Sunday, September 6, 2015

#हिंदू_बौद्ध_ऐक्य_नवी_सुरूवात

आता सोलापूरकडे निघालोय.
दिल्लीतील चार दिवसांपैकी दोन दिवस विवेकानंद इंटरनैशनल फौंडेशनमधे परिसंवादात गेले. असा परिसंवाद की ज्याच्या आयोजनात दोन देशांच्या (जपान आणि भारत) पंतप्रधानांची आत्मीयता होती. परिसंवादाची सुरूवात जपानचे पंतप्रधान आबे सिंझो यांच्या प्रक्षेपित भाषणाने झाली. मुख्य भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. दोन पंतप्रधानांनी या ऐतिहासिक परिसंवादाबद्दल दाखवलेली आत्मीयता ही गौरवास्पद बाब असल्याचे जगभरातून आलेल्या बौद्ध धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूंनी बोलून दाखवले.

जपानची राष्ट्रीय धोरणं ठरवण्यात मोलाची भूमिका बजावणारी टोकिओ फौंडेशन आणि इंटरनाशनल बौद्ध कॉन्फिडरेशन या संस्था परिसंवादात सहसंयोजक होत्या. या संस्थांचे अध्यक्ष, सचिव व प्रमुख पदाधिकारी होतेच शिवाय श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपती, जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांसह मंगोलिया, भूतान, रशिया, तैवान आणि अन्य देशातील मंत्री अन् तपस्वी विद्वानांनी पेपर प्रेझेंट केले.
अनेक देशांतील बौद्ध विद्वानांशी चर्चा करायची संधी मिळाली. माझ्यासाठी हे सारे नवीन होते. खूप शिकायला मिळालं.
जगातील संघर्ष टाळण्यासाठी आणि पर्यावरणाविषयी सजगता वाढवण्यासाठी
पुढाकार घेतला पाहिजे असा विचार घेऊन हिंदू आणि बौद्ध धर्माला एका व्यासपीठावर आणणारे हे आयोजन गेल्या २५०० वर्षांत पहिल्यांदाच झाले असावे. त्यामुळेअनेक अर्थांनी हे संमेलन महत्त्वाचे ठरले.
जगभरातील सर्व बौद्ध धर्मीय देशांत बुद्धाची जन्मभूमी भारताविषयी श्रद्धाभाव आहेच. तोच धागा पकडत हे दोन्ही धर्म एकत्र येताहेत. "माझाच धर्म खरा, इतरांचे खोटे, सर्व जग माझ्याच धर्माचे बनले पाहिजे" या अट्टाहासापायी जगात एकांतिक धर्मीयांकडून धर्मांतरण आणि रक्तपात सुरू असताना हिंदू आणि बौद्ध हे "जगातील सर्वच धर्म सत्य आहेत" हा सहिष्णू संदेश घेऊन जागतिक स्तरावर पुढे येताहेत, ही ऐतिहासिक बाब नक्कीच आहे.
पुढील वर्षी २०१६ मधे हे संमेलन जपानमधे घेण्याचे टोकिओ फौंडेशनने घोषित केले आहे.
मला अन् मित्र Sagar Suravase ला या कार्यक्रमात सहभागाची संधी मिळाली, ही आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.
महाराष्ट्रातसुद्धा परस्परांच्या श्रद्धास्थानांचा आदर राखून हिंदू अन् नवबौद्ध एकत्र आणण्याचे प्रयत्न झाल्यास महाराष्ट्राच्या समाजजीवनाला ऐतिहासिक कलाटणी मिळू शकते.
अर्थातच हे खूप कठीण आहे. दोन्ही बाजूने दोन पावले पुढे पडण्याची आवश्यकता आहे. महाष्ट्रात हिंदू - नवबौद्ध संबंधाला राजकीय कांगोरे आहेत. त्यापासून दूर राहून धाडसाने दोन्ही समाजातील सकारात्मक विचारांचे, तळमळीचे लोक पुढे आल्यास नवी सुरूवात होऊ शकते.
पूज्यनीय डॉ. बाबासाहेबांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. या वर्षात ही नवी सुरूवात होईल काय ?
#आधी विचार जन्म घेतात,
मग कृती !!
www.psiddharam.blogspot.com

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी