विवेक घळसासी
बालसंगोपनावर कितीतरी उत्तम पुस्तके सध्या उपलब्ध आहेत. आपल्यापोटी जन्माला येणारे किंवा आलेले मूल उत्तम असावे, यासाठी पालकही खूप जागरूक झाले आहेत. आहार, शिक्षण, छंद या विषयांबाबतही पालकांमध्ये दक्षता वाढत आहे. यावर रोज संशोधन होत आहे. डॉ. स्टीफन कार लिऑन या अभ्यासकाने, सतत आठ वर्षे एका प्रश्नाचा अभ्यास केला. ‘ ज्यू लोक एवढे बुद्धिमान का आहेत’ हा तो प्रश्न होता. हे तर खरेच आहे की विविध क्षेत्रात ज्यू लोकांचे र्शेष्ठत्व निर्विवाद आहे. जगातील उद्योग-व्यवसायातही त्यांचे मोठे स्थान आहे.
अभ्यासातून डॉ. स्टीफन यांच्या लक्षात काय आले? खूप काही. पण, महत्त्वाच्या काही गोष्टींचा आपण विचार करूया! ‘दिवस’ गेल्याचे कळताच ज्यू स्त्री सतत गाणे गाते. पियानो वाजवते आणि अवघड गणिते सतत सोडवते. दुसरा मुद्दा म्हणजे इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत विज्ञान आणि ‘बिझनेस मॅथमॅटिक्स’ मुलांना शिकवले जाते. तिसरा मुद्दा म्हणजे मुलांना ‘तिरंदाजी’ आणि ‘नेमबाजी’ शिकवली जाते. चवथा मुद्दा भाषेचा आहे. प्रत्येक मुलाला किमान तीन भाषा येतातच. हिब्रू, अरेबिक आणि इंग्रजी. हे चारही मुद्दे मुलाची प्रज्ञा, व्यावसायिकता, एकाग्रता आणि प्रतिभा याचा विकास करण्याच्यासंदर्भात महत्त्वाचे आहेत. आपल्याकडे बहुतेक मुले ‘गणित’ म्हटले की घाबरतात, याचा दीर्घ आणि खोलवरचा परिणाम लक्षात घ्यायला हवा. आपल्या समाजातील अंधर्शद्धा, तर्कसंगत विचाराचा अभाव आणि समस्यांना सामोरे जाण्यातली कुचराई हे सारेच दोष बालसंगोपनाच्या उणिवेतून निर्माण होतात.
वास्तविक पाहाता भारतात गर्भसंस्कार, बालसंगोपन, बुद्धी आणि प्रतिभा विकास याचा खूप पूर्वीपासून विचार झाला आहे. तरीही आपली आजची स्थिती अशी केविलवाणी का? कारण आपण तमोयुगातून बाहेरच पडायला तयार नाही. सरधोपट विचार आणि वरवरची चर्चा करण्यातच समाधान मानण्याचा आपला स्वभाव. त्यामुळेच तर आपली ‘बुद्धिमान’ मुलेही अर्धवट वाढलेली वाटतात. स्वत:पुरते यश हीच आयुष्याची सार्थकता आहे, असे मानण्याकडे ‘जागरूक’ पालकांचा कल दिसतो.
हे सगळे आज आठवण्याचे कारण काय? आज आहे र्शीकृष्ण जन्माष्टमी. बालसंगोपनासाठी मला बालकृष्णाची गोकुळ-वृंदावन लीला खूप उपयुक्त वाटते. याचे धार्मिक महत्त्व थोडावेळ बाजूला ठेवू. पण, बालसंगोपनातील ‘कृष्णपैलू’ मला महत्त्वाचा वाटतो. महत्त्वाचे म्हणजे मुलांना या ‘लीला’ खूप आवडतात. त्या ऐकताना मुले खूप ‘रिसेप्टिव्ह’ होतात. जगभर होत असलेले, या विषयातील विचार, संशोधन तर मोकळेपणाने स्वीकारलेच पाहिजे. पण, त्याच वेळी या ‘कृष्णपैलूचाही’ विचार केला पाहिजे. कोणते आहेत पैलू?
कृष्णाची बाललीला म्हणजे सांघिक जीवनाचा संस्कार. कृष्ण आणि बलराम ही दोनच मुले घरात. घरची र्शीमंती असूनही गावातल्या मुलांत ती दोघे मनमुराद मिसळत होती. खाणे-पिणे, खेळणे सारे सर्वांचे मिळून होत होते. मनोविकासात, ‘ईगो’ न वाढण्यात या सांघिकतेचा मोठा वाटा होता. उन्ह, वारा, पाऊस, थंडी सगळे ‘अंगावर’ घेत कृष्ण वाढला. आजाराचे भय ना त्याला वाटले, ना त्याच्या ‘पेरेंट्स’ना वाटले. अकरा वर्षांचा होईतो कृष्णाने पायात काही घातले नाही. कपडेही साधेच घातले. त्यामुळेच तो मित्रांत मिसळून गेला. सर्वांचा झाला. विकसनाचे हे पैलू मुलांना देण्याचा संकल्प आज आपल्याला करता येईल का? पण त्यापूर्वी ‘सुजाण पालकांना’ एका प्रश्नाचे खरे उत्तर स्वत:लाच द्यावे लागेल. पाल्यांची ‘वाढ’आपल्याला हवी आहे की ‘विकास’ हवा आहे? ‘कृष्ण’पैलू विकासाचा मंत्र आहे. कृष्णलीला विकासाचे तंत्र आहे.
दहीहंडी पाहताना मला नेहमी वाटले की, हंडी फोडण्यासाठी वर उंच गेलेल्याचे यश काय त्याच्या एकट्याचे आहे? आपला चेहराही दिसू न देता, स्वत:च्या अस्तित्वाची उतरंड करून उभे असणारे नसतील तर ‘वरचा’ यशस्वी होईल का? घरातल्या शिंक्यातले लोणी, मित्रांच्या पाठी-खांद्यावर उभे राहून मिळवणारा कृष्ण, लोणी प्रथम मित्रांना भरवत होता, ते का? मित्रांना भरवून देऊन, स्वत: नुसती बोटे चाटून तृप्त होणारा कृष्ण माझ्या मुला-नातवात दडून बसला आहे. त्याला शोधून काढणे हा बाल संगोपनाचा खरा अर्थ आज आपण लक्षात घेऊया का?
No comments:
Post a Comment