Monday, April 1, 2013

कर्तबगार राज्यकर्ता - छत्रपती संभाजी

ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी लागणारा दृढनिश्‍चय, त्यासाठीचे प्रयत्न, प्रयत्नातील सातत्य आणि आक्रमक पवित्रा ही सर्व तंत्रे आत्मसात करून, शत्रूंचा मुकाबला करणारा महान पराक्रमी राज्यकर्ता म्हणून छत्रपती संभाजी राजे यांचा उल्लेख करावा लागेल. प्रचंड पराक्रमी छत्रपतींचा पुत्र असल्याकारणाने त्यांच्या कर्तबगारीशी संभाजी राजांची प्रत्येकाने तुलना केल्यामुळे, मोठी गफलत झालेली दिसून येते.
पराक्रमाच्या संदर्भात तसूभरही कमी नसलेले राजे संभाजी, इतर राज्यगुणासंदर्भातही शिवरायांच्या बरोबरीने उतरायलाच हवेत, हा अट्टहासच चुकीचा म्हणावा लागेल. पित्याच्या मृत्यूनंतर नैसर्गिक न्यायाने गादी मिळण्याऐवजी मंत्री व सावत्र आईने केलेला कट, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर प्रत्यक्ष औरंगजेबाचे स्वराज्यावरील संकट, अशा घनघोर रणतांडवाच्या परिस्थितीतही, सतत नऊ वर्षे स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या व शेवटी बलिदान देणार्‍या या महान राज्यकर्त्याला मात्र इतिहासाने न्याय दिला नाही. अलीकडे बेंद्रे, गोखले प्रभृतींनी असे प्रयत्न केल्याचे दिसून येते. शेजवलांसारख्यांनीदेखील बखरकारांप्रमाणेच छत्रपती संभाजीराजांना अविचारी, क्रूर, दारूबाज, व्यसनी, विलासी, बाहेरख्याली संबोधून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. कथा, कादंबर्‍या, बखरींमध्ये राजांचे अनेक काळापर्यंत असेच काळेकुट्ट चित्र पाहायला मिळते.
शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर आधीच आईविना पोरका असलेल्या संभाजीराजांवर पुन्हा कुर्‍हाड कोसळली. मातेपेक्षाही मायेने पालनपोषण करणार्‍या आजीचा म्हणजेच जिजामातेचा १७ जून १६७४ रोजी मृत्यू झाला. राज्याभिषेकसमयी संभाजीराजांना युवराज म्हणून मान्यता मिळाल्यानंतर, त्यांच्याविषयी असूया बाळगणार्‍यांनी त्यांच्यावर आरोप करायला प्रारंभ केलेला दिसून येतो. त्यांची सावत्र आई सोयराबाई ही महत्त्वाकांक्षी सुंदर स्त्री होती. त्यांना, स्वत:चा मुलगा राजारामाला युवराजपद न मिळाल्याचे दु:ख होणे नैसर्गिक वाटते. परंतु, समाज व राजमान्यतेनुसार मोठ्या मुलाकडेच तो मान जाणे त्यांनी समजून घेणे त्यांच्या व स्वराज्याच्या हिताचे होते. मात्र, इतिहासाला ते मान्य नसावे.
जिजामातेच्या निधनानंतर संभाजीराजांना समजून घेणारे कुणी उरले नसल्यामुळे गृहकलह वाढतच गेला. सोयराबाईचे प्रस्थ कुटुंबात वाढणे स्वाभाविक होते. आधीच महत्त्वाकांक्षी असलेल्या सोयराबाईला मोकळे रान मिळाले. महाराज मोहिमांमध्ये गुंतून असल्याकारणाने त्यांनाही कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. अनेक काल्पनिक घटनांमध्ये संभाजीला गोवण्यात आल्याचे दिसून येते. अण्णाजी दत्तो यांच्या मुलीला पळवून जवळ ठेवण्याचा आरोप करण्यात आला. थोराताची कमळा हिच्यावर संभाजीचे प्रेम होते, ते तिला भेटायला रोज गडावरून येत, तिची समाधीदेखील लिखाणात आणली गेली, असे आरोप संभाजीला बाहेरख्याली ठरविण्यासाठी करण्यात आले. परंतु, संशोधन करून इतिहासतज्ज्ञ द. ग. गोडसे यांनी, अण्णाजी दत्तो यांची मुलगी गोदावरीची कथा कपोलकल्पित असल्याचे स्पष्ट केले. वास्तविक, फितुरीमुळे पोखरलेल्या स्वराज्याची घडी नीट बसविणारा राजा संभाजी असे काही करेल यावर विश्‍वास ठेवणे जड जाते. लुनियासारख्या परकीय तज्ज्ञानेही संभाजीराजांच्या राज्यदक्षतेची स्तुती केली आहे. ते म्हणतात, ‘‘शिवाजीने प्रस्थापित केलेली प्रशासनव्यवस्था संभाजीने यथोचित, योग्य शक्तीने, योग्य पद्धतीने सांभाळली. संभाजी हे प्रजाहितदक्ष शासक होते.’’ संभाजीराजांच्या राज्य व प्रजहितदक्षेबद्दल इतिहासकार बाहेकर म्हणतात, ‘‘संभाजीराजांना आपल्या राज्यात गैरकारभार, अफरातफर केलेली खपत नसे. अन्याय त्वरित दूर केला जाई. रयतेची गार्‍हाणी खुद्द जातीने संभाजी महाराज ऐकून घेत.
त्यांच्या शंका ऐकून त्यांना न्याय मिळवून देत. बेकायदेशीर, अन्याय्य गोष्टी घडल्यावर योग्य ती कारवाई करीत. त्यांना कामकाजाच्या बाबतीत दप्तरदिरंगाई अथवा विलंब अजीबात खपत नसे.’’ प्रजाहिताकडे लक्ष देणारा राज्यकर्ता उपरोक्त कलंकित, घृणास्पद बाबींमध्ये सहभागी असेल, हे चिकित्सक जाणिवेला न पटणारे आहे. संभाजी महाराजांवरील आरोपाच्या लिखाणाचा आधार प्रामुख्याने चिटणीस बखरमध्ये लिहिलेल्या घटना आहेत. मुळातच ही बखर समकालीन नाही, तर तब्बल १२२ वर्षांनंतर ही बखर लिहिली गेली! संभाजीनंतर तेव्हाच्या ऐकीव माहितीवर आधारित हे लिखाण सत्य असल्याचा संभव फारच कमी म्हणावा लागेल.
स्वराज्यावर आलेल्या प्रचंड संकटासमोर दिल्लीच्या मुघल पातशाहीसमोर, शक्तीने अतिशय तुटपुंज्या असलेल्या संभाजीराजाने प्राणपणाने लढा दिला. बाह्य परिस्थितीसोबतच त्यांना अंतर्गत स्थितीही अनुकूल नव्हती. सर्वत्र प्रतिकूल वातावरण होते. अण्णाजी दत्तोसारखे प्रधान त्यांना पदच्युत करण्यासाठी कारस्थाने करीत होते. त्यांना विष घालून मारण्याचाही प्रयत्न झाला. कुणावर विश्‍वास ठेवावा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. अशाही परिस्थितीत त्यांनी स्वधर्म व स्वराज्याचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशा स्थितीत सावत्र आई सोयराबाई, मंत्रिगण यांनी गृहकलह आरंभला. परमानंदलिखित अनुपुराणात या गृहकलहाचा आणि संभाजीच्या चारित्र्याला या गृहकलहाने विकृत रीत्या साकारल्याचा उल्लेख आढळतो. अशा स्थितीत बाह्य संकटाचे प्रचंड दडपण असताना, शांतता मिळण्याऐवजी विरोधी कारस्थाने आणि तेही आप्तस्वकीयांनीच आरंभणे ही विसंगती तरुण-तडफदार राजाला सहन न होण्यासारखेच होते. म्हणून त्यांनी एकवेळ माफ केलेल्या मंत्री-अधिकार्‍यांना पुन्हा कट केल्यानंतर शिक्षा देणे राजधर्मात बसणारे होते. जर त्यांनी पुन:पुन्हा अशा राज्यविरोधकांना माफ केले असते, तर राज्यरक्षण वा राज्यवर्धन शक्यच नव्हते.
तेव्हा विशेषत: बखरकारांनी पूर्वग्रहदूषित मनाने, त्या आधारावर नाटककारांनी, कादंबरीकारांनी राजा संभाजीला व्यसनी, बाहेरख्याली, विलासी, रंगेल, राज्यबुडव्या अशा विकृत स्वरूपात लिखाणाद्वारे इतिहासात बसविले. अगदी सरदेसाई, शेजवलकर यांनीही त्यांना साथ दिल्याचे दिसून येते. परंतु, अलीकडे अनेक संशोधकांनी खरा राजा संभाजी उभा करण्याचे अभिनंदनीय प्रयत्न सुरू केले. बेंद्रे, सेतू माधवराव पगडी, डॉ. सौ. कमल गोखले, जयसिंगराव पवार, डॉ. अशोक राणा इत्यादींनी या पराक्रमी व कर्तबगार राजाला वास्तव स्वरूपात इतिहासात पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला. ‘बुद्धभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिणारा, बालपणीच आग्र्‍याची कैद भोगणारा-अनुभवणारा, युगपुरुष पित्याचे छत्र हरपताच, मायेने जपणारी आजी स्वर्गवासी होताच कपटी औरंगजेबाशी दोन हात करणारा, प्रचंड पराक्रमी छत्रपती संभाजी जर उपरोक्त आरोपांमधला संभाजी असता, तर सतत नऊ वर्षे शत्रूशी प्राणपणे झुंजला नसता. त्यांनी स्वधर्म रक्षणासाठी आत्मबलिदान दिले नसते. तेव्हा पूर्वग्रह बाजूला सारून वास्तव इतिहासाचे लिखाण हीच काळाची गरज आहे, असे म्हणावेसे वाटते.
 प्राचार्य डॉ. अण्णासाहेब म्हळसने
९४२१७७४४३३
साभार - तरुण भारत 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी