Wednesday, April 17, 2013

स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर यांच्या मांडणीतील साम्यस्थळे

‘धर्म हा भारताचा प्राण आहे, आपण धर्म सोडला तर आपला विनाश अटळ आहे,’ ही विवेकानंदांची मांडणी; तर ‘समाज धम्माच्या आधारे चालतो, धम्माशिवाय शासन म्हणजे अराजक,’ हे बाबासाहेबांचे प्रतिपादन. तसेच ‘वंचित वर्गातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्यावर विवेकानंदांनी भर दिला’, तर ‘समाजातील दलित-दीन वर्गाला धम्माची सर्वात जास्त आवश्यकता आहे,’ ही बाबासाहेबांची स्पष्टोक्ती. थोडक्यात, दोघांनीही सामाजिक जडणघडणीत आणि सामाजिक प्रगतीत धर्माचे महत्त्व ठामपणे प्रतिपादित केले, हे तथ्य या पुस्तकात सूचक पातळीवर अधोरेखित केले गेले आहे. याच साम्यस्थळाचे अधिक सविस्तर विवेचन पुस्तकात येणे आवश्यक होते, असे वाटत राहते.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-book-on-swami-vivekanand-and-dr-babasaheb-ambedkar-4237448-NOR.html
स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळे उपक्रम आयोजिले जात आहेत. या प्रक्रियेत विवेकानंद केंद्र या संघटनेचे स्थान अर्थातच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. स्वामीजींच्या चरित्राचे विविध पैलू उलगडून दाखवणा-या अन् त्याद्वारे त्यांचा संदेश व्यापक  प्रमाणात प्रसारित करणा-या साहित्याचे प्रकाशन हा केंद्राच्या एकूण योजनेतील एक ठळक भाग आहे. ‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या शीर्षकाचे रमेश पतंगे  लिखित पुस्तक या योजनेनुसार 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीचे निमित्त साधून प्रकाशित केले आहे.

या दोन महापुरुषांच्या समाजचिंतनाचे मर्म, त्यातील साधर्म्य, सामाजिक प्रगतीमधील त्यांच्या जीवित कार्याचे योगदान इ.चे अभ्यासपूर्ण विवेचन वाचायला मिळेल, अशी जिज्ञासा या पुस्तकाच्या शीर्षकातून वाचकाच्या मनात निर्माण होते. प्रत्यक्ष पुस्तकातून मात्र या जिज्ञासेची परिपूर्ण तृप्ती होत नाही, असेच म्हणावे लागते.

‘हे पुस्तक म्हणजे या दोन महापुरुषांची तुलना नाही’ हे लेखक त्याच्या प्रस्तावनेतच स्पष्टपणे नमूद करतात. मग या पुस्तकाचे प्रयोजन काय, या प्रश्नाचे पुरेसे समर्पक उत्तर प्रस्तावनेतून मिळत नाही. त्यातल्या त्यात या प्रयोजनाचे वर्णन करताना रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे उदाहरण दिले गेले आहे. ते लक्षात घेता एवढे म्हणता येईल, की स्वामीजी आणि बाबासाहेब यांच्या मांडणीतील साम्यस्थळे संकलित स्वरूपात सादर करणे असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

‘या दोन्ही महापुरुषांच्या घराण्यातील पूर्वपरंपरेत धर्मपरायणता आणि संन्यस्तवृत्ती यांना ठळक स्थान होते. रामजी आंबेडकर यांचे एक बंधू गोसावी बनले होते, तर विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण हे तरुण वयातच संन्यासी बनले होते. दोघांनीही आपल्या जीवनात, चिंतनात आणि कार्यात धर्माला सर्वोच्च स्थान देऊन आपापल्या परीने समाज निर्दोष करण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या सार्वजनिक कार्यात अठ्ठावीस वर्षांचे अंतर आहे, तरीही जीवितकार्याच्या वेळची देशातली परिस्थिती जवळजवळ सारखीच होती. समाजातील दीन, दलित, पीडित, उपेक्षित वर्ग आणि त्याची उन्नती हा दोघांच्याही चिंतनाचा मुख्य गाभा होता. गुलामी, आत्मविस्मृती, आत्मग्लानी, जातीभेद, अस्पृश्यता इ. उणिवांनी ग्रासलेल्या मानसिकतेला प्रचंड धक्का देण्याचे काम विवेकानंदांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस केले तर बाबासाहेबांनी विसाव्या शतकात केले. दोघेही अमेरिकेत राहिले; पण अमेरिकन जीवन, संस्कृती आणि विचार यांचे दास मात्र ते झाले नाहीत.’ या सा-या मांडणीतून पतंगे यांनी दोघांच्या चरित्र आणि कार्यातील साम्यस्थळेच ठळक केली.

‘धर्म हा भारताचा प्राण आहे, आपण धर्म सोडला तर आपला विनाश अटळ आहे,’ ही विवेकानंदांची मांडणी; तर ‘समाज धम्माच्या आधारे चालतो, धम्माशिवाय शासन म्हणजे अराजक,’ हे बाबासाहेबांचे प्रतिपादन. तसेच ‘वंचित वर्गातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्यावर विवेकानंदांनी भर दिला’, तर ‘समाजातील दलित-दीन वर्गाला धम्माची सर्वात जास्त आवश्यकता आहे,’ ही बाबासाहेबांची स्पष्टोक्ती. थोडक्यात, दोघांनीही सामाजिक जडणघडणीत आणि सामाजिक प्रगतीत धर्माचे महत्त्व ठामपणे प्रतिपादित केले, हे तथ्य या पुस्तकात सूचक पातळीवर अधोरेखित केले गेले आहे. याच साम्यस्थळाचे अधिक सविस्तर विवेचन पुस्तकात येणे आवश्यक होते, असे वाटत राहते.

रूढीग्रस्त समाजाच्या, विशेषत: पुरोहितवर्गाच्या ‘शिवू नको’ मानसिकतेवर स्वामीजींनी अत्यंत कठोर शब्दांत हल्ला चढवला होता. ही विकृती हेच भारतीय समाजाच्या अवनतीचे मुख्य कारण आहे, यावर विवेकानंदांच्या मांडणीचा मुख्य भर होता. दीडशेव्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने स्वामीजींच्या वैचारिक भूमिकेचे स्पष्ट समर्थन करूनच ही प्रेरणा जागवली जाऊ शकते.

एका बाजूला या वास्तवाची जाण तर दुस-या बाजूला विवेकानंदांच्या समर्थनाद्वारे नकळत धर्माच्या अधिष्ठानाचे - पर्यायाने हिंदुत्वाचेही समर्थन होईल, ही भीती अशा उभयापत्तीच्या कात्रीत सध्या काही ‘विचारवंत’ सापडले आहेत. अशा लब्धप्रतिष्ठितांच्या केविलवाण्या धडपडीला स्वामीजींच्या अस्सल विचारांचे ठाम उत्तर देणे हा ‘विवेक - साहित्याचा’ प्रमुख उद्देश असणे आवश्यक आहे. या दृष्टीने ‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयाकडे आणि पुस्तकाकडेही पाहायला हवे.

‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे हे एक संपादक तसेच सामाजिक विषयांचे मूलगामी विश्लेषण करणारे लेखक या नात्याने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी प्रसारमाध्यमसृष्टीला परिचित आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, राजर्र्षी शाहू महाराज, संत गाडगे महाराज, आदी महापुरुषांच्या जीवनसंदेशाचा सखोल अभ्यास, महाराष्‍ट्रातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीची सूक्ष्म मीमांसा, तसेच तर्क, वस्तुनिष्ठता आणि भावनिकता यांचा उत्कृष्ट समतोल त्यांच्या सामाजिक विषयावरील लिखाणात दिसून येतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राष्‍ट्रीय, हिंदुत्वनिष्ठ ध्येयसृष्टीचे पक्के अधिष्ठान त्यांच्या मांडणीला असते. हिंदुत्वावर टीका हाच तथाकथित सर्वमान्यतेचा प्रमुख मापदंड असल्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न लब्धप्रतिष्ठितांकडून निकराने केला जात असताना आपल्या वैचारिक अधिष्ठानापासून विचलित न होता पतंगे लेखनाचा व्यासंग सांभाळत आले आहेत. स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा एकत्रित आढावा घेणारे त्यांचे पुस्तक या प्रक्रियेला अर्थातच अपवाद नाही.
स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेखक : रमेश पतंगे
प्रकाशक : विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे
पृष्ठे : 88, मूल्य : रु. 20/-

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी