Saturday, July 14, 2012

अब्दुस सलाम

गॉड पार्टिकलच्या संशोधनात जसा भारताच्या सत्येंद्रनाथ बोस यांचा वाटा होता तसेच आपल्या शेजारच्या देशातील म्हणजे पाकिस्तानातील अब्दुस सलाम या काहीशा न ऐकलेल्या वैज्ञानिकाचाही मोठा सहभाग होता. या कणाची क्रिया काय असू शकते, हे सांगणाऱ्या ‘इलेक्ट्रोवीक थिअरी’तील कामाबद्दल  १९७९ चे नोबेल पारितोषिक सलाम यांना मिळाले. मात्र, ते अहमदिया पंथात जन्माला आल्यामुळे पाकिस्तानातील लोक त्यांना खरे मुस्लिम मानण्यास तयार नाहीत.

त्यांच्या कुटुंबात शिक्षणाचा वारसा होताच. वयाच्या चौदाव्या वर्षी अब्दुस मॅट्रिकच्या परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला, लाहोरहून सायकल मारत आनंदात घरी आला त्यावेळी त्याचे अवघे झांग गाव या स्वागतासाठी लोटले होते. पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले. गणित व भौतिकशास्त्रात पहिले आले. सैद्धांतिक भौतिकशास्त्रात त्यांनी पीएच.डी केले. अध्यापनासाठी पाकिस्तानात काही काळ येऊन ते १९५४ मध्ये ते पुन्हा केंब्रिजला गेले. या काळात ते पाकिस्तानचे विज्ञान धोरण सल्लागार होते. विशेष म्हणजे वैज्ञानिकांची पंढरी असलेल्या लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. आयसीटीपी ही संस्था स्थापन करून त्यांनी विकसनशील देशातील संशोधकांना अर्थसाह्य करण्याचे मोठे काम केले. नोबेल पारितोषिकाची रक्कमही त्यासाठी खर्ची घातली.  १९७० मध्ये त्यांनी हिग्ज-बोसॉन कणाचे अस्तित्व सूचित केले होते.  नोबेल मिळाल्यानंतर झिया उल हक यांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला, पण जनतेने थंडे स्वागत केले. भारतासह इतर अनेक देशांनी सलाम यांचे कौतुक केले, पण पाकिस्तानात त्यांचे नाव शालेय क्रमिक पुस्तकातूनही काढण्यात आले. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमातही त्यांनी योगदान दिले पण नाव झाले ते अब्दुल कादिर खान या वैज्ञानिकाचे.  १९९६ मध्ये सलाम यांचे इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे निधन झाले , पण दफन पाकिस्तानातच झाले. त्यांच्या कबरीवर ‘फर्स्ट मुस्लिम नोबेल लॉरिएट’ असे शब्द कोरण्यात आले, पण स्थानिक मॅजिस्ट्रेटने १९७४ च्या (अहमदियांना मुस्लिम न मानण्याच्या) कायद्यावर बोट ठेवून त्यातील मुस्लिम हा शब्द खोडायला लावला. केवळ धर्माधतेने त्यांच्या पदरी आलेली ही अवहेलना आजही सुरूच आहे.
बुधवार, ११ जुलै २०१२, loksatta

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी