Sunday, February 17, 2013

स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते


तारीख: 2/15/2013 12:16:48 PM

$img_title स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात सदैव भारतीय आदर्शवत स्त्रियांचा सन्मानाने उल्लेख केलेला आहे.भारतीय स्त्रीच्या उज्ज्वलतम चारित्र्याचा आधार म्हणजे,प्रभू श्रीरामचंद्रांची अर्धांगिनी सीतामाता व तत्सम देवीस्वरूप नावाजलेल्या भगिनी होत,असा त्यांचा विश्‍वास होता व अशांचा ते आवर्जून उल्लेख करीत.
प्रसंगानुरूप आपल्या भाषणांमध्ये त्यांना पावित्र्याचे श्रेष्ठतम शिखर संबोधित. याज्ञवल्क्यपत्नी देवी गार्गीला स्वामीजींनी या विश्‍वातील श्रेष्ठतम बुद्धिमान स्त्रियांमध्ये गौरविले आहे.सत्यवानाच्या सावित्रीलाही आध्यात्मिक शक्तीच्या दृष्टीने श्रेष्ठ व निर्भयतेच्या बाबतीत असामान्य वर्णिलेले आहे.त्यांनी झाशीच्या रणरागिणी लक्ष्मीबाईलाही, शारीरिक अपार क्षमता आणि स्त्रीसामर्थ्याच्या दृष्टीने आदर्शवतच मानलेले आहे. अशा या श्रेष्ठतम भारतीय महिलांच्या सर्वोच्च सन्मानाची व यशदायी कीर्तीची अनुभूती विश्‍वजनांना त्या वेळी झाली,जेव्हा ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागोनगरीत आयोजित विश्‍व धर्ममहासंमेलनामध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणात अमेरिकेतील स्त्री-पुरुषांना ‘बंधू-भगिनींनो’ संबोधून आपल्या भाषणाला प्रारंभ केला होता.

 शिकागोच्या त्या विश्‍व धर्ममहासंमेलनात उपस्थित स्त्री-पुरुषांनी, त्यांच्या त्या तत्कालीन जीवनात असे आत्मियतायुक्त संबोधन कधीच न ऐकल्यामुळे ते सर्वच अतीव आश्‍चर्यचकित, आत्मविभोर आणि हर्षित झाले. त्या सर्वांनी तत्क्षणीच जागेेवर उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत संमेलन भवन अतिशय आंदोलित करून सोडले. अशी ही आत्मियता संभवत: उपस्थित त्या पाश्‍चात्त्य विश्‍वसमाजाला प्रथमच अनुभवास आलेली असावी.
 स्वामी विवेकानंदांनी आपल्या संपूर्ण जीवनात कधीही स्त्री-पुरुषांच्या बाबतीत भेदभाव केला नाही.अनादिकाळापासून भारतीय स्त्रीचा पुरुषासमानच कौटुंबिक संपत्तीवर भेदभावविरहित आणि समसमानच हक्क असायचा, असा ते आपल्या भाषणातही उल्लेख करीत असत.
 मातृस्थानाची श्रेष्ठता वर्णन करताना स्वामीजींनी आपल्या भाषणांमध्ये सदैव म्हटले आहे की, आमच्या भारतात स्त्रीजीवनाचा प्रारंभ आणि अंतही मातृरूपातच होतो. या विश्‍वात आई (मॉं-माता-जननी) या नावापेक्षा पवित्र व सन्माननीय असे कोणतेही नाव असू शकत नाही, असे ते ठामपणे सांगत. मातृत्वातच स्वार्थशून्यता, अतीव सहिष्णुता आणि पराकोटीची क्षमाशीलता इत्यादी मानवीय श्रेष्ठतम नि पवित्रम सद्गुणांची भव्यता दिसून येते. ‘मातृत्व’ हे ईश्‍वरीय महान दिव्यरूप आहे. त्यांनी सदैव मातृत्वासंबंधात हे स्पष्टच वर्तविले आहे की, ते स्थान पितृत्वापेक्षाही उच्च व महानतम आहे.
 स्वामीजींना भारतीय आर्यांमध्ये व जगातील सेेमेटिकवंशीय लोकांमधे स्त्रियांसंबधित विचार अगदीच भिन्न वाटले. सेमिटिक लोक ईशोपासनेत स्त्रियांच्या सहभागाला किंवा उपस्थितीला घोर विघ्न रूपात बघतात. त्यांच्यात स्त्रियांना कोणत्याही प्रकारे धार्मिक कार्य संपन्न करण्याचा अधिकारच नाही. इतकेच नाही, तर आहारात मांसभक्षणार्थ पक्ष्यांंची हत्या करणेही निषिद्ध मानले गेले आहे. परंतु, आर्यांमध्ये सहधर्मचारिणीशिवाय कोणतेही धार्मिक कार्य संपन्न होऊ शकतच नाही, असे विधान आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीय समाजाच्या अशा धार्मिक व्यवस्थेची कल्पना जगाला देताना असे म्हटले आहे की, धार्मिक कार्यात मातृत्वसामर्थ्य लक्षात घेऊनच स्त्रीची आवश्यकता, उपस्थिती, तिचे महत्त्व अत्याधिक मानले गेलेले आहे. कारण भारतात स्त्री या शब्दाचा उच्चार होताच तिच्या मातृत्वाचा अपार महिमा डोळ्यांसमोर तरळून जातो; तर पाश्‍चात्त्य देशांमधील समाजांमध्ये स्त्री केवळ भोगास्तव मानली जाते. याशिवाय स्वामीजींना याही एका गोष्टीचे आश्‍चर्य वाटले की, अशा विदेशी देशातील समाजांमध्ये मुलगासुद्धा आपल्या आईला आई न म्हणता, तिचे नाव घेऊन हाक मारीत असतो. अशा या पाश्‍चात्त्य विदेशी समाजाची जीवनशैली बघत असतानाच, त्यांच्या समकालीन मुस्लिम समाजातील महिलांची अवस्था अधिकच दु:खद रूपात निदर्शनात येऊन गेली. (संदर्भ : द कम्प्लिट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद- भाग- २, पृ. ५०६)
 पाश्‍चात्त्य देशांमधील अविवाहित तरुण स्त्रियांचे शारीरिक व मानसिक कष्ट बघून, त्याप्रमाणेच त्यांची दुरवस्था पाहून स्वामी विवेकानंद अत्यंत दु:खी झाले होते. अशाच एका जागी त्यांनी ख्रिश्‍चन मिशनरी व चर्चच्या सेवेत असलेल्या स्त्रियांचे (नन्स) कार्य बघून, त्याबाबत चर्चा केली असता, त्यातून निष्कर्ष काढीत हेच म्हटले होते की, धार्मिकदृष्ट्या या देशामधील स्त्री-स्वातंत्र्य अधिकांश पुरुषाधीनच सामावलेले आहे. स्वामीजी स्त्रियांबाबत आपल्या रुग्णावस्थेतही फारच चिंतित असत, असे समजणे अनुचित न ठरावे. त्यांची परमश्रेष्ठ शिष्या भगिनी निवेदिताला (मार्गारेट नोबल) लिहिलेल्या एका पत्रात असे लिहिले होते की, ‘‘निवेदिता, ‘नारी आणि शक्ती’ हे दोन अतिशय महत्त्वाचे शब्द कधीही विस्मरणात जाऊ देऊ नकोस.’’ स्वामीजींच्या जीवनकाळीही आधुनिक पाश्‍चात्त्य जीवनराहणीचा प्रभाव व कलियुगी वातावरण यामुळे भारतीय स्त्रीजीवनही प्रभावित होत चालले होते. हे बघून ते दु:खी होत.
 १९ व्या शताब्दीचा पूर्वार्ध स्त्रीजातीच्या दृष्टीने पीडादायक असाच होता. परंतु, उत्तरार्ध नारी जागरणाचा व चेतनावस्थेचा होता. अशा त्या काळात अनेक समाजसुधारकांद्वारे भारतात स्त्री-दशा-सुधारणा व तिला उन्नतावस्थेत पोचविण्यास्तव अनेकानेक प्रेरणादायी व स्फूर्तिदायक प्रयत्न झाले. याप्रमाणेच विभिन्न धार्मिक, सामाजिक आंदोलनाद्वारेही अतिशय महत्त्वाची भूमिका कृतिशील करण्यात आली. अशा या समाजसुधारकांमध्ये व समाजसेविकांमध्ये राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्तवी, पं. ईश्‍वरचंद्र विद्यासागर, पं. विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादींचे योगदान सर्वश्रेष्ठ होते. याचबरोबर महादेव गोविंद रानडे व रमाबाई इत्यादींनीही स्त्रीशिक्षणाकडे विशेष ध्यान दिले. याबाबत महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनाही असाच मान द्यावा लागेल. सुप्रसिद्ध बंगाली लेखक व कादंबरीकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनीही नारीजीवनाच्या दूरवस्थेकडे त्यांच्या सुप्रसिद्ध १४ कादंबर्‍यांमधून लक्ष वेधले आहे. अशा या सर्व प्रयत्नांमध्ये स्वामी विवेकानंद कसे बरे अलिप्त राहू शकले असते? त्यांनी आपल्या अल्प जीवनकाळातही (१८६३ ते १९०२), आपल्या भाषणांद्वारे भारतात व या विश्‍वातही नारीजीवनाची महत्ता व श्रेष्ठता-दिव्यता इत्यादी पराकोटीच्या सद्गुणांनाच प्रस्थापित करून सोडले नाही, तर त्याशिवाय स्त्रीजीवन सुधारकार्यात अत्यावश्यक असे ध्यान देण्यास्तव भारतीयांना व विश्‍वजनांना प्रेरितही केले.
 इतक्यावरच न थांबता स्वामी विवेकानंदांनी आपले जीवनध्येय बाजूला न सारता, वेळात वेळ काढून स्त्रीजीवनाशी संबंधित समस्यांवरही चिंतन केले. त्यांचे सर्वतोपरी आनंददायक हित व कल्याण कसे होऊ शकेल, यावर चर्चा करून, अनेकानेक उपाय व मार्ग पोटतिडकीने सुचविले. तुमचा मुख्य व श्रेष्ठतम आधार ‘स्त्री’ हीच आहे, हेच त्यांनी भारतीय समाजाला परोपरीने सांगितले. तिची प्रतिष्ठा सदैव कायम राखा. हीच सुसंस्कारांची प्रेरक शक्ती आहे. भारतीय संस्कृती सभ्यतेची रक्षक आहे. तीच आध्यात्मिक प्रेरक, मार्गदर्शक आहे, तीच या संपूर्ण विश्‍वाची संतुलन बाळगणारी प्रेरणा आहे. तीच माता जगदंबेचे, जगज्जननीचे, आदिमायेने प्रतिरूप आहे. तिला सदैव सन्मानित ठेवा. अनादराऐवजी तिचा आदरान्वित उल्लेख करा. आपल्याला जन्म अशाच मातेने दिलेला आहे.
 स्वामी विवेकानंद पाश्‍चात्त्य देशातील अविवाहित तरुण स्त्रियांच्या कष्टांना व दुरवस्थांना बघून फारच दु:खी व्हायचे. त्यांनी एका ठिकाणी मिशनरी आणि चर्चसंबंधित स्त्रियांशी उपरोक्त बाबतीत चर्चा केली. त्या संबंधात ते स्पष्टपणे म्हणाले की, जेव्हा एखादी महिला स्वयं पती-शोधार्थ अधिकाधिक प्रयत्न करते आणि तो जवळपास न मिळल्याने त्याच्या शोधार्थ निकटस्थ सागरकिनार्‍यावर जाते, तिथेही तो सहजासहजी न मिळाल्याचे बघून अंतत: छळ-कपट व धूर्तपणाचा आधार घेत, पती-शोधार्थ भटकत राहते. अशा सर्व प्रयत्नांनीही ती शेवटी स्वत:ला पती-प्राप्यर्थ अयशस्वी झाल्याने अंततोगत्वा चर्चचा आधार घेते. धर्मप्रचारार्थ अशा स्त्रियांपैकी काही चर्चच्या धार्मिक कार्यात उत्साह दाखवितात, पण अधिकांश तेथील चर्च संचालकाच्या (पाद्री) कठोर नि शिस्तयुक्त शासन संचालनामुळे दुराग्रही वृत्तीनेच चर्चसेवा करतात. हे दृष्य बघून स्वामीजींचे असेच मत पक्के झाले की, अशा या चर्चसेविका व चर्चसंचालक आपल्या धर्मप्रचारार्थ इष्ट मार्ग न अवलंबिता साम-दाम-दंड-भेद यांचा उपयोग करीत नि दुर्व्यवहार आचरणात आणीत येशू ख्रिस्ताचा शांती नि कल्याणप्रद ख्रिस्ती धर्माचा दुरुपयोगच करतात. धर्मप्रचाराच्या आड ख्रिस्ती साम्राज्य उभारण्याचाच त्यांचा हेतू असतो. (संदर्भ- विवेकानंद साहित्य, भाग-४, पृ. २५०-५१)
 स्वामी विवेकानंद अ. भा. कॉंग्रेसच्या एकंदर क्रियाकलापांना बघून अप्रसन्नच होते, विशेषत: राष्ट्र अनिष्ट धोरणांमुळे. त्यांची राष्ट्रकल्पना सुस्पष्ट होती. ते आपल्या या भारतभूमीला मातेच्या रूपातच सदैव बघत असत. अशा या भारत भूमीमातेला ते केवळ माती, दगड व भोगभूमी न मानता तिला पुण्यभूमी, तपोभूमी व साधनाभूमी मानत असत. भारतीय सांस्कृतिक परंपरेप्रमाणे त्या पारतंत्र्य काळातही देवी मातेच्या रूपात ते भारतभूमीची एकाग्र चित्ताने स्मरणयुक्त आराधना करताना, काही काळ अन्यान्य सर्वच उपासनायुक्त देवी-देवतांना स्वत:ही बाजूला ठेवीत व भारतपुत्रांनाही तसेच करण्यास्तव सांगत. अशाच एका स्मरणसमयी जागृत होत त्यांनी सिंहनादरूपात भविष्यवाणी केली की, ‘‘आगामी पन्नास वर्षांपावेतो, बंधूंनो, तुम्ही सर्वांनीच एकमात्र हाच पवित्रम घोष करायचा की, जननी जन्म भूमीश्‍च स्वर्गादपि गरीयसी!’’ आणि हीच तुमची आराधनापण असावी, नित्य नियमित.
 असे हे आमचे स्वामी विवेकानंद! सध्या आपण सर्वच त्यांच्या सार्ध शतीच्यानिमित्ताने स्मरण करून त्यांना श्रद्धायुक्त पुष्पांजली अर्पण करीत आहोत, ‘स्त्रीसन्मान समर्थक’ याही रूपात! त्यांच्या चरणी भक्तियुक्त शतश: प्रणाम!
 वसंत अण्णाजी वैद्य

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी