भाऊ तोरसेकर
गुरुवार 2 फेब्रुवारी 2012
मी स्वत: पत्रकार आहे आणि चार दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकारिता करतो आहे. त्यामुळेच पत्रकारांचे आविष्कार स्वातंत्र्य मलाही मोलाचे वाटते. पण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक असतो. त्यामुळेच आपल्या स्वातंत्र्याचे पावित्र्य पत्रकार - कलावंतांनी जपले नाही तर इतरांनी त्याची थोरवी मानायचे कारणच रहाणार नाही. आज आम्ही पत्रकार तेवढे प्रामाणिक राहिलेले आहोत काय? 'महाराष्ट्र टाइम्स' वर हल्ला झाला म्हणून ओरडणारे-रडणारे खोटय़ा बातमीबद्दल एकदा तरी माफ़ीची भाषा बोलले आहेत काय? जी बातमीच नव्हती तर निव्वळ अफवा होती ती पसरवण्याचे पाप हा कायदेशीर गुन्हा आहे. त्याची खंत कुठल्या पत्रकाराने व्यक्त केली आहे काय?लागोपाठ दोन दिवस आपल्या स्तंभातून हेमंत देसाई अविष्कार स्वातंत्र्याची थोरवी सांगत असताना पत्रकारांच्या बदमाशीबद्दल गप्प कशाला? महाराष्ट्रात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचे बारीकसारीक तपशील देताना त्यांना शिरीष निपाणीकर वा कैलास म्हापदी का आठवत नाहीत? राजकीय नेते लबाड व ढोंगी आहेतच. पण निदान चार चौघात ते दाखवण्यापुरते तरी हल्याचा निषेध करतात. अगदी आपल्याच पाठीराख्यांच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करतात. पण तमाम अविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये पत्रकार त्यांच्यापेक्षा निर्ढावलेले बदमाश नाहीत काय? कारण अजून कुणा पत्रकाराने अफवा पसरवणार्या अशा बातमीचा वा ती देणार्या पत्रकाराचा निषेध केलेला नाही.
शिरीष निपाणीकर या पत्रकाराने आमदार निवासात येऊन एका आमदाराकडून खंडणी वसूल करण्याचा घाट घातला होता. तो पकडला गेल्यावर कुठल्या वृत्तपत्राने ती बातमी छापलेली नव्हती. ज्या पत्रात तो काम करत होता त्या महाराष्ट्र टाइम्सनेही 'तो आपला पुर्णवेळ कर्मचारी नाही' असे हात झटकणारी चौकट छापली होती. पण त्या निपाणीकरने काय केले त्याचे अवाक्षर छापलेले नव्हते. संपादक कुमार केतकरांनी ती चौकट छापली होती आणि माझ्या माहिती प्रमाणे हेमंत देसाई तेव्हा महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार होते. याला अविष्कार स्वातंत्र्याचा सदुपयोग म्हणता येईल काय?
पंधरा वर्षापूर्वी ठाण्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या विरोधात एक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विजय तेंडुलकर त्यात प्रमुख वक्ते होते आणि हल्ले होतात म्हणजेच आपले काम योग्य दिशेने होत असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली होती. ते 'योग्य काम' कोणते याचा नंतर खुलासा झाला. कारण त्या परिषदेचे निमंत्रक कैलास म्हापदी होते आणि त्यांनाच खंडणी प्रकरणात अटक झाली होती. गुन्हा सिद्ध होऊन त्यांनी शिक्षा देखील भोगली आहे.
अगदी परवा मटा हल्ला प्रकरणानंतर 'स्टार माझा' वाहिनीवर बोलताना आमदार अभिजीत अडसुळांनी साम वाहिनीचा एक पत्रकार दिवाळी अंकात दोन हजाराची जाहिरात दिली नाही म्हणून खोटय़ानाटय़ा बातम्या कशा देतो त्याचा उल्लेख केला. तर त्यांना नावे घेऊ नका असा दम अँन्कर प्रसन्ना जोशी यांनी भरला. म्हणजे भामटे, चोरटे, खंडणीखोर पत्रकारांची नावेही घ्यायची नाहीत. पण पत्रकार खोटे आरोप मात्र नावानिशी करणार आणि ते अविष्कार स्वातंत्र्य म्हणायचे? ही शुद्ध भामटेगिरी झाली. 'वैरी-कैवारी' लेखात देसाईच म्हणतात 'राजकारणात गुंड व भ्रष्ट आहेत. तसेच पत्रकारातही ब्लॅकमेलिंग करणारे, फुकटे, पाकीटबाज व फ़्लटलाटू लोक आहेत. परंतु काहींच्या पापामुळे सार्या पत्रव्यवसायास आरोपीच्या पिंजर्यात बसवायचे कारण नाही.’ देसाईंचा निकष ते स्वत: तरी पाळतात काय? मुठभर शिवसैनिकांनी हल्ला केला तरी संपुर्ण शिवसेनेला गुंडसेना म्हणायचा मोह त्यांना तरी आवरता आल आहे काय? दुसरी गोष्ट एखाद्या पत्रकारावरचा हल्ला संपूर्ण पत्रव्यवसायच आपल्यावरचा हल्ला म्हणून कांगावा करत असेल तर एखाद्या निपाणीकर, म्हापदीसाठी संपूर्ण पत्रव्यवसायालाच आरोपी म्हणावे लागणार.
'महाराष्ट्र टाईम्स'ची बातमी खोटी व अफवा होती म्हणून तिचा निषेध अजून पत्रकार संघटना व देसाई यांनी केलेला नाही. पण प्रत्येक पत्रकार त्यांच्या गुन्ह्यावर पांघरुण घालायला धावला आहे. मग जनमेजयाप्रमाणे इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणणे भाग आहे. जेव्हा चांगले प्रामाणिक पत्रकार आपल्यातल्या बदमाशांना आवरण्याऐवजी, बाजूला करण्याऐवजी पापावर पांघरुण घालू लागतात, तेव्हाच सर्व पत्रव्यवसाय संशयित होत असतो. त्यातून सुटल्याचा खरा मार्ग कांगावखोरी नव्हे तर आपल्यातल्या बदमाशांना आपणच उघडे पाडणे व बाजूला करणे गरजेचे असते. त्याऐवजी त्यांचा कैवारी व्हायला पुढे येतात तेच पत्रकारितेचे वैरी असतात. मग जिग्ना शहा छोटा राजनची हस्तक होऊन जे.डे यांचा मुडदा पाडण्यापर्यंत मजल मारते. एक पत्रकारच दुसर्या पत्रकाराचा मुडदा पाडायला मदत करतो, मग बाजार बसवीने पतिव्रतेचा आव आणायचा प्रयत्न करून उपयोग होत नाही.
No comments:
Post a Comment