Monday, October 31, 2011

कृष्णाचा मॅनेजमेंट फंडा

माणसासाठी सर्वात अवघड काम काय असेल ? आपले कर्मक्षेत्र आणि कुटुंब यात ताळमेळ घालणे. या ठिकाणी भले भले अपयशी होतात. जे बिझनेसमध्ये पडले त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याचे तर ज्यांनी कुटुंबाकडे लक्ष्य दिले ते बिझनेसमध्ये मागे पडल्याचे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पैशाच्या भुकेने आपल्या प्रेमाच्या भुकेवर मात केल्याचे दिसते. आज घरातील लोकांसमवेत बसून जेवण करणे, गप्पा मारणे वगैरे आपण विसरूनच गेले आहोत. कुटुंबं संकुचित होण्यामागे हीच कारणं आहेत. व्यक्तिगत लाभ, उन्नती आणि आनंदाची भावना यालाच आपण विश्व समजून बसत आहोत.
एकत्र कुटुंबाची शकले होणे याच व्यावसायिक मानसिकतेचा परिणाम होय. कुटुंब ही आपली संपत्ती आहे, ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. स्वतासाठी अर्जित केलेले अपार यशही तोवर आपल्याला आनंद देत नाही जोवर आपण ती सर्वांमध्ये वाटत नाही.
कुटुंबासाठी वेळ द्या. आठवड्यातून, महिन्यांतून एक दिवस असा काढा की, जो केवळ आपल्या परिवारासाठी असेल. आईवडिलांसोबत बसा, त्यांच्याशी चर्चा करा, नवरा बायको यांनीही आपल्यासाठी वेळ काढले पाहिजे. मुलांसाठीही वेळ द्या. एकत्र जेवण करा. कुठेतरी फिरायला जा. धार्मिक स्थानांची यात्रा करा. अशाने तुमच्यात अदभुत ऊर्जा निर्माण होईल.
राम आणि कृष्ण यांनीही आपल्या कुटुंब जीवनाला दिव्यत्व प्राप्त करून दिले होते. कृष्णाचे जीवन पाहा. आई वडिल, भाऊ वहिनी, अनेक पत्नी आणि मुले. किती मोठे कुटुंब होते. तरीही सारे कृष्णावर प्रसन्न होते. कोणाचीच तक्रार नव्हती. त्यांनी सर्वांना पुरेसा वेळ दिला. कुणी सामान्य माणूस असता तर तो हे सोडून पळून गेला असता नाहीतर कुटुंबातच बुडाला असता. पण कृष्णाने असे केले नाही. समाजाची कामे केली पण कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. किंवा कुटुंबाची काळजी करताना समाजाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी जीवनात काही नियम केले होते. सकाळी लवकर उठून आई वडिलांचा आशीर्वाद घेणे, पत्नींशी चर्चा करणे, मुलांना शिक्षण वगैरे अशी व्यवस्था होती. सदैव सर्वांशी संवाद असायचा. आपणही कृष्णाकडून या गोष्टी शिकणे आवश्यक आहे. परिवारासाठी काही वेळ काढा. दिनक्रमच अशा रीतीने सेट करा की घरातील कुणीही अस्पर्श राहणार नाही. याचवेळी देश, धर्म आणि समाज यांच्याप्रतीही सजग राहा. अन्यथा जगण्याला साचलेपण येईल. जगण्याला अर्थच राहाणार नाही. ध्यानात ठेवा, विस्तार हेच जीवन आहे आणि संकुचितता म्हणजे मृत्यू.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी