Thursday, March 21, 2013

भानुदासजी यांची दिव्य मराठीतील मुलाखत

एकमेकांना पूरक विचार रूजवण्याचा प्रयत्न
संपूर्ण भारतात संस्कृती एकच आहे. मात्र, तिची अभिव्यक्ती ठिकठिकाणी वेगवेगळी आहे. या अभिव्यक्तीच्या आविष्कारावर लक्ष देण्यापेक्षा सर्वत्र समान असलेला संस्कृतीचा धागा पकडून एकमेकांसाठी पूरक जगणं आम्ही शिकवतो असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे महासचिव भानुदासजी धाक्रस यांनी केले.



स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जयंती समारोहानिमित्ताने प्रबुद्ध आयामतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी ते बुधवारी नाशिकमध्ये आले होते. या वेळी त्यांनी आजच्या तरुण पिढीकरिता विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून देशभर होत असलेल्या कार्याचा आढावा ‘दिव्य मराठी’शी बोलताना घेतला. तसेच आजच्या युवापिढीविषयी आपले विचार मांडले.

योग, आसनं, प्राणायाम, कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तियोग व सेवा ही जीवनपद्धती प्रत्येक व्यक्तीची असतेच फक्त त्याचा प्राधान्यक्रम प्रत्येकाकरिता वेगवेगळा असतो. संतोष आणि समाधान हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असायला पाहिजे यासाठीच कन्याकुमारीला वर्षभरातून दोन वेळा 15 दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात येते. स्थानिक कार्यकर्ता, वानप्रस्थी, सेवाव्रती, शिक्षार्थी आणि जीवनव्रती असे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे निर्माण होतात. संततीच्या विकासासाठी नवरा-बायकोने सहजीवन कसे जगावे यासाठी पूरक असा सहजयोग हादेखील नवा उपक्रम सध्या केंद्राच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

शाळा-महाविद्यालयांमध्ये शिबिरे व व्याख्यानाचे फुटलेले पेव लक्षात घेता केंद्राच्या माध्यमातून आपण वेगळे काय करता या प्रश्नावर त्यांनी आपली शिबिरे ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी नसून राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम जागृतीसाठी असल्याचे ते म्हणाले. तसेच केंद्राकडे कोणत्याही प्रकारचे भेदाभेद नाहीत, त्यामुळेच इथे येणार्‍या प्रत्येकच तरुणाला स्वामी विवेकानंदांच्या विचारांची दिशा गवसते. परिणामी प्रत्येकच युवक-युवती आयुष्यात जे काही लहानमोठे काम करेल ते 100 टक्के झोकून देऊन करतो असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
शब्दांकन . मोहिनी घारपूरे । नाशिक

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी