Monday, November 7, 2011

नास्तिकांना युधिष्ठिराने मूर्ख का म्हटले असेल ?

'नास्तिक: कच उच्यते? की मूर्ख:?'
'नास्तिक कोणाला म्हणावे? मूर्ख कोण?'
युधिष्ठिराचे उत्तर :
'नास्तिको मूर्ख: उच्यते।'
मूर्ख, मूढ, गोंधळलेला, भ्रमिष्ट, अज्ञ, बालिश, वैधेय: व यथाजात: इतक्या शब्दांनी मूर्खाला संबोधिले जाते.
नास्तिक, नास्तिकता, मिथ्यादृष्टि: हे समानार्थी शब्द आहेत.
जे ईश्‍वराला मानीत नाहीत ते नास्तिक. या नास्तिकांना राजा युधिष्ठिराने मूर्ख का म्हटले असेल?
जे जे श्रद्धावंत असतात, ईश्‍वराला मानतात, जे या विश्‍वनिर्मात्या शक्तीला, तिच्या अस्तित्वाला मानतात ते सर्व आस्तिक मूर्ख असतात, असे नास्तिकही मानतात! मग ग्राह्य काय आणि अग्राह्य काय? कोण बरोबर, कोण चूक हे कसे ठरवायचे?
जे स्वत:ला पुरोगामी, विज्ञानानिष्ठ, बुद्धिवादी समजतात ते स्वत: भूषण म्हणून नास्तिक समजतात. नास्तिक झाल्याने किंवा तसे जाहीर केल्याने लोकांना आपली वेगळी ओळख राहील असे त्या नास्तिकांना वाटते व जे बुद्धिमान नाहीत त्यांना वाटते आपण नास्तिक म्हणवून घेतले तर लोक आपल्याला बुद्धिमान व नास्तिक म्हणून ओळखतील. एखाद्या पुरोगामी नास्तिकाला जे अनुयायी मिळतात ते या दुसर्‍या कोटीतील असतात. एखाद्या पुरोगामी चळवळीत सामील होऊन, 'लाल निशाण' हाती घेऊन एखादा मोर्चा काढला की, हल्ली कोणालाही कमी श्रमात नास्तिक व पुरोगामी या दोन पदव्या अगदी सहज मिळवता येतात!
आजवरच्या एकाही नास्तिक व पुरोगामी चळवळीने राष्ट्रव्यापी स्वरूप धारण केल्याचा इतिहास नाही!
परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे जे कोणी तथाकथित नास्तिक असतात, ते तरी खरेखुरे 100 टक्के नास्तिक असतात काय?
ईश्‍वरावर श्रद्धा नसते म्हणून कोणी जरी नास्तिक होत असला तरी त्याची कशावर तरी श्रद्धा असतेच! जगातील कोणताही लहानमोठा प्राणी श्रद्धेशिवाय जगूच शकत नाही. कारण ही सारी सृष्टी, हे सारे विश्‍व मूळ श्रद्धेतूनच जन्माला आले आहे. ही विश्‍वोत्पत्तीच्या मुळाशी असलेली मूळ श्रद्धा सनातन व नित्यनूतन असते व मनुष्य व इतर सृष्टी ही मर्त्य व अल्पायुषी असते. श्रद्धा अनंत व मनुष्य सान्त असतो. मनुष्य गेला तरी श्रद्धा राहतेच. तात्पर्य, या श्रद्धेवाचून कोणालाही जगता येत नाही व या श्रद्धेला तसा कोणता पर्यायही नाही; म्हणून जगात कोणीही नास्तिक नाही!
जगात जरी कोणी श्रद्धाशून्य नसले तरी, 'आम्ही ईश्‍वर मानीत नाही' असे म्हणणारा एक नास्तिकांचा वर्ग असतोच. या नास्तिकांचा मूळ पुरुष म्हणजे प्राचीन बुद्धिवादी पंडित चार्वाक हा होय. हे बुद्धिवादी सगळे कालप्रवाहात वाहून नष्ट झाले. ना यांना यांचा नास्तिकवाद कधी विश्‍वव्यापी करता आला, ना यांना कुठच्या देशावर वा कुठच्या राज्यावर सत्ता गाजवून राज्य करता आले! ना त्यांच्या परंपरेला कधी जनमताचा पाठिंबा मिळाला! श्रद्धेच्या या जगात हे नास्तिकवादी अधून मधून डोके वर काढीत असतात इतकेच.
हे नास्तिक 'ईश्‍वरावर श्रद्धा नाही' असे जाहीरपणे नेहमी सांगत असतात किंवा त्यांना 'नास्तिक' म्हणून घेण्यात अभिमानही वाटतो. त्यांचे मत हे तरी त्यांची श्रद्धाच असते ना? नास्तिक ईश्‍वर मानीत नसले तरी, ते स्वत:ला तरी मानतातच ना? हे 'स्वत:ला मानणे' म्हणजेच श्रद्धा असते! नास्तिकाची ईश्‍वरावर, परंपरेवर, संस्कृती व संस्कार यांच्यावर श्रद्धा नसली तरी ते कोणता जो पुरोगामी 'इझम' मानतात त्याच्यावर तरी त्यांची श्रद्धाच असते ना? अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्याचा ज्यांनी ज्यांनी विडा उचलून आपले सारे आयुष्यच या कार्याला वाहून घेतले, ते नाइलाज म्हणून की अतूट श्रद्धेमुळे? 'मी नास्तिक आहे, मी ईश्‍वर मानीत नाही' ही सर्व विधाने श्रद्धेतूनच प्रकट होत असतात. हे त्या बुद्धिमान नास्तिकांनाही पटलेलेच असते; पण ते मान्य करण्याच्या प्रामाणिकपणाचा अभाव त्यांच्याकडे असतो!
मनुष्याची समजण्याची क्षमता फार मर्यादित असते, म्हणून प्रतीकांची सोयीस्कर कल्पना सर्व जगभर मान्य झाली. त्यातूनच देवाची मूर्ती, मंदिरे, समाधी, क्रॉस, पीर, कबर, ग्रंथ, निवासस्थान ही प्रतीके मानवसमाजात रूढ झाली. क्रांतिकारक राष्ट्रपुरुष, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय नेता समारंभाचे दीप प्रज्वलन हे सर्व श्रद्धेतूनच प्रगट झाले.
कोणी एके काळी तो चार्वाक म्हणून गेला :
'भस्मीभूतस्य देहोऽयं पुनरागमनं कुत:।'
'भस्मीभूत झालेला देह, याला पुनर्जन्म कुठे-कसा?'
हे दिसणारे व तात्कालिक सत्य असते तरी अजूनही एखाद्याच्या प्रेतावर हार-फुले वाहतातच ना?
एखाद्या थोर व्यक्तीच्या निधनानंतर त्याला शोकसभेत श्रद्धांजली वाहिली जाते. ती श्रद्धेतून की श्रद्धाहीनतेतून?
शोकसभेत वाहिलेली शाब्दिक वा भावनिक श्रध्दांजली त्या मृत व्यक्तीला पोचते याला काय पुरावा?
शोकसभेतील गदगद आवाजातील भाषणांना श्रद्धांजली का म्हणतात?
त्या भाषणांना 'अश्रद्धांजली' का म्हणत नाहीत?
त्या शोकसभेतील शोकसंदेश किंवा ठराव हे नाइलाज म्हणून किंवा अश्रद्धेतून केलेले असतात काय? शोकसभा, पहिली पुण्यतिथी, शंभरावी पुण्यतिथी, तीनशेवी पुण्यतिथी, ज्ञानेश्‍वरांची सातशेवी पुण्यतिथी, संत एकनाथ महाराजांच्या 'एकनाथी भागवताची' पाचशेवी स्मरणगाठ, कोणाची जन्मशताब्दी ही सर्व नाटकी धावाधाव असते काय?
26 जानेवारी व 15 ऑगस्टला दरवर्षी सक्तीने तिरंगी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते, ती अश्रद्धेने, नास्तिकतेने, नाइलाज म्हणून देतात काय?
राष्ट्रध्वजाला दिलेली मानवंदना, काठीवरच्या तीन रंगातील कापडाला असते काय?
सार्‍या राष्ट्राचे सारसर्वस्व त्या तीन रंगी ध्वजात सामावले आहे याला बौद्धिक पुरावा कोणता?
एखादा राष्ट्राध्यक्ष पदग्रहण करण्यापूर्वी शपथ घेतो तीही श्रध्दा नसते काय? का ते नाइलाजाने केलेले एक दिखाऊ नाटक असते?
लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या अंत्ययात्रेला लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. ती सारी गर्दी अश्रद्धेतून जमली होती की श्रद्धेतून?
नास्तिकपणा स्वीकारायचा म्हणजे कार्यकारणभाव नाकारावा लागतो. परंतु प्रपंचात व व्यवसायात कार्यकारणभाव नाकारल्याशिवाय व्यवहारच करता येत नाही.
नास्तिक होणे सोपे असले तरी व्यवहारातील कार्यकारण भाव नाकारणे सोपे व सुलभ नसते. हे नास्तिकसुद्धा या कार्यकारणभावाच्या आश्रयानेच आपला व्यवहार करीत असतात. परंतु ते मान्य करण्याचा उमदेपणा त्यांच्याकडे नसतो. कारण ते दांभिक व अप्रामाणिक असतात?
सन 1986-87 च्या सुमाराची घटना असावी. पुण्यात एक पुरोगामी बुद्धिवादी गटाची परिषद आयोजिली होती. त्या परिषदेचे उद्घाटन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी करणार होते. अगदी उद्घाटनाच्या वेळीच पुण्यातील एक विद्वान, थोर पुरोगामी विचारवंत शहा यांचे निधन झाले! हे कळताच परिषदेचे सर्व मान्यवर तर्कतीर्थांसह कै. शहा यांच्या अंत्यदर्शनाला धावून गेले! तेथे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली!
येथे कोणाला श्रद्धांजली पुरोगाम्यांनी वाहिली?
येथे भस्मीभूतस्य कै. शहांच्या देहाला ती श्रद्धांजली पोचली असेल काय? त्या अचेतन देहाने ती चाहत्यांची शब्दसुमनांजली स्वीकारली असेल काय?
दीड-दोन वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक महाराष्ट्र विधानसभेत आणले जात नाही म्हणून, निर्मूलनच्या कार्यकर्त्यांनी जाहीर रीतीने स्वत:च्या थोबाडीत मारून घेतली होती! तीही अश्रद्धेने की, अंधश्रद्धेने की, पूर्ण श्रद्धेने?
व्यवहारात कार्यकारणभाव नाकारणे हा शुद्ध तर्कदुष्टपणा असतो. म्हणून नास्तिकांना युद्धिष्ठिराने मूर्ख म्हटले ते योग्य वाटते!
दाजी पणशीकर ...
साभार सामना

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी