Tuesday, January 17, 2017

125 वर्षांनंतरही युवकांचे अायडाॅल विवेकानंद!

दै. दिव्य मराठी, १७ जानेवारी २०१७
तरुणाईला प्रेरित करणाऱ्या गोष्टी विवेकानंदांमध्ये आहेत. म्हणूनच हे जग जेवढे आधुनिक आणि विज्ञानाधारित होत जाईल तेवढे त्यांच्या विचारांकडे आकर्षिले जाईल. अमेरिका, जपानमध्ये विवेकानंदांवर अभ्यास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. टोकियोत संशोधन व अभ्यास केंद्र सुरू झाले. ‘द गिफ्ट अनओपन्ड’ हे पुस्तक अमेरिकी बुद्धिजीवींसाठी आशेचा किरण ठरले आहे. १२५ वर्षानंतरही विवेकानंदांविषयीचे अाकर्षण का अाहे? याचा धांडाेळा नुकत्याच पार पडलेल्या युवा दिनानिमित्ताने घेण्याचा हा प्रयत्न.
http://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-125-years-of-youth-ideal-vivekananda-5506862-NOR.html

कॉलेजात जाणारे, आधुनिक शिक्षण घेणारे, लॅपटॉप अन् अँड्रॉइड लीलया हाताळणारे टेक्नाेसॅव्ही आणि फॅशन म्हणून चारचौघांत स्वत:ला विज्ञानवादी, नास्तिक म्हणवून घेण्यात धन्यता मानणारा युवा वर्ग अाजही एका व्यक्तिमत्त्वासमोर नतमस्तक हाेताे, त्यास अायडाॅल मानताे. केवळ भारतीयच नाही, तर भारताविषयी थोडीफार माहिती असणारेही त्या व्यक्तिमत्त्वासमोर नतमस्तक होतात. अर्थातच ते प्रेरक नाव आहे, स्वामी विवेकानंद! आज १२५ वर्षांनंतरही विवेकानंदांबद्दल तरुणांमध्ये आकर्षण कायम आहे, किंबहुना त्यांच्याविषयीची क्रेझ वाढत असल्याचे दिसते. त्यामागचे रहस्य काय, याचा काही मुद्द्यांच्या आधारे धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न...
१. विज्ञाननिष्ठा : स्वामी विवेकानंद यांनी निकोलस टेस्लासारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला प्रभावित केले. जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनाचे पेटंट घेऊन ठेवण्याची दूरदृष्टी १०० वर्षांपूर्वी दाखवली. योगशास्त्रासारख्या शाश्वत ज्ञानशाखेची राजयोग या ग्रंथाच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे आणि वैज्ञानिक पद्धतीने मांडणी केली. २३ नोव्हेंबर १८९८ ला जमशेदजी टाटा यांनी विवेकानंदांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी भारतातील विज्ञान संशोधन संस्थेचे नेतृत्व विवेकानंदांनी करावे, अशी विनंती केली. हीच संस्था पुढे Indian Institute of Science, Bangalore या नावाने प्रसिद्धीस आली. जमशेदजींना स्टील उद्योग भारतात आणण्याच्या ध्येयाने पछाडले होते.
विवेकानंदांनी त्यांना सुचवले की, फक्त साधनसामग्री आणून चालणार नाही, तर तुम्हाला साधनसामग्रीचे तंत्रज्ञान भारतातच उभे करता आले पाहिजे. थोडक्यात, विज्ञाननिष्ठा हा श्रेष्ठ गुण स्वामी विवेकानंदांमध्ये होता. त्याची अनेक उदाहरणे आणि सूत्रे त्यांच्या चरित्र व वाङ््मयात विखुरली आहेत.

२. प्रखर भारतभक्ती : स्वामी विवेकानंद हे देशभक्तीचे प्रतीक अाहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जवळजवळ प्रत्येक महापुरुषावर स्वामी विवेकानंदांचा अमीट प्रभाव होता. इतिहासकार संकरीप्रसाद बसू म्हणतात, ‘फ्रान्सच्या क्रांतीवर रुसोचा जेवढा प्रभाव होता किंवा रशिया व चीनमधील क्रांतीवर मार्क्सचा जेवढा प्रभाव होता तेवढाच प्रभाव भारतीय चळवळीवर विवेकानंदांचा होता.
’ जहाल, मवाळ, क्रांतिकारी या सर्वच प्रवाहांना त्यांनी प्रेरित केले. स्वत: लोकमान्य टिळक हे विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता मानत. विवेकानंदांमुळे आपल्या देशभक्तीत हजार पटींनी वाढ झाल्याची भावना गांधीजींनी व्यक्त केली. सुभाषचंद्र बोस हे वारंवार लिहीत की, त्यांचे जीवन विवेकानंदांच्या प्रभावाखालीच घडले. युवकांनी विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा, असा आग्रह नेताजींचा असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे कोणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनीच!
वि. दा. सावरकर ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या सर्वांच्या जीवनावर स्वामी विवेकानंदांचा प्रभाव दिसून येतो. इंदिरा आणि राजीव गांधी यांनी १२ जानेवारी विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला हे सर्वविदित आहेच. ज्यांनी वयाच्या १७ व्या वर्षीच विवेकानंदांच्या वाङ््मयापासून प्रेरणा घेऊन घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपले जीवन घडवले ते नरेंद्र माेदी आज देशाचे पंतप्रधान आहेत.

३. सकारात्मकता : अनेक महापुरुषांनी विवेकानंदांचे वर्णन घनीभूत देशभक्ती या शब्दांत केले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘तुम्हाला भारत जाणून घ्यायचंय तर विवेकानंद अभ्यासा; त्यांच्यात सारे काही सकारात्मक आहे. नकारात्मक काहीही नाही.’ विवेकानंद हे देशभक्ती आणि आध्यात्मिकता याचे रसायन होते. शरीर, मन आणि आत्म्याने तरुण राहणे हे युवकांना शक्य आहे. स्वामी विवेकानंद या शाश्वत तारुण्याबद्दल म्हणतात,
‘भारतातील युवा मना, माझ्या सर्व आशा तुझ्यात आहेत. तुम्ही तुमच्या राष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद द्याल का? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायचे धाडस दाखवले तर तुम्हाला सर्वांना गौरवशाली भविष्य आहे. तुमचा स्वत:वर प्रचंड विश्वास हवा. जसा लहानपणी माझा माझ्यावर होता आणि त्याचमुळे मी आता काम करत आहे.
तसा विश्वास तुम्ही तुमच्यावर ठेवा. प्रत्येक आत्म्यामध्ये अनंत शक्ती भरलेली आहे. तुम्ही संपूर्ण भारताचे पुनरुत्थान कराल. मग आपण इतर देशांमध्ये प्रकाशमान होऊन जाऊ. प्रत्येक जण आपला देश घडवण्यासाठी जे काम करत आहे, त्यात आपल्या कल्पना महत्त्वाच्या घटक बनतील. आपण भारतात आणि भारताबाहेरील वंशासाठी काम करू. त्यासाठी आपल्या सर्वांना झटून काम करावे लागेल. म्हणून मला युवक हवे आहेत. ताजी, अस्पर्श आणि वास न घेतलेली फुले जर देवाच्या पायावर वाहिली तर तो त्यांचा स्वीकार करतो, म्हणून कार्यप्रवृत्त व्हा, जीवन छोटे आहे.’

४. स्वाभिमान जागवला : स्वामी विवेकानंद हे एकाच वेळी देशभक्त आणि जागतिक नागरिकही होते. माझा धर्म सत्य आहे तसे इतरांचे धर्मही सत्य आहेत ही जीवनशैली केवळ हिंदूंकडेच आहे. इतरांच्या धर्मांचा आदर करण्याचा हा संस्कार जगाने भारताकडून शिकले पाहिजे हे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले.
स्वत:ला हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणवण्यात आणि त्याचा अभिमान बाळगण्यास स्वामीजींनी कधी संकोच केला नाही. स्वामीजी म्हणत, ‘देशाची अधोगती धर्मामुळे नाही, तर धर्माचा चुकीचा अर्थ सांगितल्यामुळे झाला. धर्म हा भारताचा प्राण आहे. उपनिषदे ही अनंत शक्तीची भांडार होत. मी वेगळे काहीही सांगत नाही, जे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आहे, तेच मी आधुनिक भाषेत सांगत आहे.’

५. गुणग्राहकता : भारतीयांनी जगाकडून शिकले पाहिजे, अशा खूप गोष्टी आहेत. संघटितपणे काम करण्याचे गुण, विज्ञान हे आपण पाश्चात्त्यांपासून शिकले पाहिजे. त्याच वेळी आपण त्यांना आपले अध्यात्म दिले पाहिजे.
जगाला आध्यात्मिक ज्ञान देणे हीच भारताची नियती आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी भारतीयांना फटकारले, समजावले, प्रोत्साहित केले, त्यांच्यासमोर असलेल्या राष्ट्रीय ध्येयाप्रती अभिमानाची भावना जागवली आणि झालेल्या अधोगतीबद्दल मनात पश्चात्तापाची भावना निर्माण केली; इतकेच नाही, तर यातून बाहेर पडण्यासाठी धाडसी बनवले. हे सर्व स्वामी विवेकानंदांनी केवळ ४ ते ५ वर्षांत केले.

६. दूरदृष्टी : केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवणे हे विवेकानंदांचे जीवनध्येय कधीच नव्हते. विख्यात लेखक व विचारवंत रोमां रोलां म्हणतात, ‘विवेकानंदांच्या वचनांना आज इतका काळ लोटला आहे.
एवढ्या प्रदीर्घ काळाचे अंतर असूनसुद्धा, आजही या ग्रंथांना हात लावताना माझ्या शरीरभर विद्युल्लहरी खेळून गेल्याप्रमाणे वाटल्याखेरीज राहत नाही.’ स्वामीजींनी १८९५ ला लिहिलेल्या एका पत्रात असे स्पष्ट सूचित केले की, इंग्रजांशी व्यापार प्रस्थापित करावा,
डाळी उत्तम पॅकिंग करून व त्यापासून ‘सूप’ करण्याची प्रक्रिया त्यावर लिहून निर्यात कराव्यात, त्या घरोघरी पाठवण्याची व्यवस्था करून तेथील बाजारात आपल्या वस्तूला स्थान मिळवावे. बाजारपेठेचा अभ्यास करून, नवीन प्रयोग करीत राहून अग्रभागी राहावे. स्वामीजी म्हणतात
“We want an enterprising spirit’ हे केवळ एकट्याने न करता Company type of organization ने करण्याचा ते सल्ला देतात. मात्र, हे करताना निर्यात, कामगारांचा फायदा व कल्याण असे एकाच वेळी उच्चतम पातळीवर साधता आले पाहिजे, असे त्यांनी १८९७ मध्ये स्वामी ब्रह्मानंदांना लिहिलेल्या पत्रात प्रतिपादन केले आहे.
स्वामी विवेकानंद हे द्रष्टे होते. आजच्या काळातील प्रत्येक समस्येवर त्यांनी उत्तर शोधून ठेवले आहे. संस्कृती आणि विकास हातात हात घालून एकत्र नांदू शकतात, हा आशावाद विवेकानंदांच्या विचारांनी जागवला आहे. जगभरातील तरुणाई यापासून दूर कशी बरं राहू शकेल!
- सिद्धाराम पाटील, साेलापूर.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी