चर्चचे वास्तव - २५
जगप्रसिद्ध ‘टाईम’च्या दणक्याने ऍक्शन एडला भोवळ
चारुदत्त कहू
नागपूर, २५ सप्टेंबर
चाईल्ड स्पॉन्सरशिपच्या नावाने
आंतरराष्ट्रीय आणि भारतीय देणगीदारांकडून जमा केलेला निधी, ऍक्शन एड
निराळ्याच कामांसाठी खर्च करते, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी सत्य असतानाही ना
राजकीय पक्ष ना सामाजिक चळवळी ना भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे ना
प्रसिद्धी माध्यमे या संस्थेच्या क्रियाकलापांकडे लक्ष देताना दिसतात. एवढी
अवाढव्य संस्था, त्यामागे खंबीरपणे उभे दिसणारे नामवंत आणि या
नामवंतांच्या नावाने आपल्या पोळीवर तूप ओढणारे राजकारणी आणि प्रशासनातील
उच्चपदस्थांच्या दबदब्यामुळेच या संस्थेच्या कोळशाच्या दलालीत हात काळे
करण्याच्या कृत्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. स्वतः ऍक्शन एडलाही
त्यांच्या कार्याच्या विरोधाभासाची कल्पना आहे. पण त्यांच्या वर्तनात
मात्र कधी फरक पडल्याचे दिसत नाही. २०१० मध्ये जगप्रसिद्ध टाईम मॅगझिननेच
ऍक्शन एडच्या कारवायांवर आक्षेप घेऊन जगभरातील ख्रिस्तानुयायी आणि चर्चच्या
धर्मप्रसारकांमध्ये खळबळ उडवून दिल्याने संस्थेच्या पदाधिकार्यांवर भोवळ
येण्याची पाळी आली.
वर्ष २००४ मध्ये ऍक्शन एड इंडियाच्या
बंगलोर मुख्यालयातील गॅरेजमध्ये सुरू असलेला फसवेगिरीचा प्रकार पाहून
दस्तुरखुद्द या संस्थेचे निधिसंग्रह संचालक जेरी अल्मेडा यांना आश्चर्याचा
धक्का बसला. एके दिवशी बंगलोर कार्यालयात आडबाजूला असलेल्या गॅरेजमध्ये
बसून काही कर्मचारी बालकांच्या नावाने ओबडधोबड अक्षरात पत्रे खरडत असल्याचे
पाहून त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. ही पत्रे स्पॉन्सर बालकांना आणि
त्यांच्या पालकांनाही अंधारात ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील देणगीदारांना
व्यक्तिशः पाठविली जात होती. ती भारतातील गरीब, शोषित, मागास आणि
डोक्यावरील छत्र हरविलेल्या बालकांनी स्वतः लिहिली असल्याच्या भ्रमात
आंतरराष्ट्रीय देणगीदार आपले खिसे आणखी मोकळे सोडत होते. यातून संस्थेचा
गल्ला अधिअधिक फुगत चालला होता. परदेशी देणगीदार सातासमुद्रापलीकडे
असल्याने त्यांचा व्यक्तिगत संवाद शक्यच नसतो, त्यामुळे कल्याणकारी
संस्थेने स्पॉन्सरबाबत सांगितलेल्या माहितीवर विसंबून राहण्याशिवाय
त्यांच्याजवळ दुसरा पर्याय उरतोच कुठे?
टाईमच्या बातमीवर ऍक्शन एड इंडियाचे
कार्यकारी संचालक संदीप चाचरा यांनी अतिशय मिळमिळीत खुलासा करून हात झटकले
असले, तरी जेरी अल्मेडा यांनीही आजतागायत टाईम मॅगझीनमध्ये प्रकाशित
झालेल्या वृत्ताचे कुठेही खंडन न केल्याने या वृत्ताची बळकटी वाढली आहे.
एवढे मात्र खरे की, ऍक्सन एडने टाईमच्या दणक्यानंतर निधी उभारण्याच्या
त्यांच्या शैलीत गेल्या दशकात बदल करून टाकला. निधी उभारण्याच्या दुसर्या
स्रोतांचा शोध त्यांनी प्रारंभ केला आहे. पण त्यांना यात अजून फारसे यश
आलेले नाही.
यासंदर्भात जेरी अल्मेडा यांची एक मुलाखत
प्रसिद्ध झाली होती. त्यांनी नव्या पर्यायांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे
सूतोवाच त्यात केले आहे. ऍक्शन एड इंडियाचे प्रमुख जेरोनिनिओ (जेरी)
अल्मेडा यांनी अलायन्सशी केलेल्या पत्रव्यवहारात निधिसंग्रहासाठी नवा मार्ग
अनुसरत असल्याची माहिती दिली आहे. आम्हाला सत्यघटना कथन करून, गेल्या ९
महिन्यांत ४० हजार दात्यांकडून ९ लाख युरोच्या देणग्या गोळा करण्यात यश
आल्याचे ते सांगतात. ऍक्शन एड इंटरनॅशनलकडून चाईल्ड स्पॉन्सरशिपसाठी असलेले
दडपण झुगारल्याचेही अल्मेडा जाहीर करतात. ‘ते’ ऍक्शन एडचे आंतरराष्ट्रीय
स्तरावर निधी उभारण्याचे मॉडेल आहे, अशी त्यांची याबाबतची बोलकी
प्रतिक्रिया आहे. मुलाखतीच्या अखेरीस, आम्ही आता समाजबांधवांच्या स्थितीची
वस्तुस्थिती कथन करून, निधिसंकलनासाठी सिद्ध झालो आहोत, असे सांगून अल्मेडा
मोकळे झाले.
नवा मार्ग
टाईमच्या वृत्तामुळे गोत्यात आलेल्या
ऍक्शन एड इंडियाने आता निधिसंकलनाचा नवा मार्ग अनुसरला आहे. ‘जॉय ऑफ
गिव्हिंग या शीर्षकाची एक २० मिनिटांची चित्रफीत त्यांनी तयार केली असून,
त्यामार्फत ऍक्शन एड सेक्स वर्कर्स, दलित, भूमिहीन ग्रामीण, दंगलपीडित,
रस्त्यांवरील मुले, अपंग व्यक्ती, आदिवासी आणि भंगी अशा आठ समुदायांमध्ये
सुधारणावादी कार्य करते, असे दाखविण्यात आले आहे. त्यांनी थेट विक्रीची नवी
पद्धती विकसित केली आहे. याअंतर्गत भारतातील प्रमुख १२ शहरांमधील
एजन्सीजमध्ये मोठ्या संख्येने व्यावसायिक विक्री प्रतिनिधींची नेमणूक
करण्यात आली आहे. त्यांना ‘सोशल गिव्हिंग कन्सल्टंट’ असे संबोधले जाते. या
एजन्सीज त्यांना वेतनही देतात आणि त्यांनी गोळा केलेल्या निधीतील काही
टक्के रक्कमही त्यांच्या पदरात टाकली जाते. हे सारे ‘सोशल गिव्हिंग
कन्सल्टंट’ महाविद्यालयांमधून नुकेतच शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेले किंवा
एमबीएचे विद्यार्थी असतात. त्यांची नेमणूक करण्यापूर्वी त्यांना ऍक्शन एड
निरनिराळ्या समाजबांधवांसाठी कसे कार्य करते, याची माहिती देऊन प्रशिक्षित
केले जाते. निरनिराळ्या कंपन्यांमध्ये जाऊन व्यक्तिगत दाते गळाला लावले
जातात. ‘सोशल गिव्हिंग कन्सल्टंट’ देणगीदारांच्या कार्यालयांमध्ये अथवा
त्यांच्या निवासस्थानी भेटी देऊन चित्रफितीच्या माध्यमातून त्यांच्याशी
संवाद साधतात. भारताच्या ग्रामीण भागातील हे मागास बांधव असून, त्यांच्या
जीवन जगण्याच्या शैलीची, हलाखीच्या परिस्थतीची जाणीवही शहरी लोकांना नसते.
ही चित्रफीत पाहून त्यांच्या डोळ्यात आसवे आल्याशिवाय रहात नाहीत. ऍक्शन एड
ही संस्था अशाच नाकारलेल्या समाजबांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार
घेत असल्याचा आभास या चित्रफितीतून निर्माण केला जातो. समाजबांधवांना मदत
मिळावी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी ऍक्शन एड कशी झटत आहे, हेच
सांगण्याचा त्यांचा हेतू असतो.
इतक्या जबरदस्त व्यावसायिक पद्धतीने
जाहिरातबाजी करूनही आणि जेरी अल्मेडा यांनी केलेला दावा लक्षात घेतला तरी,
आजही वस्तुस्थिती अशी आहे की, ऍक्शन एडजवळ चाईल्ड स्पॉन्सरशिपवरच अवलंबून
रहाण्याशिवाय दुसरा चाराच नाही.
२००६च्या संस्थेच्या वार्षिक अहवालानुसार
चाईल्ड स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून जमा झालेला निधी ५६ टक्के, संस्थात्मक
भागीदारीतून ३३ टक्के आणि ८ टक्के निधी ओव्हरसीज डेव्हलपमेंट असिस्टंटच्या
माध्यमातून गोळा केला गेला. ऍक्शन एडचा २०१०चा वार्षिक अहवालही यापेक्षा
निराळा नाही. उलट त्यात चाईल्ड स्पॉन्सरशिप निधीत वाढ झाल्याचे व त्यातून
७३ टक्के निधी संकलित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. उर्वरित २७ टक्के
निधी डीएफआयडी, इसी, इसीएचओ, युएनडीपी, डीआयपीइसीएचओ, युएनएफपीओ, इंटेल आणि
वैयक्तिक देणगीदारांकडून गोळा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. (क्रमशः) (उद्याच्या अंकात धर्मांतरणाचे कुटिल डाव)
चर्चचे वास्तव - २६
धर्मांतरणाच्या कुटिल कारवायांतून राष्ट्रांतराचा डाव
चारुदत्त कहू
नागपूर, २६ सप्टेंबर
मीना आणि विवेक (नावे बदललेली) हे तरुण
दाम्पत्य. दोघेही गरीब हिंदू घरची मुले. काही वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह
झाला. मीनाने तिच्या एका ख्रिश्चन मैत्रिणीच्या संपर्कात आल्यानंतर
धर्मांतरण केले. पुढे विवेक मीनाच्या संपर्कात आला. दोघांचेही प्रेम जुळले.
लग्नाच्या आणाभाका झाल्या. पण ऐन लग्नाच्या वेळी मीनाने, ‘अरे मै एक बात
तो बताना भूल ही गयी
|’, असे वाक्य उच्चारून खोडा घातला. विवेकच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्याने भीतभीतच विचारणा केल्यावर तिने माझ्याशी लग्न करायचे असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल, अशी अट घातली. विवेक प्रेमात इतका आकंठ बुडाला होता की, त्याने मागचा-पुढचा विचार न करता मीनाला होकार भरला. घरच्यांनी विरोध केला. पण विवेक इरेला पेटला. अखेर घरच्यांनी विवेकला बाहेरचा रस्ता दाखवला. विरोध झुगारून दोघांचेही लग्न झाले. आता उभयतांना कन्यारत्नही झाले. तिचे नाव सॅनेरिटा, फादरनेच सांगितले ठेवायला. पण अजून या दोघांनाही ना नोकरी ना धंदापाणी. मात्र, घरात टीव्हीपासून फ्रीजपर्यंत आणि वॉटर प्युरीफायरपासून ओव्हनपर्यंत सार्या वस्तू... शेजारच्यांना आश्चर्यात पाडणार्या. ही दोघे करतात तरी काय... नोकर्या कुठे आहेत... धंदापाणी वगैरे काहीच नाही. मग एवढा पैसा-अडका, सामान-सुमान, स्वतःचे घर आणि गाड्याघोड्या कुठून आल्या याचा उलगडा झाला. मीना आणि विवेक नियमित संडे प्रेयर अटेंड करतात आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना वश करण्याचे कार्य त्यांनी स्वीकारले आहे. आता त्यांच्या घरात ना हिंदू सण साजरे होतात ना हिंदू परंपरा पाळल्या जातात. मात्र, येशूच्या नावाने मेणबत्ती मात्र नित्य जाळली जाते. पण ती भारताच्या उत्कर्षासाठी नव्हे तर नकळत रोमच्या विकासासाठी. हे नागपूर शहरातील एक उदाहरण झाले. वरुड शहरातील एक मुलगा अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी मुंबईत गेला आणि चार वर्षांनी गळ्यात क्रॉस अडकवूनच परतला. यवतमाळातील एक शेतकर्याची विधवा. तिनेही वशीकरण झाल्याने कुणा पाद्र्याकडून आर्थिक मदत स्वीकारली आणि आता तिच्यापुढे क्रूसवासी होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मुंबईतील एक मोलकरीण. तीदेखील चर्चमध्ये संडे प्रेयरला जाते. पण तिचा उद्धार करण्यात आला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. पण आता चांगले तीन खोल्यांचे घर झाले. कारण केवळ संडे प्रेयरची उपस्थिती. नागपुरातील मार्टिननगर वस्ती पूर्वी बौद्धबहुल होती. ख्रिश्चनांची घरे बोटावर मोजण्याइतकीच होती. तिथे दहा वर्षांपूर्वी घरोघरी डॉ. बाबासाहेब आणि गौतम बुद्धाच्या तसबिरी अभिमानाने लावल्या जात. त्यांच्या नावाने नीळही उधळली जाई. आता मार्टिननगरातून आंबेडकर-बुद्धाच्या तसबिरी नाहीशा झाल्या आहेत. पूर्वी कानावर येणारे भिक्खूंचे परित्राण पाठांचे सूर कुठेशी निमाले आहेत. तेथे घरोघरी येशू आणि मेरीची छायाचित्रे विराजमान झाली आहेत. अशा नित्य घटना तुमच्या आमच्या शेजारी, प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत बघायला मिळतीत. कुणी अडचणीतील व्यापारी, कुणी संकटात सापडलेला रुग्ण, तर कुणी पतीचे छत्र हरविलेली स्त्री... अशा अनेक व्यक्तिंनी क्रूसनीतीच्या जाळ्यात जखडून धर्मांतरातून राष्ट्रांतर केलेले आहे. अनेक ठिकाणी तर याला सामूहिक धर्मांतराचीही जोड मिळाली आहे.
‘बॅप्टीझम’ म्हणा, ‘सेव्हिंग द सोल’ म्हणा
अथवा ‘इव्हेंजलायझेशन’... ही सारी शब्दांची जादूगिरी आहे. भारतीय भाषेत
याचा सरळ अर्थ ख्रिस्तीकरण अर्थात ख्रिश्चनेतरांचे धर्मांतर असा होतो. या
शब्दांच्या मायाजाळात नाव, गाव, संस्था, कॅथॉलिक, प्रोटेस्टंट आपला-परका,
उच्च-नीच, काळा-गोरा, गरीब-श्रीमंत हे सारे मतभेद गळून पडतात. हा सारा
विषयच देणग्यांशी विशेषतः विदेशातून मिळणार्या निधीशी संबंधित आहे.
सामाजिक कार्यकर्ते मिलिंद ओक यांनी केलेल्या अध्ययनात धर्मांतराच्या अशा
अगणित घटना, प्रसंग आढळले. भारतात हा प्रकार धार्मिक परिवर्तन अथवा
धर्मांतरण या नावाने सर्वपरिचित आहे. याच अध्ययनात असेही आढळून आले की
नव्याने स्थापन झालेले इव्हँजेलिकल मिशनच नव्हे तर सर्व प्रकारच्या अगदी
इंग्रजांच्या काळापासून स्थापन झालेल्या ख्रिस्ती संस्था-संघटनादेखील
भारतीयत्वावर विश्वास असणार्या समाजबांधवांच्या धर्मांतरणासाठी कसोशीने
प्रयत्नशील दिसतात.
१५ जुलै २००९ रोजी बोंगाईगावच्या (आसाम)
कॅथॉलिक चर्चच्या बिशपने मोंटानास्थित (अमेरिका) चर्च ऑफ डायोसिस ऑफ ग्रेट
फालासला एक पत्र पाठवून त्यात सद्य:परिस्थिती आणि डायोसिसच्या गरजा याबद्दल
स्पष्टपणे खुलासा केला आहे. बिशप म्हणतात, वर्ष २००९-१० मध्ये आम्ही
धर्मांतरावर जोर देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याजवळ असलेल्या शाळा,
वसतिगृहे आणि इस्पितळे यांचा वापर धर्मांतराच्या कार्यासाठी करता येईल, असे
आमच्या पदाधिकार्यांनी सर्वानुमते ठरविले आहे. मात्र, यासाठी १० लाख
रुपयांची (२५ हजार अमेरिकन डॉलर्स) आवश्यकता आहे.
चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या (सीएनआय)
घटनेतील सहाव्या क्रमांकाच्या कलमात बिशपचे कार्य आणि अधिकार स्पष्टपणे
नमूद केलेले आहेत. त्यातील उपकलम ‘ब’ मध्ये आपल्या डायोसिसमध्ये
धर्मांतरणाला प्रोत्साहन देणे, त्यासाठी स्वतःचे उदाहरण घालून देणे आणि
इतरांनाही या कामासाठी प्रोत्साहित करणे, त्याचप्रमाणे बिशपने पदाधिकारी
आणि अनुयायांना त्यांच्या जबाबदारीची सातत्याने जाणीव करून देणे, ही कामे
नमूद केलेली आहेत.
चर्च ऑफ साऊथ इंडियामध्ये (सीएसआय) तर
स्वतंत्र असे बोर्ड ऑफ मिशन अण्ड इव्हँजेलिसम अस्तित्वात आहे. रेव्हरंड डॉ.
जेबराज सॅम्युअल त्या बोर्डाचे संचालक असून, रेव्ह. सॅम्युअल प्रभाकर,
रेव्ह. जी. पॉल दयानंदन आणि रेव्ह. डी. फ्रेड्रीक चार्ल्स हे सहायक संचालक
म्हणून कार्य करतात. या बोर्डाची उद्दिष्टे अगदी साफ आणि हेतू स्पष्ट आहेत.
१) आपल्या ब्रदर्स आणि सिस्टर्सना इतरांसाठी प्रार्थना करण्याचे प्रशिक्षण देणे.
२) दरवर्षी १०० नव्या खेड्यांमध्ये धर्मांतराची ध्वजा पोहोचविणे.
३) दरवर्षी ६० नव्या धार्मिक सभांची स्थापना करणे.
४) मिशनच्या कार्यक्षेत्रात दरवर्षी २० नव्या चर्चच्या इमारती उभ्या करणे.
५) गॉस्पेलच्या संदेशासह डायोसिसनच्या सीमेबाहेर जाऊन कार्य करणे.
६) डायोसिसनच्या मिशनरी कामात सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी जास्तीत जास्त धार्मिक सभांचे आयोजन करणे.
७) लोकल प्रेसबायटर्सच्या अधिकारात मिशन फील्डमध्ये काम करणार्या १२५ धर्मप्रसारकांच्या कामावर देखरेख ठेवणे.
फेब्रुवारी २०१२ च्या सीएसआयच्या मासिक
अहवालात चित्तार येथे झालेल्या बाप्तिस्मा कार्यक्रमाचा अभिमानाने उल्लेख
करण्यात आला आहे. या सभेत उपस्थित सश्रद्ध ख्रिस्तींमध्ये ४ कुटुंबे अशी
होती ज्यांनी नुकतेच पाणिग्रहण करून येशूचे पाईक होण्याचा निर्णय घेतलेला
आहे. (क्रमशः)
(उद्याच्या अंकात धर्मांतरणात वर्ल्ड व्हिजनची सैद्धांतिक भूमिका)
चर्चचे वास्तव - २७
वर्ल्ड व्हिजनचा धर्मांतरणाला सैद्धांतिक मुलामा
चारुदत्त कहूनागपूर, २७ सप्टेंबर
४० हजार कर्मचार्यांच्या सहकार्याने
जगातील तब्बल १०० देशांमध्ये कार्य करणारे तसेच एक मिलियनहून अधिक अमेरिकी
दात्यांचे भरभक्कम पाठबळ लाभलेले वर्ल्ड व्हिजन हे भारतातील हिंदू,
मुस्लिम, बौद्ध, शीख, जैन, पारशी आदी गैरख्रिश्चनांच्या धर्मांतरणाला
प्रोेत्साहन देणारे जगातील मोठे प्रस्थ असल्याची बाबही पुढे आली आहे.
प्रत्यक्ष धर्मांतरणाच्या घटनांमध्येही वर्ल्ड व्हिजनचा असलेला सहभाग काही
प्रसंगांमुळे उघडकीस आला आहे. काही घटना, धर्मांतरणाला असलेल्या या
संस्थेच्या सैद्धांतिक पाठबळावर प्रकाश टाकणार्या आहेत.
वर्ल्ड व्हिजन आणि ल्युसेन चळवळ खांद्याला खांदा लावून काम करणार्या संस्था आहेत, हे जगजाहीर आहे. Iussane.org
या संकेतस्थळावर ल्युसेन चळवळीमार्फत नित्यनेमाने प्रसिद्ध होणार्या
पेपर्समध्ये ‘ख्रिश्चन विटनेस टू हिंदूज’ या शीर्षकाखाली एक पेपर प्रसिद्ध
करण्यात आला आहे. त्याच्या प्रस्तावनेत जागतिक धर्मांतरावर १६ ते २७ जून
१९८० मध्ये पटाया, थायलंड येथे झालेल्या सल्लामसलतीच्या बैठकींचा आढावा
घेण्यात आला आहे. हिंदू समाजाच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी अर्थात
‘रिचिंग हिंदूज’ या एकमेव मुद्यावर झालेल्या पटाया येथील बैठका आणि
चर्चासत्रे लाऊसेन कमिटी फॉर वर्ल्ड इव्हँजेलायझेशने प्रायोजित केल्या
होत्या. त्या अहवालाच्या उद्घोषणापत्रात, समाजाच्या व्यापक लोकसंख्येपर्यंत
पोहोचण्यासाठी चर्चला प्रोत्साहन मिळावे, अशी आशा आणि प्रार्थना करून तो
प्रकाशित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या पेपरच्या अनुक्रमणिकेतील विषयांवर
एकवार नजर टाकली तरी संस्था हिंदूंच्या धर्मांतरणासाठी कोणती पावले उचलू
इच्छिते, हे स्पष्ट होते.
१) ऐतिहासिक रूपरेषा आणि समकालीन
परिस्थिती, २) हिंदू धर्मांतरणासाठी पुस्तकांची संदर्भसूची, ३) हिंदूंच्या
धर्मांतरणकार्यात येणारे अडथळे, ४) ख्रिश्चन मिनिस्ट्रीजमध्ये हिंदूंवर
पडलेल्या येशूच्या प्रभावाची उदाहरणे, ५) हिंदूंच्या धर्मांतरणासाठी
सैद्धांतिक धोरणांची निश्चिती, ६) लक्ष्य गाठण्यासाठी स्त्रोत आणि साधने,
७) निर्धार, ८) निष्कर्ष, ९) समाप्तीची चिंता
हा अहवाल तयार करणारी समिती आणि तिचे
सल्लागार कोण, याकडेही वाचकांचे लक्ष जाणे आवश्यक आहे. अध्यक्ष- पी.
साखकीर्ती (इव्हँजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया), सचिव- रेव्ह. एम. अल्फोन्स
(मेथॉडिस्ट तामीळ चर्च, सिंगापूर), जनसंवादाच्या सल्लागारांमध्ये डी. ऍडम्स
(इंटरनॅशनल प्रोग्राम कन्सल्टंट ट्रान्स वर्ल्ड रेडिओ, युएसए), कु. ऍनी
एडिगर (इव्हँजेलिक फेलोशिप ऑफ इंडिया) आणि एम. एम. मॅक्सटॉन इंडिया (एव्हरी
होम क्रूसेड) यांचा समावेश आहे. सल्लागारांमध्ये रेव्ह. डॉ. डब्ल्यू.
ड्युवेल (ओरिएंटल मिशनरी सोसायटी इंटरनॅशनल, युएसए), रेव्ह. पी. मॅकनी
(वर्ल्ड व्हिजन, न्यूझीलंड), डॉ. एस. कमलेसन (वर्ल्ड व्हिजन इंटरनॅशनल) आणि
निवृत्त रेव्ह. एस. के. परमार (मेथॉडिस्ट चर्च इन साऊथ एशिया, भारत) यांचा
समावेश आहे.
यावरून हिंदूंच्या धर्मांतरणाच्या योजना
आंतरराष्ट्रीय स्तरावर आखल्या जातात व त्यात वर्ल्ड व्हिजन सहभागी असते, हे
स्पष्ट आहे. या अहवालात सुचविण्यात आलेले रेडिओ मिनिस्ट्रीसारखे उपाय
प्रत्यक्ष धर्मांतरण क्षेत्रात अवलंबिले जात असल्याची बाब उघडकीस आली असून,
त्यातूनच वर्ल्ड व्हिजन ही संस्था थेट धर्मांतराचे कार्य करीत असल्याचे
सिद्ध झाले आहे.
व्हिगो सोगार्ड हे महाशय जनसंवाद विशेषज्ञ
आणि ख्रिस्तोपदेशकदेखील आहेत. ते डेन्मार्कचे रहिवासी आहेत. त्याचप्रमाणे
युरोपियन लाऊसेन कमिटी फॉर वर्ल्ड इव्हँजेलायझेशनचे संचालक म्हणूनही ते
कार्य करीत आहेत. त्यांनी पटाया, थायलंड येथील बैठकीत त्यांच्या अनुभवांवर
आधारित प्रकाशित केलेला पेपर अतिशय बोलका आणि दस्तुरखुद्द पोप जॉन पॉल -
यांनी त्यांच्या १९९९ च्या भारतभेटीत व्यक्त केलेल्या आशावादाला साजेसा
आहे.
व्हिगो सोगार्ड सांगतात, ‘‘एक दिवस मी
वर्ल्ड व्हिजनच्या आढावा समितीसोबत दक्षिण भारतातील श्रीपेरुम्बुदूर या
खेड्यात गेलो होतो. तेथे पोहोचताच मोठ्या संख्येत गावकरी आमच्याभोवती गोळा
झाले. एक महिला कंबरेवर लहान मूल घेऊन आमच्याजवळ आली. अभिमानाने तिने तिचे
मूल आम्हाला दाखविले. ते किती सुंदर आणि गुटगुटीत आहे, हे ती सांगत होती.
पण ते नेहमी आजारी पडते, त्यामुळे अतिशय किरकिरे असल्याचे तिचे म्हणणे
होते. एकदा आम्ही पाण्याच्या संदर्भातील रेडिओ मिनिस्ट्रीची ध्वनीफीत ऐकली.
त्यात आम्ही या संकटातून मुक्त होण्यासाठी जिझसची प्रार्थना करू शकतो, असे
सांगितले होते. त्यानुसार आम्ही जिझसपुढे नतमस्तक झालो. आता त्याचा परिणाम
बघा, तुमच्या समोरच आहे.’’
आपल्या अनुभवांना बळकटी देण्यासाठी व्हिगो
सोगार्ड यांनी आणखी काही दावे केले आहेत. वर्ल्ड व्हिजनच्या ध्वनिफीत
प्रकल्पाचे तेव्हाचे प्रमुख फ्रँकलिन जोसेफ यांच्या घेतलेल्या मुलाखतीत
त्यांना धर्मांतरणाच्या बाबतीत जे चमत्कार झाल्याचे आढळले, तेदेखील त्यांनी
शेअर केले आहेत. भारतीय समाजातील गरीब, दलित, पीडित, अजाण, निरक्षर लोक
ख्रिस्तोपदेशकांच्या गोडगोड बोलण्याने त्यांच्या आहारी कसे जात आहेत, हे
स्पष्ट करणारी ही मुलाखत अभ्यासक, देशहितकारक, चळवळीतील कार्यकर्ते, राजकीय
पुढारी, समाजसुधारक, स्त्रीवादी कार्यकर्ते, कामगार नेते, आरोग्य
क्षेत्रातील लढवय्ये आणि जागे असून झोपेचे सोंग घेणार्यांसाठी नक्कीच
दिशादर्शक ठरू शकतात. फ्रँकलिन जोसेफ हे सध्या वर्ल्ड व्हिजनचे संचालक
आहेत. (क्रमशः) (उद्याच्या अंकात धर्मांतरासाठी वापरल्या जाणार्या युक्त्या)
चर्चचे वास्तव - २८
व्यष्टी, समष्टीतून ख्रिस्तीकरणाची महाचळवळ
चारुदत्त कहू
नागपूर, २८ सप्टेंबर
भारतीय समाजातील गरीब, दलित, पीडित,
वनवासी, अजाण, निरक्षर लोक ख्रिस्तोपदेशकांच्या गोडगोड बोलण्याने त्यांच्या
आहारी कसे जात आहेत, हे स्पष्ट करणारे विदर्भातील आणखी एक उदाहरण नजरेत
भरण्यासारखे आहे. आधी एक व्यक्ती गाठायची, मग त्याचे कुटुंब कह्यात घ्यायचे
आणि नंतर त्याचा समाज आपल्या तंबूत उतरवायचा, हा भारतातील ख्रिस्तीकरण
महाचळवळीचा एक अविभाज्य भागच होऊन गेलेला आहे.
अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा
तालुक्यांत धर्मांतरणाचे काम जोमात सुरू आहे. दोन्ही तालुक्यांत
मिशनर्यांची संख्याही डोळ्यात भरणारी आहे. मलकापूर, चिखलदरा, परतवाडा,
धारणी, कुसुमकोट, दुनी आदी ठिकाणी धर्मांतराची केंद्रे आहेत. चिखलदरा
नगरपालिकेची लोकसंख्या केवळ ५१५१. येथील मरियमपूर वॉर्ड म्हणजे आदिवासींची
वस्ती. स्वातंत्र्यानंतर येथील मिशनर्यांना १०० एकर जागा लीजवर मिळाल्या.
त्या जागेचा वापर सेवेच्या माध्यमातून ख्रिस्तोपदेशाचे धडे देण्यासाठी केला
जात आहे. ख्रिश्चन मिशनरींनी काही आदिवासींना घरे बांधून दिली. आधी
गावाचा विकास करतो असे सांगायचे आणि नंतर वैयक्तिक मदत करायची, असा सेवेचा
निर्झर प्रवाह सुरू झाला. त्या काळात चिखलदर्यात उच्च प्रतीचे तेल, धान्य,
दूध पावडर, उंची-महागड्या वस्तू आदी मदत थेट अमेरिकेतून येत असे आणि
विशिष्ट घरी या वस्तू वितरित होत असत. संध्याकाळी बैठका घ्यायच्या,
येशूबद्दल माहिती सांगायची. यातून धर्मांतरणाला वेग आला. त्यामुळे
चिखलदर्यातील सुमारे १५० कुटुंबे ख्रिश्चन झाली. त्यातील अनेक आदिवासींनी
जात कोरकूच कायम ठेवली, पण धर्म बदलला आहे. आता ते हिंदू सण साजरे करत
नाहीत. पूर्वीचा जग्गू महादेव धुर्वे, जग्गू रॉबर्ट झाला. जब्बे मिट्टामीचा
पीटर झाला आणि काहींनी रॉबर्ट थॉमस कावलकर, अँथोनी पडोळे अशी नावे धारण
केली. जात न बदलल्याने त्यांना दुहेरी सुविधा मिळत आहेत. ख्रिश्चन म्हणून
आणि कोरकू म्हणूनही ते या सोयी-सुविधा लाटून सरकारची फसवणूक करीत आहेत.
त्यांची संस्कृती बदलली आहे. ते हिंदू सण साजरे करीत नाहीत. पोळा नाही.
दिवाळी नाही. रविवार आला की चर्चमध्ये मात्र नेमाने जातात. ‘जय येशू’ असा
जयघोष करतात आणि मुलगा झाला की, त्याचे नाव ख्रिश्चन ठेवण्यात त्यांना
धन्यता वाटते. मात्र गेल्या २० वर्षांत वनवासी कल्याण आश्रमाने
प्रयत्नपूर्वक गावागावांत आणि खेडोपाडी संपर्क प्रस्थापित केल्याने
धर्मांतराचा वेग कमी झाला असला, तरी नवनव्या मार्गांनी येशूचा संदेश
भोळ्याभाबड्या लोकांपर्यंत पोहोचवून मिशनरी आपले अस्तित्व टिकवून आहेत.
ऍडव्हेंटिस्ट न्यूज वेबसाईटवरील एका
मुलाखतीत सेवन्थ डे ऍडव्हेंटिस्टचे रॉन वॅट यांनी ऍडव्हांटिस्ट चाईल्ड
इंडिया प्रोग्राम अंतर्गत मुलांना स्पॉन्सर करण्याचे आवाहन केले आहे. त्याच
वेळी त्यांचे सहकारी पास्टर जॉन यांनी स्पॉन्सरशिप प्रोग्रामच्या
परिणामकारतेवर भाष्य केले आहे. आमचे आजचे ५० टक्क्यांहून अधिक
कार्यकर्ते-शिक्षक आणि पास्टर्स हे आधीचे स्पॉन्सरशिप प्रकल्पाचे लाभार्थी
आहेत, असे ते सांगतात. दक्षिण-पूर्व भारतात आमचे तीन हजार कार्यकर्ते
(धर्मप्रसारक) आहेत, असा त्यांचा दावा आहे.
कम्पॅशन इंटरनॅशनल ही चाईल्ड
स्पॉन्सरशिपसाठी निधी उभारण्याची कल्पना साकारणारी संस्था आहे. या संस्थेची
भारतातील सहयोगी संस्था कम्पॅशन इस्ट इंडिया हिची १०० कोटींहून अधिकचा
(२०१ कोटींचा निधी) विदेशी निधी मिळणार्या संस्थांमध्ये वर्णी लागते.
कम्पॅशन इंडिया भारतात करुणा बाल विकास या संस्थेच्या भागीदारीतून कार्य
करते. करुणा बाल विकाससोबत केलेल्या भागीदारीमुळे २२० मुले आणि त्यांच्या
कुटुंबीयांवर प्रभू येशूच्या आशीर्वादाचा वर्षाव होऊ शकला, याबद्दल बेथेसडा
आय.पी.सी. चर्चने (मदुराई, तामिळनाडू) देवाचे आभार मानले आहेत. संस्थेच्या
वेबसाईटनुसार ‘ख्राईस्ट फॉर टोटल पर्सन’ हे या संस्थेचे ध्येय आहे.
शारीरिक शिक्षण, सामाजिक आणि धार्मिक आदी क्षेत्रात हे चर्च कार्यरत आहे.
आम्ही मुलांना निःशुल्क शिक्षण, निःशुल्क अन्न, त्यांच्यावर सतत देखरेख,
नेतृत्वाच्या कार्यशाळा, सामाजिक न्याय आदींवर लक्ष केंद्रित करतो. आमची
मदत मुलांमार्फत कुटुंबापर्यंत पोहोचते. शिवणकाम आणि शेळी-बकरी
पालनासारख्या उपक्रमातून कुटुंबांना आर्थिक सबलता दिली जाते, असे त्यांचे
दावे आहेत. यासोबतच नवजात बालकांनाही बाप्तिस्मा दिला जातो. काही पालकांनी
तर जिझससाठी सारे आयुष्य वेचण्याचा संकल्प केलेला आहे. येणार्या काळात
आणखी बालकांना आमच्या छत्रछायेखाली आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
आमच्याशी भागीदारी करण्यासाठी संपर्क करा. एक केंद्र सुरू करण्याचा खर्च १४
हजार २२५ रुपये (३१२ अमेरिकी डॉलर्स). एका केंद्र संचालनाचा मासिक खर्च १४
हजार ६६० रुपये (३३३ अमेरिकी डॉलर्स), असे आवाहन संस्थेने बिनधास्तपणे
केले आहे. या सार्या प्रकाराकडे पाहू जाता, विदेशी धनाचा प्रवाह कम्पॅशन
इंडियाकडून करुणा बाल विकासकडे व त्यांच्याकडून बेथेसडा आयपीसी चर्चकडे
वाहतो तसेच या सार्यांना विदेशातील देणग्या केवळ चाईल्ड स्पॉन्सरशिपच्या
नावाने मिळतात व त्याचाच फायदा घेऊन काही मुलांना ख्रिस्तानुयायी केले जाते
तर काही बालकांचे पालक येशूसाठी जीवन ओवाळण्यास तयार होतात.
गॉस्पेल पार्टनर मुव्हमेंटने (जीपीएम) तर दहा वर्षांच्या त्यांच्या कार्याचा आढावा घेणार्या अहवालात १० हजार भारतीयांचे क्रूसीकरण केल्याचे अभिमानाने सांगितले आहे. तामिळनाडूच्या तुतिकोरीन येथील शेअरिंग लव्ह मिनिस्ट्रीने ६२० खेड्यांमधील भिल्ल समाजाच्या हजारो लोकांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिल्याचा दावा केला आहे. त्यांनी ४३० भिल्ल मिनिस्ट्रीजची स्थापनाही केली आहे. गोरखपूरचे द हिमालयन मिशन, तिरुनवेल्ली येथील द पीस ट्रस्ट आणि यासारख्याच अनेक संस्था, ज्या प्रत्यक्ष धर्मांतराचे कार्य करतात, त्यांनादेखील करुणा बाल विकासकडून चाईल्ड स्पॉन्सरशिपच्या नावाने मोठ्या देणग्या मिळतात, असे आढळून आले आहे. बेथेसडा चर्चच्या उदाहरणावरून स्पष्ट आहे की, या सार्या संस्थांची सेवाकार्ये त्यांच्या धर्मांतरण कारवायांपासून वेगळी नाही. सार्या संस्था सरकारी यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करून, धर्मांतराचे कार्य अव्याहतपणे करीत आहेत. (क्रमशः) (उद्याच्या अंकात द स्टोरी ऑफ विल्यम स्कॉट)
चर्चचे वास्तव - २९
विल्यम्स स्कॉट यांची बायबल स्कूल धर्मांतराची गुरुकिल्ली
चारुदत्त कहू
नागपूर, २९ सप्टेंबर
ऑक्टोबर
२०१० रोजी भारतवर्षातील निरनिराळ्या चर्चचे ५०० धुरीण, डॉ. विल्यम स्कॉट
यांनी गेल्या ६० वर्षांपासून भारतीय भूमीत केलेल्या मिशनरी कार्याच्या
गौरवार्थ एकत्र झाले होते. या एकमेवाद्वितीय एकत्रीकरणाचे गुपित जाणून
घेण्यासाठी स्कॉट चळवळीच्या इतिहासात डोकवावे लागेल. या चळवळीचा बाराकाईने
आढावा घेतल्यास ती धर्मांतराची गुरुकिल्ली असल्याचेही स्पष्ट झाल्याशिवाय
राहत नाही.
डॉ. विल्यम स्कॉट आणि आणि त्यांची
स्वर्गीय पत्नी डॉ. जॉयसी स्कॉट या दोघांनी १९५० मध्ये भारतात त्यांच्या
मिनिस्ट्रीच्या (धर्मोपदेशनाच्या) कार्याचा शुभारंभ केला. त्याला
भारतीयत्वाची जोड देण्यासाठी ‘द इंडिया बायबल सोसायटी’ या नावाने
मिनिस्ट्री नावारूपाला आणली. या संस्थेमार्फत कामाच्या दर दिवसाला येशूची
महती सांगणारे तसेच बायबलशी संबंधित ४० हजार पुस्तिका अथवा पत्रके भारतात
वाटली जातात, हे ऐकून स्कॉट दाम्पत्याच्या कारवायांचा अंदाज येऊ शकेल.
१९७२ मध्ये स्कॉट दाम्पत्याने ‘वर्ल्ड होम
बायबल’ या संस्थेच्या सहकार्याने ऑन-साईट स्कूल्स ऑफ इव्हँजेलिझम्ची
स्थापना केली. या अंतर्गत खेड्यांमध्ये वर्ग भरवून विद्यार्थ्यांपर्यंत
शिक्षकांना पोहोचविले जाते. १९८५ सालापासून ६ हजार २०० हून अधिक भारतीय
धर्मोपदेशकांना चर्चच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांनी
देशभरात १८ हजारांहून अधिक छोट्या चर्चेसची स्थापना केली असून, २०
हजारांहून अधिक टिमोथींना (धर्मोपदेशक) प्रशिक्षित केले आहे. (टिमोथी हा
धर्मोपदेशक संत पॉल यांचा सहकारी होता).
१९८४
मध्ये जॉयसी स्कॉट यांनी एका नव्या साहित्यिक प्रकल्पाचा आराखडा आखला.
लिटरसी इव्हँजेलिझम् इंटरनॅशनलने त्यांची भारतातील संयोजक म्हणून नियुक्ती
करून, त्यांच्यावर प्रमुख भारतीय भाषांमध्ये बायबल प्रकाशित करण्याची
जबाबदारी सोपविली. आजघडीला ‘इंडिया बायबल लिटरेचर’ ही संस्था भारतातील २८
राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशातील ६०० हून अधिक चर्च आणि सामाजिक
संस्थांच्या भागीदारीतून निरक्षरांमध्ये धर्मतत्त्व आणि साक्षरतेचा प्रचार
करीत आहेत. सद्य:स्थितीत १७ प्रमुख भारतीय भाषांमध्ये प्राथमिक स्तरावरील
ख्रिस्तोपदेशाचे साहित्य उपलब्ध आहे. बायबलच्या प्रचारार्थ स्थापन करण्यात
आलेल्या चिल्ड्रेन बायबल स्कूलने तज्ज्ञांच्या मदतीने तयार केलेल्या
अभ्यासक्रमातून दर वर्षाला विभिन्न शाळांमधील ६ ते १६ वर्षे वयोगटातील एक
मिलियन विद्यार्थी येशूची ओळख करून घेत आहेत. चर्चधुरीणांच्या सभेत याच
विल्यम स्कॉट महोदयांच्या कामगिरीच्या सकारात्मक परिणामांचा, त्यांच्या
साठाव्या वाढदिवसानिमित्त गौरवाने उल्लेख करण्यात आला.
या सभेत बोलताना एक ख्रिश्चन नेता
म्हणाला, १९८६ पासून मी या चळवळीशी जुळलो आहे. या अभ्यासक्रमामुळे मला
शिष्य कसे मिळवायचे, नव्या चर्चची स्थापना कशी करायची आणि परिणामकारक
पद्धतीने धर्मांतर कसे करायचे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन मिळाले. यातून
प्रेरणा घेऊन मी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यात १० प्रेयर सेल्स सुरू करून,
४० नव्या लोकांना बाप्तिस्मा दिला. आता माझ्या चर्चची संख्या शंभरावर
पोहोचली आहे. माझ्या मिनिस्ट्रीची पहिली दहा वर्षे चाचणी आणि पडताळणीची
होती, त्यानंतरची दहा वर्षे शिकण्याची आणि मशागतीची होती आणि आता पुढील दहा
वर्षांचा काळ माझ्यासाठी कापणीचा, फळांचा आस्वाद घेण्याचा राहणार आहे.
आयबीएलमुळेच मला प्रौढांसाठी साक्षरता वर्ग सुरू करण्याची आणि नवी चर्चेस
उभारण्यासाठी इच्छुक असणार्यांना प्रशिक्षित करण्याची प्रेरणा मिळाली.
देवाच्याच आशीर्वादामुळे मी आयबीएलच्या सहकार्याने स्कूल ऑफ
इव्हँजेलिझम्च्या माध्यमातून २९० पास्टर्स आणि इव्हँजेलिस्टना प्रशिक्षित
करू शकलो. या सर्व प्रशिक्षितांनी विल्लूपुरम, पॉंडिचेरी, कुड्डालोर आणि
कोइंबतूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक चर्च (एकूण २९० चर्चेस) स्थापन केले
आहेत. आतापर्यंत मी ८००० येशू प्रेमींना बाप्तिस्मा (धर्मांतरित करणे) दिला
असून, आजवर ८७० प्रेयर सेल्सची स्थापनाही केली आहे.
या धर्मसभेतील निरनिराळ्या वक्त्यांनी
केलेल्या भाषणांचा गोषवारा काढला असता, या प्रकल्पातून आजवर ५३ हजार ४००
लोकांना धर्मांतरित करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हा आकडा केवळ वक्त्यांनी
केलेल्या भाषणांतून मिळालेल्या आकडेवारीवर आधारित आहे.
याचप्रमाणे सेवन्थ डे अडव्हँटिस्ट प्रौढ
साक्षरता वर्गाच्या माध्यमातून परिणामकारक पद्धतीने धर्मांतर करीत आहे.
वूमेन मिनिस्ट्रीच्या साऊथ एशिया डिव्हिजनच्या संचालिका हेप्झीबाह कोर
यांनी महिलांना साक्षर करण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य पणास लावले आहे.
महिलांना वाचता आल्याशिवाय आपण बायबल त्यांच्या गळी उतरवू शकणार नाही, असे
हेप्झीबाह कोर मानतात. त्यांच्याच पुढाकाराने तामिळनाडू, आंध्रप्रदेश,
ओरिसा, पश्चिम बंगाल आणि गारो हिल्समध्ये सुमारे २०० प्रौढ साक्षरता वर्ग
सुरू झाले आहेत. या वर्गांमध्ये बायबलची शिकवण आणि ख्रिश्चन गीतांवर भर
असणे स्वाभाविकच ठरते. www.news.adventist.org या
संकेतस्थळावर नमूद केलेल्या माहितीनुसार, वर्ष २००० मध्ये पार पडलेल्या
‘विमेन कण्डक्ट ग्राउंडब्रेकिंक आऊटरिच प्रोग्राम इन इंडिया’ या
कार्यक्रमांतर्गत १ हजार १०० लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला.
निरनिराळ्या चर्चेसद्वारे संचालिक नियमित
शाळांमध्येसुद्धा प्रयत्नपूर्वक धर्मपरिवर्तनाच्या कारवाया होत आहेत. या
शाळांना मोठ्या प्रमाणात विदेशी देणग्या प्राप्त होतात. या शैक्षणिक
संस्थांना शिक्षणापेक्षा अधिक रस धार्मिक परिवर्तनात असल्याचे दिसून येते. (क्रमशः) (उद्याच्या अंकात धर्मांतराच्या नाना तर्हा)
चर्चचे वास्तव ३०
धर्मांतरणासाठी पांघरलेली सोज्वळतेची भारतीय झूल
चारुदत्त कहू
नागपूर, ३० सप्टेंबर
ख्रिस्ती धर्म आणि चर्च, बायबल,
मेणबत्ती, क्रूस आदी या धर्माची प्रतिके परकीय वाटू नये म्हणून, तसेच
भारतीय लोकांनी या पाश्चिमात्य धर्मापासून फटकून राहू नये म्हणून
ख्रिश्चनांनी त्यांच्या उपासना पद्धतीत स्थानिक परंपरांनुरूप, सांस्कृतिक
वैशिष्ट्यांच्या त्यांच्या पूजा पद्धतीत अंतर्भाव केला. बिशप्सनी १९६६ साली
भारतीय उत्सवांच्या ख्रिस्तीकरणाला मान्यता दिली. १९६९ मध्ये पार पडलेल्या
ऑल इंडिया लिटर्जिकल मीटिंगमध्ये ग्रामीण पद्धतीचा पूजा प्रकार, सजावट,
वस्तू, हावभाव आदींच्या माध्यमातून उपासनेत भारतीय वातावरण निर्माण केले
जाऊ लागले. यातूनच भारतातील प्राद्यांची वेशभूषा, पूजा विधी, चर्चमधील
वातावरण, चर्चचे स्थापत्य, प्रार्थनागीते, चर्च संगीत आदींवरील रोमचा
प्रभाव कमी होऊन त्यांना हिंदू स्वरूप आले. हिंदुस्थानी मनाला न पटणारे
ख्रिस्ती विधी, संकल्पना, परंपरा आणि प्रतिके यांना फाटा दिला गेला. पुढे
कीर्तने, आरत्या यांचाही आधार घेतला जाऊ लागला. ख्रिस्ती धर्मगुरूंना
स्वामी, बाबा, महाराज, आनंद या उपाध्या देण्याचीही नंतर लाट आली. यातून
अनेक हिंदूंना येशू आपलासा वाटू लागला आणि त्यांनी त्याची तत्त्वे
स्वीकारलीही.
धर्मांतराच्या कारवायांअंतर्गत
नागपूर येथे फेब्रुवारी २००० मध्ये चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आणि दलित
सॉलिडॅरिटी पीपल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या परिषदेत दलित
समाजाला लक्ष्य करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यात पारित झालेल्या ठरावात
दलित जातींच्या प्रश्नाशी सीएनआयने एकरूप होण्याची गरज व्यक्त केली
गेली.सीएनआयने दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडायला हवी, त्यांच्या
प्रश्नांच्या संदर्भात सीएनआय एक शक्ती म्हणून उभी ठाकायला हवी, दलित
डेस्क, दलित स्टडी ऍण्ड रिसर्च सेंटरची स्थापना करणे, स्वतंत्र माध्यमे,
वृत्तपत्रे, वेबसाईट्स सुरू करणे, दलितांमधील धर्मोपदेशक, मानवी अधिकारांचा
समावेश थिऑलॉजीच्या अभ्यासक्रमात करणे, मुलांच्या संडे स्कूल्स तसेच येशू
सुताराचा मुलगा होता यावर भर देण्याचा निश्चय त्यात करण्यात आला.
ख्रिश्चनांची ही शर्करावगुंठीत गोळी बरोबर लागू पडली आणि अनेक दलित आणि
विशेषत: बौद्ध बांधव दुसर्यांदा धर्मांतरित झाले. मात्र, बौद्धांमध्ये
मोठ्या प्रमाणात वाढलेली ख्रिश्चनप्रेमाची लाट रोखण्यासाठी ना नेत्यांनी
ना त्यांच्या संघटनांनी पुढाकार घेतला, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
शिकल्यासवरल्या लोकांमध्ये
धर्मांतरासाठी रेडिओ इहँजेलिझमचा वापर केला जात आहे. याअंतर्गत प्रादेशिक
भाषांमधील संदेश प्रसारित करून लोकांना येशूकडे आकर्षित केले जाते.टाईड
रेडिओ मिनिस्टरीने फेब्रुवारी २०१२ मध्ये आयोजित केलेल्या परिषदेत कुरुख
मातृभाषा असलेल्या उराव समाजाच्या ९६ लोकांनी जिझस आमचा आश्रयदाता असल्याचे
मान्य केले तर ४२ लोक थेट क्रूस गळ्यात अडकवून येशूवासी झाले. याचप्रमाणे
पथराई, फतेहपूर, उदारी आणि लुचकी येथे पार पडलेल्या सिकर्स कॉन्फरन्समध्ये
शंभरावर लोकांनी बाप्तिस्मा घेतला.
आंध्रप्रदेशात एका वर्षाचे
उद्दिष्ट ठरवून, ५०० खेडेगावांमध्ये येशूच्या प्रेमाची महती सांगून,
धर्मांतराचा एक विशाल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ८ लाखांहून अधिक
सदस्यसंख्या असलेल्या सेवन्थ डे ऍडव्हँटिस्ट चर्चच्या माध्यमातून हा
प्रकल्प राबवला जात आहे. गॉस्पेल आऊटरिचचे उपाध्यक्ष वॅलेस मँडिगो यांनी
नमूद केल्यानुसार या प्रकल्पात एकूण ५० चमू सहभागी होणार असून, त्यातील २०
चमूचे नेतृत्व प्रख्यात धर्मांतरणतज्ज्ञ मार्क फिनले करीत आहेत. या
प्रकल्पातून चर्चची सदस्यसंख्या १ लाखांनी वाढविण्याचा संकल्प सोडण्यात आला
आहे.ऍडव्हेंटिस्ट चर्चच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात केवळ एकाच
प्रकल्पाच्या माध्यमातून धर्मांतरण कधीच झालेले नाही,असा दावा सेवन्थ डे
ऍडव्हँटिस्ट चर्चेचे दक्षिण आशिया खंड प्रमुख रॉन वॅट यांनी केला. या ५००
खेड्यांमध्ये ‘गो’ या संस्थेमार्फत प्रत्येकी एक, वन डे चर्च इमारत उभारली
जाणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जावा म्हणून ‘गो’मार्फत २००
कामगारांना स्टायपंड देण्याचीही योजना आहे.‘गो’या संस्थेची सोबतच्या
प्रकल्पातील भागीदारी ३ वर्षांची राहणार असून त्यासाठी संस्थेला ४ लाख ५०
हजार अमेरिकन डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. वायएसआर रेड्डी या ख्रिश्चन
नेत्याकडे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर चर्चचे काम विनाअडथळ्याने
होऊ लागले, असे रॅन वॅट यांनी अभिमानाने नमूद केले आहे.
धर्मोपदेशकांसाठी भारताचा
समावेश १०-२० विंडोमध्ये करण्यात आला आहे. १०/४० विंडो हा जगाच्या नकाशातील
आयाताकृती भूभाग असून यात उत्तर आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशियाचा समावेश
होतो. ख्रिश्चन धर्मोपदेशकांमध्ये हा भूभाग रेझिस्टंट बेल्ट म्हणून ओळखला
जातो. कारण येथील बहुतांश लोकसंख्येत हिंदू, मुस्लिम आणि बौद्धांचा समावेश
आहे.
मिशनरींच्या दृष्टीने भारतात
९५३ इथनिक ग्रुप्स (१० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले) असून, त्यातील ७५०
गटापर्यंत गॉस्पेलची शिकवण पोहोचलेली आहे. तथापि २०० इथनिक ग्रुप्स (५०
हजाराहून अधिक लोकसंख्या असलेले) असे आहेत जिथपर्यंत अजूनही येशूचा संदेश
पोहोचलेला नाही. गटागटांनी जनतेपर्यंत पोहोचण्याची धर्मोपदेशकांची
पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. मात्र, भारतासारख्या बहुविध भाषा आणि
अठरापगड जातींच्या देशात ही पद्धती फारशी यशस्वी ठरण्याची शक्यता नसल्याने
मिशनरींनी येथे पीन कोड पद्धतीचा अवलंब करून आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत.
एका सर्वेक्षणानुसार भारतातील एकूण २७ हजार पीन कोड विभागांपैकी ९०००
विभागांमध्ये किमान एक पास्टर किंवा ख्रिश्चन धर्मोपदेशक निवासाला आहे.
मिशनरींचे कार्य कुठवर पोहोचले
आहे,हे मोजण्याचे आणखी एक परिमाण स्थानिक भाषेत बायबलची असलेली उपलब्धी हे
आहे. बंगलोरस्थित बायबल सोसायटी ऑफ इंडियामार्फत याचा नित्य आढावा घेतला
जातो. एफसीआरएच्या आकडेवारीनुसार या संस्थेला २००६ ते २०११ या कालावधीत ५८
कोटींच्या विदेशी देणग्या मिळाल्या आहेत.आजघडीला २०४ भाषांमध्ये बायबलमधील
साहित्य उपलब्ध असून,तब्बल ६५ प्रादेशिक भाषांमध्ये संपूर्ण बायबल उपलब्ध
आहे.हेच चर्चच्या भारतीयीकरणाचे सर्वात मोठे प्रमाण आहे. (क्रमशः) (उद्याच्या अंकात : चर्चचे जागतिक संबंध)
No comments:
Post a Comment