Sunday, July 8, 2012

संगमांच्या प्रश्‍नांवरून निरुत्तर का झालात? राष्ट्रपतिपदासाठी उभे असलेले गैरकॉंग्रेसी उमेदवार पूर्णो संगमा यांनी त्यांचे व्यक्तित्व आणि कार्यशैलीमुळे स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. त्यांनी निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रश् उपस्थित केले आहेत ते सद्य:स्थितीत भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.
खेदाची बाब ही की, प्रसिद्धिमाध्यमे आणि राजकारणातील लोक त्यांना त्यांच्या पात्रतेएवढे महत्त्व देण्यासही तयार नाहीत. संगमा अनेक वर्षांपासून माझे चांगले मित्र आहेत. राजकारणात परस्परभिन्न विचारधारांवर विश्वास असतानाही भारतीय हितांच्या बाबतीत एकवाक्यता असल्याने माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. तीन महिन्यांपूर्वी जेव्हा राज्यसभा आणि लोकसभेतील विभिन्न राजकीय पक्षांशी संबंधित खासदारांनी संयुक्त पत्र लिहून एखाद्या आदिवासी नेत्याला राष्ट्रपतिपदावर बसविण्याची विनंती केली, तेव्हाच आम्ही संगमांना पाठिंबा देण्यास मनाने तयार झालो होतो.
पूर्णो संगमा हे मेघालयातील ख्रिश्चन आदिवासी समाजाचे नेते आहेत. तेथील गारो पर्वतीय क्षेत्रातील तुरा शहराजवळील चपलाती हे त्यांचे जन्मगाव. त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. आई शेतकरी होती, तर वडील तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील मेमनसिंह शहरात पेशकर होते. जेव्हा संगमा सहा वर्षांचे होते त्या वेळीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण, त्यांनी अखेरपर्यंत वडिलांची, त्यांनी वकील व्हावे, ही इच्छा मनात जोपासली. सौभाग्याने त्यांच्या गावात एक ख्रिश्चन पाद्री आले आणि ते लहानग्या संगमांना पुढील शिक्षणासाठी शिलॉंगला घेऊन गेले. तेथे त्यांनी भांडी धुण्यापासून झाडू लावणे तसेच चर्च आणि शाळेच्या साफसफाईची कामे केली. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना शिकवण्याही कराव्या लागल्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्युत्तर पदवी घेतली तसेच दिब्रुगढ येथून वकिलीचे शिक्षण घेऊन तुरामध्ये वकिली सुरू केली. दरम्यान, त्यांचा विवाह सोराजिनी या तेथील एका प्रसिद्ध आणि गर्भश्रीमंत परिवारातील मुलीशी झाला. वास्तविक सोराजिनीच्या वडिलांची, त्यांच्या मुलीचे नाव सरोजिनी नायडूंच्या नावाने ठेवण्याची इच्छा होती. पण, खासी भाषेत त्या नावाचा अपभ्रंश होऊन ते सोराजिनी या नावाने प्रचलित झाले. खासी परिवारात मातृसत्ताक पद्धती आहे. येथे आईची संपत्ती मुलीच्या वाट्याला येते आणि मुले लग्नानंतर पत्नीच्या घरी राहायला जातात. म्हणूनच पूर्णो संगमादेखील लग्नानंतर पत्नीच्या घरी राहायला आले. सासरी इतकी समृद्धी होती की, संगमांना वकिलीतून मिळालेला सारा पैसा सामाजिक कार्यात लावण्याची संधी मिळाली. त्यांनी गरीब मुले विशेषतः महिला कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणीतील नोकरदारांच्या मुलांसाठी रात्रकालीन शाळा सुरू केल्या. त्याच वेळी १९७७ च्या निवडणुका घोषित झाल्या. त्या वेळी कॉंग्रेसला मेघालयात निवडणुकीसाठी उमेदवार मिळणेदेखील दुरापास्त होते. पुष्कळ शोधाशोध करूनही उमेदवार मिळत नव्हते. त्या वेळी मेघालयचे मुख्यमंत्री डब्ल्यू. एच. संगमा यांनी पूर्णो संगमा यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना आग्रहपूर्वक कॉंग्रेसची उमेदवारी देऊ केली. ज्यावर्षी संपूर्ण देशात कॉंग्रेसचा पराभव झाला, त्यावर्षी पूर्णो संगमा या युवा खासदाराने दिल्लीत पोहोचून इंदिरा गांधींना ताकद प्रदान केली. तेव्हापासून आजतागायत संगमांचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला असला तरी त्यांचा उत्कर्ष होतच राहिला.
कामगार मंत्री असताना बालकामगार प्रथा नष्ट करणे आणि कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी उचललेली पावले आजही स्मरणात आहेत. त्यानंतर सूचना आणि प्रसारण मंत्री, उद्योग आणि कोळसा मंत्री आदी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. तथापि, लोकसभाध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ सर्वाधिक चर्चित आणि प्रशंसेस पात्र राहिल्याने त्यांना मीडियात खूप प्रसिद्धी मिळाली. ते अतिशय हिंमतवान होते आणि नवे पाऊल टाकण्यात त्यांना कुठलाही संकोच वाटत नसे. शरद पवार आणि तारिक अन्वर यांच्यासोबत जरी त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी वंशाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली, तरी त्यांना नंतर तडजोड करावी लागली. नंतर त्यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्याचा इरादा पक्का केला आणि प्रणव मुखर्जी यांना जाहीर आव्हान देऊन टाकले. खेदाची बाब म्हणजे प्रणव मुखर्जी यांनी पूर्णो संगमा यांच्याशी एक मर्यादित आणि प्रगल्भ जाहीर चर्चा करण्यास नकार दिला. राष्ट्रपतींना कोणतेही धोरण तयार करण्याच्या कार्यात दखल देण्याची गरज नसते, त्यामुळे अशा जाहीर चर्चेची आवश्यकता वाटत नाही, असे कारण मुखर्जींनी दिले. याला पूर्णो संगमा यांनी अतिशय सुरेख उत्तर दिले. ते म्हणाले, जो पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही आणि बोलू शकत नाही, असा राष्ट्रपती देशाला हवा आहे का? रात्री दोन वाजताही सरकारी कागदपत्रांवर सह्या करण्यास तयार असणारी व्यक्ती राष्ट्रपतिपदी हवी का? असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रपतींची देशातील गरिबी, आर्थिक घसरण, काळा पैसा, भ्रष्टाचार, विकासाच्या योजना, राजकीय दुराचार यावर स्वतःची काही मते असायला हवीत की नको? येथील जनतेला राष्ट्रपतींची वैचारिक पातळी काय, हे जाणून घेण्याचा अधिकार असायला नको? असे प्रश् संगमांनी उपस्थित करून विरोधकांना निरुत्तर करून टाकले.
संगमांनी उपस्थित केलेले हे प्रश् देशात राजनैतिक संवाद का होत नाही, यावर विचार करायला बाध्य करतात. प्रणव मुखर्जी यांनी सात वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. विदेशातील बँकांमध्ये जमा असलेला देशातील काळा पैसा परत आणण्यासाठी कोणती पावले उचलली, हा प्रश् देशाचे अर्थमंत्री या नात्याने प्रणव मुखर्जी यांना विचारायला नको? देशात भरमसाट वाढणारी महागाई आणि गरिबी रोखण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या, हे त्यांना विचारायला नको? देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध कधी आपण आवाज उठवला, किंवा याविरुद्ध सुरू असलेल्या एखाद्या मोठ्या अभियानाच्या मागे आपण ठामपणे उभे राहिलात? याचे उत्तर त्यांनी द्यायला नको?
राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो. तो राष्ट्राची अस्मिता आणि प्रतिष्ठेचा प्रतीक असतो तसेच जगभरात राष्ट्रीय समाजाचा आवाजही तोच असतो. प्रणवदांच्या व्यक्तिगत गुणांबद्दल सारे चांगलेच बोलतात. आम्हीही काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये श्री नंदा राजजात यात्रेच्या तयारीच्या संदर्भात त्यांची भेट घेतली, त्या वेळी त्यांच्या विनम्र स्वभावाने, विद्वत्तापूर्ण चर्चेने, संसदीय परंपरांच्या त्यांना असलेल्या ज्ञानाने आणि त्यांनी दाखविलेल्या आत्मीयतेमुळे प्रभावित होऊन परतलो. पण, ज्या वेळी ते कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या रूपात उभे होतात, त्या वेळी त्यांच्याकडून कॉंग्रेसच्या राज्यात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे निश्चितच अपेक्षित असतात. कारण त्या सर्व चुकीच्या कामांमध्ये ते स्वतःची जबाबदारी झटकून टाकू शकत नाहीत. नामांकन पत्र भरण्याच्या वेळी कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेच्या अध्यक्षपदाचा त्यांनी दिलेला राजीनाम्याचा मुद्दा जनतेच्या मनात कुठलाही विश्वास निर्माण करीत नाही.
पक्षीय भेदभाव दूर सारून भारताची महान सांस्कृतिक परंपरा जपणारी, सर्वांना सोबत घेऊन चालणारी तसेच सर्वांचा समप्रमाणात विश्वास ग्रहण करणारी व्यक्तीच भारताच्या राष्ट्रपतिपदी आरूढ व्हावी. एका जनजातीय समाजातून आणि उत्तर पूर्वांचलातून आलेल्या संगमांनी उपस्थित केलेले प्रश् मनात तरंग निर्माण करणारे आहेत. त्यांना या प्रश्नांची सरळ-साधी उत्तरे हवी आहेत.
 तरुण विजय
(लेखक राज्यसभा सदस्य आहेत)
 अनुवाद : चारुदत्त कहू
tarun bharat

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी