Friday, March 6, 2015

इराणमध्ये बुरख्याविरुद्ध जिहाद

My Stealthy Freedom


 पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांचा दिव्य मराठीतील लेख


तिने निवडलेला मार्ग अतिशय वेगळा आणि प्रभावी होता. तिने फेसबुकवर एक पेज बनवले. इराणी महिलांनी बुरखा किंवा कोणत्याही प्रकारचा पडदा न वापरता काढलेले छायाचित्र त्या पेजवर पेस्ट करण्याचे आवाहन केले. हे आवाहन यायचा अवकाश महिलांनी बुरख्याशिवायची छायाचित्रे धडाक्याने अपलोड केली. मौलाना किंवा इस्लामी कायद्याची भीती न बाळगता पोस्ट केलेल्या छायाचित्रांची संख्या तब्बल ७ लाख ६० हजारांहून अधिक होती.
मसीह अलीनिजाद
 

आजचे जग हे समानता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे आहे. परंतु वर्चस्ववादी पुरुषी मानसिकतेने स्त्रियांना सदैव दाबून ठेवण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसते. स्त्रीला हीन सिद्ध करण्यासाठी आकाशपाताळ एक करण्याचे अनेक प्रयत्न झाले. महिला कितीही बुद्धिमान, शक्तिशाली अन् धाडसी असली तरी आज २१ व्या शतकातही पुरुषीसमाज ते सहजासहजी मान्य करायला तयार नाही. आदमने आपल्या छातीच्या हाडापासून स्त्रीची निर्मिती केल्याची आख्यायिका मध्य पूर्वेतील संस्कृतीत प्रचलित आहे. त्यानुसार पुरुषाने स्त्रीला बरोबरीचे स्थान नाही दिले तरी किमान स्त्रीवर अन्याय करण्याची परंपरा तरी थांबवायला हवी होती.
राजेशाहीपासून लोकशाहीपर्यंत स्त्रीचे गुणगान केले जाते. परंतु तिला आजही अतिशय खालचा दर्जा दिला जातो. स्त्रीला पायातील वाहाणा म्हणून हिणवणाऱ्यांचीही कमी नाही. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने आहे. इतकेच नाही तर अनेक क्षेत्रात ती पुरुषाच्याही पुढे गेली आहे. तरीही प्रत्येक समाजात, प्रत्येक देशात तिचे शोषण सुरूच आहे. यासंबंधीच्या बातम्या आपल्या वाचनात सातत्याने येत असतात.

जगातील अधिकांश धर्मांनी महिलांना कायदा आणि समाजात पुरुषाच्या बरोबरीने स्थान देणे सुरू केले आहे. परंतु काही धर्म मात्र या बाबतीत कोणतेही बदल करण्यास तयार नाहीत. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत पूर्वेकडील देशांमध्ये स्त्री ही अपमान आणि अन्यायाच्या गर्तेत अडकलेली आहे. धार्मिक प्रक्रिया, रीतिरिवाज आणि परंपरांनी आजही तिच्या पायात बेड्या घातल्या आहेत. या देशांतील महिलांनीच वेळोवेळी संघर्ष पुकारून पुरुषी अभिमानाच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत, हेही येथे विसरून चालणार नाही.

इस्लामी जगतात महिलांची स्थिती सर्वात वाईट आहे. बुरख्याच्या प्रथेने त्यांना आजही गुलाम बनवून ठेवले आहे. त्यामुळे पूर्वेकडील देशांमध्ये स्त्रियांची घालमेल अधिक पाहायला मिळते. मध्य पूर्वेतील देशांचा मुख्य धर्म इस्लाम आहे. त्यामुळे मुस्लिम लोकसंख्या अधिक असलेल्या देशांमध्येच धर्माच्या आडून स्त्रीचे शोषण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. इराणमधील खोमेनीचे अत्याचार साऱ्या जगाला माहीत आहेत. कोणत्याही मुस्लिम राष्ट्रावर नजर टाका, गुलामांपेक्षा वाईट जीवन महिलांच्या वाट्याला आल्याचे दिसते. दुय्यम नागरिक बनवून त्यांचे मन, मेंदू आणि शरीराला गुलाम बनवले जाते. ती विव्हळते तेव्हा तिला फटके मारले जातात. पुरुषी वासना शांत करण्याला विरोध करते तेव्हा पशूही सहन करणार नाही, असा छळ करण्यात येतो.

इराणमध्ये महिलांवर अत्याचार आणि पापाचार झाल्याची उदाहरणे ढीगभर आहेत. परंतु महिला स्वातंत्र्याचा शंखनादही आज इराणमध्येच झाला आहे. स्त्रीने आपल्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा बुरख्याला मानले. बुरख्याला विरोध करणाऱ्या महिला इराणमधूनच पुढे आल्या. आता तर हे आंदोलन सोशल मीडियावर सुरू झाले आहे. काही दिवसांपासून फेसबुकवर एक मोठे आंदोलन इराणमध्ये सुरू झाले आहे. यामुळे समस्त इस्लामी देशांतील पुरुष विचार करण्यास बाध्य झाला आहे. बुरख्याने शेवटच्या घटका मोजण्याचे दृश्य इस्लामी जगत पाहात आहे.

बुरख्याविरुद्ध फेसबुकवरून लढा पुकारणाऱ्या महिलेचे नाव आहे मसीह अलीनिजाद. इराणमधील पत्रकारितेशी ही महिला निगडीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती आपले आंदोलन चालवत होती. एनजीओच्या का संमेलनात महिलांसाठीच्या सर्वात मोठ्या पुरस्काराने जिनेवा येथे तिचा सन्मान झाला. तेव्हा कुठे जगाच्या व्यासपीठावर तिला स्थान मिळाले. महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्या संमेलनाचे आयोजन केले होते. मसीह ही महिलांची मसिहा म्हणून जागतिक स्तरावर आकर्षणाचे केंद्र बनली. तिने निवडलेला मार्ग अतिशय वेगळा आणि प्रभावी होता. तिने फेसबुकवर एक पेज बनवले. इराणी महिलांनी बुरखा किंवा कोणत्याही प्रकारचा पडदा न वापरता काढलेले छायाचित्र त्या पेजवर पेस्ट करण्याचे आवाहन केले. हे आवाहन यायचा अवकाश महिलांनी बुरख्याशिवायची छायाचित्रे धडाक्याने अपलोड केली.

वाचकांना वाचून आश्चर्य वाटेल की मौलाना किंवा इस्लामी कायद्याची भीती न बाळगता पोस्ट केलेल्या छायाचित्रांची संख्या तब्बल ७ लाख ६० हजारांहून अधिक होती. रोजच्या रोज छायाचित्रांची संख्या वाढू लागली तेव्हा कठमुल्लांनी ओरड सुरू केली. शासन, प्रशासन, मुल्ला, मौलवी आणि समाजाचे ठेकेदार गल्लीगल्लीतून फिरू लागले. ओळखले गेले तरी इराणी महिला जराही विचलित झाल्या नाहीत. दडपशाही करणाऱ्यांना सोशल मीडिया अनसोशल (असामाजिक) केल्याशिवाय राहणार नाही असा संदेशच जणु या महिलांनी दिला.

इराण आणि आसपासच्या देशातील पुरुषांनी विरोध करण्यास सुरुवात केलीच होती तोवर अन्य अनेक देशांतील महिलांनीही या आंदोलनात उडी घेतली. आज जगातील ७८ देशांनी या पेजला मान्यता देऊन आपल्या देशातील महिलांना प्रोत्साहन देऊ केले आहे. रुढीवाद्यांच्या जगतात याविरुद्ध आंदोलनाचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. हा तर शिया समाजाचा प्रश्न आहे, आमचा या प्रश्नाशी काय देणेघेणे असे म्हणत सुन्नी मौलानांनी सुस्कारा सोडला आहे. परंतु इस्लामच्या एकतेचे गीत गाणारे मात्र महिलांच्या या बंडामुळे चिंतीत झाले आहेत. जाती आणि पंथाच्या आडून या आंदोलनातली हवा काढून टाकण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. परंतु आतापर्यंत तरी त्यांना यश मिळालेले नाही. सुन्नींच्या देशांमध्ये महिलांच्या सौंदर्य स्पर्धा भरवल्या जातात, मग शिया समाजात बुरख्याविरद्ध आंदोलन का सुरू होऊ शकत नाही, असा रोकडा सवाल एका शिया महिला नेत्यांनी केला आहे. वाचकांना माहीत असेलच की काही मुस्लिम देशांमध्ये महिला सौंदर्य स्पर्धांत भाग घेऊ लागल्या तेव्हा महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांची रचना करण्यात आली.

एका इराणी महिलेने आपले बुरख्याशिवायचे छायाचित्र पोस्ट करून लिहिले आहे की, "आम्ही महिलांनी कधीही आम्हाला स्वर्गात पाठवा असा हट्ट केलेला नाही. त्यामुळे त्या स्वर्गाच्या नावाखाली तुम्ही आमचे वर्तमान नरक का करू इच्छिता?' एका तरुणाने आपल्या आईसोबतचे (जिने बुरखा घातला नव्हता) छायाचित्र अपलोड करून त्याखाली लिहले आहे की, "एक नवयुवक या नात्याने मी माझ्या आईसोबतचे बुरखा नसलेले छायाचित्र काढून मानवाधिकारांच्या रक्षणाची प्रतिज्ञा करत आहे.'  एकाने लिहिले आहे की, “माझी आई कब्रमध्ये जेव्हा कोणा दूतासमोर बुरख्याशिवाय प्रश्नांची उत्तरे देईल तर या जगातील तिचे नातेवाईक तिच्याशी संवाद का नाही करू शकणार?'

बुरख्याच्या विरोधात सोशल मीडियावर व्यक्त होत असलेले विचार पाहिले की ध्यानात येते की आता कोणीही पुरुष बुरख्याचे समर्थन करण्याच्या मानसिकतेत नाही. बुरखा अवैज्ञानिक आहे, त्यामुळे तो सदासर्वकाळ टिकूच शकत नाही. दडपशाहीने तुम्ही पाहिजे ते करवून घ्या, पण स्वातंत्र्याची ही किरणे कधी अंध:काराचे गुलाम बनणार नाहीत. मसीहने केलेले धाडस पाहून लोक तिला मसीहाची उपमा देऊ लागले आहेत.

येथे प्रश्न बुरख्यासारख्या प्रथेला विरोध करण्याचा नाही तर फेसबुक आणि सोशल मीडियाची अन्य साधनेही समाजातील या प्रकारच्या कुरीती नेस्तनाबूत करू शकतात. आजवर समाजनिर्माण आणि समाजसुधारणा करण्याचे काम केवळ वृत्तपत्रे करायची. आता एक प्रकारे वैयक्तिक वृत्तपत्र (फेसबुक पेज) या प्रकारची मोहीम चालवत असेल तर जागरुक नागरिकांनी त्याचे स्वागतच केले पाहिजे. इस्लामी कट्टरवाद्यांच्या शवपेटीवरचा हा शेवटचा खिळा ठरणार यात शंका नाही.

मुजफ्फर हुसेन,
ज्येष्ठ पत्रकार मुंबई

http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-muzaffar-hussain-article-about-iran-woman-4924381-NOR.html 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी