Sunday, December 20, 2020

धन्य ते जीवन...

मा. गो. वैद्य यांच्यासोबत त्यांच्या घरी सिद्धाराम.


स्थळ : नागपुरातील मा. गो. वैद्य यांचे घर.
११ सप्टेंबर २०१९. सायंकाळची वेळ.
ही त्यांची शेवटची भेट ठरली.

९६ वर्षांच्या ज्ञानाच्या क्षेत्रातील या ऋषींना ‘ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी’ या ग्रंथासाठी एक लेख लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘आता सध्या मी एका ग्रंथावर काम करत आहे. साधारण फेब्रुवारी २०२० ला लेख देऊ शकेन. चालणार आहे का?’.
ग्रंथाचे प्रकाशन १९ जानेवारी २०२० ठरलेले असल्याचे मी सांगितले. त्यामुळे या ग्रंथात त्यांचे योगदान घेता आले नाही.
९६ वर्षांची व्यक्ती याही वयात इतके नियोजनबद्ध काम करते, हे मा. गो. यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असेच होते.
एखाद्या विषयावर लेख लिहून पाहिजे असल्यास त्यांचा पहिला प्रश्न असायचा की लेख कधीपर्यंत हवा?.
सांगतिलेल्या दिवसापर्यंत शक्य असल्यास ते हो म्हणत, अन्यथा त्यांच्या नियोजनानुसार अमूक दिनांकापर्यंत चालणार आहे का, असे विचारत. ठरलेल्या दिनांकाच्या एक दोन दिवस आधी त्यांचा दूरध्वनी येणार. तुम्ही मागीतलेला लेख थोड्या वेळापूर्वी इ मेल केलाय. पाहून घ्या.
शंभरीकडे वाटचाल सुरू असतानाही वेळेचे इतके काटेकोर नियोजन... धन्य ते जीवन. ज्या व्यक्तींचा माझ्या आयुष्यावर अमीट ठसा उमटला त्यापैकी एक श्री. मा. गो. वैद्य.
इतके ज्ञानवृद्ध व्यक्तिमत्व पण माझ्यासारख्या सामान्य तरुणाला त्यांनी खूपच सलगीने वागवलं. शेवटच्या भेटीत शेजारी बसवून फोटो काढण्यास लावले. त्यांचे आत्मचरित्र आपुलकीने भेट दिले.

विवेकानंद केंद्र कार्यकर्ता आणि पत्रकार असल्याचा मला व्यक्तिश: आजवर खूप लाभ झाला. एरव्ही जे अशक्य होते अशा अनेक महान व्यक्तित्वांना भेटु शकलो. त्यांच्या स्नेहास पात्र राहू शकलो. याची धन्यता वाटते. पूर्वजन्म पुण्याईमुळेच विवेकानंद केंद्र कार्यकर्ता अन् पत्रकारिततेची संधी मिळाली असावी. पत्रकारितेची सुरूवात सोलापूर तरुण भारतमधून होणे आणि तेथे रविवार पुरवणी संपादक अशी संधी मिळणे यामुळे मा. गो. यांच्याशी स्नेहबंध जुळू शकले.
विवेक विचार मासिकाच्या जानेवारीच्या अंकात थोडं विस्तृत लिहीन.
हिंदुत्वाचे समर्थ भाष्यकार मा. गो. वैद्य यांच्या आत्मास सद्गती मिळो.

Sunday, October 25, 2020

वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द

Veershaiv Lingayat Hindu

वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून प्रा. गजानन धरणे, सिद्धाराम पाटील, शरद गंजीवाले, डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, धर्मराज काडादी, राजेंद्र काटवे.


वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाचे प्रकाशन 

सोलापूर : एखाद्या इमारतीचे खांब कापण्यासाठी कोणी येत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने हिंदू धर्मात असलेली आपली मुळं कापण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द आहेत. वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच आहे आणि वीरशैव लिंगायत समाजात धर्मरक्षणाची परंपरा आदी जगद्गुरूंपासून चालत आलेली आहे, असे प्रतिपादन बृहन्मठ होटगी मठाचे डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले. सिद्धाराम पाटील आणि अप्पासाहेब हत्ताळे यांनी लिहिलेल्या ‘वीरशैव लिंगायत हिंदूच!’ या लघु ग्रंथाचे प्रकाशन अक्कलकोट रोड येथील महास्वामी यांच्या कार्यालयात झाले. यावे‌ळी ते बोलत होते. जटायु अक्षरसेवा संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. 

जातवेद शिवाचार्य मुनींकडून महात्मा बसवेश्वर यांनी लिंगदीक्षा घेतली होती. मी शैव होतो आता वीरशैव झालो, असे खुद्द महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या वचनातून सांगितले आहे. त्यामुळे मतभेद सोडून वीरशैव लिंगायत समाजाने एकसंध झाले पाहिजे, असे आवाहन महास्वामी यांनी यावेळी केले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे प्रांत प्रमुख शरद गंजीवाले, धर्मजागरण प्रमुख हेमंत हरहरे, डाॅ. राजेंद्र हिरेमठ, राजेंद्र काटवे जिल्हा प्रमुख प्रा. गजानन धरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 आरक्षणाच्या आशेने धर्म सोडणे मान्य नाही : काडादी 

 आरक्षण मिळेल म्हणून धर्म मोडून काढणे कधीच योग्य नाही. वीरशैव िलंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग आहे. त्यामुळे येत्या जनगणनेच्या वेळी धर्माच्या ठिकाणी हिंदू धर्म अशीच नोंद समाजबांधवांनी करावी, असे आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली. श्री. काडादी म्हणाले, “हजार वर्षे देशावर आक्रमणे झाली. तरीही आपण आपली संस्कृती जपून वाटचाल करत आहोत. लिंगायत समाजात इतकी वर्षे पंचाचार्य आणि बसवेश्वर हा वाद पेटत राहील असा प्रयत्न सुरू होता. हा वाद आता मिटतोय असे दिसताच आरक्षणाच्या या काळात शब्दछल करून ‘वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे’ असे राजकारणातील मंडळींनी सांगायला सुरूवात केली आहे. वीरशैव लिंगायत हे हिंदूच नाहीत असे सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे. लहान मुलाला चाॅकलेट दाखवले की ते मूल काही वेळासाठी संभ्रमित होते, तीच गत आरक्षण मुद्द्यावरून झाली आहे. आरक्षण नसल्याने समाजात भेदाची भावना निर्माण झाली आहे. आरक्षणारूपी चाॅकलेटच्या जवळ जाण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. परंतु, धर्म मोडून काढणे योग्य होणार नाही. वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाने समाजाची दिशाभूल दूर करण्याचे काम केले आहे.’’ 

 काय आहे पुस्तकात ? 

 महात्मा बसवेश्वर यांच्याआधी ३ हजार वर्षांपासून वीरशैव लिंगायत परंपरा प्रचलित होती, यासंबंधीचे शिलालेख व अन्य पुराव्यांची माहिती या पुस्तकात आहे. हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश या प्रमुख त्रिदेवांपैकी महेश अर्थात शिव उपासना इष्टलिंग रूपात करणारा समाज हिंदू आहे. शिवयोगी सिद्धराम, महात्मा बसवण्णा यांच्या वचनांचा आधार घेत वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच असल्याचे ३७ मुद्दे या पुस्तकात साधार मांडले आहेत. बृहन्मठ होटगीचे धर्मरत्न डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.
9767284038 या क्रमांकावर व्हाटस् अॅप / एसएमएस करून पुस्तक मागवू शकता.
पृष्ठे ३६, मूल्य ३०/ 
पुढील लिंकवरूनही पुस्तक मागवता येईल

  

Saturday, July 25, 2020

भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !

श्री. भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !
फक्त तीन ते चार महिन्यात
त्यांच्या प्रतिपक्ष या युट्यूब वाहिनीची सदस्यसंख्या एक लाखावर पोहोचली आहे.
दृश्य संख्या 1 कोटी 19 लाख.

एखाद्या वैचारिक विषयावरील
युट्युब वहिनीला
शंभर-सव्वाशे दिवसात
इतके सदस्य मिळणे
ही बाब साधारण नाही.

पाठीमागे कोणतीही माध्यम संस्था नसताना
एखाद्या पत्रकाराला
अशी जनमान्यता मिळणे
हे महाराष्ट्रातील
पहिलेच उदाहरण ठरावे.

येथे उल्लेखनीय बाब म्हणजे
भाऊ यांना आपल्या ब्लॉगसाठी,
आपल्या युट्यूब वाहिनीसाठी
एका रुपयाची सुद्धा जाहिरात
करावी लागली नाही.

भेदक विश्लेषण, साठ वर्षांचा पत्रकारितेतील दांडगा अनुभव, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मांडण्याची शैली, प्रांजळपणा, मांडणीतील सातत्य, साधेपणा, निस्पृहता, दांडगी स्मरणशक्ती, तटस्थता, नवीन शिकण्याची जिद्द, परिश्रम, प्रसिद्धीने हुरळून न जाणे, स्वतःच्या मर्यादांची जाणीव, अभ्यासोनी प्रकट व्हावे या उक्तीचे पालन, सूक्ष्म निरीक्षण बुद्धी, निर्भिड स्वभाव आणि निरागसता...

यामुळेच महाराष्ट्राने
भाऊंना डोक्यावर घेतलं आहे.
भाऊ ( Ganesh Torsekar )
यांचे प्रबोधन कार्य असेच चालू दे...
मनापासून शुभेच्छा...

विशेष नोंद :
कथित पुरोगामी मंडळींनी पोसलेला बुद्धीच्या क्षेत्रातील दहशतवाद
मोडीत काढण्याचा मार्ग
प्रशस्त करण्याचे ऐतिहासिक काम
जोखीम पत्करून करणे
हे एक मोठे धाडस आहे.
असे धाडस
निस्पृहतेमधूनच
येत असते.
कमालीची निस्पृहता
ही भाऊंची ठळक ओळख आहे.

(एक लाख सदस्य संख्या झाल्यानिमित्ताने भाऊंचे मनोगत...
https://youtu.be/z2vSdR7tv3c)

--------------------
नोंदी सिद्धारामच्या...
psiddharam.blogspot.com

Thursday, July 23, 2020

व्यंकय्या नायडू यांचा निषेध करण्यापूर्वी...

व्यंकय्या नायडू यांचा निषेध
अवश्य झाला पाहिजे, परंतु
तुमच्यामध्ये "हे" धाडस असेल तरच...

छत्रपती उदयनराजे भोसले यांना
राज्यसभेत शपथ घेताना
"घोषणा देऊ नका", असे म्हटल्याने
महाराजांचा अपमान झाला,
असे सांगत
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
यांचा निषेध करण्यात येत आहे.
परंतु,
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी
म्हटले आहे की,
"आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला,
व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं,
पवारसाहेबांना विचारा काय झालं ?"
(https://youtu.be/e87EKLNExLM)

पवार साहेब याचे उत्तर देणार नाहीत.

गेल्या 10 वर्षात
शिवरायांची बदनामी करणारे एक पुस्तक
बिनधास्त विकले जात आहे.
त्या पुस्तकाच्या विरोधात
कोणी माई का लाल
आक्रमक झाल्याचे दिसला नाही.

"शिवाजीचे उदात्तीकरण" हे ते पुस्तक.
या पुस्तकात
अत्यंत नीच भाषेत
शिवाजी महाराजांची
पानोपानी अवमानाना करण्यात आली आहे.
शिवाजी महाराज यांच्यावर
आक्षेपार्ह आणि दर्जाहीन आरोप आहेत.

"महाराज हे महान नव्हते,
ते खंडणी गोळा करायचे",
अशी आक्षेपार्ह भाषा
या पुस्तकात आहे.

या पुस्तकात महाराजांविषयी
असे काही लिहिले आहे की
त्याचा या ठिकाणी
उल्लेख करणेही शक्य नाही.
या पुस्तकाची विक्री
गेल्या दहा वर्षापासून
आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे.
(http://shodh-bodh.blogspot.com/2012/07/blog-post_29.html?m=1)

या पुस्तका विरोधात काहीही न करता
आजवर मूग गिळून बसलेल्या लोकांना
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात
रान उठवण्याचा काय अधिकार ?
निषेधच करायचा असेल तर
"जय शिवाजी जय भवानी" म्हणण्यास
विरोध करणाऱ्या
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झाला पाहिजे.

शिवाजी महाराजांना
'जाणता राजा' म्हणू नका,
असे म्हणणाऱ्या
श्री. शरद पवार यांचा
कोणी कधी निषेध केला आहे काय ?

"नरेंद्र मोदी हे आजच्या
काळातील शिवाजी आहेत",
या पुस्तकावर तुटून पडणारे
शरद पवार यांना "जाणता राजा"
ही बिरुदावली वर्षानुवर्षे लावताना
विरोध का केला नाही ?

"तुम्ही छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे द्यावेत", असे म्हणत छत्रपतींच्या घराण्यावर
अविश्वास दाखवण्याचा प्रमाद करणाऱ्या
संजय राऊत यांच्या विरोधात
निषेधाची ही धार का दिसली नाही?

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
यांचा निषेध
अवश्य झाला पाहिजे.
परंतु,
निषेधासाठी वापरलेली आपली भाषा
स्वतः ला अभिमानाने मावळा म्हणवून घेता येईल अशीच आहे ना हे पाहीले पाहिजे.

थोडक्यात -
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आडोसा घेत कुरघोडीचे राजकारण करणे, हे आता सर्वच पक्षातील नेत्यांचे धोरण बनले आहे. शिवरायांचे आणि शंभुराजेंचे नाव घेणाऱ्या काही संघटना संबंधित व्यक्तीची जात, पक्ष, आणि विचारधारा पाहून निषेधाची तीव्रता आणि पातळी ठरवतात. वास्तविक पाहता या मंडळींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी, तत्वांशी काही देणे घेणे नसते. आपले उपद्रवमूल्य कायम ठेवणे हाच काय तो उद्देश असतो.

काही संदर्भ :
1. https://www.google.co.in/amp/s/www.lokmat.com/nagpur/bjp-demands-ban-book-shivajiche-udattikaran-padadyamagache-vastav/amp/

Thursday, June 4, 2020

शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन

शिवराज्याभिषेक दिनाला 
हिंदू साम्राज्य दिन असे म्हणतात. कारण...

🚩 सर्वसामान्य जनता जेव्हा त्रस्त झाली होती, तेव्हा एक धर्मात्मा पुढे आला - त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी धर्मरक्षण केले.

🚩 प्राचीन महाकाव्यांमध्ये वर्णन केलेली आदर्श राजाची सर्व लक्षणं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात होती.

🚩 छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते. कारण ते हिंदू होते. अमेरिकेतील थोर विचारवंत लीसा मिलर म्हणतात, "जो इतर धर्मांचे अस्तित्व मानतो तो हिंदू. या दृष्टीने पाहिले तर आज जग हिंदू बनत आहे". (इतर धर्मांचे अस्तित्व मान्य न करणारे एकांतीक धर्म सदैव धर्मांतर घडवून आणण्यासाठी धडपडतात. स्वतःच्या धर्मियांची संख्या वाढविण्याचा खटाटोप करतात. हिंदू धर्म धर्मांतर घडवत नाही, कारण सर्व धर्म सत्य आहेत, अशी त्यांची धारणा असते.)

🚩 ईश्वर एक आहे आणि तो अनेक रूपातून व्यक्त होतो. तो चराचरात आहे. सर्वत्र आहे. कोणत्याही मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचता येते, हे हिंदू धर्माचे मर्म छत्रपती शिवाजी महाराज जाणून होते.

🚩 माझा धर्म सत्य आहे तसे इतरांचेही धर्म सत्य आहेत, ही प्रत्येक हिंदूची धारणा असते. स्वाभाविकच महराजांचीही अशीच धारणा होती. परंतु, ते हिंदू धर्माभिमानीसुद्धा होते.

🚩 धर्म व संस्कृतीवर होणाऱ्या आघातांबद्दल ते दक्ष होते. सद्गुणविकृतीला त्यांनी कधीच थारा दिला नाही.

🚩 नीतिमत्ता न पाळणाऱ्या शत्रूला मारताना प्रसंगी पारंपरिक नियम दूर सारले पाहिजे, त्याच्या पोटात वाघनखं खुपसली पाहिजेत, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं.

🚩 कोणी परधर्मी हिंदूंना बाटवून त्यांच्या रीलिजन मध्ये ओढत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे, हे महाराजांनी दोन पाद्र्यांचे शिर धडावेगळे करून सांगितलं.

🚩 कोणी धर्मांध मंदिर उद्ध्वस्त करून तेथे त्याच्या उपासनेचा ढाचा बनवत असेल तर योग्य वेळी तो ढाचा दूर सारून तेथे पुन्हा मंदिर उभारले पाहिजे, हे त्यांनी दक्षिण स्वारीच्या वेळी कृतीतून दाखवून दिलं.

🚩 काही परिस्थितीत मुस्लिम बनलेल्या कोणाला पुन्हा हिंदू व्हायचं असेल तर त्याला सन्मानाने हिंदू होता आलं पाहिजे, याची व्यवस्था महाराजांनी निर्माण केली. तसे उदाहरण प्रस्तुत केले.

 🚩 महाराजांनी कधीही मशिद अथवा चर्च उद्ध्वस्त केले नाहीत. किंवा अन्य धर्मीयांचा छळ मांडला नाही.

🚩 महाराजांनी त्यांच्या काळात कधीही कोठेही मशिदी उभारल्या नाहीत. कोणी तसे सांगत असेल तर ते निराधार आहे. महाराजांनी कधीही कोणत्याही दर्गा वा मशिदीला नव्याने इनाम दिले नाही.

🚩 आपल्या भाषेवर होणारे परकीय शब्दांचे आक्रमणही परतवून लावले पाहिजेत, इतका सूक्ष्म विचार शिवराय करत होते. आणि त्यासाठी व्यवस्था निर्मितीही करत होते.

🚩 हिंदू असणं म्हणजे सर्वसमावेशक असणं. छत्रपती शिवराय हे असे हिंदू होते. त्यांना आपल्या धर्म व संस्कृतीचा अभिमान होता.

🚩 केवळ माझाच धर्म खरा, इतरांचे खोटे... इतकेच नाही तर इतरांचे धर्म नष्ट, भ्रष्ट केले पाहिजेत... मूर्तीपूजा करणाऱ्यांना आपल्या कळपात ओढले पाहिजे... अन्य धर्मीयांना आपल्या कळपात ओढताना त्यांची कत्तल करावी लागली तरी ते योग्यच आहे आणि या कार्यात मृत्यू आला तर आपल्याला स्वर्गात सुंदर स्त्रीया उपभोगायला मिळतील... इत्यादी प्रकारे विचार करणारे काही रानटी टोळ्या या जगात असू शकतात हे हजार वर्षांत कोणत्याही हिंदू राजाला ओळखता आले नाही. किंबहुना आजही बहुतांश लोकांना हे समजलेले नाही. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांना एकांतिक पंथातील धर्मांध टोळ्यांची नीती समजलेली होती. अतिशय मुत्सद्देगिरीने या संकटाला तोंड दिले पाहिजे याची त्यांना जाण होती.

🚩या सर्व मुद्द्यांचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक होता. या सोहळ्याचे वर्णन हिंदू साम्राज्य दिन अशा शब्दात करणे यथार्थ आहे.

🚩रा. स्व. संघाच्या प्रमुख उत्सवात या दिनाला फार महत्त्व आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणणारे बुद्धिजीवी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून स्वतःला दूर ठेवत होते तेव्हापासून, किंबहुना त्या आधीपासून रा. स्व. संघ हिंदू साम्राज्य दिन साजरा करीत आहे.

🚩केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतवर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अलौकिक कार्य पोहोचवण्याचे काम संघ गेल्या ९५ वर्षांपासून करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची सतत उपेक्षा करत आलेल्या गटातील काही मंडळी आज-काल "हिंदू साम्राज्य दिन" या शब्दावलीवर आक्षेप घेत आहेत. केवळ वैचारिक संभ्रम निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे. बाकी काही नाही.

- सिद्धाराम भै. पाटील
psiddharam.blogspot.com

Thursday, May 28, 2020

भारत आता सावरकर मार्गाने पुढे जातोय; गांधी-नेहरूंचा मार्ग केंव्हाच मागे सुटलाय

चीन, पाकिस्तानसाठी 
गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी 
याची जाण आजच्या नेतृत्वात आहे. 
हा नवा भारत आहे. 
देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे 
अन् जे जे घातक ते विषवत. 
कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही. 
देश आहे म्हणून आपण आहोत. 
हा सावरकर विचार आहे. 
हा शाश्वत विचार आहे. 
तारणारा आहे.  
सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.

२७ मे - नेहरू पुण्यतिथी
२८ मे - सावरकर जयंती

अनेक विद्वानांनी यानिमित्ताने या दोन्ही नेत्यांची तुलना करण्याचा प्रयत्न आपापल्या आउटलेटवरून केला.

मीही स्वतःला असे करण्यापासून आवरणार नाही. मी लहान असताना मला नेहरुही आवडायचे अन् सावरकरही.

पुढे वाचन वाढत गेलं.
त्यातून माझी स्वतः ची मते बनत गेली.

माझ्या मते -

"नेहरू आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांमुळे आपले निर्णय चुकत गेले. परिणामी आपल्या मातृभूमीचे तुकडे पडले. काँग्रेसने फाळणी होऊ देणार नाही असे देशाला सांगितले. पण ऐनवेळी फाळणी स्वीकारली.  देशाचा विश्वासघात केला. दंगली घडवून ब्लॅकमेल करून भारताच्या भूमीवर आपण पाकिस्तान बनवू शकतो याची आणि काँग्रेसचे नेते भित्रे, पुळचट अन् नेभळट असल्याची जिनाला खात्री होती.

भारताच्या भूमीवर पाकिस्तान उगवले ते आपले पाप आहे, याची लाज आणि खंत काँग्रेसला कधीच वाटली नाही. उलट, येथील हिंदू, हिंदू संघटना यांना बदनाम कसे करता येईल, हेच धोरण रेटून चालवले. शालेय अभ्यासक्रमात काँग्रेसला अनुकूल तेवढेच शिकवत राहिले.

धर्माच्या नावावर मुस्लिमांसाठी पाकिस्तान, बांगलादेश रूपात या देशाची भूमी तोडून देण्यात आली. तरी लांगूलचालन करणे काँग्रेसने सोडले नाही. काँग्रेस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६ मध्ये हद्द केली. जाहीर रित्या सांगितले की, या देशाच्या साधनसंपत्तीवर पाहिलं हक्क मुसलमानांचा आहे. बाटला हाऊस येथे जिहादी अतिरेकी मारले गेले म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रडू कोसळले.

थोडक्यात, काँग्रेसने देशभक्त मुस्लीम नेतृत्व कधीच पुढे आणले नाही. तोंडी सेक्युलर तत्वाचा जप करत प्रत्यक्षात मात्र कट्टरवादी, जिहादी गटांना बळ पुरवले. इतिहास लेखन, पाठ्यपुस्तक आणि इतर माध्यमातून वैचारिक संभ्रमाला खतपाणी घातले. या देशाचा तेजोभंग होत राहील अशी नीती राबवली. स्वार्थ आणि काँग्रेस हे १९२० नंतर
 जणू समानार्थी बनले.

स्वतः चा स्तोम माजवत राहणे हे काैंग्रेसी नेत्यांचे व्यवच्छेदक लक्षण. माझ्या मते याला गांधीजी अपवाद नव्हते. अहिंसासारख्या व्यक्तिगत जीवनातील मूल्यांना ते देशावर लादू पाहत होते.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसचे असे दोन पंतप्रधान होऊन गेले ज्यांनी स्वतःलाच "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित केलं -
१. जवाहरलाल नेहरू (१९५५)
२. इंदिरा गांधी (१९७१).

हे दोन्ही नेते निश्चितच महान होते. पण म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उणीव दुर्लक्षित करता येणार नाही. कारण या बाबींमुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. यांनी स्वतः लाच पुरस्कार कसे दिले? त्यांना संकोच वाटला नाही का ? असे प्रश्न पडतात... असं कसं होऊ शकतं, याचं आश्चर्य वाटतं.

समजा, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ला भारतरत्न पुरस्कार द्यायचे ठरवले तर किती हलकल्लोळ माजेल. मीडियात कशा प्रतिक्रिया उमटतील ?
१९५५ आणि १९७१ मध्ये स्वतः लाच पुरस्कार देऊ केले म्हणून मीडियातून टीका टीपणी झाली होती का ? याचे संदर्भ मिळत नाहीत.

आता या पार्श्वभूमीवर
वि. दा. सावरकर यांचे जीवन पाहा.

स्वार्थाचा लवलेश नाही.
विचारांमध्ये स्पष्टता आहे.
देशासमोरील खऱ्या आव्हानांची जाणिव असल्यानेच तरुणांना सैन्य भरतीसाठी त्यांनी चळवळ चालवली. यामुळे सैन्यातील हिंदूं सैनिक प्रमाण २५ टक्क्यावरून ६७ टक्याच्या पुढे गेले.
सावरकर यांनी हे एकच कार्य केले असते तरी ते सर्व काँग्रेस नेत्यांच्या एकत्रित कार्यापेक्षा ते महान गणले गेले असते.

सैन्यातील तरुणांची भरती झाली नसती तर कदाचित खंडित भारताचा आजचा नकाशा आता आहे त्याहून खूप आक्रसलेला असला असता.

सावरकर आणि त्याग हे समानार्थी शब्द आहेत. सावरकर आणि तप हे एकच शब्द आहेत.
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
हे तत्त्व भारतीयांनी स्वीकारली असती तर मातृभूमीची फाळणी झाली नसती. दंगलखोर आणि हा देश दार उल इस्लाम करण्याची मनसुबे जोपासणाऱ्या जिहादी शक्ती यांना पायबंद घालण्यात अपयश आल्यानेच या भारतभूमीवर पाकिस्तान उगवला.
देश तोडू पाहणाऱ्या शक्तींना वेसण घालण्याची क्षमता केवळ सावरकर विचारात आहे; गांधी आणि नेहरूंचे विचार फेल ठरले आहेत. देशाने याचा अनुभव घेतला आहे. त्याची फार मोठी किंमत दिली आहे.

आपण सावरकर विचाराने चाललो तर एक दिवस सांस्कृतिक गुलामीत गेलेले आपले बांधवही पुन्हा आपल्या पूर्वजांची संस्कृती अभिमानाने अंगीकार करतील. राष्ट्रांच्या इतिहासात शे - पाचशे वर्षे फार नाहीत. शक्ती आणि संघटन याची कास धरू तर एक दिवस पवित्र सिंधू नदी पुन्हा या भूमीचा भाग होईल.

सुदैवाने आज देशाचे नेतृत्व अशा लोकांच्या हाती आहे की जे या देशाच्या महापुरुषांच्या मध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांच्यासाठी कोणीच अस्पृश्य नाहीत.

त्यांच्यासाठी महात्मा गांधी वंदनीय आहेत.
नेहरू महापुरुष आहेत.
आंबेडकर, सावरकर प्रत: स्मरणीय आहेत.

गांधींची कोणती मूल्ये आज घ्यायची
अन् सावरकर, आंबेडकरांची कोणते विचार अमलात आणायचे याची योग्य जाण या नेत्यांमध्ये आहे.

चीन, पाकिस्तानसाठी गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी याची जाण आजच्या नेतृत्वात आहे.
हा नवा भारत आहे.
देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे अन् जे जे घातक ते विषवत.
कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही.
देश आहे म्हणून आपण आहोत.
हा सावरकर विचार आहे.
हा शाश्वत विचार आहे.
तारणारा आहे. 
सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.

भारत यापुढे
सावरकरांच्या मार्गानेच चालेल...
सावरकर हे
काळाच्या पुढे शंभर वर्षे असतात...
सावरकरांनी जे १०० वर्षांपूर्वी सांगितले ते या देशातील लोकांना आता पूर्णपणे समजले आहे.
तसे नसते तर या देशातील लकांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सरकारला इतक्या तगड्या बहुमताने सत्ता दिली नसती.

तगड्या बहुमतमुळे आणि सावरकर नितीमुळेच तर ३७० हटले. काश्मीर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले. सैन्यात आत्मविश्वास वाढला. सर्जिकल स्ट्राईक होऊ लागले.

असो. सर्वांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त शुभेच्छा. सावरकर अभ्यास करण्यासाठी अनेक तरुणांनी पुढे यावे हे नम्र आवाहन.

- सिद्धाराम भै. पाटील

Monday, May 25, 2020

भारतमातेच्या मुर्तीमुळे कन्याकुमारीत म्हणे "धार्मिक भावना" दुखावल्या


कन्याकुमारी जिल्ह्यातील पुलियुर या छोट्याशा गावातील ही घटना पहा.
कन्याकुमारी जिल्ह्यात ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या आहे 46.85 टक्के आणि हिंदू 48.65 टक्के. उर्वरित मुस्लिम.

200 वर्षे प्राचीन असलेल्या इसक्की अम्मन (दुर्गादेवी) मंदिराच्या भूमीवर काही दिवसांपूर्वी भारत मातेची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. हे मंदिर हिंदु व्यक्तीच्या मालकीचे आहे. एका हिंदू मजुराने पुढाकार घेऊन भारत मातेची ही मूर्ती बसवली.

मंदिराजवळ राहणाऱ्या काही ख्रिस्ती लोकांनी पोलिसात तक्रार दिली की यामुळे त्यांच्या "धार्मिक भावना" दुखावल्या. पोलिसांनी लगेच दखल घेतली. ही मूर्ती काढून टाका असे तेथील गावकऱ्यांना पीएसआयने 20 मे रोजी सांगितले. इतकेच नाही तत्परता दाखवत 21 मे रोजी पोलिसांनी निळ्या कापडाने भारत मातेची प्रतिमा झाकून टाकली.

RSS, BJP आणि हिंदू मुन्नानी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली. प्रकरण मुख्यमंत्री यांच्या पर्यंत नेले. आणि भारत मातेची प्रतिमा मुक्त केली.

जेथे हिंदू समाज हा बहुसंख्य असतो तेथे अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उभारण्यास कधीही विरोध होत नाही. सर्व धर्म सत्य आहेत. ईश्वर एक आहे. तो सर्वत्र आहे. कणाकणात आहे. चराचरात आहे. आणि तो विविध रूपातून व्यक्त होतो, अशी हिंदूंची श्रद्धा असते. त्यामुळे हिंदू कधीही इतरांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
परंतु
विस्तारवादी, एकांतिक धर्मीय व्यवस्थेचे असे नसते. "माझाच धर्म सत्य. माझाच देव सत्य. इतर देव खोटे खोटे. असत्य आहेत. जगातील इतर धर्मीय सारे माझ्याच धर्मात ओढून आणले पाहिजेत." यासाठी एक यंत्रणा काम करत असते. ही यंत्रणा देशाची सीमा मानत नाही.

धर्मांतर, जिहाद, क्रुसेड ... असे काहीही करून जग माझ्याच धर्माचे झाले पाहिजे असा धर्मवेड प्रबळ असतो. राष्ट्रवाद त्यांच्या मार्गातील काटा असतो. भारत मातेची प्रतिमा त्यांच्यासाठी धार्मिक भावना दुखावणारे असते.  "धर्मांतरमुळे राष्ट्रांतर घडते" ते असे.

महत्वाचे -
पोलिस यंत्रणा किंवा कोणतीही यंत्रणा कशी काम करते, हे समजून घेतले पाहिजे. कोणीतरी चार जण एकत्र येऊन कोणाविरुद्ध तरी तक्रार देतात आणि पोलिस कामाला लागतात. धार्मिक भावना दुखावल्या ची तक्रार असेल तर पोलिस यंत्रणा हळवी होते. अशावेळी कायद्याची थोडीफार जाण असलेली संघटित शक्ती गरजेची असते. अन्यथा चूक आपली नसली तरी "आपली भारतमाता झाकून" आपल्यावरच अरेरावी केली जाते. सत्याचा जय तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा सत्याला सामर्थ्याची जोड असते.
अन्यथा
कधी काळी हिंदू असलेला अफगाणिस्तान भारताच्या सीमेबाहेर जातो. १९४७ पर्यंत भारताचा अविभाज्य भाग असलेली भूमी पाकिस्तान, बांगलादेश बनते.

जाता जाता...
1. काही वर्षांपूर्वी कन्याकुमारी जिल्ह्याचे नाव बदलून "कन्नी मेरी" (मेरी म्हणजे येशू ख्रिस्ताची आई) असे नामकरण करण्याची मागणी आणि आंदोलन झाले होते.
2. कन्याकुमारी येथील समुद्रातील श्रीपाद शिला येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभारणी करण्यास एका गटाने मोठा विरोध केला होता. हे सेंट झेवियर्स रॉक आहे. येथे विवेकानंद स्मारक होऊ देणार नाही, अशी त्यांची भूमिका होती.
3. या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही हिंदूंना आपल्याच जागेत एखादे मंदिर उभे करायचे असेल तर ते इतके सोपे नाही.
यासंबंधीच्या काही बातम्या अधून मधून येत असतात. काही बातम्या मध्येच विरून जातात. बातमी मूल्य या निकषात अशा बातम्यांना कोण विचारतं ?

- सिद्धाराम भै. पाटील

Sunday, May 3, 2020

हमीद दाभोलकर, हमीद दलवाई आणि अंनिस


हमीद दलवाई यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने हमीद दाभोलकर यांनी स्वतःचा एक जुना लेख आपल्या fb वर शेअर केला आहे. (https://m.facebook.com/story.php?story_fbid=790338144829584&id=100015602171173) हा लेख खूप प्रभावी अन् विचार करायला लावणारा आहे.
त्यातील एका मुद्द्याने मला अस्वस्थ केले आहे. (तो मुद्दा येथे स्क्रीन शॉट ने जोडला आहे.)
नाव हमीद अन् आडनाव दाभोलकर यामुळे हमीद दाभोलकर यांना शाळेत मुले लांड्या म्हणून चिडवू लागली. का चिडवत असतील तर हमीद दा. यांना वाटतं की, "चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवाजी व अफजल खान लढाई वर्णन आहे. त्यामुळेच हे घडले असावे."
हा गंभीर मुद्दा आहे. अनेक प्रश्न पुढे येतात..
१. शिवाजी - अफजल खान लढाई वर्णनात कोठेही लांड्या हा शब्द आलेला नाही. किंवा अफजल खानशी संबंधित हमीद नावाची व्यक्तिरेखा सुद्धा नाही. मग मुले चिडवण्याचे कारण शिवाजी - अफजल खान लढाई असेल का ?
२. शिवाजी - अफजल लढाई वर्णन हे कारण असेल तर मग हा धडा अभ्यासक्रमात असू नये असे सुचवायचे आहे का ?
३. रोज बातम्यांमध्ये कुठे हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ये तोयबा, जैश ए मोहम्मद, तालिबान, लादेन, दानिश, इंडियन मुजाहिद्दीन, अल कायदा, कसाब, जिना, अफजल गुरू, याकुब वगैरे अतिरेकी, जिहादी यांचा उल्लेख येत असतो. मुलांच्या पाहण्यात, वाचनात या बाबी येतातच. मग केवळ चौथीचा धडा वगळल्याने भागेल का?
४. थोर नेते शरदचंद्र पवार सुचवतात त्याप्रमाणे तब्लीगी, जिहादी, अतिरेकी यांच्या बातम्याही प्रसिध्द करायच्या नाहीत, अशी मागणीही होऊ शकते. समजा ही मागणीसुद्धा मान्य झाली तर मूळ प्रश्न सुटणार आहे का ? (मूळ प्रश्न हिंदू - मुस्लीम एकता कशी नांदेल हा आहे.)
५. थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम हे सर्व भारतीयांना वंदनीय आहेत. त्यांचे नाव उच्चारताना कोणीही विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही हमीद यांना चिडवल त्या शब्दाचा वापर करत नाहीत, हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे.

त्यामुळे शिवाजी - अफजल खान लढाई वर्णन ही अडचण असू शकत नाही. बातम्यांतून पुन्हा पुन्हा पुढे येणारी अतिरेक्यांची नावेही समस्या असणार नाहीत. समाजापुढे डॉ. APJ कलाम यांच्यासारखी चरित्रे आणावी लागतील आणि त्याच वेळी अफजल खान, अफजल गुरू अन् कसाब यासारख्या व्यक्तींची गत काय होते हेही पुढे आणावे लागेल.

वाईट काम करेल त्याला दंडित केले जाते आणि चांगले काम केल्यास गौरव होतो. लोक डोक्यावर घेतात. येथे त्याचे नाव कोणत्या धर्मातील आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, याला काही किंमत नसते. हे विचार नव्या पिढीवर बिंबवले पाहिजे. यासाठी अंनिस मोठी भूमिका निभावू शकते. हमीद दलवाई यांना हेच अपेक्षित असावे.
परंतु, धार्मिक भेदाभेद वाढू नये म्हणून अफजल खान वध शिकवू नका, अतिरेकी काही केले तरी त्यावर बातम्या दाखवू नका... गप्प राहा.. डॉ. APJ यांच्या सारख्या महान व्यक्तीचा गौरव टाळा... अशी भूमिका अंनिस घेणार असेल तर पदरी फार काही पडणार नाही.

- सिद्धाराम

Wednesday, April 29, 2020

संन्यस्त जीवन जगणारी धाडसी गृहिणी

Aparna Ramtirthkar
चला नाती जपुया आणि आईच्या जबाबदार्‍या हे कौटुंबिक विषय घेऊन ज्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यांत तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली, लव्ह जिहादच्या सापळ्यात अडकलेल्या शेकडो मुलींना अलगद बाहेर काढून त्यांच्या पालकांना सोपवलं, शेकडो कुटुंबे घटस्फोटापासून, उद्ध्वस्त होण्यापासून ज्यांनी वाचवली त्या अ‍ॅड. अपर्णा  अरुण रामतीर्थकर तथा अपर्णाताई यांचे मंगळवार, दि. 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11.45 वाजता सोलापूर येथील अश्विनी रुगणालयात उपचार सुरू असताना निधन झाले. यानिमित्त सिद्धाराम भै. पाटील यांचा लेख 

पक्षाघाताचा झटका आल्याने गुढी पाडव्याच्या दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिली अन् अखेर वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्यांच्या मागे मुलगा आशुतोष, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी.
पती, पत्नी दोघेही विचारांचे पक्के होते. आपण घेतलेल्या भूमिकेसाठी कोणतीही किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. किंबहुना आपण स्वीकारलेला मार्ग हा खडतर आहे, काट्याकुट्याचा आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. कटु असलेले सत्य मांडताना आडपडदा ठेवायचा नाही. सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करत नाही. सत्य थोडेही डायल्यूट न करता, तीव्रता कमी न करता थेट मांडणे हेच त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान होते.


कटु सत्य भेदकपणे मांडण्याची रामतीर्थकर शैली महाराष्ट्रातील सामान्य माणसाने सहज स्वीकारली. आपली मानली. पण, काही मतलबी बुद्धीजीवींनी आपल्या मनातील संकुचितता अपर्णाताईंना चिटकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अपर्णाताई या मध्ययुगीन मानसिकतेच्या समर्थक आहेत येथपासून ते त्या स्त्री जातीच्या शत्रू आहेत, येथपर्यंत अनेक आरोप होत राहिले. पण याच वेळी समाजाने त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं.
महिन्यातील किमान 25 ते 28 दिवस प्रवास करणे ही त्यांची दिनचर्याच बनून गेली होती. पायात जणू भिंगरी. अफाट जनसंपर्क. महाराष्ट्रातील गावोगावी आणि बहुतेक शहरांमध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले होते. त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍यांत शिवसेना, भाजपा, हिंदू जनजागरण समिती, विविध ज्ञाती संस्थांचे कार्यकर्त  होते. तसे काँग्रेस-राष्ट्रवादीचे पडद्यामागून आयोजन करणारे कार्यकर्तेही होते. मठ-मंदिरांचे विश्वस्त, महिला मंडळे, प्रगतशील शेतकरी असे विविध थरातील कार्यकर्त्यांसाठी अपर्णाताई दैवत बनल्या होत्या.  
सगळा प्रवास लाल डब्यातून (एसटीने). गडचिरोली आणि चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ मांडला होता. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. काही सभांना 30 ते 40 हजारांची उपस्थिती.
एखादी सामान्य स्त्री मनात जिद्द बाळगून पुढे आली तर ती असामान्य काम उभे करू शकते याचे अपर्णाताई या जीवंत उदाहरण. अपर्णाताई या मूळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या सुनीता यशवंत कुलकर्णी. पतीची नोकरी बदलल्याने पुण्याहून सोलापूरला आल्या. मुलाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरं शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचे वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या.
रोज व्याख्यान म्हटलं की मानधनही मिळणारच. त्या मानधन स्वीकारत, पण आपल्या 75 लेकरांच्या उदरनिर्वाहासाठी. मोहोळ (जि. सोलापूर) येथे पारधी समाजाची मुलं त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणली. दरमहा 60 हजार रुपयांचा खर्च व्याख्यानाच्या मानधनातून उभा करत.
कामाची गरज ओळखून त्यांनी आपले जीवन अनेक अंगांनी फुलवले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांच्या व्यक्तित्वाला त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचा पाया होता. जे काही करायचं ते समाजासाठी. आर्थिक स्थिती बेताची असतानाही जी निस्पृहता त्यांनी शेवटपर्यंत दाखवली त्याला तोड नाही. पैशाविषयीचा जो भाव श्री रामकृष्ण परमहंस यांच्या ठायी होता तोच भाव रामतीर्थकर दाम्पत्याने शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या अंगी असलेले धाडस यातूनच आले असावे.
अपर्णाताई यांचा सहवास मिळालेला प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबवत्सल आणि प्रेमळ स्वभावाने बांधला जात असे. खंबीर बोलणार्‍या अपर्णाताई मनाने खूपच हळव्या होत्या. सुलभ, सोप्या भाषेत लिहिणार्‍या अपर्णाताई सिद्धहस्त लेखिका होत्या. कुठे तरी चुकतंय हे दै. पुण्य नगरीतील साप्ताहिक सदर अनेक वर्षे महाराष्ट्रात गाजलं. दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्या पत्नींशी हितगुज करणारे सदरही पत्रकारितेतील त्यांचा अधिकार सांगणारे ठरले. मराठी माध्यम जगताला टीव्ही पत्रकारिता नवी होती तेव्हा अपर्णाताई यांनी वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीत मंथन नावाने प्रबोधन करणारी साप्हाहिक मालिका चालवली. प्रभावी वक्त्या म्हणून परिचित असलेल्या अपर्णाताई या हौशी कलावंत होत्या. नाट्य कलावंत म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.
नाटक, समाजसेवा, कायदा,  समुपदेशन असे कोणतेही क्षेत्र त्यांच्यासाठी वर्ज्य नव्हते. सोलापुरात पाखर संकुल आणि उद्योगवर्धिनी या संस्था नावारूपास आणण्यात अपर्णाताई यांचा वाटा सिंहाचा होता. या संस्थांनी हजारोंच्या संख्येने महिलांना स्वावलंबी बनवले. अंगी संघटन कौशल्य होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पु. भा. भावे हा मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांचे जीवन अनुकरणीय होते.  त्यांच्या व्याख्यानांवरून अनेकदा वादळ उठले तेव्हाही त्या अतिशय शांत होत्या. आपले संतुलन त्यांनी ढळू दिला नाही. सनातन संस्थेचे  संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यावर अपर्णाताई यांची श्रद्धा होती. अपर्णाताई यांचे जीवन हे एका तपस्विनीचे जीवन होते.

संघ गीताच्या पुढील ओळी त्यांना तंतोतंत लागू पडतात...
पतझड के झंझावातों में
जग के घातों प्रतिघातों में
सुरभी लुटाता सुमन सिहरता
निर्जनता में भी खिलता है
दिव्य ध्येय की ओर तपस्वी
जीवनभर अविचल चलता है.


तीन जिस्म मगर एक जान

Shubhangi Buwa, Aparna Ramtirthkar & Chandrika Chauhan

अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर, चंद्रिका चौहान आणि शुभांगी बुवा ही तीन नावे सोलापूरच्या सामाजिक विश्वात एकत्रितरीत्या घेतली जातात. सुमारे दोन तप म्हणजे 24 वर्षांहून अधिक काळ या तिघींनी पाखर संकुल, शुभराय मठ आणि उद्योगवर्धिनी या तिन्ही संस्था एकदिलाने नावारुपास आणल्या. कुटुंबपद्धती टिकून राहावी. देशभक्ती आणि हिंदुत्वाची भावना लोकांमध्ये रुजावी, ही तळमळ तिघींची समान प्रेरणा. या बाबतीत अपर्णाताई अगदी कट्टर होत्या. याबद्दल चंद्रिका चौहान म्हणतात, आम्ही तिघी खूप भांडत होतो. नंतर रडतही होतो. पण बाहेर समाजासमोर येताना आम्ही तिघी एकत्रच. तीन जिस्म मगर एक जान है हम, असे आम्ही गंमतीने म्हणत असू. बाबा म्हणजे अपर्णाताईंचे पती अरुण रामतीर्थकर बुद्धीवादी. मोठे विचारवंत. मी बायको, मला काही येत नाही. मी तर सामान्य गृहिणी, अशी अपर्णाताईंची भावना. शिक्षणही अर्धवट होतं. पण पतीकडून शिकण्याची जिद्द मात्र होती. पतीकडून सर्वकाही शिकल्या. पतीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पिंजून वैचारिक प्रबोधन करू लागल्या. बाबा गेले. ताई खचू लागल्या. मार्चच्या शेवटच्या दिवसांत पक्षाघाताने गाठलं. अपर्णाताई कालवश झाल्या. त्यामुळे तीन पैकी एक खांब निखळला.


अपर्णाताई यांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत
1. वृध्दाश्रमांमध्ये वाढ होतेय. घरगुती कलहामुळे कोर्टकचेर्‍या वाढताहेत. समाजाचं वास्तव चिंताजनक आहे. उच्च आणि प्रतिष्ठित पदावरील एका व्यक्तीची पत्नी (जी एम.एस्सी., बी.एड. शिकली आहे) घरी सासू-सासरे नको म्हणून माहेरी गेली. चार वर्षं परत आलीच नाही. शेवटी कुटुंब तुटलं. हे उदाहरण अपवाद नाही. किचन नका संस्कृती येऊ घातलीय. शीला की जवानी यासारख्या गाण्यावर आईच नाचते, अशी दृश्यंही पाहायला मिळताहेत. नात्यांमधला समजूतदारपणा, आदर कमी होतो आहे. त्यामुळेही घरं दुभंगताना दिसताहेत. तसंच, नाती जपताना संस्कार आणि धर्म याच्याशी फारकत घेतल्यास लव्ह जिहादला रोखणं अवघड आहे. त्यामुळे नाती जपत असताना स्वधर्माचं नेमकं ज्ञान, संस्कार याला पर्याय नाही.
2. लव्ह जिहादची वाढती विषवेल पाहता आणखी नियोजनबध्दरीत्या जागृती होण्याची गरज वाटते. हिंदू धर्मातून बाहेर जायला दरवाजे आहेत पण परतायला नाहीत, ही स्थितीही हळूहळू बदलतेय. लव्ह जिहादमधून सुटून आलेल्या मुलींशी लग्न करायला आम्ही तयार आहोत, असं सांगणारे तरुण पुढे येताहेत. अशा तीन मुलींची लग्ने करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हा शुभसंकेत वाटतो. याला चळवळीचे रूप यावं, असं वाटतं.


महत्वाचे लेख पुढील लिंकवर 
अपर्णा ताई यांनी स्वत:विषयी लिहिलेला लेख
 वादळाशी केला संसार 

लव जिहाद संबधी अपर्णा ताई यांची मुलाखत
लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई 

Tuesday, April 28, 2020

अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी 11.45 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.  पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.
मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. 2001पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.
महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्‍या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.

संन्यस्त जीवन जगणारी धाडसी गृहिणी


वादळाशी केला संसार 

लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई 

Tuesday, January 14, 2020

विवेकानंदांनी शिकागोत सांगितलेला विचारच आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुळाशी

ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशनात भाऊ तोरसेकर यांचे मत

ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशन
ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशन
पुणे । एकांतिक धर्मीयांच्या छळाला कंटाळून स्वत:चा धर्म आणि जीव वाचवण्यासाठी जगातील इतर देशातून पळून आलेल्या जीवांना ज्या देशाने सदैव आश्रय दिला त्या देशातून आल्याचे व त्या सहिष्णू हिंदू धर्माचा प्रतिनिधी असल्याचे स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात ठासून सांगितले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यातून तोच विचार नरेंद्र मोदी कृतीत आणत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी