hindu buddhist initiative / दै. दिव्य मराठी, पान ७, दि. १० सप्टेंबर |
hindu buddhist initiative |
http://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-siddharam-patil-article-about-hindu-religion-5108722-NOR.html
जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या तीन संस्थांनी या परिसंवादाचे आयोजन केले होते. एक : संरक्षण, परराष्ट्र आणि मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रात राष्ट्रीय भूमिका घेऊन मूलभूत संशोधन करणारी आणि जागतिक स्तरावर सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणारी विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन. दोन : जपानची थिंक टँक समजली जाणारी टोकियो फाउंडेशन आणि तीन : जगभरातील बौद्धांची सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल बुद्धिस्ट काॅन्फेडरेशन या त्या तीन संस्था. जगातील संघर्ष टाळणे आणि पर्यावरणाबद्दल सजगता वाढवणे यासाठी हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानाने पुढाकार घेतला पाहिजे, असा विचार घेऊन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. जगाच्या कल्याणासाठी हिंदू आणि बौद्ध धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू आणि प्रभावी नेत्यांना एका व्यासपीठावर आणणारे हे आयोजन गेल्या २५०० वर्षांत पहिल्यांदाच झाले असावे. त्यामुळे अनेक अर्थांनी हे संमेलन महत्त्वाचे ठरले. दरम्यान, पुढील वर्षी २०१६ मध्ये हे संमेलन जपानमध्ये घेण्याचे टोकिओ फाउंडेशनने घोषित केले आहे.
बौद्ध धर्मीयांची मोठी संख्या असलेल्या जगभरातील सर्वच देशांमध्ये बुद्धाची जन्मभूमी म्हणून भारताविषयी सुप्त श्रद्धाभाव असतो. तोच धागा पकडत या दोन्ही धर्मीयांना एकत्र आणण्याचा हा प्रयोग होता. "माझाच धर्म खरा, इतरांचे खोटे, सर्व जग माझ्याच धर्माचे बनले पाहिजे’ या अट्टहासापायी जगात एकांतिक धर्मीयांकडून धर्मांतरण आणि रक्तपात सुरू असताना हिंदू आणि बौद्ध हे "जगातील सर्वच धर्म सत्य आहेत’ हा सहिष्णू संदेश घेऊन जागतिक स्तरावर पुढे आल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. स्वामी िववेकानंदांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत दिलेल्या संदेशाचे कृतिशील रूप म्हणून या घटनेकडे पाहिले पाहिजे. म्हणूनच या घटनेकडे आॅर्गनायझेशन आॅफ इस्लामिक को-आॅपरेशनसारखा एखादा हिंदू – बौद्धांचा एक गट अशा संकुचित दृष्टिकोनातून पाहता येणार नाही.
‘इतर धर्मही सत्य आहेत. त्या मार्गानेही ईश्वरापर्यंत पोहोचता येते,’ हे तत्त्वज्ञान केवळ भारतीय धर्मांकडेच आहे. हा सहिष्णुतेचा भाव पसरवताना सारी पृथ्वी आपल्याच धर्माची करण्याच्या धर्मवेडाने पछाडलेल्या गटांविषयी जगातील प्रमुख देशांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे यासाठी पुढाकार घेणे, हा एक प्रमुख उद्देश या परिसंवादाच्या आयोजनामागे असल्याचे गेली सहा महिने अथक परिश्रम घेत या आयोजनाला मूर्त रूप देणारी एक प्रमुख व्यक्ती स्वामिनाथन गुरुमूर्ती यांनी सांगितले.
परिसंवादाची सुरुवात जपानचे पंतप्रधान आबे िशंझो यांच्या प्रक्षेपित भाषणाने झाली. मुख्य भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. उद््घाटनपर भाषणात पंतप्रधान मोदी यांनी बौद्ध आणि हिंदू धर्म हे उपासना पद्धती कमी तत्त्वज्ञान अधिक असल्याचे सांगितले. विचारधारा फूट पाडते, तर तत्त्वज्ञान जोडून ठेवते. संवादातूनच जोडणे शक्य होते. सगळी उपनिषदे ही संवादातूनच निर्माण झाली आहेत. पूर्वी सैन्य हे शक्तीचे प्रतीक मानले जात असे. आता शक्ती ही विचारांची शक्ती आणि प्रभावी संवादातून निर्माण होते, हे स्पष्ट झाले आहे. सर्व प्रकारचे संघर्ष दूर करण्याची ताकद संवादात आहे. मनुष्य आणि निसर्ग, निसर्ग आणि विकास, निसर्ग आणि विज्ञान या प्रकारचे संघर्ष टाळण्याची मूल्ये हिंदू आणि बौद्ध परंपरेत खोलवर रुजलेली आहेत. ही मूल्ये आपल्याला संघर्ष टाळण्यासाठी, शांततेकडे जाण्यासाठी आणि स्वच्छ-सुंदर पर्यावरणासाठी प्रेरक ठरतील.
दोन दिवसांच्या परिसंवादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोधगया येथे परिसंवादासाठी जगभरातून आलेल्या सर्व बौद्ध धर्मगुरू, विद्वान, राजकीय नेते यांचे स्वागत केले. बोधगया ही भारत आणि बौद्ध जगतामधील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगून बोधगयेला अाध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात अनेक धर्मनिरपेक्ष आणि शाश्वत घटकांना स्थान मिळाले आहे. हेच भारतीय आणि हिंदू तत्त्वज्ञानाचे महान वैशिष्ट्य मानले पाहिजे.’
महाराष्ट्रातही परस्परांच्या श्रद्धास्थानांचा आदर राखून हिंदू अन् नवबौद्धांना एकत्र आणण्याचे प्रयत्न झाल्यास येथील समाजजीवनाला ऐतिहासिक कलाटणी मिळू शकते. अर्थातच हे खूप कठीण आहे. दोन्ही बाजूंनी दोन पावले पुढे पडण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात हिंदू-नवबौद्ध संबंधाला अनेक कंगोरे आहेत. राजकीय समीकरणेही जोडली गेली आहेत. त्यामुळे या साऱ्यापासून दूर राहून दोन्ही समाजातील सकारात्मक विचारांचे, तळमळीचे लोक धाडसाने पुढे आल्यास एक नवी सुरुवात होऊ शकते. डॉ. बाबासाहेबांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे. या वर्षात ही नवी सुरुवात होईल काय ?
भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी म्हणजे गौतम बुद्ध. पण आजवर आपण आग्नेय आणि पूर्वेकडील आशियाई देशांशी संबंध ठेवताना बौद्ध परंपरेकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वेकडील सर्व देश हे धार्मिक आणि सांस्कृतिक धाग्याने भारताशी अतिशय दृढपणे बांधले गेले आहेत. या देशांमध्ये हिंदू आणि बौद्ध परंपरा एकरस होऊन नांदताहेत. हाच आधार आपल्याला एकत्र आणू शकतो. त्या दृष्टीने नवी दिल्लीतील परिसंवाद मैलाचा दगड ठरणार आहे.
सिद्धाराम पाटील
मुख्य उपसंपादक, दिव्य मराठी, सोलापूर गौतम बुद्धांनी उपासनेच्या अनेक पद्धती स्वीकारल्या. त्यांनी केवळ हिंदू तत्त्वज्ञानाचीच फेरमांडणी केली नाही, तर जगाचा दृष्टिकोनही बदलला. हिंदू तत्त्वज्ञानातून अनेक आध्यात्मिक तत्त्ववेत्ते निर्माण झाले. त्यात गौतम बुद्ध अग्रस्थानी म्हटले पाहिजेत.
No comments:
Post a Comment