Tuesday, March 3, 2015

संवादाची शक्ती - एक चिंतन

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष व विचारवंत पी. परमेश्वरन् यांचा लेख...
जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर एखाद्याशी चर्चा करता तेव्हा ती तीन प्रकारे करता येते. वाद, जल्प आणि वितंड हे ते तीन प्रकार आहेत. किती सुरेख विभागणी आहे ही. ‘वादा’ मध्ये सत्य शोधणे हा तुमचा हेतु असतो. सत्यशोधनाच्या हेतुने तुम्ही दुसर्‍याशी चर्चा करीत असता या चर्चेच्या वेळी तुम्ही शांत, संयमी असता. तुमच्याकडून वाक्‌ताडन होत नाही. चर्चाही गरमागरम नसते. अशा चर्चेला वाद असे म्हणतात.
हिंदू परंपरेतील वाद आणि संवाद हे दोन समान शब्द वारंवार येतात. वाद म्हणजे युक्तीवाद तर संवाद म्हणजे संभाषण. चर्चा करून किंवा वादविवादातून सत्यापर्यंत जाणे हे दोन्हीचे समान ध्येय आहे. हे दोन शब्द श्रीमद्भगवत् गीतेतही आहेत. खरे तर संपूर्ण भगवत् गीता म्हणजे श्रीकृष्ण-अर्जुन संवाद आहे.
१८ अध्याय असलेल्या यातील प्रत्येक संवादाचा एक विशिष्ट दृष्टीकोन आहे. १० व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वत:ला ‘वाद’ संबोधतात. ‘‘भारतात आपण तर्कशास्त्र अभ्यासतो तेव्हा त्यात तीन प्रकारची प्रावधानं आढळतात. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर एखाद्याशी चर्चा करता तेव्हा ती तीन प्रकारे करता येते.
वाद, जल्प आणि वितंड हे ते तीन प्रकार आहेत. किती सुरेख विभागणी आहे ही. 
‘वादा’ मध्ये सत्य शोधणे हा तुमचा हेतु असतो. सत्यशोधनाच्या हेतुने तुम्ही दुसर्‍याशी चर्चा करीत असता या चर्चेच्या वेळी तुम्ही शांत, संयमी असता. तुमच्याकडून वाक्‌ताडन होत नाही. चर्चाही गरमागरम नसते. अशा चर्चेला वाद असे म्हणतात.
चर्चेचा दुसरा प्रकार म्हणजे जल्प. या प्रकारात आपण चर्चा कशासाठी सुरू केली हेच विसरून जातो.
सत्याप्रत जाण्यासाठी प्रामाणिक युक्तीवाद न करता कसेही करून प्रतिवादीवर विजय प्राप्त करणे या हेतूने ही चर्चा होते.
तिसर्‍या वितंड या प्रकारात तुम्हाला सत्याशी काहीच देणेघेणे नसते. समोरचा काय म्हणतो ते जाणून न घेताच त्याला खोटे ठरवले जाते. विधाने खोडली जातात. मुद्‌दा सोडून केवळ शब्दबंबाळ चर्चा म्हणजे वितंड. आजच्या लोकशाहीत राजकारणी असे वागतात. त्यात वाद कमी आणि जल्प, वितंड अधिक असते. संसदेत लोकप्रतिनिधींकडून वादाची अपेक्षा असते. देशाचे भले कशात आहे यावर चर्चा अपेक्षित आहे. लोकशाहीतील चर्चेत ते अपेक्षित आहे. ते विसरून आपले सांसद जल्प आणि वितंड या मार्गानेच जातात. लोकशाहीत संवादातून राज्यकारभार करायचा असल्याने जल्प, वितंड हे मार्ग सोडून आपल्याला वादाकडे वळणे क्रमप्राप्त आहे.’’
(पृष्ठ ४४२ खंड २, भगवत्‌गीतेचा वैश्‍विक संदेश -स्वामी रंगनाथानंद)

संवाद म्हणजे चर्चा. हिंदू धर्मग्रथांत उपनिषदांपासून भगवत् गीतेपर्यंत हा संवादच आपल्याला आढळतो. हा संवाद गुरू आणि शिष्य यांच्यातील असतो. अंतिम सत्याचा शोध घेण्याची ज्याला पराकोटीची तळमळ लागली आहे असा माणूस सक्षम, विद्वान, पात्र अशा गुरूकडे जातो. ज्ञान आणि परम मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवण्याची गुरूला अत्यंत विनम्र भावे विनंती करतो. आपल्या मनातील शंका, समस्या तो गुरूपुढे मांडतो आणि त्यावर स्पष्टीकरण मागतो.
शिष्य म्हणून समोर आलेल्याची ज्ञानप्राप्तीची तळमळ कितपत खरी आहे आणि शिष्य होण्यास तो पात्र आहे का याची पारख प्रथम गुरू करतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो शिष्याला हवे ते ज्ञान देतो. कित्येक वेळेस गुरू स्वत:च शंका उपस्थित करून बुद्धीभ्रम निर्माण करतो. त्यातून भविष्यात येणार्‍या खर्‍याखुर्‍या शंका आणि गैरसमज यांचे वेळीच निराकरण होणे शक्य होते.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संपर्काचा संवाद हा सर्वोत्तम मार्ग आहे. चार भिंतीत बाकावर बसून आज विद्यार्थ्यांना शिकवणे ही आधुनिक शिक्षणपद्धती आहे. प्राचीन हिंदू शिक्षण पद्धती तशी नाही. आधुनिक पद्धत एकांगी आहे. फक्त शिक्षक बोलतो. विद्यार्थी गप्प बसतात.
हिंदू पद्धतीत अध्यापक व विद्यार्थी दोघेही संवादात सहभागी झालेले असतात. सहभागामुळे विद्यार्थ्याच्या मनातील शिकण्याचा उत्साह मावळत नाही. उलट तो वाढीस लागतो. गुरू शिष्याचे नाते कायम जागृत व ताजे असते. हीच गुरू शिष्य परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. ही परंपरा हिंदु जीवन पद्धतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. संवादाचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे मौनातून संपर्क , ज्यात शब्दोच्चारणाचा अभाव असतो. अशाप्रकारे प्रचंड शांततेत मौनातून संपर्कासाठी असाधारण अशी अध्यात्मिक पातळी गाठावी लागते. शब्दांच्या माध्यमातून केलेला संपर्क पूर्णपणे चुकीचा नसला तरी आकलनांत सदोष असू शकतो.
दुर्दैवाने सामान्य माणसाला याशिवाय अन्य पर्याय नाही. मात्र ज्यांनी अत्त्युच्च अध्यात्मिक पातळी गाठली आहे, ज्यांना मौनातून नव्हे तर एका दृष्टीक्षेपातूनही संपर्क साधता येतो.
अलीकडच्या काळातील गुरू रमण महर्षि हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.मौनाच्या माध्यमातून श्री दक्षिणामूर्ती कसे अध्यापन करीत या विषयीचा एक श्‍लोक आहे. चित्रम्‌वटथरूय मुलेशिष्य वृद्ध गुरूर युवागुरोस्थु मौनम् व्याख्यानम्‌शिष्यस्थु छिन्नम 
 हिंदू धर्माचे मूलतत्त्व असलेल्या अद्वैत मताचा प्रसार, परिचय करून देण्यासाठी श्री शंकराचार्यांनी ते जीवनध्येय मानून भारतभ्रमण केले. त्यात विविध वैचारिक पंथांचे आचार्य आणि उपासनेची भिन्न पद्धत अवलंबणारे यांच्याशी चर्चा करून त्यांना अद्वैत मताची महती पटवून दिली. या एका अद्वैत मताने भारताची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक एकात्मता बळकट झाली. हे करताना त्यांनी ज्ञानसंपन्न आणि विनम्र चर्चेचा प्राचीन मार्ग अवलंबला.
त्याला तर्काचा भक्कम आधार आणि अध्यात्मिक बैठक होती. भारतावर अनेक रानटी हल्ले झाले, गुलामगिरीत काळ कंठावा लागला. त्यानंतरही हिंदू धर्म टिकून राहीला, बळकट होत गेला, त्यामागे हेच कारण आहे. तलवारीपेक्षा संवाद किती प्रभावशाली असतो ते यातून सिद्ध होते. शंकराचार्य हे एकच उदाहरण नाही. इतर अनेक आचार्य, संतश्री यांनी संवादाच्या माध्यमातूनच मतपरिवर्तन घडवून आणले.
जो आपल्या मताशी असहमती दर्शवतो किंवा विरोध करतो त्यांना जिवंत जाळणे, तुरुंगात टाकणे, छळ करणे यातून विरोधी मत दडपण्याचा प्रयत्न इतर संस्कृतींनी केला. हिंदू संस्कृती नेमकी याविरूद्ध आहे.
भारताने प्रत्येकाला आपल्या मतानुसार विश्‍वास ठेवण्याचे आणि बुद्धीस पटेल तसे वागण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. भगवत्‌गीतेतही श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील सर्व शंका दूर केल्यावर गीतेच्या शेवटच्या अध्यायात म्हटले,  ‘आता तू तुझ्या बुद्धीप्रमाणे निर्णय घे’.
श्रीकृष्णांनी अर्जुनाला निर्णयाचे स्वातंत्र्य दिले. हिंदु धर्माची थोरवी यातच दडली आहे. संवाद ही सुसंस्कृत लोकांची भाषा आहे तर तलवार ही रानटी लोकांची भाषा आहे. भारताने सर्व आघाड्यांवर लोकांची मने जिंकताना नेहमी पहिल्या मार्गाचा अवलंब केला. हाती तलवार घेऊन कधीही मतप्रसार केला नाही.
ही केवळ अध्यात्माची बाब नाही तर दैनंदिन जीवनाचे अंग आहे. जबरदस्तीने आपल्या बाजूस वळवण्यापेक्षा चर्चेतून संवादातून मतपरिवर्तनाचा मार्ग अवलंबला म्हणून आपण अस्तित्व टिकूवन आहोत.
वैविध्य जपत एकसंध राहून आपण रानटी परकीय आक्रमणांस तोंड दिले ते संवादातील सातत्याने.
आपल्या भाषा व पोटभाषा भिन्न आहेत.
असे असले तरी कोणत्याही सम्राटाला संपूर्ण भारतवर्षावर सत्ता गाजवता आली नाही वा गुलाम करता आले नाही. या कामात श्री संत, भिक्षु, कवि, कथाकार या सर्वांचे सहकार्य लाभले. जीवन धारणा वेगाने बदलत असते. समाजावर त्याचा ताण येतो. हा ताण सहन करणे किंवा बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणे जमत नाही असे अनेकदा घडते. त्यामुळे तडजोड ही समाजाची अपरिहार्यता आहे. ज्या समाजाला असे बदल स्वीकारता आले नाही तो संकुचित होऊन नामशेष झाला. बदलत्या वातावरणाकडे पाठ फिरवण्याचा प्रकार भारतात कधीही झाला नाही.
देशाच्या प्रत्येक भागात आणि इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यात असे नेते निर्माण केले की त्यानी योग्य संवाद साधून समाजाची नाडी अचूक ओळखली. समाजाची त्या त्या वेळेची गरज ओळखून समाजसुधारक निघाले.
जे परिवर्तन घडवायचे ते त्यांनी अत्यंत शांतपणे घडवून आणले. या परिवर्तनात कोठेही सामाजिक असंतोषाच्या ज्वालामुखीचा स्फोट झाला नाही की समाजाचा अनन्वित छळ झाला नाही.
फ्रेंच क्रांती किंवा आक्टोबर क्रांतीसारखी क्रांती भारतात झाली नाही.
जेव्हा जेव्हा परिवर्तन आवश्यक होते तेव्हा ते संवादाच्या माध्यमातून, शांतपणे कोणताही विध्वंस न करता झाले. प्राचीन वैदिक काळापासून विद्यमान युगापर्यंत हिंदू समाजात अनेक परिवर्तने झाली.
पण ती वेगळया पद्धतीने. हिंदू धर्माच्या पायास जराही धक्का लागला नाही. हिमालय पर्वताप्रमाणे हिंदू धर्म अचल, अभेद्य राहीला.भगवान बुद्ध, शंकराचार्य, रामानुज, मध्वाचार्य, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि नारायण गुरू यांचे विविध काळात आगमन झाले. समाजात त्यावेळी आवश्यक असलेले बदल त्यांनी कुशलतेने घडवले. हे बदल घडत असताना हिंदु धर्माच्या मूळ संकल्पनांना कोठेही धक्का लागला नाही.
संहिता आणि शास्त्राचा अर्थ वेळोवेळी नव्या स्वरूपात सांगितला गेला. तो अशा कौशल्याने समाजाच्या पचनी पडला की समाज कधीही हिंसक झाला नाही. जे झाले ते सकारात्मक परिवर्तन होते. जगाच्या दृष्टीने ते आश्‍चर्य आहे. शतकानुशतके भारत याच मार्गाने जात असून आता वैश्‍विक कर्तव्ये पार पाडण्यास सिद्ध आहे.
लहान असो वा मोठी, राष्ट्रीय असो वा प्रादेशिक, या संस्थांनी सांस्कृतिक वारसा सांभाळला आहे.
या संस्था स्थापणार्‍यांचा संवादाच्या शक्तीवर विश्‍वास होता. त्यांनी प्रथम स्वत:शी संवाद साधला. नंतर लोकांना समजेल, उमजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधला. हे विचार सामान्यांपर्यंत सहज पोहोचले.
संस्थेत किंवा पंथात संवादाची प्रक्रिया अखंड चालू राहीली. उभे, आडवे असे संवाद मुक्तपणे चालले.
विचार आणि कल्पना, समस्या आणि त्यांची उत्तरे, आव्हाने आणि प्रत्युत्तर यावर प्रतिबंध घातला गेला नाही.
प्रवाह कधीही खंडित झाला नाही. त्यामुळे तो शुद्ध आणि परिणाम विरहीत राहीला. आचार्य आणि शिष्य, वरिष्ठ आणि कनिष्ठ, नेते आणि अनुयायी बंधू आणि भगिनी या सर्वांनी चर्चेची द्वारे उघडी ठेवली. त्यामुळे परस्पर सामंजस्य, विश्‍वास, आत्मविश्‍वास यांचे अस्तित्व टिकून राहीले. माणसाच्या शरीरात रक्ताचा प्रवाह अखंड चालू रहावा लागतो. त्यात गतीरोध निर्माण झाला तर अर्धांगवायू, हृदयविकार यासारख्या समस्या उद्भवतात.
संस्थांचे तसेच आहे.
वैचारिक मंथन रोखणे संस्थेच्या अस्तित्वावर संकट असते. सावधानता सतत बाळगली पाहिजे. सदिच्छा जपताना त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करावयास हवे. त्यासाठी संवाद हेच माध्यम आहे. मात्र संवादावरच हिंदुंचा गाढ विश्‍वास आहे, अन्य पर्याय निरर्थक असे नाही. ज्यावेळी असंस्कृत, रानटी लोक चालून आले, त्यांनी आपली संस्कृती उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
सनातन धर्म आणि येथील जीवनपद्धती उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सनातन धर्म आणि येथील जीवनपद्धती उध्वस्त करण्याच्या कारवाया केल्या. त्यावेळी अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी आचार्यांनी इतर मार्गांचा अवलंब केला. अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यावर ब्राम्हण क्षत्रिय झाले, संवादाची जागा शस्त्राने घेतली. धर्माचे सर्व परीने रक्षण करण्यात आले. ऋषीमुनींनी जाहीर केले, ‘‘इदम् ब्राम्हम्, इद् क्षात्रम्, शापादपि शरादपि’’ म्हणजे शापही देऊ शकतो, शर (बाण) चालवू शकतो. अर्थात शस्त्र वापरापेक्षा संवादाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. मात्र संवाद निष्प्रभ ठरत असल्यास धमर्र्रक्षणासाठी शस्त्राचा मनमुराद वापर केला आहे.
कारण ‘धर्म’ सर्वोच्च आहे.

- पी. परमेश्वरन
राष्ट्रीय अध्यक्ष,
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी
साभार - विवेक विचार
****
अवश्य वाचा
हिंदू - बौद्ध ऐक्यातून सजग सुसंवादाचे नवे पाऊल

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी