुसाबाहेर राहिलेल्या समाजाला सन्मान मिळवून देण्याचा बाबासाहेबांचा उद्देश होता, समाजातील दरी अधिक रूंद करणे नव्हे.
बाबासाहेब म्हणतात, '' ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बौद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. ''
या उद्गारातून बाबासाहेबांचे एकसंध समाजाबद्दलचे विचार समोर येतात. बाबासाहेब म्हणतात, '' ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही. माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या दुवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही. ''
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांचे वक्तव्य पाहा. दलितांनी शिव, गणेश, देवी, राम, कृष्ण यांची पूजा अर्चा करू नये, असे बाबासाहेबांनी म्हटल्याचा दाखला पवारांनी दिला. शिवसेनेशी अनेकदा जवलिक करण्याचा प्रयत्न केलेल्या पवार यांनी केवळ राजकारणासाठी समाजातील दरी वाढविण्याचा प्रयत्न करवा, हे दुर्दैवी आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर हा गाढला गेलेला वादही वाढविण्याचा प्रयत्न पवारांनी केला.
गेल्या 60 वर्षात कॉंग्रेसने दलितांच्या भौतिक उन्नत्तीसाठी काय केले ? या प्रश्नाचे उत्तर निराशाजनक आहे. अलीकडच्या 25/30 वर्षांत भाजप शिवसेनेसारख्या पक्षांना जातीयवादी ठरवून दलित समाजाचा केवळ स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यात आला नाही काय ?
हिंदुत्ववादी हे जातीयवादी आहेत, हे गृहितकृत्यही फोल ठरले आहे. आकडेवारी काढून पाहा... दलितांवर जेवढे अत्याचार झाले आहेत त्यामागे बहुतेक वेळा कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक असणारेच गावगुंड असल्याचे दिसून येते. जातीभेद पाळणारे बहुतेक रुढीवादी लोक कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक असणारे असतात, अशी कबुली अनेक दलित कार्यकर्ते खासखीत देतात. मुस्लिमांविषयी देशाचे काय धोरण असावे, याबद्दलचे डॉ. बाबासाहेबांची विचारसूत्रे काढून पाहा. कसाब-अफजल गुरूसारख्या प्रवृत्तींना पाठिशी घालणा-या प्रवृत्तींबद्दल बाबासाहेबांनी कधीच सावध करून ठेवल्याचे दिसेल.

बाबासाहेब म्हणतात, '' हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे. सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते. ''

बाबासाहेबांनी दलितांना सावध करून ठेवले आहे. बाबासाहेब म्हणतात, '' कॉंग्रेस जळते घर आहे, त्यात जाऊ नका. '' या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांच्या निर्णयाकडे पाहिले पाहिजे. हिंदुत्व विचाराच्या पक्षांना त्यांच्या पाकिस्तान आणि मुस्लिम लांगुलचालनविरोधी भूमिकेबद्दलच जातीयवादी संबोधण्याची फॅशन आहे. या संदर्भात आंबेडकरप्रेमींची अडचण असण्याचे काहीही कारण दिसत नाही. शिवसेना भाजपला भीमशक्तीसोबत यायला संकोच नसेल तर हे सामाजिक बदलाचे सुचिन्ह मानून स्वागत करावे की विरोध हे सर्वस्वी ६० वर्षे 'दलितच' राहिलेल्या समाजाला ठरवायचे आहे.

आपले मत

तुम्हाला काय वाटतं ? रामदास आठवले यांनी चूक केली आहे ? सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून बाहेर पडून पुन्हा त्यांच्या आश्रयाला जाणार्या पवारांनी आठवले यांना सल्ला देणे योग्य वाटते ? या विषयावरील तुमची मते पुढील चौकटीत अवश्य लिहा.

Wednesday, June 8, 2011

नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे

मूळ मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. काळ्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यासाठी सुरू झालेल्या स्वामी रामदेव यांच्या आंदोलनाला मूळ मुद्दयावरून दूर नेण्यात काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकार काळ्या पैशाच्या मुद्दयावर कचखाऊ भूमिका घेत आहे, त्यावरून काँग्रेस भोवतीचा संशय अधिक गडद होताना दिसत आहे. काळ्या पैशावरून या आधीच गांधी परिवाराकडे संशयाची सुई वळल्यामुळे आणि अण्णा- बाबा या मुद्दयावर अधिक आक्रमक झाल्याने काँग्रेस चवताळली आहे. यातून सुटण्याचा अन्य कोणताही मार्ग काँग्रेसपुढे शिल्लक नाही हे आता आणखीनच स्पष्ट झाले आहे.
काळ्या पैशावर चर्चा होत रहाणे काँग्रेसच्या सोयीचे नाही. त्यामुळे काँग्रेसने रामदेव बाबा, त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण, सुषमा स्वराज, आरएसएस यांच्यावर बेछूट आरोप करणे चालू ठेवले. त्यात चप्पल उगारल्याची घटनाही काँग्रेससाठी जणु वरदान ठरली. आणि याने उत्साहित झालेल्या दिग्विजय सिंग यांनी आचार्य बालकृष्णन यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अत्यंत शेलक्या शब्दांत त्यांचा उद्धार करणे सुरू केले. दरम्यान आचार्य बालकृष्ण प्रकट झाले आहेत. माझा जन्म भारतात झाला. माझे आई वडील नेपाळचे आहेत. परंतु माझे शिक्षण भारतात झाले आहे. मी भारतातच सेवा करतोय. मी मरेपर्यंत भारतातच राहीन, असे आचार्य बालकृष्ण यांनी सांगीतले आहे. आता काँग्रेसने हे प्रकरण ताणले तर काँग्रेसच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सांस्कृतिक दृष्टया आणि आध्यात्मिक दृष्टया भारत-नेपा एकच आहेत. देशांच्या सीमा ध्यानात घेऊन बोलायाचे तर आज नेपळमधे ४३ लाखाहून अधिक भारतीय आहेत आणि भारतात ७० लाखापेक्षा अधिक नेपाळी भारतीय नागरिक आहेत. तिबेट गिलंकृत केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून चीन नेपामध्ये भारतविरोधी विष कालवत आहे, अशा वेळी क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी राजकारणी नेत्यांनी नेपाली नगरिकत्वाचा मुद्दा काढून नेपला भारतापासून दूर लोटण्याचे पाप केले आहे. बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरीविरुद्ध मात्र गठ्ठा मतांसाठी हे राजकारणी जनतेची दिशाभूल करीत असतात हेही ध्यानात घेणे आवश्यक आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या सर्वेसर्वा यांच्या नागरिकत्वासंबंधीची तथ्ये अधिक गंभीर आहेत. नागरिकत्वाच्या मुद्दयावर आचार्य बालकृष्ण यांची बाजू सोनिया गांधी यांच्यापेक्षा उजवी आहे. कारण इंग्रजांमुळे नेपाळ प्रांताला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळालेला असला तरी नेपाळ सांस्कृतिकदृष्ट्या भारताला अतिशय जवळचा आहे. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान असताना १९५३ साली नेपाळने भारतात विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली होती, हे उल्लेखनीय. भारतातून नेपाळात आणि नेपाळातून भारतात यायला जायला पारपत्र लागत नाही ते यामुळेच. पशुपतीनाथासारखी तीर्थक्षेत्रे भारतीयांसाठी श्रद्धेय आहेत. इतकेच नाही तर पशुपतीनाथाचे पुजारी हे परंपरेने भारतीय आहेत. अशी सांस्कृतिक नाळ असल्यामुळे बालकृष्ण नेपाळी वंशाचे असल्याचा मुद्दा तसा भारतीयांच्या दृष्टीने गौण आहे. घटनेतल्या तरतुदीनुसारही आचार्य बालकृष्ण हे भारताचे नागरिक ठरतात. परंतु सोनिया गांधी यांच्याबाबतीत अशी स्थिती आहे काय.
इटलीचे राजदूत यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्रातून 27 एप्रिल 1983 रोजी लिहिलेल्या पत्रातून सोनिया गांधी यांनी केलेली फसवणूक उघड केली आहे. अ‍ँटोनिया नाव बेमालूमपणे बदलून सोनिया नाव कसे लावले गेले ते या पत्रातून उघडे पडले आहे. पाहा... http://www.janataparty.org/annexures/ann05p32.html
सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढविताना जी कागदपत्रे सादर केली आहेत, ती खोटी ठरली आहेत. त्यांनी शिक्षणाबद्दलची दिलेली माहितीही खोटी ठरली आहे. अर्थातच या गोष्टींची भरपूर चर्चा झाली आहे. याचे ठोस पुरावेही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. स्वीस बँकेशी आणि रशियन गुप्तचर संस्थेशी असलेले संबंध, पोप आणि व्हॅटिकनशी असलेले सोनियांचे संबंध आणि त्यांचा नागरिकत्वाचा मुद्दा या साऱ्याच गोष्टी काँग्रेसला अडचणीच्या ठरू शकतात. परंतु काँग्रेसला अडचणीच्या ठरतील अशा मुद्दयांवर खुबीने बगल देण्याची कला अवगत आहे. त्यामुळे या मुद्दयावर काँग्रेस कायम मूग गिळून असते. आता दिग्विजय सिंग यांनी आचार्य बालकृष्ण यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा काढला आहे की जो काँग्रेसने अधिक ताणला तर काँग्रेसच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेला येणे, ही गोष्ट काँग्रेसला फायद्याची नाही. त्यामुळे आचार्य बालकृष्ण यांच्या नागरिकत्त्वाचा मुद्दा काँग्रेस अधिक ताणणार नाही. त्याऐवजी रामदेव बाबा यांच्यामागे अनेक तपासण्यांचा ससेमिरा लावून हैराण करेल याची शक्यता अधिक आहे.


स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी















Sunday, June 5, 2011

स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी



काळा पैसा भारतात आणण्यातला सर्वात मोठा अडसर सोनिया गांधी यांचा आहे, हे काही आता लपून राहिलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह आणि निपक्षपाती म्हणून मान्यता असलेल्या दोन स्त्रोतांनुसार सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचा स्वीस बॅंकेत प्रचंड पैसा आहे. सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर केले आहे. स्वीत्झर्लंडमधील सर्वाधिक खपाचे आणि लोकप्रिय असलेल्या "Schweizer Illustrierte या नियतकालिकेने 11 नोव्हेंबर 1991च्या अंकात याचे रहस्योद्‌घाटन केले होते. स्व. राजीव गांधी यांच्या गुप्त खात्यात 2.2 बिलियन डॉलर असल्याचे त्यात म्हटले आहे.

दुसरी विश्वासार्ह संस्था आहे केजीबी. ही रशियाची गुप्तचर संस्था आहे. केजीबीच्या कागदपत्रांवर आधारित संशोधन पुस्तिकेत रशियन पत्रकार युवेजिना अल्बटस्‌ यांनी म्हटले आहे की, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते (1985) तेव्हा त्यांनी गांधी कुटुंबावर आर्थिक कृपा केल्याबद्दल केजीबीकडे कृतज्ञता व्यक्त केली होती.

विख्यात स्तंभलेखक ए.जी. नूरानी यांनी पहिल्यांदा 1988 मध्ये ही बाब समोर आणली होती. नंतर 2001 मध्ये जनता पार्टीच्या संकेतस्थळावर सुब्रमण्यम्‌ स्वामी यांनी या संदर्भातील पुरावे प्रसिद्ध केले. न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये यावर 2009 मध्ये विस्तृतपणे छापून आले आहे. इंडिया टुडे या भारतातील प्रसिद्ध नियतकालिकेत राम जेठमलानी यांनी यावर विस्तृतपणे लिहिले आहे. आजवर भारतात आणि भारताबाहेर कुठेही गांधी कुटुंबाने लेखक, प्रकाशक यांना कोर्टात खेचले नाही किंवा बदनामीचा खटला दाखल केला नाही.

(मोरारजी देसाई यांनी वयाच्या 87व्या वर्षी 50 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा अमेरिकेत दाखल केला होता. ते सीआयए या अमेरिकी गुप्तचर खात्याचे एजंट असल्याचे सेमर हेर्ष या लेखकाने आपल्या पुस्तकात लिहिले होते. आरोप सिद्ध झाला नाही आणि त्यामुळे देशाची आणि मोरारजींची अब्रू वाचली.)

2008 साली सोनिया गांधी या अमेरिका भेटीला गेल्या होत्या. त्यावेळी द न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकेतील प्रतिष्ठित दैनिकात एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. अनिवासी भारतीयांनी दिलेल्या त्या जाहिरातीत सोनिया गांधी यांच्या कुटुंबाचे स्वीस बॅंकेत खाते असल्याचे नमूद केले होते. यामुळे व्यथित होऊन परदेशस्थ कॉंग्रेसप्रेमींनी 100 दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला, परंतु नंतर काही दिवसांनी खटला मागे घेण्यात आला. अशा स्थितीत कांग्रेसचा कुणी नेता सोनिया गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे शक्यच नाही. कांग्रेसचे अस्तित्वच धोक्यात येईल अशी भीती कांग्रेसच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. अन्य पक्षीय नेत्यांचा काहीच काळा पैसा नाही असे कोणी म्हणणार नाही, परंतु अन्य पक्षांनी उघडपणे काळ्या पैशाला राष्ट्रिय संपत्ती घोषित करायला पाठिंबा दर्शविला आहे.

4/5 जूनच्या मध्यरात्री रामलीला मैदानावर केंद्र सरकारने पोलीस बळाचा वापर केला. त्यामुळे स्वामी रामदेव यांनी सुरू केलेले काळा पैसाविरोधी आंदोलन चिघळले आहे. रामदेव बाबा यांनी आंदोलन चालूच राहील अशी घोषणा ऋषीकेष येथून केली आहे. या आंदोलनाला आणीबाणी विरोधी आंदोलनासारखे रूप येईल की आंदोलन विरून जाईल, या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण आहे.

एक लाख 80 हजार कोटी रुपयांच्या टू जी भ्रष्टाचाराविरोधात एका अक्षरानेही लेखणी न झिजवणारे पत्रकार रामलीला मैदानावर आंदोलनाच्या तयारीसाठी 14 कोटी खर्चले म्हणून गळा काढताना दिसले. रामदेवबाबा यांच्यामागे आरएसएस आहे. ते महाठग आहेत. अशा आरोपांची मालिकाच कॉंग्रेसचे महासचिव आणि लादेनचा उल्लेख 'ओसामाजी' असे करणाऱ्या दिग्विजय सिंग यांनी केल्याचेही देशाने पाहिले. रामदेव बाबांच्या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबद्दल अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आणि पोलीस कारवाईनंतर अण्णा हे बाबांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसले. साध्वी ऋतंभरा यांच्या रामलीला मैदानावरील उपस्थितीला आक्षेप घेण्यात आला. सर्व पंथ संप्रादायाचे धार्मिक नेते रामदेव बाबांच्या समर्थनार्थ रामलीला मैदानावर आले. शाहरूख, सलमानसारखे नट उत्स्फूर्तपणे बाबांच्या विरोधात समोर आल्याचेही दिसले. कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मौन आणि शेवटी रामदेव बाबा यांनी त्यांच्यावर केलेला आरोप असा घटनाक्रम समोर आला.

स्वीस बँक आणि अन्य ठिकाणी भारतीय नेत्यांनी प्रचंड काळा पैसा दडवला आहे. त्या पैशाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावी यासाठी स्वामी रामदेव यांनी देशात सुमारे 1 लाख किलोमीटरचा प्रवास केला. गेल्या दोन वर्षात जागतिक स्तरावर निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती आणि स्वीस बँकेच्या नव्या भूमिकेमुळे भारतीयांचा काळा पैसा भारताला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा मोक्याच्या वेळी रामदेव बाबा यांनी आंदोलन हाती घेतल्याने लोकांच्या मनात एक आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे साधारण जनमानस रामदेव बाबा यांच्या मागे आहे. अशा वेळी आश्चर्यकारकपणे माध्यमांत प्रभावी असणारा एक गट रामदेव बाबा यांनी फक्त योगच शिकवावे, त्यांनी राजकारणात उतरू नये असा सूर लावताना दिसतो आहे. शेवटी सोनिया गांधी यांच्यावर बाबा यांनी आरोप केल्याने 'पहा बाबांच्या मागे संघ परिवार आहे' हे आतातरी सिद्ध झाले की नाही असाही सूर उमटत आहे.



गेल्या दोन तीन वर्षातील घटना पाहा. सुरूवातीला 2 जी स्पेक्ट्रममध्ये घोटाळा नाहीच, अशी भूमिका कांग्रेसने घेतली. सर्वोच्च न्यायालयाने फटकारून हस्तक्षेप केल्यानंतर मग कुठे कारवाई होताना दिसते. राष्ट्रकुल घोटाळ्याचेही असेच झाले. आता काळ्या पैशाचा मुद्दयावर सरकारने रामदेव बाबांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. समिती वगैरे नेमून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. बाबा बधले नाहीत तेव्हा बलप्रयोग करण्याशिवाय कांग्रेसपुढे पर्यायच राहिला नाही. कपिल सिब्बल किंवा दिग्विजय सिंग हे प्यादे आहेत, याची रामदेव बाबांना पूर्ण कल्पना आहे. सोनिया गांधी यांचे नाव येते तेव्हा भले भले पत्रकारही मौन धारण करतात. भारताचे माजी गुप्तचर प्रमुख अजित दोवल यांच्या नेतृत्त्वाखालील टास्क फोर्सने काळ्या पैशावर प्रकाशित केलेल्या शोध अहवालात संशयाची सुई सोनिया गांधी यांच्याकडे जाताना दिसते. त्या अहवालाला रामदेव बाबांच्या ताज्या आरोपामुळे बळ मिळणार आहे. आता विषय सोनिया गांधींपर्यंत आल्यानंतर ते येथेच थांबेल, अशीच अधिक शक्यता आहे. रामदेव बाबांसारख्या केवळ 45 वर्षीय योग्याला राजकारणाची ही दलदल कितपत झेपेल, हे काळच ठरवेल. त्यासाठी काही काळ प्रतिक्षा मात्र करावी लागणार आहे.



राष्ट्रपुनरुत्थानाच्या युद्धात रामदेव बाबा विजयी योद्धा संन्याशी म्हणून आर्य चाणक्यासारखे उदय पावतील की हुतात्म्यांच्या मालिकेतील एक तेजस्वी योगी म्हणून इतिहासाच्या पुस्तकात राहतील हे आजच्या घडीला सांगणे खूप अवघड आहे. जनता जनार्धनाचा कल काय राहील यावरच हे अवलंबून असेल कारण लोकशाहीमध्ये जनतेच्या लायकीनुसारच त्यांना राज्यकर्ते मिळतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. जनतेचे मन संस्कारित करण्याचे ऐतिहासिक कार्य केल्यासाठी मात्र ते सदैव लोकांच्या स्मरणात राहतील, हे निश्चित.



आपले मत

तुम्हाला काय वाटते... काळा पैसा देशात आणण्यात रामदेव बाबांना यश येईल ? आन्दोलन विरून जाईल की ...? तुमचे मत अवश्य मांडा.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी