Thursday, April 18, 2013

धर्मसंस्थापना हीच खरी सेवा!


 समाजात सेवेची गरज तेव्हा भासते जेव्हा धर्म स्थापित झालेला नसतो.धर्मसंस्थापनेने समाजाच्या परस्पर सहयोगातूनच सहज सेवा होऊ लागते.परस्परसंबंधातूनच सर्वांचे समग्र कल्याण होते. अशा आदर्श समाजाची रचना करण्यासाठी केलेले कार्य ही सर्वोत्तम सेवा.भारतात परतल्यावर दिलेल्या व्याख्यानात स्वामी विवेकानंदांनी या विषयावर अनेक संदर्भ दिले आहेत. एकदा बोलताना स्वामीजी म्हणतात, ‘प्राचीन ऋषींनी आदर्श जीवन स्थापनेची एक अद्भुत योजना आखली होती.या योजनेवर अंमल करून प्रत्येक युगात धर्माधारित आदर्श रचना होत गेली. कालाच्या प्रवाहात आज ती योजना पूर्णपणे उलगडण्याआधीच विधर्मी,परकीय प्रभावात निष्प्रभ झालेली दिसते.’

 चक्रीय कालगणना ही हिंदू संस्कृतीची विशेषता आहे. आदर्श कितीही स्खलित झाला, तरीही पुन्हा त्याची स्थापना निश्‍चित आहे. हा हिंदूंचा मूळ विश्वास आहे. सतयुग ते कलियुगाची चतुर्युगी संकल्पना ही आदर्श समाजरचनेच्या पुनर्स्थापनेची ग्वाही देते. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘गुरुकृपेने ती योजना माझ्यापुढे स्पष्ट प्रगट झाली आहे.’ भारतात अनेक व्याख्यानांत स्वामीजींनी या योजनेचे संकेत दिले आहेत. त्या संकेतांबद्दल चर्चा करण्याआधी,आदर्श समाजाच्या संकल्पनेला थोडेे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पूर्ण सृष्टी एक सुव्यवस्थित जैविक संरचना आहे.याचा प्रत्यक्ष साक्षात्कार ऋषींनी केला. आजही हा साक्षात्कार शक्य आहे.सेवा-साधनेचा हाच परम अनुभव आहे. त्या जैविक जगतरचनेलाच विराट पुरुषाच्या रूपात उपनिषदांनी वर्णिले आहे.सर्वभूतमात्र त्या विराट पुरुषाचे अंग होत. भगवद्गीतेच्या ११ व्या अध्यायात विश्वरूप दर्शनाचे, या विराट पुरुषाचे सविस्तर वर्णन आहे.जेव्हा या जैविक स्वरूपाला अनुसरून व्यवहार करणारा समाज स्थापित होतो तेव्हा त्यालाच आदर्श समाज म्हणतात.
 आम्हा विराटाच्या प्रत्येक अंगांचा विराट एकत्वाशी व आपापसात जो संबंध आहे त्याच्या ज्ञानाला व आचरणाला धर्म म्हटले जाते. हे धर्म विज्ञान जेव्हा सुसंतुलित असते तेव्हाच समाज आदर्श होतो.म्हणूनच अशा स्थितीला धर्मराज्यपण म्हटले जाते. श्रीराम अवतारात धर्माच्या पूर्ण परिपालनाने या आदर्श समाजाची पुनर्स्थापना झाली म्हणून त्याला रामराज्यपण म्हटले जाते.
 ज्याप्रमाणे मानवशरीराच्या प्रत्येक अंगाची विशिष्ट रचना, कार्य व भूमिका असते त्याचप्रमाणे विराटाच्या प्रत्येक अंगाचीपण असते. मनुष्याशिवाय सगळ्या प्राण्यांमध्ये भोगयोनी असल्यामुळे त्यांचे कार्य, विचार व आचरण पूर्वनिर्धारित असते. ते त्याने बांधलेले असतात.त्यामुळे विराटाच्या योजनेप्रमाणे योगदान करतातच.मानवाला कर्म व कल्पना दोन्हीचे स्वातंत्र्य असल्यामुळे त्याला स्वत:चे कर्तव्य,भूमिका व दायित्व ओळखावे लागते व त्याप्रमाणे व्यवहार करावा लागतो.यालाच स्वधर्म म्हणतात. स्वधर्माची ओळख आणि त्या अनुसार जीवन जगणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
 अंगांगी संबंधांचे भान असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपला सख्ख्याहून सख्खा असतो.त्यामुळे कुणाचेही काही अहित करण्याचा विचारच कुणाच्या मनात येत नाही. अशा धर्माधारित समाजात गुन्हेगारीचा प्रश्‍नच नसतो. त्यामुळे शिक्षा देण्याकरिता दंडव्यवस्थाही करावी लागत नाही.नैसर्गिक स्वानुशासनाचे पालन सर्वच जण करीत असल्यामुळे,बाह्य शासनाची आवश्यकताच नसते. समाज परस्परावलंबनातून स्वावलंबनात विकसित होतो. अशा स्वावलंबी समाजात सगळे स्वतंत्र, जबाबदार व परिणामत: सुखी असतात. महाभारताच्या शांतिपर्वात भगवान श्रीकृष्ण जेव्हा पांडवांना शरशय्येवर पडलेल्या पितामह भीष्मांजवळ घेऊन जातात.धर्मराज युधिष्ठिर धर्मराज्याबद्दल प्रश्‍न विचारतात तेव्हा पितामह भीष्म पूर्वी वेळोवेळी स्थापित धर्मराज्यांचे वर्णन करतात.
 ‘नच राजा नच राज्यो
न दण्डो न दण्डित:
|धर्मेनैव प्रजा सर्वा वर्तन्ति स्म परस्परम् ॥
 धर्मेनैव प्रजा सर्व रक्षन्ति स्वम परस्परम् ॥
न कुणी राजा होता न ही कुठले राज्य. कुणी अपराधीच नव्हता त्यामुळे दंडव्यवस्थेचीपण आवश्यकता नव्हती.सगळी प्रजा धर्मानेच परस्परांशी व्यवहार करत होती. धर्मानेच परस्परांचे रक्षण करत होती. पितामहांनी हे स्वप्न किंवा भविष्यात साकार करण्यासाठी लक्ष्य सांगितले नाही,तर त्यांनी भूतकाळ वापरलाय्. वर्तन्ति स्म- व्यवहार करीत असत. म्हणजे अशी व्यवस्था अस्तित्वात होती.
 प्रत्येक युगात त्या काळानुसार धर्मस्थापनेचे कार्य करावे लागते. तीच योजना स्वामी विवेकानंदांना उमगली होती. पण, अल्पायुषी असल्यामुळे त्या योजनेवर पूर्ण अंमल करण्याची संधी त्यांना लाभली नाही. आदर्श समाजरचनेच्या निर्मितीच्या योजनेचा पहिला भाग आहे- धर्माचा खरा अर्थ समाजात रूढ होणे. धार्मिक अवडंबरालाच धर्म मानल्याने त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंधच राहिला नाही. आपल्या कामधंद्यात वाटेल तसे वागा आणि मंदिरात जाऊन देवाची पूजा करा म्हणजे झालं! स्वामीजी म्हणतात, हा कुठला सनातन धर्म? आपला खरा धर्म तर जीवन जगण्याची पद्धतीच आहे. हे धर्मजीवन समाजात रूढ करण्यासाठी खर्‍या धर्मजागराची आवश्यकता आहे. हे धर्मजागरण केवळ बौद्धिक असून चालणार नाही, ते मानवाच्या आचरणात यायला हवं.त्यामुळे या धर्मजागरणाचं एकमात्र माध्यम आहे चरित्रनिर्माण. प्रत्यक्ष शिक्षणाद्वारे हे चरित्रनिर्माण व्हायला हवे. जोवर शिक्षण व्यवस्था धर्माधारित होत नाही,तोवर चरित्रनिर्माणाची अनौपचारिक व्यवस्था व्हायला हवी.
 स्वामी विवेकानंदांनी यासाठी दोन कल्पना मांडल्या. एक म्हणजे विखुरलेल्या आध्यात्मिक शक्तींच्या एकत्रीकरणाद्वारे खरी राष्ट्रीय एकात्मता घडवून आणणारं मंदिर उभारावं. या मंदिरात मानवनिर्माणाचं प्रशिक्षण द्यावं. असे प्रशिक्षित युवा जगभरात खर्‍या वेदान्त धर्माचा प्रचार करतील. तर दुसरा मार्ग भारतमातेच्या पूजनाचा. चेन्नईच्या व्याख्यानात स्वामीजींनी सर्व ३३ कोटी देवतांना बाजूला ठेवून, एका भारतमातेच्या पूजनाचे आवाहन केले. नित्य भारतमातेच्या पूजनाचा मंत्र दिला. बलोपासनेचा मंत्र दिला. भारतमातेला आता वीरव्रती हवेत. भक्तीच्या भरात रडणं खूप झालं. आता शक्तीची उपासना हवी.
 दोन्ही मार्गांचा समान बिंदू संघटन. स्वामीजींनी भारतात संघटनेची पुनर्स्थापना केली. तसे तर आर्यसमाज, ब्राह्मोसमाज या चळवळींद्वारे संघटन मंत्राचा जागर सुरू झालाच होता. पण, हे सर्व धार्मिक सुधार प्रकार होते. स्वामीजींनी सकारात्मक सामाजिक संघटनेचा पायंडा पाडला. श्रीरामकृष्ण संघ एक नव संप्रदाय बनू नये याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली. कारण त्यांचे स्वप्न सर्वसमावेशक राष्ट्रीय संघटनेच्या उभारणीचे होते. त्यांना संस्था उभी करायची नव्हती, तर हिंदू समाजाचे संघटन करून त्याद्वारे राष्ट्राची उभारणी करायची होती.
 आदर्श समाजरचनेकरिता, अर्थात धर्मसंस्थापनेकरिता व्यक्तिनिर्माण, समाजसंघटन व त्याद्वारे राष्ट्रबांधणी. असे उन्नत राष्ट्र संपूर्ण जगाचे, मानवतेचे मार्गदर्शन करेल, असे स्पष्ट दृश्य स्वामी विवेकानंदांनी पाहिले होते. स्वामीजींची ही योजना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या’ रूपाने साकार केली डॉ. हेडगेवारांनी! हिंदू संघटन, सुस्पष्ट तंत्र शाखा याद्वारे धर्मजागरण प्रचारक प्रशिक्षण व भारतमातेच्या उपासनेचे अद्वितीय यंत्र साकार झाले.
 मुकुल कानिटकर
 ९४०५७७४८२०
साभार - तरुण भारत 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी