Sunday, February 15, 2015

भाजपच्या पराभवाची पाच कारणे

ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख...
दिल्ली प्रदेश निवडणुकात आम आदमी पार्टीने जबरदस्त बहुमताने जिंकल्या. एकूण 70 पैकी त्यांना 67 स्थानी यश मिळाले. या यशाला लॅन्ड्स्लाइड् म्हणजे भूमीपाताचे यश असे म्हणतात. निवडणुकीत ज्यांना यश मिळते ते आनंदी होतात,आणि ज्यांना अपयश मिळते ते दु:खी होतात. भाजपाचे नेते आणि समर्थक आज दु:खी आहेत. या निवडणुकीत आपला एवढा दारूण पराभव होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपाने सर्व जागा जिंकल्या. 61 विधानसभा मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली होती. 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला 32 जागा मिळाल्या आणि आपला 28 जागा मिळाल्या होत्या. 2015 च्या निवडणुकीत भाजपाला फक्त 3 जागा मिळाल्या आणि आपला 67 जागा मिळाल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 46% मते मिळाली होती आणि आता फक्त 32% मिळाली, 'आप' ला 54% मते मिळाली. 2013 च्या निवडणुकीत भाजपाला 33% मते मिळाली होती. भाजपाच्या मताच्या टक्केवारीत फक्त 1% ने फरक पडला आणि 32 ऐवजी 3 जागा झाल्या.

निवडणुकीतील असे चमत्कार पहिल्यांदाच घडत आहेत असे नाही. आंध्र प्रदेशात एन. टी रामाराव यांनी 1983 साली असाच चमत्कार केला आणि तेलगु देशम पार्टीचा उदय झाला. 2007 साली मायावतींनी उत्तर प्रदेशात हा चमत्कार करून दाखविला आणि नुकताच हा चमत्कार तृणमूल काँग्रेसच्या ममताने बंगालमध्ये करून दाखविला. याचा राजकीय अर्थ काढायचा तर भारतीय लोकशाही आता दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होत चालली आहे. भारतीय मतदार कोण्याही एका व्यक्तीच्या मागे अथवा कोण्याही एका पक्षामागे कायम जाण्यास तयार नसतो. त्याला बदल हवा असतो, बदल घडवून आणण्याची शक्ती आपल्या मतात आहे, हे त्याला समजू लागले आहे, म्हणून दिल्लीतील 'आप'चा विजय हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे. म्हणून या विजयाचे मनपूर्वक स्वागत करायला पाहिजे.

अशा निवडणुकीत ज्या पक्षाचा पराभव होतो, त्याच्याबद्दल विरोधी राजकीय नेते आपली मते मांडतात. ही मते राजकीय असल्यामुळे आणि खुपशा प्रमाणात संकुचित असल्यामुळे त्याची गंभीरपणे दखल घेण्याचे कारण नसते. उदारणार्थ - ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणतात की,'आप' च्या रूपाने भाजपाला राष्ट्रीय स्तरावर पर्याय उभा राहील,तर ममता बॅनर्जी म्हणतात,'औधत्य आणि राजकीय सूडबुध्दीचा पराभव झाला आहे.' क़ाँग्रेसचे नेते म्हणतात,' आम्हाला एकही जागा मिळाली नाही याचे दु:ख नाही कारण आम्ही शर्यतीत नव्हतो, परंतु भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या याचा आम्हाला आनंद आहे.' राजकीय विश्लेषण करताना या प्रतिक्रियांचा काही उपयोग नसतो.

मूळ प्रश्न असा आहे की, भाजपाचा एवढा पराभव का झाला? माझ्या मते त्याची पाच कारणे आहेत. पहिले कारण - भाजपाच्या नेत्यांना जनतेच्या मनात काय आहे याचा काहीही अंदाज आलेला नाही. दुसरे कारण - भाजपाच्या नेत्यांनी आपल्या मतदारांना गृहीत धरले, आपल्यासाठी संघपरिवारातील कार्यकर्ते काम करतील असे गृहीत धरले. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मिर येथे जसे मतदान झाले तसे दिल्लीत होईल हे त्यांनी गृहीत धरले. तिसरे कारण - एकदा गृहीत धरण्याची सवय लागली की, घमेंड निर्माण होते, जातात कुठे, आम्हालाच मतदान करणार आहेत, आमच्यासाठीच काम करतील असे नेत्यांना वाटू लागते. चौथे कारण - असे वाटू लागल्यानंतर आम्ही करू ती पूर्वदिशा, कार्यकर्त्यांनी आणि जनतेने आमचे ऐकले पाहिजे, अशी भावना निर्माण होते. पाचवे कारण - अशी भावना निर्माण झाली की, तळागळातील कार्यकर्त्यांना फाटयावर मारून निर्णय केले जातात. किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करणे हा असाच निर्णय आहे. भाजपा उभा करण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची होळी केली, त्यांना दूर सारण्यात आले आणि 'आप' सोडून, काँग्रेस सोडून जे भाजपात आले त्यांना तिकिटे देण्यात आली. असला हलगर्जीपणा आणि आपल्याच घरातील लोकांना तुच्छतेने वागवण्याची मनोवृत्ती यशाची हवा डोक्यात शिरली की होते.

भाजपाचा पराभव होण्याची ही पाच कारणे आहेत. याशिवाय रणनितीतील चूका भाजपाला भोवल्या आहेत. निवडणूक म्हणजे एक प्रकारची लढाई असते. कुशल सेनापती लढाई त्याच्या सोयीच्या रणांगणावर लढतो, आपल्या शत्रूदलाला एकवटू देत नाही. त्याला येणाऱ्या कुमकीचे मार्ग तो बंद करतो. दिल्लीच्या निवडुकीत सगळे उलटे झाले.हरियाणा आणि काश्मिरच्या निवडणुकीनंतर लगेचच निवडणूका झाल्या असत्या तर परिणाम वेगळे आले असते. निवडणुकीला नेता लागतो, असा नेता स्वपक्षातील असावा लागतो. बाहेरचा नेता चालत नाही. भाजपासारख्या कार्यकर्ताआधारित पक्षाचा नेता संघविचारधारेतीलच असावा लागतो. संघस्वंयसेवकांना तो मान्य असावा लागतो. बाहेरच्या नेत्यांवर संघस्वंयसेवकांचा अजिबात विश्वास नसतो. हे नेते संधीसाधू आणि कधी टोपी फिरवतील याचा नेम नसतो. वैचारिक निष्ठा, पक्षनिष्ठा याच्याशी त्यांना काहीही कर्तव्य नसते. स्वत:चा स्वार्थ हेच त्यांचे लक्ष्य असते. फक्त 'स्व' चाच विचार करणारी कोणतीही व्यक्ती कितीही मोठी असली तरीही ती संघविचारधारेत बसत नाही.

काँग्रेस आणि अन्य पक्ष हाराकिरी करून आपला पराभव करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत याचे आकलन पक्षाच्या नेत्यांना होणे आवश्यक होते. काँग्रेसला शून्य जागा मिळाली हा आनंद करण्याचा विषय नाही, काँग्रेसची सगळी मते 'आप' ला गेली, ती कशी गेली, का जाऊ देण्यात आली, हा गंभीरपणे चर्चा र् करण्याचा विषय आहे. दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंवत ठेवणे रणनितीच्यादृष्टीने आवश्यक होते. दिल्लीत 12% मुसलमान मतदार आहेत, त्यापैकी 77% मुसलमानांनी 'आप'ला मत दिले. दलितांची 68% मते 'आप' ला मिळाली आणि ओबीसींची 60% मते 'आप'ला मिळाली. याचा अर्थ असा झाला की, समाजातील दुर्बल घटकांनी भाजपाकडे पाठ फिरविली आणि 'आप' ला जवळ केले.

समाजातील दुर्बल घटकांच्या आकांक्षा कोणत्या आहेत? हे भाजपा कधी समजून घेणार आहे का? समाजातील गरीब वर्गाला आणि दुर्बळ घटकांना बुलेट ट्रेन नको आहेत, आंतराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ नको आहेत, केंद्र सरकारचे शाही समारंभ नको आहेत,अगदी महागडया सूटातील पंतप्रधान नको आहेत. त्याला राहायला छोटेसे का होईना घर हवे आहे. सहजपणे प्रवास करता येईल अशी बससेवा हवी आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी हवे आहे. मुलांसाठी चांगले शिक्षण हवे आहे. आरोग्यरक्षणासाठी माफक दरातील वैद्यकीय सेवा हव्या आहेत. राज्यकर्ते ज्या भारताच्या गोष्टी करतात तो श्रीमंतांचा भारत आहे, हा श्रीमंतांचा भारत विमानतळावर एक कप कॉफीसाठी 120 रू. मोजतो आणि झोपडपट्टीत राहणारा, मजूरी करणारा सामान्य मनुष्य 6 रू. ची कटींग पिताना देखील दहा वेळा विचार करतो.

अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या 'आप' ने समाजातील या सामान्य माणसाच्या हृदयालाच हात घातला आहे. निदान दिल्लीत तरी तसे घडले आहे. रिक्षावाला, टपरीवाला, ढेलेवाला, रस्त्यावर वेगवेगळे पदार्थ विकणारा फेरीवाला, दूधवाला, सफाईकामगार, अशा सर्वांना 'आप' पक्ष जवळचा वाटला. त्याचे दु:ख वाटण्याचे काही कारण नाही. समाजातील दुर्बल घटकांना विश्वास वाटणारा एक राजकीय पक्ष दिल्लीत उभा राहिला, ही एक चांगली घटना आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यापासून बोध घेतला पाहिजे. श्रीमंतांचे आणि मध्यमवर्गाचे राजकारण तरी दिल्लीतील मतदारांनी नाकारले आहे.

याचे पडसाद सगळया देशात उमटतील काय? 'आप' अखिल भारतीय पक्ष होईल का? या प्रश्नांच्या उत्तरात अनेक जर-तर आहेत. निवडणुकीत ज्यांना प्रचंड यश मिळते त्यांच्या डोक्यावर मतदारांच्या अपेक्षांचे प्रचंड ओझे येते. केंद्रात नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ते ओझे आहे आणि दिल्लीत हे ओझे अरविंद केजरीवाल यांच्यावर आले आहे. निवडणूक काळात वाटेल ती आश्वासने देता येतात. निवडून आल्यानंतर ती पूर्ण करावी लागतात. पूर्ण करताना देशाची राज्यघटना आहे, प्रशासनाचे नियम-कायदे आहेत, यात सर्व ते बसवावे लागते. मन मानेल तसा राज्यकारभार करता येत नाही. तो कायद्याच्या चौकटीतच करावा लागतो. केजरीवाल यांनी ते करून दाखवले तर देशपातळीवर त्यांची प्रतिमा तयार होऊ शकते. प्रत्येक राज्याचे राजकारण वेगळे असते आणि जनमत देखील वेगळे असते. एकच फर्ॉम्युला सर्व ठिकाणी चालत नाही. महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरात आणि मध्यप्रदेशात दिर्घकाळ भाजपाचे शासन आहे. त्या राज्याचा फर्ॉम्युला महाराष्ट्रात यशस्वी होत नाही, हा आपला राजकीय स्वभाव आहे. यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या यशाचे फार ताणून अर्थ काढणे अत्यंत धोकादायक आहे.

दिल्लीचा पराभव भाजपाला उपकारक ठरावा. यश मस्ती आणतं आणि पराभव आत्मचिंतन करण्यास भाग पाडतं. केजरीवाल यांच्या विरोधात नकारात्मक प्रचार महागात पडेल, हे स्वानुभवावरून भाजपाच्या लक्षात यायला हवे होते. मोदींच्या विरोधात असाच प्रचार 2014 साली झाला. भारतीय मतदारांना तो आवडत नाही. भारतीय मतदारांना नम्र राज्यकर्ता आवडतो, घमेंडी राज्यकर्ता आवडत नाही. त्याला अनुशासन आवडते, परंतु वरून लादलेली शिस्त आवडत नाही. अनुशासन स्वत:हून पाळायचे असते, तर शिस्त नियमांच्या चौकटीत बसवून अमलात आणायची असते. नियमाचे गुलाम बनणे हा भारतीय स्वभाव नाही. नियम केल्यामुळे कोणी व्रत करीत नाहीत. व्रताचे आचरण ज्याचा तो करतो. उपवासाचे वार तो लक्षात ठेवतो आणि खाण्याचे नियम तो कडकपणे पाळतो, त्यावर बाहेरील बंधन काही नसते. भारतीय जनतेला अनुशासन शिकविले पाहिजे, तिला शिस्तीच्या चौकटीत बांधण्याच्या भानगडीत पडू नये. आपल्या भारतीय जनतेच्या हजारो सालापासून घडत आलेल्या मनोव्यापाराचे भाजपाच्या नेत्यांनी नव्हे तर सर्वच राजकीय नेत्यांनी सातत्याने मनन-चिंतन केले पाहिजे. हस्तीदंती मनोऱ्यात बसू नये. दिल्लीतील विजय लोकशाहीचा विजय आहे, हे पुन्हा एकदा सांगताना हा विजय सर्व राजकीय पक्षांना आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त ठरो, अशी इच्छा करण्यास काही हरकत नाही.

रमेश पतंगे
9869206101
rameshpatange@gmail.com

http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-on-aap-victory-in-delhi-polls-by-ramesh-patange-4902764-NOR.html

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी