Monday, February 2, 2015

दाभोलकरी मत्सरातून विवेकानंद विचारांचे अपहरण

दाभोलकर कुलोत्पन्न दत्तप्रसाद यांची स्वामी विवेकानंद यांच्यावरची तीन दिवसांची व्याख्यानमाला सोलापुरात २४ ते २६ जानेवारी या काळात पार पडली. अतिशय तल्लख बुद्धीमत्तेच्या दत्तप्रसाद यांनी विवेकानंदांच्या नावावर स्वत:चे विकृत विचार पसरवण्याचा खटाटोप या व्याख्यानमालेतून केला. भंपक आणि खोटारडेपणा करून विवेकानंद विचारांत भेसळ करू पाहणार्‍या दाभोलकर यांना उघडे पाडणारा युवा पत्रकार सागर सुरवसे यांचा तरुण भारतच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रकाशित लेख...

परिवर्तन अकादमी नावाच्या संस्थेने या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेले स्वामी विवेकानंदांचे समग्र वाङमय हे एकांगी आणि दत्तप्रसाद दाभोलकर यांनी लिहिलेले ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ हे एकमात्र पुस्तकच सर्वसमावेशक अशी भूमिका आयोजकांनी पहिल्याच दिवशी घेतली. विवेकानंदांच्या पुस्तकांचा स्टॉल लावण्यास कार्यक्रमस्थळी मज्जाव करण्यात आला. दाभोलकर यांनी तिन्ही दिवस आपल्या व्याख्यानाची पुष्टी करण्यासाठी मठाने प्रकाशित केलेल्या १० खंडाचा आधार घेतला. लोकांना मूळ वाङमयापासून दूर ठेवायचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे सूर्य उगवू नये म्हणून कोंबडी झाकण्यासारखे झाले. होय, हेच ते स्वयंघोषित पुरोगामी.

परिवर्तन अकादमी, जमात ए इस्लाम वगैरे संस्थांनी मिळून समविचारी सभा या नावाने अनेक उपक्रम यापूर्वी घेतले आहेत. यावेळी दाभोलकर यांच्या विवेकानंदांवरील व्याख्यानमालेतून इस्लामचा प्रचार होत असताना सभागृहासमोरील मैदानात मोफत कुराण वाटप होणे, संशय गडद करणारे आहे.

२६ जानेवारी रोजी दाभोलकर सोलापुरातल्या व्याख्यानात सांगत होते, ‘विवेकानंदांनी इस्लामचा गौरव केला आणि हिंदू धर्माला मूर्ख म्हटले.’ दाभोलकर प्रवृत्तीच्या दुर्दैवाने त्याच वेळी देशाच्या राजधानीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सांगत होते, ‘विवेकानंदांनी अमेरिकेला सर्वप्रथम हिंदुत्व आणि योग यांची ओळख करून दिली.’
तीन दिवसांच्या व्याख्यानांतून दाभोलकर यांनी स्वामी विवेकानंदांना आपल्या कल्पनेतील समाजवादी अर्थात हिंदुत्वविरोधक ठरवण्याचा प्रयत्न केला. यासाठी विवेकानंदांच्या तोंडी स्वत:चे विचार घुसडण्याचा प्रमादही दाभोलकर यांनी केला. विवेकानंदांनी आपण समाजवादी असल्याचे सांगितले हे खरेच आहे. 

विवेकानंदांनी हिंदू धर्मातील वाईट रूढींवर प्रहारही केले. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मातील चांगल्या बाबींचे कौतुकही केले. हिंदू धर्म अधिकाधिक चांगला व्हावा, हा उद्देश त्यामागे होता. परंतु दाभोलकर यांनी मात्र आपल्या संपूर्ण व्याख्यानातून जाणवेल अशा रीतीने हिंदू धर्मावर टीका आणि इस्लामचा गौरव केला. यासाठी त्यांनी विवेकानंद ग्रंथावली खंड ३ मधील एक संदर्भ दिला. ६ सप्टेंबर १८९३ रोजी विवेकानंद ‘हिंदुस्थानातील मुसलमानी राजवट’ या विषयावर बोलले, असा संदर्भ आहे. काय बोलले याची माहिती उपलब्ध नाही पण दाभोलकरांनी मात्र तर्कट मांडला की, ‘इस्लामी राजवटीचे भारताला योगदान असाच विषय विवेकानंदांनी मांडलेला असला पाहिजे.’

येथे आपण विवेकांनंदांचे इस्लामविषयीचे मत साधार पाहिले पाहिजे, की जे दाभोलकर यांनी दडवले. हिंदूने चांगला हिंदू होण्याचा, मुसलमानाने चांगला मुसलमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदूने मुसलमान किंवा मुसलमानाने हिंदू होण्याची आवश्यकता नाही, असे स्वामी विवेकानंद आवर्जून सांगायचे. याचवेळी तलवारीच्या जोरावर जगाला मुसलमान करणार्‍या प्रवृत्तीवद्दल विवेकानंदांनी हिंदूंना सावधही केले आहे. पासाडेना, कॅलिङ्गोर्निया येथील एका भाषणात स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘प्रत्येक युगात, प्रत्येक राष्ट्रात जे थोर पुरुष आणि स्त्रिया होऊन गेल्या त्यांना आदराने वंदन करा. चैतन्याची - दिव्यत्वाची साक्षात अनुभूती जेव्हा येते तेव्हा मन विशाल होते. सर्वत्र त्या एकाच ईश्वराचे प्रकाशमय दर्शन होऊ लागते. मुसलमानांच्या मनात ही धारणा विकसित झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यात धर्मांधता आणि कडवेपणा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची घोषणा हीच की, ‘अल्ला एकच आहे आणि महंमद हाच त्याचा प्रेषित आहे.’ एवढेच सत्य. यावेगळे जे जे आहे ते केवळ त्याज्यच नव्हे, तर चिरडून नष्ट करून टाकले पाहिजे. जे कोणी काङ्गर आहेत त्यांच्या कत्तली केल्या पाहिजेत. या उपासनापद्धतीहून वेगळ्या उपासनापद्धती तोडून मोडून ङ्गेकून दिल्या पाहिजेत. याहून वेगळे सांगणारा प्रत्येक धर्मग्रंथ जाळून टाकला पाहिजे. अशी ही धर्मांधता आहे. प्रशान्त महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत या धर्मांधांनी पाचशे वर्षे रक्ताचे पाट वाहविले ! इस्लाम हा असा आहे !’’ 
(समग्र वाङ्‌मय, खंड ४)

आकाशातून पडणारे पाणी शेवटी सागराला जाऊन मिळते त्या प्रमाणे कोणत्याही ईश्‍वराची केलेली उपासना एकाच ईश्‍वरापर्यंत पोहोचते, असे हिंदू धर्म सांगतो. सर्वच धर्म सत्य आहेत यावर हिंदू धर्मियांचा विश्‍वास आहे. ही विचारधारा अर्थात वेदान्त जगात शांती आणू शकेल आणि वेदान्त हाच भावी जगासाठी उपयुक्त असेल असे विचार स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेच्या जगप्रसिद्ध भाषणांतून मांडले. परंतु दाभोलकर यांनी येथेही चलाखी केली. सर्व धर्मांवर आधारित धर्माची संकल्पना विवेकानंदांनी मांडल्याचे त्यांनी खोटेच सांगितले. 

इस्लामच्या आक्रमणाने स्वत:चा धर्म वाचवण्यासाठी पळून आलेल्या पारसी लोकांना हृदयाशी धरणार्‍या आणि ख्रिस्ती लोकांच्या अत्याचाराने देशोधडीला लागलेल्या यहुदी लोकांना त्यांच्या धर्मासह आश्रय देणार्‍या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी अभिमानाने सांगितले, याचा साधा उल्लेखही दाभोलकर यांनी केला नाही.
संन्याशांनी आपल्या हातात गीता, कुराण आणि बायबल घेऊन आध्यात्म आणि विज्ञानाचे शिक्षण देत फिरावे, असे विवेकानंदांनी सांगितल्याचे दाभोलकर यांनी सांगितले. 
परंतु, विवेकानंदांचे मूळ उद्धरण पुढीलप्रमाणे आहे, ‘‘शेकडो समर्पित संन्यासी आपल्या देशात धर्मशिक्षण देत गावोगाव ङ्गिरत आहेत. त्यांच्यातील काहींनी भौतिक शिक्षणसुद्धा दिले पाहिजे. ह्या संन्याशांनी केवळ अध्यात्म-विद्यांचेच नव्हे, तर ऐहिक विद्येचे दान करीत घरोघर गेले पाहिजे. ‘ॐ’ हे सर्व पंथीयांना वंद्य असे प्रतीक आहे. त्या ॐचीच प्रतिष्ठापना या मंदिरात करू. जर एखाद्या पंथाला ‘ॐ’ हे प्रतीक स्वीकारावे असे वाटत नसेल, तर तो पंथ हिंदू नव्हेच!... इत्यादी.’’

दाभोलकर यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले की विवेकानंदांनी उपनिषदांची खिल्ली उडवली. खोटारडेपणाचा हा कळच आहे. कारण विवेकानंदांनी उपनिषदांना सामर्थ्याचा अक्षय्यकोष असल्याचे म्हटले आहे. विवेकानंदांचे शब्द आहेत, ‘‘शक्ती ! शक्तीची उपासना’ हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. हा एकच संदेश मी आयुष्यभर शिकत आलो आहे. ‘हे बंधो, दुर्बल बनू नको ! शक्तीची उपासना कर!
उपनिषदे म्हणजे सामर्थ्याचा अक्षयकोषच आहेत. सर्व विश्व गदगदा हलवील, असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. सारे विश्व त्यांच्या संदेशाने चैतन्यमय होईल, समार्थ्यमय होईल.
विविध वंश, जाती आणि पंथ यांच्यात जे दीनदुबळे आहेत त्यांच्यात उपनिषदांचा ललकार सामर्थ्य ओतील. त्यांना मुक्त आणि निर्भय करील. स्वातंत्र्य - शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्वातंत्र्य हे उपनिषदांचे प्राणसूत्र आहे.’’
माणसांनी धर्मांतर केले तर ते मनावर घेऊ नका, असे विवेकानंदांचे सांगणे असल्याचे दाभोलकर सांगतात. पण हे सत्य नाही.
हिंदू समाज सहिष्णू आहे. परंतु जगाच्या पाठीवर त्याचे अस्तित्व अबाधित राहिले तर या सहिष्णूतेला अर्थ आहे. संपूर्ण जग माझ्याच धर्माचे झाले पाहिजे या एकांगी विचारातून जगभर सुरू असलेल्या धर्मांतराचा धोका स्वामी विवेकानंदांनी शंभर वर्षांपूर्वीच ओळखला होता.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘हिंदूत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या केवळ एकाने कमी करतो, एवढेच नव्हे तर शत्रूची एकाने वाढवितो.’’
सिन्हाजी नामक शिष्यासोबतचा स्वामी विवेकानंदांचा संवाद खूपच बोलका आहे. ‘‘सिन्हाजी, तुमच्या आईचा कुणी अपमान केला तर तुम्ही काय कराल ?’’
‘‘मी त्याच्यावर तुटून पडेन स्वामीजी, आणि चांगला धडा शिकवीन त्याला.’’
‘‘बरोबर बोललात. तुम्ही आपल्या धर्माला आईइतकेच मानत असाल, तर कोणाही हिंदू बांधवाने ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला तर ते पाहून तुम्हाला मरणप्राय दु:ख व्हायला हवे. हे तर प्रतिदिनी घडताना तुम्ही पाहात आहात आणि त्याचे काहीच सोयरसुतक तुम्हाला नाही ? कुठे गेली तुमची श्रद्धा ? कुठे गेली तुमची देशभक्ती ? रोज ख्रिस्ती प्रादी तुमच्या तोंडावर तुमच्या धर्माची निंदा करतात. पण तुमच्या कोणाचेच रक्त तापत कसे नाही ? तुम्ही हिंदुधर्माच्या रक्षणासाठी उभे का राहात नाही ?’’

आत्मविस्मृत झालेल्या हिंदूंमधील स्वाभिमान जागवण्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘माझे हे शब्द स्मरणात असू द्या : ‘हिंदू’ हा शब्द उच्चारताच अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात. ‘मी हिंदू आहे’ असे जो बांधव म्हणतो तो लगेच तुमचा परमप्रिय, परमनिकट आप्त झाला पाहिजे. मग तो कोणत्याही देशातून आलेला असो. तो तुमची भाषा बोलत असो वा अन्य भाषा बोलत असो. कोणत्याही हिंदूची वेदना स्वत:च्या वेदनेइतकीच तुमचे हृदय व्यथित करत असेल तरच तुम्ही ‘हिंदू’ आहात.’’
‘‘आपण हिंदू आहोत. ‘हिंदू’ या शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित करावयाचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळामध्ये सिंधूच्या एका बाजूला राहणारे ते हिंदू इतकाच त्याचा अर्थ होता. जे आपला द्वेष करीत आले त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिकटविला असेल. पण त्याचे काय ! हिंदू या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा; अथवा जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडविले गेलेले आहे, जे दैन्यवाणे आहे अशाचा बोध व्हावा हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकांत अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊया.’’

ख्रिश्‍चन मिशनर्‍यांची गंभीर दखल
स्वामी विवेकानंदांनी युरोप आणि अमेरिकेत अनेक चर्चमध्ये व्याख्यानेे दिली. येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या मानवी मूल्यांचा गौरव केला. जगाच्या पाठीवर आजवर झालेल्या सर्व महापुरुषांमध्ये मानवी विकासाचा समान धागा असल्याचे दाखवून दिले. परंतु याच वेळी संपूर्ण जगाला ख्रिश्‍चन करण्याच्या धर्मवेडाने पछाडलेल्या मिशनर्‍यांवर प्रहार करायलाही ते मागेपुढे पाहिले नाहीत. बायबलमधील उदात्त तत्त्व सांगितले त्याप्रमाणे बायबलमधील ‘मनुष्य पापी आहे’ असे सांगून माणसाला मेंढी बनवणार्‍या या शिकवणीचा धिक्कारही केला. माणसाला पापी म्हणणे हेच पाप असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात येऊन हिंदूंना बाटवून ख्रिस्ती करणार्‍या पाद्य्रांविषयी स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘येशू भारतात आला आहे आणि आकाशातल्या बापाचा आदेश लौकरच ङ्गळाला येणार आहे !’ असे डंके पिटणार्‍यांनो, तुम्ही उघड्या कानांनी ऐका. जीझस्‌ही इथे आलेला नाही आणि येहोवा त्याहून आलेला नाही. ते येण्याची सुतराम शक्यताही नाही. आपापल्या चुली सांभाळताना त्यांना इथे यायला उसंत देखील होणार नाही !
इथे तो पुरातन शिवसम्राटच पूर्ववत् आसनस्थ आहे. रुधिरप्रिया कालीमातेचीच इथे समारंभपूर्वक पूजा होत आहे. तो यशोदानंदन गोपाल आपली मोहक मुरली वाजवितो आहे. या शिवाने एकदा वृषभावर आरूढ होऊन डमरूचा रुद्रनाद करीत सुमात्रा, बोर्निओ, सेलेबर, जपानपासून सैबेरियापर्यंत आपली मुद्रा उमटविली होती. आजही उमटवीत आहे. कालीची पूजा चीन आणि जपानमध्ये आजही चाललेली आहे. ख्रिश्‍चनांनी तिचेे रूपांतर माता मेरीमध्ये केले आहे. ख्रिस्तमाता म्हणून ते तिची पूजा करतात.
हिमालयाची ती उत्तुंग शिखरे पाहा ! उत्तरेला शिवाचे निधान कैलास आहे. दहा तोंडाचा आणि वीस हातांचा महाबलाढ्य रावणसुद्धा ते शिवसिंहासन हलवू शकला नाही. मग बिचार्‍या मिशनर्‍यांचा काय पाड ? या भरतभूमीत भगवान शिवांचा डमरू सतत रुद्रनाद करीतच राहील. कालीमातेला पशुबली दिले जातच राहतील आणि गोपालकृष्ण त्याची भुवनमोहिनी मुरली वाजवीतच राहील ! हिमालयाइतकेच ते दृढ अचल आहेत. ख्रिस्ती किंवा आणखी कोणा धर्मप्रचारकांनी आकशपाताळ एक केले तरी ते त्यांना झळ पोहचू शकणार नाहीत.
तुम्हाला जर ही दैवते सोसत नसली तर रामराम ! तुमच्यासारख्या मूठभर करंट्यांसाठी काय या देशाने दम उखडावा आणि मुलखाचे नीरस जीवन पत्करावे ? एवढे जग तुमच्यापुढे पडले आहे. शोधा की तुम्हाला सोयीचे कुरण मनमुक्त चरायला ! पण हे मूठभर करंटे असे गुण्यागोविंदाने जातील थोडेच ! तसे करायलाही हिंमत लागते. ते शिवाच्या या भूमीतच पोटे भरून घेतील, पण शिवाचीच बदनामी करतील आणि कुठल्यातरी परक्या प्रेषिताचे गोडवे गातील !’’

  सारांश : सर्व धर्मांना सामावून घेणारी विचारधारा जगात फक्त हिंदू धर्माकडेच आहे. सर्व धर्म सत्य आहेत, असा विचार फक्त हिंदू धर्मच मांडतो. आपल्या धर्मातील दोष आपण दूर करू. पण यासाठी हिंदू धर्मावर कोणी आघात करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, अशी ठाम भूमिका विवेकानंदांची होती. हिंदू धर्म नष्ट करण्याची भावना अन्य धर्मीय बाळगत असतील तर मुकाट्याने अपामान सहन करा असे विवेकानंदांनी सांगितलेले नाही. परंतु, दाभोलकर यांनी आपल्या व्याख्यानातून हिंदूंचा तेजोभंग करून इस्लाम आणि ख्रिश्‍चन धर्माला वरचढ दाखवण्याचा विकृत प्रयत्न विवेकानंदांचे नाव घेऊन केला. दाभोलकरांचा खोटारडेपणा वेळीच उघड करणे गरजेचे वाटल्यानेच हा लेखनप्रपंच केला.

सागर सुरवसे
९७६९१७९८२३


No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी