Sunday, December 23, 2012

मोदींचा विजय आणि दायित्व धर्म

तरुण विजय

$img_titleगुजरातकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले होते. भारतीय राजकारणात गुजरातमधील निवडणुकांचे निकाल निर्णायक आणि दूरगामी परिणाम करणारे राहणार असल्याने त्याकडे देशातीलच नव्हे, तर विदेशातील सरकारांचेदेखील लक्ष लागले होते. या निवडणुकांच्या निकालांमुळे जशी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांची छाती अभिमानाने फुलली, त्याचप्रमाणे या निकालांमुळे भारताची लोकशाही आणि जन-गण-मनच्या सर्वोच्च स्थानालाही पुन्हा अधोरेखित केले.
तथापि, ‘अपशकुनांचे बादशहा’ या विजयातही काहीतरी खोट शोधून काढण्याच्या प्रयत्नात दंग आहेत. विजयाच्या दिवशीदेखील त्यांनी विनाकारण मोदींच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा उपस्थित करून, मूळ मुद्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. तथापि, यातून साध्य काहीच होणार नाही. हिंदुत्वाचे श्रेष्ठ अनुयायी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपाच्या विचारधारेचे प्रतिनिधी कार्यकर्ते, संपूर्ण देशात विकासाचे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण घालून देऊ शकतात, हेच नरेंद्र मोदी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पंतप्रधान या नात्याने अटलबिहारी वाजपेयीजींनी विकास आणि विनम्रतेचे सामंजस्य सादर करून, अजातशत्रू असल्याचा सन्मान प्राप्त केला आहे. जगात मीडिया आणि राजकीय तिरस्काराला सर्वाधिक बळी पडलेले नरेंद्र मोदी यांनी, घृणास्पद आघात सहन करताना पक्षाचे अस्तित्वच सुरक्षित केले नाही, तर पक्षाची वृद्धीदेखील केली. त्याचप्रमाणे वीज, पाणी, शिक्षण, इस्पितळे आणि भ्रष्टाचारहीन शासन आम आदमीपर्यंत पोहोचवून अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य करून दाखविल्या.
नेतृत्वाच्या जबाबदारीच्या धर्मानुसार अविचलित मार्गक्रमण करण्याचे परिणाम दिसून येतात. आघात झाला तरी मार्ग बदलू नका, विचारधारेकडे पाठ फिरवू नका, विचारपथापासूनदेखील ढळू नका. अखेरीच विजय पदरी पडतोच. आपल्यात असे काही लोक असतात, जे विभिन्न कारणांनी नेतृत्वाची जबाबदारी टाळतात आणि विचारांनाही तिलांजली देतात. त्या व्यक्तींना त्याचे तात्कालिक फायदे झाले असले, तरी त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आणि संघटनेच्या यशावरही आघात होतात, हे नाकारले जाऊ शकत नाही.
आमचे एक जुने मित्र होते. त्यांनी असाच रंग बदलून टाकला. मोठ्या बंगल्यात राहायला गेले, दर्जादेखील कॅबिनेट मंत्र्याचा मिळाला. त्यामुळे चेहर्‍यावर प्रसन्नतेचे भाव आणि चालण्यात एकप्रकारची अकड येणे स्वाभाविकच होते. दर्जा आणि प्रभावक्षेत्र वाढल्यामुळे एके दिवशी त्यांचा फोन आला. पण, आम्ही समाधान व्यक्त केले नाही. फक्त हे योग्य केले नाही, एवढीच साधी प्रतिक्रिया दिली. आपल्यासोबत अन्याय झालेला असेल, ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही. आपल्याला वाटत होते की, कुणीतरी आपल्यावर अन्याय केलेला आहे. आपली योग्यता आणखी जास्त अधिकार मिळण्याची आहे. ते मिळाले नाही तर राग व्यक्त करायचा. मोठ्या लोकांपुढे हा विषय मांडायचा. पण, जबाबदरीपासून पळ काढणे, हे पापच आहे. अन्यायाचे लोढणे पाठीवर बाळगून फुटपाथवर राहायलाही हरकत नव्हती. धनपती, भुजपती आणि विद्वेषाच्या पायावर उभ्या असलेल्या दगाबाजांपासून स्वतःला बाजूला सारून आणखी दुसरे काहीतरी करता आले असते. पण मार्ग त्यागण्याची गरज नव्हती. जबाबदारीतून पळ काढणे, मार्ग बदलणे हा तर अधर्मच झाला. कॉंग्रेसवाल्याने जीवनभर अन्याय आणि उपेक्षा सहन करून कॉंग्रेसी म्हणूनच जगला आणि मेला तरी त्याचा सन्मानच होईल. पक्ष तृणमूल असो की भाजपा, जो पक्ष एकदा स्वीकारला तो स्वीकारला. इकडे-तिकडे काही जास्त मिळतेय म्हणून मार्ग बदलणे म्हणजे वैचारिक मृत्यूच आहे.
आम्ही संघाच्या शाखेत १२-१३ वर्षांच्या गणशिक्षकासमोर ५० ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांना कदमताल करताना आणि कुठलाही संकोच न बाळगता आज्ञेचे पालन करताना पाहिले आहे. संघटनेचे अनुशासन आणि त्याच्या पद्धतीनुसार जगण्याचा अर्थ हाच आहे. तुम्ही जर संघटनेत मी वयाने मोठा आहे, अनुभवाने मोठा आहे, जेव्हा तुमचा जन्मही व्हायचा होता तेव्हापासून मी कार्य करतोय्, तुम्ही मला आज्ञा देणारे कोण होता? अशी भाषा वापरायला लागलात, तर संघटना कशी चालेल? मग शिस्त आणि पद्धतीला अर्थच कोणता उरणार? आम्हाला माहीत आहे की, प्रसिद्धिमाध्यमांपुढे वक्तव्ये करून आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना वठणीवर आणण्याची ताकद आपल्यात आहे. पण, अशा अहंकारामुळे पक्षाची ताकद वाढेल, की तुमचा लोकसंग्रह वाढेल? आपल्यातील प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, आपल्यावर कुठला ना कुठला अन्याय झाला आहे. संघटनेतील अधिकार्‍यांशी याबाबत चर्चा करणे, हा त्यावर एक तोडगा ठरू शकतो. दुसरा पर्याय विद्रोहाचा झेंडा हाती घेण्याचा असू शकतो. आता तेलगू देसम् पक्षाचेच उदाहरण घ्या ना! किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी ज्या वेळी राज्यसभेत मतदान झाले, त्या वेळी त्यांचे तीन सदस्य अनुपस्थित राहिले. तिघांनीही यासंदर्भात आपापले खुलासे दिले आहेत. आम्हाला असे काही होणार आहे याची कल्पनाच नव्हती, हा त्यातील एक खुलासाही आहे. एका सदस्याचे तर ऐनवेळी विमानच उडून गेले! नेते यावर काय करणार?
एखाद्या पक्षाचे मोठ-मोठे नेते लोकसभेत एक भूमिका घेऊन एखाद्या मुद्याचा टोकाचा विरोध करतील. तेच नेते राज्यसभेत त्याच मुद्यावर निराळे मत मांडून, ज्या मुद्याला लोकसभेत विरोध केला, त्या मुद्याचे समर्थन करताना सरकारच्या पाठीशी उभे राहत असतील, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी असल्या राजकारणातून कोणता अर्थ घ्यावा?
खरी बाब तर ही आहे की, कुठल्याही राजकीय पक्षात आणि संघटनांमध्ये आताशी शिस्त आणि विचारधारेला कुठलेही महत्त्व राहिलेले नाही. निरनिराळ्या पक्षांमध्ये संघटनेची शिस्त मोडणारेच इतक्या मोठ्या उच्च पदांवर असतात की, त्यांच्या उंचीकडे पाहून जुन्या जमान्याच्या म्हणीप्रमाणे आपल्या डोक्यावरची टोपी जमिनीवर पडून जाईल! हेच नेते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना शिस्तपालनाचे धडे देत असतात. ते सांगतात की, पक्षाच्या विरोधात सार्वजनिक वक्तव्ये करू नका. पक्षांतर्गत बाबींची सार्वजनिक रीत्या चर्चा करू नका. मीडियाकडे जाऊन चुगल्या करू नका. पक्षाचे कार्यकर्ते तुमचे बंधूच आहेत. पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा मान राखला पाहिजे. त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्यावर आघात करणारी विधाने मीडियापुढे करायला नकोत. या सार्‍या गोष्टी सपा, बसपा, तेलगू देसम्, अण्णा द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस म्हणा किंवा भाजपादी पक्षांमध्ये सामान्यपणे बोलल्या जातात. पक्षाचा एखादा कार्यक्रम, अधिवेशन अथवा बैठक असेल, तर या मोठ्या नेतेमंडळींच्या तोंडातून गोड-गोड शब्द बाहेर पडतात. पण नंतर असे दिसते की, हे मोठे नेतेच पक्षाची शिस्त भंग करतात. हे सर्व पाहून असे वाटते की, सध्याच्या राजकीय माहौलमध्ये विचारधारा हा आता पक्षाच्या जाहीरनाम्याचाही विषय राहिलेला नाही. एकमात्र विचारधारा, जी सर्व पक्षांमध्ये एकसारखी आणि सर्व्यवापी आहे आणि ती म्हणजे जिंकण्यासाठी करायच्या तडजोडी म्हणजेच जुगाड!
येनकेनप्रकारेण जिंकून येणे, जिंकण्यासाठी जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड, या निवडीत जाती आणि पैसा याची सर्वाधिक मुख्य भूमिका, जिंकून आल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी तडजोड आणि सरकार स्थापन करण्यासाठी जे काही करणे गरजेचे आहे त्याची जुळवाजुळव करणे. सर्वांची गोळाबेरीज करता आजचे राजकारण फक्त एवढ्यापुरतेच सीमित झाले आहे.
एक काळ असा होता की, कार्यकर्ते चणे आणि फुटाणे फाकून, प्रबळ विचारांच्या प्रेरणेतून कामासाठी तत्पर असत. आपल्या खिशातील पैसा खर्च करून पक्ष आणि संघटनेच्या विस्तारासाठी वेळ देत असत. आपल्या नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करून येत आणि तासन्‌तास त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत. पोलिंग बुथवर काम करण्यासाठी घरांमध्ये पुरीभाजी पॅक करून त्याचे वाटप केले जाई आणि परिवारातील सदस्य जत्थ्याजत्थ्याने जोशात या कामात स्वतःला झोकून देत असत. आता पक्षाच्या बैठका आणि नेत्यांच्या संमेलनासाठी मोठ्या संख्येत बसेसची व्यवस्था करावी लागते. येण्या-जाण्याचा आणि भोजनाचा वेगळा खर्च द्यावा लागतो. पोलिंग बुथवर शहरातील सर्वांत चांगल्या हलवायाकडून अथवा एखाद्या उपाहारगृहातून थाळी पद्धतीनुसार भोजन द्यावे लागते. तरीदेखील उत्साह, हुरूप आणि गर्दी कुठेच दिसत नाही. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आदी प्रांतांमध्ये जेथे जनसंघाची सत्तेत येण्याची कुठलीच संभावना नव्हती, तेथे केवळ पक्षाचे कार्यक्रम आणि विचारधारेवर अविचल टिकून राहण्यामुळेच २०० पेक्षा अधिक युवा कार्यकत्यार्र्ंना कम्युनिस्टांच्या आक्रमणांना बळी पडावे लागले, जीव गमवावा लागला. याउपरही त्यांच्या कुटुंबीयांत जनसंघाबद्दलच्या आस्थेत आणि समर्थनात कुठलीच घट झाली नाही. म्हणूनच जर काही लोक म्हणत असतील की, पक्ष कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या सिंचनामुळे उभा राहिलेला आहे, तर त्यात चूक काय?
पण, वैचारिक आणि व्यावहारिक वृत्ती सर्वच पक्षांमध्ये बघायला मिळते. कम्युनिस्ट विचारधारेला आमचा विरोध असणे स्वाभाविक आहे. पण, त्यांच्या नेत्यांची साधी राहणी आणि कार्यकर्त्यांच्या समर्पण निष्ठेची चर्चा तर होतच होती. आजही त्यांचे अनेक नेते साधे पण समर्पित जीवन जगण्यासाठी ओळखले जातात. पण, आज इतर पक्षात जी परिस्थिती बघायला मिळते अगदी तशीच परिस्थिती कम्युनिस्टांचे बालेकिल्ले असलेल्या केरळ आणि पश्‍चिम बंगालमध्येही अनुभवायला येत आहे.
याचा अर्थ, देश एका नव्या राजकीय पर्यायाच्या, भाषेच्या आणि प्रगतीच्या शोधात आहे? नेत्यांच्या शब्दांवरील विश्‍वास आता संपत चालला आहे. सरकारे आणि मंत्री प्रामाणिकपणे जनहितार्थ काम करतात, हा विश्‍वासदेखील आता कमी होऊ लागला आहे. हा विश्‍वास जागृत करण्यासाठी आणि नव्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी आपल्या जीवनाचा होम करणारे समोर आले, तरच देशाच्या राजकीय भविष्याबाबत आशा जागृत होऊ शकते. जेव्हा आम्ही सारे, आपल्याला सोपविलेल्या जबाबदार्‍या पार पाडताना खंबीरपणे टिकून राहण्याच्या धर्माचे पालन करू, तेव्हाच हे सारे शक्य आहे.

(लेखक राज्यसभा सदस्य आहेत)
अनुवाद : चारुदत्त कहू

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी