Tuesday, September 13, 2011

सर्व कार्येषु सर्वदा..


दैनिक लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला एक अग्रलेख खूप आवडला, तो येथे देत आहे.... तुम्हालाही आवडेल असे वाटते...



समाजासाठी पैसा देण्याची वृत्ती श्रीमंतांमध्ये कमी का दिसतेहातातील चतकोर भाकर गरीब जितक्या सहजतेने पुढे करतो तसे श्रीमंत का करीत नाहीत? या प्रश्नांचा मानसशास्त्रातून शोध घेण्यास सुरुवात झाली ती एका श्रीमंताच्या साध्या सूचनेमुळे आणि या सूचनेवर होणाऱ्या टीकेमुळे. 'श्रीमंतांचे कौतुक करणे थांबवा. आमच्यावर अधिक कर बसवा. समाजाच्या आर्थिक समृद्धीसाठी हे आवश्यक आहे', अशी मागणी सरकारकडे केली ती श्रीमंतीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वॉरेन बफे यांनी. 'न्यूयॉर्क टाइम्स'मधील त्यांचा लेख खळबळजनक ठरला. अधिक श्रीमंत कसे व्हावे हा सल्ला देण्याऐवजी हा माणूस सामाजिक न्यायाची भाषा कशी काय बोलतो, असा प्रश्न धनवंतांना पडला. बफेंची सूचना अस्वस्थ करणारी असली तरी सहानुभूतीची बुद्धी श्रीमंताने बाळगावी का, हा प्रश्न होता. सध्या अमेरिकेत मंदी आहे. लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. अनेकांची हातातोंडाशी जेमतेम गाठ पडते आहे. मंदी हटविण्यासाठी सरकारला अनेक कल्याणकारी कार्यक्रम हाती घ्यावे लागणार. त्यासाठी पैसा हवा. पण सरकारच कर्जबाजारी झालेले. गेली काही वर्षे अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी अमेरिकेसह जगात सर्वत्र कर कमी होत गेले. त्यातून अर्थव्यवस्थेला गती आली तरी अनेक गैरव्यवहारांमुळे आणि श्रीमंतांच्या अप्पलपोटय़ा व्यवहारामुळे नंतर मंदीचा काळ आला. त्यातून बाहेर पडण्यासाठी 'सर्वानीच त्याग करावा' असे आवाहन ओबामा यांनी केले. ओबामांचे आवाहन ऐकून बफे यांनी खतावणी उघडली असता मध्यमवर्गापेक्षा आपण कमी कर भरतो असे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याच कंपनीतील कारकुनापेक्षा त्यांच्या कराची टक्केवारी कमी होती. बफे यांनी केलेला करभरणा काही कोटी डॉलर्सचा आहे तर कारकुनाचा काहीशे डॉलर्स. परंतु दोघांच्या उत्पन्नाची तुलना केली तर बफे यांना खूपच कमी कर बसतो. अन्य श्रीमंतांची हिशेब तपासणी करता बफे यांना हीच वस्तुस्थिती आढळली. सर्वानीच जर सारखा त्याग करायचा असेल तर गरीब व मध्यमवर्गाप्रमाणे आपल्यावर कर लावा, असे आवाहन बफे यांनी केले. ओबामांचे आवाहन खरे तर बफेंना लागू नव्हते. कारण त्यांनी आपली ८० टक्के संपत्ती याआधीच दान केली आहे. तरी उरलेल्या २० टक्क्यांवर जबर कर लावा अशी मागणी त्यांनी केली. बफे यांची योजना अमलात आणली तर सरकारी तिजोरीत सुमारे ५०० अब्ज डॉलर्सची भर पडेल. बफेंच्या सूचनेचे मध्यमवर्गातून स्वागत झाले तर धनाढय़ उद्योगपतींनी टीकेचे आसूड ओढले. करच भरायचा असेल तर नफा मिळवायचा कशाला? कर वाढवाल तर गुंतवणूक होणार नाही. मग रोजगार बुडेल व सामाजिक अस्वास्थ्य वाढेल असे युक्तिवाद सुरू झाले. बफे यांनी लेखातच याला प्रत्युत्तर दिले होते. कर जास्त असतानाही गुंतवणूक कमी झाली नव्हती. उलट सर्वाधिक कर असताना अधिक रोजगार होता व करसवलती दिल्यावर तो कमी होत गेला, हे त्यांनी दाखवून दिले. जास्त कर लादल्यास श्रीमंतांमध्ये कामाचा उत्साह राहणार नाही हा दावा अर्थतज्ज्ञ जेरल्ड बर्नस्टाईन यांनी खोडून काढला. गरिबांना सवलती देण्याच्या विरोधात श्रीमंत असतात. अशा सवलती गरिबांना कामचुकार करतात. श्रमांचे मूल्य त्यांना कळत नाही. सवलती रद्द केल्यास कामगार अधिक काम करतील, असा युक्तिवाद श्रीमंतांकडून केला जातो. मात्र हेच श्रीमंत स्वतबाबत उलटा युक्तिवाद करून करसवलतीशिवाय काम होणार नाही असे म्हणत असतील तर 'वर्क एथिक्स' गेले कुठे, असा बर्नस्टाईन यांचा सवाल आहे. त्याचा प्रतिवाद श्रीमंतांना करता आलेला नाही. यातून 'इकॉनॉमिक फेअरनेस' म्हणजेच आर्थिक वाजवीपणाचा  मुद्दा येतो. पेनसिल्वानिया विश्वविद्यालयातील मानसशास्त्राचे प्राध्यापक जॉन जॉन्सन यांनी याचा ऊहापोह केला आहे. स्पर्धेत सर्वाना समान न्याय लावला पाहिजे. परंतु स्पर्धा सुरू होताना प्रत्येकाचा आर्थिक, सामाजिक व मुख्यत: जैविक स्तर वेगळा असतो याकडे दुर्लक्ष होते. बुद्धिमत्ता, कल्पकता, स्वयंशिस्त हे गुण एखाद्याला जन्मजात साधलेले असतात तर आळस, चंचलता, मंदबुद्धी अशा दोषांसकट एखाद्याच्या आयुष्याची सुरुवात होते. स्पर्धक असमान असताना स्पर्धेत वाजवीपणा आणणार कसा? मात्र बहुसंख्य श्रीमंतांना तसे वाटत नाही असा जगाचा अनुभव आहे. असे का होते हे पाहण्याचा प्रयत्न डॅशन केल्टनर या मानसशास्त्रज्ञाने 'सोशल क्लास अ‍ॅज कल्चर' या शोधनिबंधात केला आहे. समाजामुळे नव्हे तर अंगभूत गुणामुळे आपल्याला वैभव मिळाले असे प्रत्येक श्रीमंताला वाटते. अंगभूत गुणांना समाजातील अनेक गोष्टींची साथ मिळालेली असते हे त्याच्या लक्षात येत नाही. कुणालाच एकटय़ाने श्रीमंत होता येत नाही. तरीही स्वतच्या कर्तृत्वामुळे सर्व साध्य झाले या मिजाशीत तो असतो. त्याला मिळणारी मदत ही अप्रत्यक्ष असल्याने जगाशी जोडले गेल्याची भावना त्याच्या मनात येत नाही. आपण किती टॅक्स भरला हे कोणताही श्रीमंत चटकन सांगतो, पण त्याला मिळणाऱ्या सुखसोयींसाठी सरकारने किती खर्च केला या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नसते. गरिबांचे जग याउलट असते. गरिबांचे रोजचे जीवन हे शेजाऱ्यांच्या थेट मदतीवर अवलंबून असते. चाळीतील आत्मीयता फ्लॅटमध्ये मिळत नसल्याचा अनुभव अनेकांना येतो त्यामागे हे कारण आहे. दुसऱ्याबद्दल आत्मीयता निर्माण करणारी शरीरातील विशिष्ट मज्जा ही गरिबांमध्ये अधिक सक्रिय असते. तुलनेत श्रीमंतामध्ये ती क्रियाशील होत नाही किंवा स्वार्थामुळे तिच्यातील जिवंतपणा कमी झालेला असतो असे केल्टनर यांना मज्जासंस्थेच्या अभ्यासात आढळले. एखाद्या छायाचित्राला प्रतिसाद देण्याची पद्धत ही आर्थिक स्तरानुसार बदलत जाते, असेही त्यांनी दाखविले. यातील इतरांशी स्वत:ला जोडण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण समाजाचा एक भाग आहोत ही जाणीव वाढली की समाजासाठी काही देण्याची ऊर्मी येते. गुणसंपन्न माणसांनी कमी गुण असलेल्या माणसांना मदत केली तर बुद्धिमत्ता, कल्पकता, स्वयंशिस्त हे गुण वाढविता येतात, असे जॉन्सन सांगतात. सरकारी योजना येथे उपयोगी पडतात व त्यासाठी श्रीमंतांनी थोडी अधिक रक्कम द्यावी, अशी अपेक्षा असते. समाजातील अधिकाधिक लोक समृद्ध होण्यात आपलेही हित आहे, हा 'शहाणा स्वार्थ' श्रीमंतांनी बाळगावा असे बफे सांगतात. त्यांच्या शहाण्या स्वार्थाला युरोपातून प्रतिसाद मिळाला. देशावरील कर्जाचा बोजा उचलण्यासाठी गरिबांपेक्षा श्रीमंतांनी अधिक पुढाकार घेतला पाहिजे असे १५ फ्रेन्च उद्योगपतींनी म्हटले. फेरारी मोटारी तयार करणाऱ्या लुका मॉन्टेझेमोलोने बफेंना पाठिंबा दिला. 'समाजाबरोबर स्वत:ला जोडण्यासाठी जास्त कर द्या, असे मॉन्टेझेमोलो म्हणतो. सरकारच्या कपातीचा सर्वात जास्त फटका गरिबांना बसतो. म्हणून त्यांच्यावर कपात लादण्याऐवजी आमच्यावर अधिक कर बसवा अशी मागणी करणारी 'इनिशिएटिव्ह ऑफ वेल्थि फॉर वेल्थ टॅक्स' ही चळवळ जर्मनीत सुरू झाली. ब्रिटन मात्र जमीनदारी युगात आहे. 'आमच्याकडील बफे कोठे आहेत', असा सवाल अनॉर्ड टायन्बी या नामवंत स्तंभलेखकाने 'गार्डियन' दैनिकातून केला. त्याला उत्तर मिळालेले नाही. भारतात दानशूरांची कमी नाही. पण सामाजिक कार्यापेक्षा धार्मिक कार्याला सहज दान दिले जाते. दानाचा हा 'फोकस' भारतातील श्रीमंतांनीच नव्हे तर उच्च मध्यमवर्गानेही बदलण्याची आवश्यकता आहे. याच हेतूने 'लोकसत्ता'ने समाजबांधणीच्या निरनिराळ्या क्षेत्रांत निरलसपणे काम करणाऱ्या संस्थांचा परिचय गणेशोत्सवात करून दिला. गणेश भक्तांनी अशा संस्थांना मदत करावी ही अपेक्षाही त्यामागे होती. सर्वाना वॉरेन बफेंप्रमाणे भरघोस दान करता येणार नसले तरी खुलभर दुधानेही शंकर प्रसन्न होतो ही कहाणी आपल्या समाजात रुजली आहे. दुधाच्या कोटय़वधी वाटय़ा पुढे झाल्या तर सामाजिक कार्याचे अभिषेकपात्र ओसंडून वाहण्यास वेळ लागणार नाही. देवाला ओढ आहे ती अशा भक्तांची जे शिवभावाने जीवसेवा करण्यासाठी प्रत्येक कार्यातला आपला वाटा यथाशक्ती उचलण्यासाठी पुढे सरसावतात. अशा भक्तांच्या कार्यातील विघ्ने दूर करण्यासाठी तो विघ्नहर्ता सर्वदा उभाच असतो!

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181280:2011-09-09-16-35-13&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

शनिवार, १० सप्टेंबर २०११ , दै. लोकसत्ता, अग्रलेख


No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी