Friday, July 13, 2012

तेथे स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार ऐकायलाही मिळत नाहीत

सोलापूर - ‘आमच्या राज्यात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जात नाही, त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार ऐकायलाही मिळत नाहीत’, अशी माहिती सोलापुरात आलेल्या ताकेलूम बिलाई या अरुणाचलच्या तरुणाने दिली. ताकेलूम हा गेली पाच वर्षांपासून पुणे येथे विधी कायद्याचे शिक्षण घेत आहे. अरुणाचल प्रदेशात लग्न मुलीकडेच असते, पण लग्नप्रसंगाचे गावभोजन मात्र मुलाने द्यायचे असते. तेथे हुंडा देण्याची पद्धत नाही, असे तो म्हणाला.
स्त्री भ्रूणहत्या न होणार्‍या देशातील मोजक्या राज्यांत अरुणाचल प्रदेशचा समावेश होतो. या राज्यातील पूर्व कामेंग, कुरूंग कुमी, तिराप, पूर्व सियांग आदी जिल्ह्यात दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 1040 पर्यंत आहे. काही जिल्ह्यांत हे प्रमाण थोडे कमी असले तरी त्याचे कारण स्त्री भ्रूणहत्या ही नाही.

मुलेच देतात ‘हुंडा’ - लग्नाच्या वेळी वधू पित्याला दहा ते पंधरा मिथुन देण्याची प्रथा आहे. गायी-म्हशीसारखा दिसणारा मिथुन हा तिथला वैशिष्ट्यपूर्ण प्राणी. बाजारात एका मिथुनसाठी 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागतात. घरासमोर असलेल्या मिथुन प्राण्यांच्या संख्येवरून तेथे र्शीमंती आणि प्रतिष्ठा मोजली जाते. मुली अधिक असणे म्हणजे जणू कुटुंबाची बरकत होणेच. त्यामुळे मुलींची संख्या अधिक झाली म्हणून हुंडा द्यावी लागण्याची चिंता नाही.

समजा, विवाहप्रसंगी आर्थिक अडचण किंवा अन्य कारणामुळे मिथुन देणे शक्य झाले नाही तर नवविवाहितेला माहेरी पाठवता येत नाही. या काळात काही कारणाने नवविवाहितेचा मृत्यू झाला तर त्यासाठी नवर्‍याला अपराधी ठरवून शिक्षा दिली जाते. लग्नापूर्वी मुला-मुलीचे आधीचे नातेसंबंध पाहिले जाते. जुने शत्रुत्व नाही याची खात्री पटल्यानंतर मुलीला पसंती विचारली जात.

कोण हा ताकेलूम
अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यातील ताकेलूम बिलाई हा सध्या पुण्यात एलएलबीच्या शेवटच्या वर्षात शिकतोय. कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राकडून तेथे चालणार्या सेवाभावी उपक्रमांच्या संपर्कातून तो पुण्यात आला. पुण्यात असला तरी अरुणाचलातील प्रभावी युवक संघटनांत त्याला मान आहे. जाती, संस्कृती आणि आपल्या मातीसाठी सर्मपित होऊन काम करण्याचे त्याचे ध्येय आहे. आपल्या समाजात आत्मविश्वास कसा आणायचा, संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टी कशा वाढवायच्या या विषयावर सध्या त्याचे लेखन सुरू आहे. प्रभावी वक्ताही आहे. ताकेलूम हा उत्तम मराठी बोलतो आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याचे प्रेरणास्थान आहेत.


अशा ठरतात लग्नाच्या गाठी

लग्नापूर्वी
मुलामुलीचे वडील एकत्र येतात. आधीचे नातेसंबंध पाहिले जाते. जुने शत्रुत्व नाही याची खात्री पटल्यानंतर मुलीला पसंती विचारली जाते आणि मग किती मिथुन देणार वगैरे विषयांची बोलणी होते. इदू मिश्मी या जमातीत लग्न जमवण्यापूर्वी मागील 30 पिढय़ांचा विचार केला जातो. आधीचे भावकीचे नाते असल्यास लग्न करणे पाप समजले जाते. त्यामुळे या समाजात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण अधिक आहे. महाभारतकालीन कृष्ण पत्नी रुक्मिणी आपल्याच वंशातील असल्याची यांची र्शद्धा आहे. मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा येथेही आहे. लग्नात वधू पित्याकडून आपोवङ (मद्य) पुरवण्याची परंपरा आहे. लग्नात मासे, बकरी आणि डुक्कर यांचे मांस शिजविले जाते.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी