Monday, July 2, 2012

सांस्कृतिक मुळांपासून तुटणारे काश्मीर

बलबीर पुंज 
सध्या काश्मीरमध्ये असलेल्या कथित शांतीमागे लपलेले नेमके सत्य काय आहे? काश्मीर खोर्‍याची पर्यटकांना सामावून घेण्याची जेवढी क्षमता आहे त्याच्या कितीतरी पट अधिक पर्यटक यंदा जम्मू-काश्मिरात आले, कुठेही काहीही अप्रिय घटना घडली नाही. परंतु, काश्मिरातील ही शांती खरोखरच स्थायी स्वरूपाची आहे काय आणि काश्मीरची संस्कृती आपल्या मूळ स्वरूपात परतली आहे असे आम्ही मानायचे काय? यामागचे कटु सत्य हेच आहे की, सध्या दोन्ही बाजूंनी युद्धविरामाची स्थिती आहे. एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे दहशतवादामुळे त्रस्त स्थानिक सामान्य जनतेकडून पाठिंबा मिळत नसल्यामुळे दहशतवादी सध्या ‘तात्पुरते’ निष्क्रिय आहेत आणि दुसरीकडे फुटीरवादाची समस्या सध्या भूमिगत आहे. गेल्या काही दशकांत काश्मीर खोर्‍यात जो प्रचंड सांस्कृतिक विनाश झाला आहे त्याबाबत केंद्र सरकार आणि उर्वरित भारताने तडजोडच केली आहे आणि ही सांस्कृतिक हानी भरून काढण्याचे प्रयत्न कधीही झालेले नाहीत. त्यामुळेच दोन्ही बाजूंनी ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती ठेवण्याचे धोरण राबवण्यात येत आहे.


माझ्या पत्रकारितेतील चाळीस वर्षांहून अधिक कालखंडात प्रथमच हा लेख मी अन्यायग्रस्त, भुक्तभोगी म्हणून लिहीत आहे. जी काश्मीरची वेदना आहे, जी उर्वरित भारताची वेदना आहे, त्याच्याशी माझी व्यक्तिगत वेदनाही जुळलेली आहे. अगदी इतक्यातच मी काश्मीरच्या दौर्‍यावर गेलो होतो. तेव्हा एक हिंदू या नात्याने मी अनुभवले की, काश्मीरशी जे माझे भावनात्मक नाते होते त्याची मुळेच कापून टाकण्यात आली आहेत. माझ्याबरोबर नोएडा निवासी विनोद रेखी आणि त्यांचे कुटुंबीयही होते. त्यांच्याही पदरी निराशाच पडली.

१९८० च्या दशकात मी जेव्हा काश्मिरातील ‘मटन’ येथील ‘मार्तंड’ मंदिरात गेलो होतो तेव्हा मला एक अतिशय सुखद अनुभव आला होता. ज्याप्रमाणे गया (बिहार) आणि हरिद्वारच्या पंडितांजवळ अनेक पिढ्यांचा लेखाजोखा असतो त्याचप्रमाणे मटन (मार्तंड) येथील शास्त्री-पंडितांजवळही कित्येक शतकांची वंशावळी होती. आमच्या कुटुंबीयांशी संंबंधित एका पंडिताजवळ माझ्या पूर्वजांचा इतिहास लिखित स्वरूपात होता. मी त्या नोंदी पाहून अतिशय रोमांचित झालो होतो. मात्र, दहशतवादामुळे तो इतिहास आमच्यापासून हिरावून घेतला आहे. काश्मिरी पंडितांच्या पलायनाबरोबरच आमच्यासारख्या हजारो हिंदूंचा इतिहास आणि त्याबरोबर जुळलेल्या परंपरा नष्ट झाल्या आहेत. एवढी प्रचंड परंपरा जिहादी दहशतवाद्यांनी संपविली, त्यांनी एवढी सांस्कृतिक हानी केली. परंतु, याबद्दल आमच्याकडील तथाकथित सेक्युलॅरिस्टांनी आपल्या तोंडातून निंदेचा एक शब्दही उच्चारला नाही.

दोन दशकांपूर्वी मटन तीर्थक्षेत्राशी संंबधित असलेल्या गावात काश्मिरी पंडितांची ४०० घरे होती. आज मोठ्या मुश्किलीने क्वचित एखादाच पंडित कायमस्वरूपी त्या भागात राहत असेल. पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे जम्मू आणि दिल्लीतील काही विस्थापित पंडे मंदिराशी संबंधित धर्मशाळेत राहून पूजाअर्चना सुरू ठेवतात.

आज ज्या ठिकाणी भगवान मार्तंडाची पूजा होते, प्रत्यक्षात तेथून तीन-चार किलोमीटर दूर डोंगरावर भगवान सूर्यदेवाचे भव्य मंदिर होते. या मंदिराची निर्मिती राजा ललितादित्य मुक्तपीडने इ. स. ७२४-६० मध्ये केली होती. इतके भव्य, रेखीव आणि सुंदर मंदिर संपूर्ण काश्मिरात दुसरे कुठलेही नव्हते. परंतु, कट्टर धर्मांध आणि जिहादी मानसिकतेने प्रेरित होऊन सुलतान सिकंदरने आपल्या कार्यकाळात (इ. स. १३८९-१४१३) काश्मिरातील अन्य मंदिरांसह सूर्यदेवाचे हे भव्य मंदिरही पार उद्ध्वस्त करून टाकले आणि तेव्हापासून केवळ एक पाषाण स्वरूपात आज ते मंदिर ‘अस्तित्वा’त आहे.

नीलमत पुराणात मार्तंड मंदिराचा झालेला उल्लेख हेच दर्शवितो की, ते मंदिर किती प्राचीन आहे. मटनपासून एक किलोमीटर दूर अंतरावर आणखी दोन मोठी मंदिरे होती. आज त्याचे स्वरूप बदलून टाकण्यात आले असून, मुसलमान तेथे ‘जियारत’ करतात. श्रीनगरपासून २७ किलोमीटर दूर अंतरावर तुलामुला गावात खीरभवानीचे प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिर आहे. देवी मातेला दूध आणि खीरचा नैवेद्य दाखविण्यात येत असल्यामुळे या मंदिराचे नावच खीरभवानी असे पडले आहे. मे-जून महिन्यातील पौर्णिमेच्या आठव्या दिवशी येथे भक्तांचा मेळा जमतो. या दिवशी सरोवरातील पाण्याचा रंग बदलतो. काही लोकांचे तर असेही म्हणणे आहे की, नव्वदच्या दशकात काश्मिरी पंडितांच्या पलायनापूर्वी सरोवरातील पाण्याचा रंग काळा झाला होता.

कोणे एकेकाळी तुलमुला हे पंडितबहुल गाव होते. आज तेथे मोजकीच पंडितांची कुटुंबे आहेत आणि तीही केवळ त्यांना मिळत असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या संरक्षणामुळेच. भक्तांना राहण्यासाठी बांधण्यात आलेली धर्मशाळा आज सीआरपीएफच्या ताब्यात आहे. बंदुकीच्या सावटाखाली या ऐतिहासिक मंदिरातील आध्यात्मिक वातावरण कसे राहत असेल याची कल्पना तरी करता येईल काय?

काश्मीरची संस्कृती कशाप्रकारे विकसित झाली, याचा उल्लेख आमच्या नीलमत पुराणात आहे. कश्यप मुनींना या भूमीचा निर्माता मानले जाते. त्यांचे पुत्र नील या प्रदेशचे पहिले राजा मानले जातात. जम्मू-काश्मिरात जे वर्तमान मुस्लिम आहेत ते मूळचे हिंदूधर्मीय असून अर्थात धर्मांतरित मुस्लिम आहेत. दस्तुरखुद्द शेख अब्दुल्ला यांनी ‘आतिषे चीनार’ या आपल्या आत्मकथेत ही बाब मान्य केली आहे की, त्यांच्या पणजोबांचे नाव बालमुकुंद कौल होते. अंतिम हिंदू राज्यकर्ती कोटाराणीच्या आत्मबलिदानानंतर पर्शियातून आलेला मुस्लिम धर्मप्रचारक शाहमीरने राज्यकारभार सांभाळला आणि येथूनच ‘दारुल-हरब’ला जबरदस्ती व हिंसेच्या माध्यमातून ‘दारुल-इस्लाम’मध्ये परिवर्तित करण्याची अखंड परंपरा सुरू झाली.

कोणे एके काळी काश्मीर वैदिक दर्शन तसेच बौद्ध आणि शैव मताचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित झाले होते. एवढेच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रातही ते अग्रणी होते. प्राचीन काळापासूनच काशी आणि काश्मीर शिक्षण, अध्ययनासाठी प्रख्यात होते. परंतु, त्यातही काश्मीर हे काशीपेक्षाही अधिक ख्यातिप्राप्त झाले. अनेक विदेशी इतिहासकार व विद्वान काश्मीरमध्ये विद्या संपादन करण्यात व तेथे निवास करण्यात स्वत:ला धन्य समजत असत. इ. स. ६३१ आणि इ. स. ७५९ मध्ये काश्मिरात येऊन संस्कृतचे अध्ययन करणार्‍या नसांग आणि ओउकांग या चिनी प्रवाशांच्या अनेक साहित्यकृतीत अशाप्रकारचे अनेक उल्लेख आढळतात. नसांगने लिहिले आहे, ‘‘काश्मीर येथील नागरिक शिक्षणाविषयी प्रेम असलेले आणि सुसंस्कृत आहेत. काश्मिरात प्राचीन काळापासून शिक्षणाबाबत आदर आणि प्रतिष्ठा आहे.’’ इ. स. ११०२ मध्ये महमूद गजनीसमवेत पंजाबच्या दौर्‍यावर आलेल्या अलबरूनी या प्रसिद्ध इतिहासकाराने लिहिले आहे, ‘‘काश्मीर हिंदू विद्वानांची सर्वांत मोठी पाठशाळा आहे. दूरदूरच्या देशातील लोक येथे संस्कृत शिकण्यासाठी येत होते आणि त्यातील बहुतांश लोक काश्मीर खोर्‍यातील स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि नैसर्गिक सौंदर्याची भुरळ पडून तिथेच स्थायिक होत असत.’’

इ. स. १५५६ ते १६०५ या बादशहा अकबराच्या कालखंडात काश्मीर मोगली राजवटीचे अंग बनले होते. सन १८१९ मध्ये महाराजा रणजितसिंह यांनी काश्मीरवर विजय मिळवला आणि शेवटी १८४६ मध्ये महाराजा गुलाबसिंह यांच्या कार्यकाळात काश्मीरवर डोगरा वंशीयांनी सत्ता प्रस्थापित केली. याच वंशातील महाराजा हरिसिंह यांनी भारताच्या फाळणीच्या वेळी काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्यास लेखी संमती दिली होती. मात्र, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी यावर अंमलबजावणीसाठी केलेल्या विलंबामुळेच आज उर्वरित भारताला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्यानंतर कलम ३७० लागू करून पंडित नेहरूंनी काश्मीरला उर्वरित भारतापासून कायमचे तोडण्याचा पायाच घातला. आज खोर्‍यात काश्मीरच्या मूळ संस्कृतीचे वाहक असलेल्या काश्मिरी पंडितांची नामोनिशाणीही नाही. आपल्या मातृभूमीपासून दूर फेकले जाऊन याच देशातील अन्य भागात निर्वासितांचे जिणे जगणे त्यांच्या नशिबी आले आहे. मात्र, त्यांच्या मायभूमीत परतण्याची चिंता या देशातील सेक्युलॅरिस्टांनी कधीच केली नाही. काश्मिरातील हिंदूंची बहुतांश श्रद्धास्थाने ओसाड पडली आहेत, पण केवळ हिंदूंनाच सहिष्णुतेचे धडे शिकविणारे बुद्धिजीवी या विषयावर मात्र तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. ते का?

(लेखक भाजपाचे राज्यसभा सदस्य आहेत.)

अनुवाद : अभिजित वर्तक

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी