Saturday, January 3, 2015

धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मुलाखत

आमचे प्रतिनिधी लिहितात :
‘हिंदूत्वातूनबाहेर गेलेल्यांविषयी - धर्मांतरितांविषयी - स्वामी विवेकानंदांची मी मुलाखत घ्यावी, असे आमच्या संपादकांनी सुचविले होते. त्यांची व माझी भेट गंगेच्या विशाल पात्रावर तरंगणार्‍या एका निवासी नौकेत, उतरत्या सायंकाळी झाली. रामकृष्ण मठाच्या नजीकच्या तीरावर नौका स्थिरावली होती. तिथे स्वामीजींचे दर्शन झाले.ती वेळ आणि स्थळही मोठे सुरेख होते. माथ्यावर नक्षत्रे चमकू लागली होती. भोवती गंगेचा प्रवाह उसळत होता. एका बाजूला नारळीच्या झाडांनी आणि गर्द सावली धरणार्‍या इतर वृक्षांनी वेढलेल्या मठाची वास्तू दिसत होती. ती शांत प्रकाशाने उजळलेली होती.
‘‘स्वामीजी, हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांना पुनश्च हिंदू धर्मात घेण्यासंबंधी जी चळवळ चाललेली आहे त्यासंबंधी आपल्याशी बोलावे अशी इच्छा आहे. धर्मांतरितांना अशा प्रकारे हिंदुधर्मात परत घ्यावे असे आपले मत आहे काय ?’’

‘‘नि:संशय!’’ स्वामीजी म्हणाले, ‘‘घेतलेच पाहिजे.’’
ते किंचित् काळ विचारमग्न झाले. क्षणभराने पुन्हा बोलू लागले, ‘‘तसे केले नाही तर आपली संख्या दिवसेंदिवस कमी होत जाईल. फरिश्ता हा प्राचीन मुसलमान इतिहासकार सांगतो की, मुसलमान पहिल्याने या देशात आले, त्यावेळी हिंदूंची संख्या साठ कोटी होती. आज आपण अवघे वीस कोटी उरलो आहोत. पुन्हा हिंदूत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या केवळ एकाने कमी करतो, एवढेच नव्हे तर शत्रूची एकाने वाढवितो.’’
मुसलमान किंवा ख्रिश्‍चन धर्मांतरितांपैकी बहुतेकांना तलवारीच्या जोरावर बाटविले गेलेले आहे. आजचे धर्मांतरित हे त्यांचेच वंशज आहेत. अशांना दूर लोटणे केव्हाही हिताचे होणार नाही. तुम्ही विचाराल की, जे निखालस परजातीचे, परधर्माचे असतील त्यांचे काय ? भूतकालात असे कित्येक परजातीय आपल्या धर्मात स्वीकारले गेले आहेत. अजूनही हा प्रघात आहेच. आतापर्यंत आपल्या सीमेवरच्या अनेक रानटी टोळ्यांना आपण आत्मसात केले. मुसलमानांपूर्वीच्या सर्व परकीय आक्रमकांनाही आपण आत्मसात केले आहे.
स्वेच्छेने परधर्मात गेलेले जर परत स्वधर्मात येऊ इच्छित असतील तर त्यांना शुद्ध करावे हे ठीकच आहे. पण काश्मीर आणि नेपाळमध्ये झाले तसे परक्यांच्या स्वार्‍यांमध्ये, आत्याचारांमुळे ज्यांना धर्म बदलावा लागला असे जे मूळचे हिंदू आहेत त्यांना; वा जे रक्तानेच परधर्मीय आहेत त्यांना हिंदू धर्मात प्रवेश करताना कोणतेही प्रायश्‍चित्त असू नये.’’
‘‘पण या लोकांची जात कोणती मानायची ?’’ प्रतिनिधीने विचारले.
‘‘सक्तीने धर्मांतरित झालेले पुनरपि आपल्या धर्मात येतील तेव्हा त्यांना त्यांची पूर्वीची जात मिळावी. हिंदुधर्मात जे नव्याने प्रवेश करतील त्या सर्वांची मिळून एक नवीनच जात घडवावी. वैष्णव पंथाने हेच केले. निरनिराळ्या जातींचे आणि परकीय धर्मांचे लोक वैष्णव पंथात आले. त्या सार्‍यांची मिळून एक जात झाली. ती जात सन्मान प्राप्त करू लागली. रामानुजांपासून चैतन्यांपर्यंत सर्व वैष्णव महालयांनी हेच केले.’’
‘‘या नव्या जातीच्या लोकांच्या विवाहाचे कसे काय?’’
‘‘त्यांनी परस्परांमध्ये विवाह करावेत.’’ स्वामीजी शांतपणे म्हणाले.
‘‘परधर्मातून जे हिंदुधर्मात येतात त्यांनी आपली नावे बदलली पाहिजेत, असे आपणास वाटते ना ?’’
‘‘अगदी बरोबर. नावात बरेच काही आहे.’’ स्वामीजी विचारपूर्वक म्हणाले.
माझ्या पुढच्या प्रश्‍नाने मात्र स्वामीजी उसळून उठले.
मी विचारले, ‘‘हिंदुधर्मातल्या या नवागतांसाठी तुम्ही अमुक एक धर्मीच आचार ठरवून द्याल की, त्यांना इष्ट वाटेल त्या पंथाची वा देवतेची उपासना करण्याचे त्यांना स्वातंत्र्य द्याल ?’’
‘‘हा प्रश्‍न तुम्ही विचारता तरी कसा ? त्यांना जी उपासना योग्य वाटेल तीच ते स्वीकारतील. उपास्यदैवत निवडण्याचे स्वातंत्र्य नसेल तर या धर्माला हिंदुधर्म म्हणायचे तरी कशाला ? इष्ट दैवतांची निवड करण्याचे स्वातंत्र्य हेच तर हिंदू जीवनपद्धतीचे मर्म आहे !’’
प्रतिनिधी लिहितो : हिंदुत्वातील समान भूमिकेचा शास्त्रीय आणि आत्मीय शोध घेण्यात ज्याने जीवन खर्ची घातले होते, असा एक तपस्वी माझ्यापुढे बसला होता. त्याच्या उद्गारांमागे त्या तपश्‍चर्येची पुण्याई होती. ‘इष्ट’ निवडण्याचे स्वातंत्र्य हे खरोखर विराट, समावेशक तत्त्व आहे यात संदेह नाही.नंतर बोलणे अन्य विषयांकडे वळले. मी गुरुदेवांना प्रणाम केला. त्यांनी आपला कंदील उचलला आणि ते मठाकडे निघाले. आणि मीही त्या महापुरुषाचे शब्द आठवीत, भागीरथीच्या महाप्रवाहातून विविध आकारांच्या होड्यांमधून वाट काढीत कलकत्त्याकडे निघालो.
(प्रबुद्ध भारत, एप्रिल १८९९)॥
****
साभार : विवेक विचार, जानेवारी २०१५
***
वर्गणी/देणगी
वार्षिक :: रु.150/-
पंचवार्षिक :: रु. 600/-
आजीवन :: रु. 2500/-
संवर्धक :: रु.3000/-
***
विवेक विचार
विवेकानन्द केन्द्र १६५, रेल्वे लाईन्स, सोलापूर 413001
संपर्क : 8855872228
ई-मेल : vivekvichar@vkendra.org

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी