Thursday, November 10, 2011

'देऊळ' पाहून मनात आलेले काही प्रश्न

हिंदू विचारांवर श्रद्धा असलेला मी एक कार्यकर्ता आहे. अन्य धर्म जन्मास येण्यापूर्वीही हिंदू धर्म अस्तित्वात होता. तेव्हा या धर्माला सनातन धर्म म्हणत. जगातील अन्य भागातील लोकांना कपडे घालायचीही बुद्धी नव्हती तेव्हा या भारत देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती.
नंतर काळाच्या ओघात आपल्या जीवनपद्धतीत अनेक दोष येत गेले आणि अवनती होत गेली. असे असले तरी हिंदू धर्म हा विकसित होत जाणारा धर्म आहे. विज्ञानाशी सुसंगत आहे. हिंदू धर्मात शिरलेल्या वाईट गोष्टी दूर करून हिंदूंचे प्रबळ संघटन करणे हे हिंदू संघटनांचे कार्य आहे. अशाच एका संघटनेच्या माध्यमातून काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.
हिंदू संघटनेचा कार्यकर्ता म्हणजे तो असहिष्णूच असला पाहिजे, अशी एक समज पसरलेली आहे. स्वत:ला सेक्युलरवादी म्हणविणारे नेहमीच या समजाला चलाखीने खतपाणी घालतात आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये हा समज पक्का होत जातो. या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीसारखी एखादी हिंदू संघटना देऊळसारख्या चित्रपाटील गाण्याला विरोध करण्यास सरसावते तेव्हा सर्वसामान्य हिंदूच नव्हे तर अन्य छोट्या-मोठ्या हिंदू संघटनांचे कार्यकर्तेही संभ्रमित होतात.
देऊळ चित्रपटाचे दिग्दर्शन अतिशय सशक्त आहे. कलाकारांनी अतिशय कसदार भूमिका केली आहे. त्यामुळे चित्रपट मनाचा ठाव घेतो. पण म्हणून हिंदू जनजागृती समितीचा विरोध गैर ठरतो काय, हा मला पडलेला प्रश्न आहे.
चित्रपटातील एका गाण्याला विरोध करणारी हिंदू जनजागृती समिती काय काम करते, हे पाहणे येथे गरजेचे वाटते. गेल्याच महिन्यातली एक बातमी आहे. ही बातमी देशातील सर्वाधिक खप असणा-या दै. भास्करमध्ये प्रसिद्ध झाली होती. देशात फायनान्स क्षेत्रात काम करणा-या मुथूट फायनान्स अ‍ँड गोल्ड लोन या कंपनीने १७ मार्च २०११ रोजी एक आदेश जरी केला होता. कंपनीचे सेक्रेटरी शाईनी थॉमस यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते की, महिला आपल्या बोटात केवळ वेडिंग रिंग घालू शकतील. महिलांना मंगळसूत्र किंवा कानातले अलंकार घालता येणार नाही. पुरुष कर्मचारी घड्याळ घालू शकतील, गळ्यात चेन आणि बोटात अंगठी घालू शकतील मात्र कपाळावर गंध लावू शकणार नाहीत. मनगटावर रक्षाबंधनाच्या दुस-या दिवशी राखीही घालू शकणार नाही. जगात ख्रिश्चन धर्म हाच एकमेव धर्म आहे, असे वाटणा-या लोकांकडून असा आदेश काढण्यात आला होता. याविरुद्ध हिंदू जनजागृती समितीने लोकशाही मार्गाने आवाज उठवला आणि संबंधित कंपनीने माफी मागून हिंदूंचा अपमान करणारा आदेश मागे घेतला.
हिंदू देव देवतांची आणि भारतमातेची नग्न चित्रे काढणा-या एम एफ हुसेनच्या विरोधातही लोकशाही मार्गाने लढा देऊन देशभरात हजारो पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. हुसेनने शेवटी या देशातून पळ काढणे पसंद केले.
आपल्या भाषणांतून हिंदू धर्माची हेटाळणी करणे, हिंदू देव-देवतांचा अवमान करणे सर्रास सुरू होते. हिंदू जनजागृती समितीमुळे अलीकडच्या काळात या प्रकाराला आळा बसला आहे. गणेशोत्सव आणि अन्य उत्सवांमध्ये चालणारे गैरप्रकार थांबविण्यात या संघटनेने मोलाची कामगिरी बजावली आहे. हिंदू धर्मच खरा धर्म आहे अणि इतर धर्म खोटे आहेत आणि ते नष्ट केले पाहिजेत अशी भूमिका या संघटनेने कधीच घेतली नाही, कारण तशी हिंदू धर्माची शिकवण नाही. आकाशातून पडणारे पाणी शेवटी सागराला जाऊन मिळते, तद्वत तुम्ही कोणत्याही देवाची पूजा केली तरी ती एकाच ईश्वराला जाऊन मिळते ही हिंदू संस्कृतीची शिकवण आहे. परंतु अन्य काही धर्म हिंदू धर्माचे लचके तोडण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. कधी धर्मांतरण करतात तर कधी जिहादच्या नावाखाली शिरकाण करतात. जगात आमचाच धर्म एकमेव सत्य धर्म आहे आणि अन्य धर्मियांना आपल्या धर्मात ओढले पाहिजे, ही त्यांची समजूत असते. त्या समजूतीपोटी ते विविध उपदव्याप करीत असतात. या कारवायांना पायबंद घालण्याचे काम ही संघटना यथाशक्ती करीत असते.
परंतु हिंदू शब्द उच्चारले तरी हा शब्द इतर धर्माच्या विरोधात आहे असा गंड बाळगणारे ही बाब कशा रीतीने समजून घेतील. आपल्या मुलाने घरी व्यायाम करू नये कारण व्यायाम करणे म्हणजे शेजारच्या माणसाचा द्वेष केल्यासारखे होईल असा विचार करणे जसे मूर्खपणाचे आहे, तसेच हिंदूंनी संघटना बांधणे म्हणजे ते अन्य धर्मियांच्या विरोधात आहेत, असे समजणेही मूर्खपणाचेच. हिंदू धर्म सोडून इतर सर्वच धर्म धर्मांतरावर विश्वास ठेवतात. कारण माझाच धर्म खरा अशी त्यांची भावना असते. हिंदू धर्म सहिष्णू आहे म्हणजे या धर्मीयांनी अन्यायही मुकाट्याने सहन केला पाहिजे असा भ्रम हिंदू धर्मावर श्रद्धा नसलेल्या बुद्धिवाद्यांनी पसरवलेला आहे.
या ठिकाणी आयबीएन लोकमतवर नुकतीच  झालेली चर्चा आठवते. 'देऊळ'ला विरोध का, या विषयावर चर्चा होती. चर्चेत सहभागी झालेले बुद्धीवादी सांगण्याचा प्रयत्न करीत होते की, देऊळला विरोध म्हणजे हिंदू धर्म असहिष्णू होत असल्याचे दिसते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी समर्पक उदाहरण दिले. नोव्हेंबर २०११ च्या पहिल्या आठवड्यात युरोपातील एका देशात एका वृत्तपत्राने महंमद पैगंबर यांच्यावर टिपण्णी केली. दुस-या दिवशी तेथील मुस्लिम जमावाने ते वृत्तपत्र कार्यालय जाळून टाकले. हे उदाहरण देऊन शिंदे म्हणाले की, आमची संघटना लोकशाही मार्गाने विरोध करते त्याला तुम्ही असहिष्णू म्हणणार का ?
हिंदू धर्मीय सहिष्णू आहेत. परंतु एक हजार वर्षांच्या गुलामीमुळे आणि सेक्युलरवादाच्या भ्रमामुळे अनेक बुद्धीजीवींची अवस्था गांडूळासारखी कणाहीन झाली आहे. मान-अपमान यातील फरकही त्याला कळेनासे झाले आहे. भारतमाता, देवी सरस्वतीची नग्न चित्रे काढली तरी त्याला ती अपमान न वाटता कला वाटते. गोरगरीब, दु:खी हिंदूंना पाहून त्याचे हृदय कळवळत नाही. अन्यधर्मीय लोक हिंदूंचे फसवून धर्मांतर करतात, हे पाहून यांचे रक्त सळसळत नाही. त्यामुळे भगवान श्री दत्तात्रेय यांचा आयटम सॉंगच्या तालावर वापर झाल्यानंतर ते अपमान वाटेल असे कसे शक्य आहे ? 'देवा तुला शोधू कुठं' या भजनात अनावश्यक प्रणयसदृश्य कामुक दृश्ये पाहून भावना दुखावतील याची शक्यताच नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरून निदर्शने करण्याचीही शक्यता कमी आहे. परंतु ज्यांच्या भावना अद्याप बोथट झालेल्या नाहीत, ज्यांच्या मनात धर्मप्रेमाची आग धगधगते आहे, ज्यांनी वैयक्तीक स्वार्थापलीकडे जाऊन  आपल्या दिनक्रमातील अधिकाधिक वेळ धर्मकार्यासाठी दिले आहे अशा हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना त्या गाण्याला विरोध करण्याचा नैतिक अधिकार आहेच. ते इतरांसारखे आत्मविस्मृत नाहीत हा काय त्यांचा दोष आहे ? भगवान दत्तात्रेय यांचा आयटम सॉंगमध्ये वापर होऊ नये यासाठी लोकशाही मार्गाने विरोध करणे ही त्यांची चूक आहे काय ?

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी