Monday, April 1, 2013

फुले यांची संघर्षशीलता आणि हेडगेवार यांची संघटनशरणता

--पेशवाईचा अस्त १८१८ साली झाला आणि महाराष्ट्रात अव्वल इंग्रजी शासनाचा कालखंड सुरू झाला. १८३२ सालापासून महाराष्ट्रात प्रबोधनपर्वास सुरुवात झाली, असे मानण्यात येते. आपण पारतंत्र्यात का गेलो? त्यासाठी आपले सामाजिक दोष कसे कारणीभूत झाले आहेत? आपल्या धर्मात काही मूलगामी दोष निर्माण झाले आहेत का? याचे चिंतन आणि मनन सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर, न्यायमूर्ती रानडे, आगरकर आणि महात्मा जोतिराव फुले आदी थोर पुरुषांची नावे या प्रबोधनपर्वाशी जोडली गेलेली आहेत. यांपैकी महात्मा जोतिराव फुले हे महाराष्ट्रातील आणि देशातीलही बहुजन समाजातील पहिले समाजक्रांतिकारक आहेत.

आद्यप्रवर्तक
त्यांच्याविषयी वसंत पळशीकर म्हणतात, ‘‘१९ व्या शतकात भारतात जे प्रबोधन घडून आले त्याचे फुले एक आद्यप्रवर्तक होते. ही मान्यता त्यांना मिळावयास भारतात स्वातंत्र्य मिळून काही काळ लोटावा लागला. ही गोष्ट आपल्या समाजाविषयी बराच काही उलगडा करून जाते... ज्या क्रांतीचे निशाण त्यांनी उभारले ती क्रांती आजही पूर्णत्वास पोहोचलेली नाही.’’ (महात्मा फुले स्मारक व्याख्यानमाला, १९९३)
अशा आद्य समाजक्रांतिकारक जोतिराव फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी येत आहे. योगायोग असा की, तिथीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचाही जन्मदिवस ११ एप्रिल रोजीच येत आहे. वर वसंत पळशीकर यांचे एक वाक्य दिले आहे. त्यात पळशीकर म्हणतात की, महात्मा फुले यांना महात्मा म्हणून मान्यता मिळण्यासाठी बराच काळ लोटावा लागला आहे. डॉ. हेडगेवार यांना समाजमान्यता मिळण्यास अजून खूप काळ जावा लागणार आहे. त्यामानाने महात्मा फुले यांना फार लवकर समाजाने मान्यता दिली, असे म्हणावे लागेल.
माझ्या एका संघमित्राने मला एकदा प्रश्‍न विचारला की, ‘‘डॉ. हेडगेवारांना सर्व समाज स्वीकारेल, मान्यता देईल, त्यांचे युगप्रवर्तक कार्य मान्य करील याला किती कालखंड लागेल?’’ मी त्याला म्हणालो, ‘‘आपल्याला आणखी शंभर-दीडशे वर्षे वाट ब़घावी लागेल. येशू ख्रिस्ताला समाजमान्यता मिळण्यासाठी तीनशे वर्षांहून अधिक काळ लागला. भगवान गौतम बुद्ध यांचा विश्‍वसंचार होण्यास अडीचशे-तीनशे वर्षांचाच कालखंड गेला आहे. तेव्हा एवढी दीर्घ तपश्‍चर्या आपल्याला करावी लागेल.’’
योगायोग
या दोन्ही महापुरुषांचा जन्मदिवस इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आणि तिथीप्रमाणे एकाच दिवशी येत आहे, हा एक योगायोग आहे. असाच योगायोग १४ एप्रिल १९८३ रोजी आला होता. त्या दिवशीही डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस एकाच दिवशी आला होता. हे निमित्त साधून पुणे येथे कै. दत्तोपंत ठेंगडी यांनी सामाजिक समरसता मंचाची स्थापना केली. त्याचा उद्देश सांगत असताना तो एका वाक्यात त्यांनी असा सांगितला की, ‘‘समरस समाजाची निर्मिती हे दोन्ही महापुरुषांचे ध्येय होते, पण मार्ग वेगवेगळे होते.’’ आज समरसता हा शब्दप्रयोग सामाजिक चळवळीमध्ये मान्य झालेला शब्दप्रयोग असून, यावर भरपूर लिखाण होत असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा जोतिराव फुले यांना आपले गुरू मानले होते. महात्मा जोतिराव फुले यांनी हिंदू समाजाच्या र्‍हासाची जी कारणमीमांसा केली तीच पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधनपर ग्रंथलेखन करून समाजापुढे मांडली. महात्मा जोतिराव फुले यांनी थोडक्यात असे सांगितले की, ‘‘हिंदू धर्माचे रूप ब्राह्मणी धर्माचे झालेले आहे आणि शूद्रातिशूद्रांना गुलाम करण्यासाठी खोट्यानाट्या भाकडकथा रचलेल्या आहेत. त्यांना धर्मग्रंथ असे म्हटले गेले आहे. या धर्मग्रंथांच्या माध्यमातून हिंदू समाजातील शूद्रातिशूद्रांचे प्रचंड शोषण चालू आहे. हे शोषणाचे कार्य भट-ब्राह्मणांनी शेकडो वर्षे केलेले आहे. त्यांचे वर्चस्व आपण मोडून काढले पाहिजे. हिंदू धर्माचे स्वरूप विषमतावादी धर्म असे झाले आहे.’’ डॉ. बाबासाहेबांनी, महात्मा जोतिराव फुले यांचा हाच विचार हिंदू धर्मग्रंथांची बुद्धिवादी चिकित्सा करून परखडपणे समाजासमोर मांडला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर समाजाची निर्मिती झाली पाहिजे, जाती-पातीची बंधने असता कामा नये. उच्च-नीचता असता कामा नये, अस्पृश्यता पूर्णपणे गेली पाहिजे आणि बंधुभावयुक्त समाजजीवन निर्माण झाले पाहिजे, याचा आग्रह बाबासाहेबांनी धरला.
यावर्षी ११ एप्रिलला पुन्हा एकदा १९८३ सारखा विलक्षण योगायोग आला आहे. यामुळे महात्मा जोतिराव फुले यांचे सामाजिक स्वप्न आणि डॉ. हेडगेवार यांचे सामाजिक स्वप्न यामध्ये काही समानता, एकसारखेपणा आहे का, असू शकतो का, असा विचार माझ्या मनात आला. असा विचार हा एक धाडसी विचार आहे, कारण महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी आणि परिवर्तनवादी लोकांनी डॉ. हेडगेवार यांना आपल्या सामाजिक चिंतनात काहीही स्थान दिलेले नाही. त्यांची योग्यता आणि त्यांचे क्रांतिकारकत्व यांची जाणीव समाजाला अजून व्हायची आहे आणि ती या पिढीला होणे (सर्वांची क्षमा मागून) कठीणच आहे. तरीसुद्धा एक विचार मनात आला आहे, तर त्याबद्दल लिहिले पाहिजे, असे वाटून या दोन थोर पुरुषांच्या कार्यातील सुसंगती मला जशी ़उमगली तशी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
कार्यक्षेत्र हिंदू समाज
महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य १९ व्या शतकाच्या मध्यपासून सुरू झाले. तेव्हा पहिला प्रश्‍न मनात असा येतो की, महात्मा जोतिराव फुले यांच्या डोळ्यांपुढे कोणता समाज होता? ते कोणत्या समाजाच्या प्रश्‍नासंबंधी बोलत होते? ते कोणत्या धर्माबद्दल बोलत होते? ते कोणत्या धर्मग्रंथांबद्दल बोलत होते? या प्रश्‍नांची उत्तरे अशी आहेत की, त्यांच्या डोळ्यापुढे हिंदू समाज आहे. त्यांनी हिंदू समाजातील जातिभेदांवर हल्ले केले, अस्पृश्यता फक्त हिंदू समाजातच पाळली जाते, त्या अस्पृश्य बांधवांविषयी त्यांनी अत्यंत ममतेने कार्य केले, स्त्रीशिक्षणाचा अभाव ही हिंदू समाजाची समस्या होती, विधवा स्त्रियांचे प्रश्‍न, हिंदू स्त्रियांचे प्रश्‍न होते. शेतकर्‍यांची नागवणूक करणारे हिंदूच होते म्हणजे महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य हिंदू समाजाच्या पुनर्घटनेचे, हिंदू समाजाला निर्दोष करण्याचे, हिंदू समाजाला जातिमुक्त करण्याचे, हिंदू समाजातून अस्पृश्यता घालवून देण्याचे होते. महात्मा जोतिराव फुले यांनी चुकूनही मुस्लिम समाजातील पडदा पद्धती, मुस्लिम समाजातील स्त्रियांचे स्थान, मुस्लिम समाजातील अंधश्रद्धा, मुस्लिम धर्मातील परधर्माचा द्वेष करण्याची शिकवणूक यांच्यावर हल्ला केलेला नाही किंवा त्यांनी ख्रिश्‍चन मिशनरी आणि भारतातील ख्रिस्ती संप्रदाय यांच्यातील धर्मदोष, समजदोषदेखील दाखविलेले नाहीत. त्यांच्यापुढे फक्त हिंदू समाजच होता. यामुळे माझ्या दृष्टीने महात्मा जोतिराव फुले म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचे तर, ते एक सत्यशोधक होते आणि माझ्या भाषेत सांगायचे तर ‘ते हिंदू सत्यशोधक होते.’
एक ढळढळीत सत्य महाराष्ट्रातील एकही पुरोगामी मांडत नाहीत, कारण ते त्याला सोयीचे नसते. त्यांना महात्मा जोतिराव फुले सर्वधर्मसमभावी स्वरूपातील हवे असतात. या पार्श्‍वभूमीवर डॉ. हेडगेवारांचा जर विचार केला तर काय दिसते? १९२५ साली डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. महात्मा जोतिराव फुले यांच्या डोळ्यापुढे जरी हिंदू समाज असला, तरी तो प्रामुख्याने पुणे, पुणे परिसर, मुंबई आणि महाराष्ट्रातील होता. डॉ. हेडगेवारांच्या डोळ्यापुढे आसेतूहिमाचल पसरलेला हिंदू समाज होता. महात्मा जोतिराव फुले यांच्याप्रमाणे त्यांच्याही मनात एक चिंतन सतत चालू राहिले की, आपली अशी दयनीय अवस्था का निर्माण झाली आहे? हिंदू समाजाचा एवढा र्‍हास का झाला आहे? आणि हिंदू समाजाचे जर पुनरुत्थान करायचे असेल तर काय केले पाहिजे?
वेगळी मीमांसा
चिंतनाचा बिंदू जरी समान असला, तरी महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. हेडगेवार यांचे निदान अतिशय वेगळे आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी समाजाच्या अवनतीला आपले धर्मग्रंथ, भट-ब्राह्मणांची मक्तेदारी आणि बहुजन समाजाचे अज्ञान यांना जबाबदार धरले. हे निदान करून जोतिराव यांनी समाजजागृतीचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी त्यांनी ग्रंथलेखन केले, चळवळ सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक पद्धतीने लग्नकार्य, पूजापाठ त्यांनी सुरू केले.
डॉ. हेडगेवारांचे निदान वेगळे होते. आपल्या अवनतीला त्यांनी सर्व समाजाला जबाबदार धरले. धर्मग्रंथ अथवा ब्राह्मणवर्ग यांनी त्यांना जबाबदार धरले नाही. हिंदू समाज आत्मविस्मृत झाल्यामुळे हिंदू समाजाची अशी दयनीय अवस्था झाली आहे. या अवस्थेतून त्याला वर काढायचे असेल, तर समाजाचे आत्मभान जागृत केले पाहिजे. आत्मभान जागृत करण्यासाठी हिंदू समाजाला संघटित केले पाहिजे, असा त्यांनी निर्णय केला आणि आपले सर्व आयुष्य हिंदू समाज संघटनेच्या कार्याला वाहून टाकले. डॉ. हेडगेवार यांनी आपली धर्मचिकित्सा कधी केली नाही. त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला नाही. डॉ. हेडगेवार विद्वान पंडित वगैरे कुणी नव्हते. त्यांच्याविषयी त्यांचे चरित्रकार नाना पालकर लिहितात, ‘डॉक्टरांच्या धावपळीच्या जीवनात त्यांना फारसे वाचन करण्यास सवड मिळाली नव्हती. त्यामुळे मोठमोठ्या ग्रंथकारांचे उतारे, अवतरणे व संदर्भ यांचा वापर त्यांनी सहसा केलेला दिसत नसे. त्यांनी वाचन केले होते ते जनमनाचे, त्यांनी अध्ययन केले होते देश-काल परिस्थितीचे.’ यामुळे डॉक्टरांच्या नावावर एकही ग्रंथ नाही किंवा डॉक्टरांनी लिहिलेले लेखही उपलब्ध नाहीत.
आसूड आवश्यक
एकोणिसाव्या शतकातील हिंदू समाजाची अत्यंत दारुण अवस्था पाहता, या समाजाला जागे करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांच्यासारखा हातात आसूड घेतलेला एक महात्मा आवश्यकच होता. महात्मा जोतिराव फुले यांच्या घाणाघाती टीकेमुळे आणि त्यांच्या रांगड्या भाषेमुळे काही जणांना त्यावेळेला राग जरूर येत, त्या वेळीही आला, आताही येतो, परंतु त्यामुळे आपल्या धर्माची युगसापेक्ष चर्चा करण्याची बुद्धी समाजातील फार मोठ्या वर्गाला झाली. दुसर्‍या भाषेत, महात्मा जोतिराव फुले यांनी महाराष्ट्राची विचारशक्ती जागृत केली, बुद्धिवादी विचार करण्याची पिढी निर्माण केली. हे त्यांचे कार्य हिंदू समाजावर फार मोठे उपकार करणारे आहे. त्यांच्या कार्याची परिणती कालांतराने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात झाली. त्याला जातीय स्वरूप आले, हा त्यांच्या अनुयायांनी त्यांचा केलेला पराभव आहे. याचा दोष महात्मा जोतिराव फुले यांना देता येत नाही.
डॉ. हेडगेवार यांनी जे कार्य सुरू केले ते समाजाला धक्का देणारे कार्य नव्हते. मुळातच हिंदू संघटन करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. संघटन करायचे असेल, तर सर्वांना एकत्रित करण्याचा, आजच्या परिभाषेत सांगायचे, तर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हवा. डॉ. हेडगेवारांनी तो कसा शोधला? हा त्यांचा शोध ही त्यांची अलौकिकता आहे. त्यांनी हिंदू संघटनेसाठी हिंदू धर्म आधार मानलेला नाही. एखादा धर्मग्रंथ स्वीकारला नाही, इतिहासातील एखादा महापुरुष स्वीकारला नाही, कुठलेही तत्त्वज्ञान स्वीकारले नाही. वेदान्ताच्या आधारे हिंदू संघटन करायचे आहे, असेही ते कधी म्हणाले नाही. मग ते काय म्हणाले?
ते म्हणाले, ‘‘ही आपली भारतमाता आहे. आपण सर्व तिचे पुत्र आहोत. एकेकाळी आपली आई वैभवसंपन्न होती, आज तिला दारिद्र्य प्राप्त झालेले आहे. पुत्र म्हणून तिला वैभवसंपन्न करणे हे आपले परमकर्तव्य आहे. आपण हिंदू आहोत, आपला प्राचीन इतिहास आहे, आपली संस्कृती प्राचीन आहे, आपले पूर्वज महान होते, आपल्या पूर्वजांनी एकेकाळी हा देश सुवर्णभूमी केला. आपल्यालाही आपल्या पराक्रमाने, कष्टाने आणि प्रयत्नाने संपूर्ण देश वैभवसंपन्न करायचा आहे. देश वैभवसंपन्न आपल्या सामर्थ्यातूनच होईल. सामर्थ्य संघटनेत असते म्हणून समाजाला संघटित केले पाहिजे.’’ हे त्यांनी प्रत्यक्ष शाखेच्या माध्यमातून करून दाखविले. कसलाही अभ्यास न करता, अध्ययन न करता आणि अनुभव न घेता संघाला, संघाचे टीकाकार धार्मिक संघटन समजतात. परधर्माच्या विरोधातील संघटन समजतात आणि त्यामुळे देशाच्या सर्वसमावेशक वृत्तीला असे संघटन मारक आहे, असा त्यांचा निष्कर्ष असतो. असे विधान करणारे विद्वान असतात आणि मग त्यांच्या अशा विद्वत्तेवर हसू आल्याशिवाय राहत नाही.
परिणाम
डॉ. हेडगेवारांनी सुरू केलेल्या हिंदू संघटनकार्यातून २०१३ सालापर्यंत काय परिणाम झालेला आहे, याचेही थोडे अध्ययन करण्याची गरज आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी उपस्थित केलेले विषय आपण घेऊ या. महात्मा जोतिराव फुले यांनी अस्पृश्यतेविरुद्ध बंड पुकारले. आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला. महार-मांगांच्या मुलांसाठी त्यांनी शाळा काढल्या आणि असे कार्य केल्याबद्दल समाजाच्या खूप शिव्या खाल्या. वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले, परंतु महात्मा जोतिराव फुले त्यातून डगमगले नाहीत. ते खंबीर राहिले.
डॉ. हेडगेवारांनी सुरू केलेल्या संघात पहिल्या दिवसापासून अस्पृश्यतेला पूर्णविराम देण्यात आला. संघात कुणी कुणाची जात विचारित नाही. संघात अस्पृश्यता पाळली जात नाही. संघाचे कार्य समग्र हिंदू समाजाचे असल्यामुळे हिंदू जातीतील सर्व समाजाची माणसे संघात असतात. त्यातील कुणी प्रचारक असतात, कुणी संघचालक असतात, कुणी कार्यवाह असतात. ते त्या ठिकाणी त्यांच्या जातीमुळे नसतात. त्याचप्रमाणे तेथे पोहोचण्यात त्यांची जातही कधी अडचण ठरत नाही. हा लेख सार्वजनिक रूपाने जाणार असल्याने मला माहीत असलेल्या काही नावांचा मुद्दाम उल्लेख करतो. नामदेवराव घाडगे हे संघप्रचारक होते. डॉ. गंगाधर पानतावणे यांचे बंधू ओरिसात संघाचे प्रचारक होते. कांबळे, गायकवाड, सोनावणे अशी अनेक मंडळी संघाची पदाधिकारी आहेत. संघात जो संघचालक होतो किंवा कार्यवाह होतो त्याला शाखेत गेल्यानंतर प्रणाम करावा लागतो. संघाच्या कार्यपद्धतीचा हा एक भाग आहे आणि संघात येणारे सर्व हिंदू आपल्या संघचालकाला आणि कार्यवाहाला प्रणाम करतात. म्हणजे महात्मा जोतिराव फुले यांना अभिप्रेत असलेले अस्पृश्यता निवारण डॉ. हेडगेवारांनी पूर्णत्वास नेले आहे.
खरे सत्यशोधक
महात्मा जोतिराव फुले यांना आपल्या धर्माची बुद्धिवादी चिकित्सा अभिप्रेत होती. धर्मग्रंथातील वाक्ये किंवा वचने प्रमाण मानून आपली बुद्धी गहाण ठेवू नये, असे त्यांचे मत होते. मी एक संघस्वयंसेवक आहे आणि आत्मप्रौढीचा दोष स्वीकारून मी असे म्हणेन की, मी संघातील एक ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. मी कट्टर धर्माभिमानी आहे, परंतु मी रूढिवादी नाही. ग्रंथप्रामाण्यवादी नाही, बाबा वाक्यं प्रमाणम् मानणारा नाही. संघात तसे मला शिकविले गेलेले नाही. हे माझ्यापुरतेच खरे आहे, असे नसून माझ्याप्रमाणे सर्वच कार्यकर्त्यांची ही स्थिती असते. म्हणून महात्मा जोतिराव फुले यांना अभिप्रेत असलेला खरा सत्यशोधक संघस्वयंसेवकातच पाहायला मिळतो. कारण तो कसल्या जातिपातीची बंधने पाळत नाही. कुठल्याही धार्मिक कर्मकांडात त्याला विशेष रुची नसते. त्याचा देव समाज असतो आणि त्याची आराध्य समाजातील सर्वसामान्य माणूस असतो. मनुष्यात देवत्व पाहायचे आणि त्या देवाची सेवा करायची, हेच स्वयंसेवकाचे व्रत असते. महात्मा जोतिराव फुले यांनादेखील हेच अभिप्रेत होते.
शैक्षणिक कार्य
महात्मा जोतिराव फुले यांनी शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणावर अतिशय भर दिला. त्यांचा खालील अखंड फार प्रसिद्ध आहे-
‘विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतिविना गती गेली
गतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले’
मुलींना शिक्षण देण्यासाठी १८४८ साली त्यांनी भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू केली. महार-मांगांच्या मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केली. वंदनीय सावित्रीबाई फुले यांनी त्यांना या कार्यात जी साथ दिली आहे ती अद्वितीय आहे. म्हणून त्यांनाही वंदन करावे लागते.
शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणाचा हा वसा देशभरचे संघस्वयंसेवक अत्यंत निष्ठेने चालवीत आहेत. आपण महात्मा जोतिराव फुले यांचा हा वारसा फुढे नेत आहोत, असे कदाचित त्यांना माहिती नसेल, पण महात्मा जोतिराव फुले जर आज असते, तर ते सर्व कार्य पाहून ते सद्गतीत झाले असते. नुकताच मी रुद्रपूरला गेलो होतो. तिथे पूर्वांचलातील चारशे मुली शिक्षण घेत आहेत. त्यांचे वसतिगृह आणि शाळा संघस्वयंसेवक चालवितात. या सर्व मुली महात्मा जोतिराव फुले यांच्या परिभाषेत सांगायचे तर शूद्रातिशूद्र आहेत. यमगरवाडी येथे भटके-विमुक्त समाजातील चारशे मुला-मुलींचे वसतिगृह चालते. महात्मा जोतिराव फुले यांच्या परिभाषेत यांची गणना तर अतिशूद्र या विभागात करायला पाहिजे. मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ, आंध्र अशा प्रत्येक राज्यात अशी वसतिगृहं आणि शाळा आहेत. जिथे समाजातील वंचित आणि उपेक्षित वर्गातील मुले-मुलीच शिक्षण घेत आहेत आणि त्या समाजातूनच ‘सावित्रीच्या लेकी’ उभ्या राहत आहेत, ज्या सावित्रीबाईंचा वसा पुढे घेऊन जात आहेत.
अद्भुत किमया
डॉ. हेडगेवारांनी जी एक अद्भुत किमया या देशात केली आहे ती अशी की, त्यांनी हा सर्व समाज माझा आहे, या समाजातील सर्व थोरपुरुष माझे आहेत, त्यांचे कार्य माझे कार्य आहे, असा मनोभाव निर्माण करणारे लाखो कार्यकर्ते उभे केले आहेत आणि असे कार्यकर्ते निरंतरपणे उभे राहतील, अशी कार्यपद्धती उभी केली. यामुळे महात्मा जोतिराव फुले यांची वाणी तिखट असली, टीका तिखट असली, डॉ. बाबासाहेबांची वाणीदेखील कडक टीकेची असली, तरी हे महापुरुष संघस्वयंसेवकाला आपले मित्रच वाटतात. आपले आत्मीय वाटतात. कारण या सर्व महापुरुषांचे कार्यक्षेत्र हिंदू समाज हेच आहे. ज्यांनी ज्यांनी हिंदू समाजासाठी आपले रक्त आटविले ते आपलेच आहेत, ही शिकवण डॉ. हेडगेवारांनी दिलेली आहे. यामुळे आपण करीत असलेले असंख्य कार्य ही महात्मा जोतिराव फुले यांचा वारसा पुढे नेणारी कार्ये आहेत, याची खर्‍या अर्थाने जाणीव कदाचित संघकार्यकर्त्याला नसेल, परंतु जर विचार केला तर फुले यांनी मांडलेले विषयच आपण पुढे नेत आहोत, याचे आकलन झाल्याशिवाय राहणार नाही. महात्मा जोतिराव फुले यांचा वारसा डॉ. हेडगेवार यांचे अनुयायी संपूर्ण देशात जिवंत ठेवीत चालले आहेत, हे या दोन महापुरुषांच्या एकाच दिवशी येणार्‍या जयंतिनिमित्ताने सर्वांनी लक्षात घ्यायला हरकत नाही.
रमेश पतंगे
९८६९२०६१०१
साभार - तरुण भारत 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी