Sunday, June 27, 2010

कायरोप्रॅक्टीक

अक्कलकोट- अक्कलकोट नगरीतील शिवपुरी आश्रमातर्फे दि. 25 जून ते 5 जुलै दरम्यान कायरोप्रॅक्टीक व आयुर्वेदिक सर्वरोग निदान, नेत्रचिकित्सा ई शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी अमेरिकेत कार्यरत असलेली थर्ड वर्ल्ड बेनिफिट ऑर्गनायझेशन शिवपुरी आश्रमाशी संलग्न असलेली ही संस्था आपले कायरोप्रॅक्टीक तज्ञ शिवपुरीमध्ये पाठवत आहेत. या सर्व थर्ड वर्ल्ड बेनिफिट ऑर्गनायझेशन व शिवपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भूकंपग्रस्त देश हैती, डोमीनिकल रिपब्लिकन घाना या सारख्या देशामध्ये कायरोप्रॅक्टीक कॅम्पस घेतले आहेत.
कायरोप्रॅक्टिक म्हणजे हाताने केला जाणारी उपचार पद्धती होय. अपघात व चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे, चालणे इत्यादीमुळे पाठीच्या मणक्यांचे संतुलन बिघडून त्यातून विविध अवयवांकडे जाणाऱ्या मज्जांततुवर दाब पडून तेथे वेदना व व्याधी निर्माण होतात. कायरोप्रॅक्टीकच्या तंत्राने कोणत्याही प्रकारचे औषध व शस्त्रक्रियेविना केवळ हाताने विशिष्ट प्रकारे दाब देऊन मणके पूर्वस्थितीत आणले जातात. अमेरिकेत या पद्धतीचा शास्त्रीय अभ्यासक्रम विकसीत झाला असून या उपचार पद्धतीने तिथे फार मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिले जाते.
शिवपुरी येथे यापूर्वी घेतलेल्या कायरोप्रॅक्टीक शिबिरामध्ये 25000 पेक्षा जास्त रुग्णांनी या चिकित्सा पद्धतीचा लाभ घेतलेला आहे. अर्धांगवायू, संधीवात, पाठीचे व मणक्याचे विकार, फ्रोझन शोल्डर्स, कंबर दुखी, मान दुखी व शरीराचे अवयव पांगळे झालेल्या अशा रुग्णांना मुख्यत: या शिबिराचा लाभ यापूर्वी झालेला आहे. अक्कलकोट परिसरातून सोलापूर, विजापूर, बीदर, लातूर, तसेच थेट हैदराबाद,मुंबई, नागपूरहून देखील रुग्ण आले होते.
यावर्षीच्या शिबिराचे वेगळेपण असे आहे की, शिवपुरीमध्ये 25 जून ते 5 जुलै या कालावधीत होणाऱ्या शिबिरामध्ये एकाच ठिकाणी कायरोप्रॅक्टीक चिकित्सा, आयुर्वेद चिकित्सा व नेत्रचिकित्सा या सर्व चिकित्सा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांना व नातेवाईकांना न्युट्रीशन, व्यायाम, आहार व स्वच्छता, पोषक तत्वे, पर्यावरण याविषयी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरादरम्यान आलेल्या रुग्णांना व नातेवाईकांना अन्नदानाची मोफत सोय शिवपुरी आश्रमाद्वारे करण्यात आली आहे. या शिबिरासाठीची नावनोंदणी फोनवर करण्याची सुविधा यावर्षी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गरजू व रुग्णांनी 8806699388 फोनवर दि. 18 जूनपासून सकाळी 10 ते सायं. 5 या कालावधीतच फोन करावा व आपले नाव नोंदवावे, असे आवाहन शिवपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी