Friday, December 16, 2011

केवळ ३००० बहादूर जवानांनी जिंकले होते पूर्व पाकिस्तान

1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यातून जगाच्या नकाशावर बांगला देश या नव्या देशाची निर्मिती हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरांनी लिहिलेला अध्याय आहे. या युद्धाचे भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण जगाचा सार्वभौम सम्राट होण्याचे स्वप्न पाहणार्‍या सिकंदराचा सरसेनापती सेल्यूकसचा पराभव इ.स. पूर्व 303 मध्ये चंद्रगुप्त मौर्यांनी केला होता. भारत खंडावर परकीयांनी केलेल्या आक्रमणाचा संपूर्ण बीमोड करणारा गेल्या अडीच हजार वर्षांतील हा पहिला विजय म्हणून नोंदवला गेला.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-india--bangladesh-divya-marathi-special-2644388.html?HT1=


त्यानंतर दुसरी नोंद 16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या निर्णायक विजयाची आहे. या युद्धामध्ये ज्या अनेक वीरांनी अगदी तरुण वयात देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले त्यांचा त्याग तर महान आहेच; पण ज्या माता-पित्यांनी आपल्या काळजाचा तुकडा, बहिणींनी आपला प्रिय भाऊ, पत्नींनी आपला तरुण पती देशासाठी दिला त्यांच्या त्यागालाही सीमा नाही. आज 16 डिसेंबर 2011 रोजी या युद्धाचा 41 वा विजय दिवस साजरा होत आहे. मातृभूमीसाठी शहीद झालेल्या त्या सर्व शूरवीरांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या असीम त्यागाला कोटी कोटी प्रणाम.
14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री जन्मलेल्या पाकिस्तानचे भौगोलिक रचनेमुळे पूर्वपाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग झाले होते. लोकसंख्येच्या दृष्टीने पूर्व पाकिस्तान मोठा होता, पण अनेक बाबीत राजकीय नेत्यांची पूर्वपाकिस्तानशी असलेली वागणूक सापत्नभावाची होती. पूर्व पाकिस्तानी जनतेने जवळपास 23 वष्रे हा भेदभाव सहन केला, पण 1970 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर परिस्थिती बदलत गेली.
या निवडणुकीत अवामी लीगने पूर्वपाकिस्तानातील 169 पैकी 167 जागा जिंकत 313 सदस्य संख्या असलेल्या पाकिस्तानी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बहुमत प्राप्त केले होते. अवामी लीगचे प्रमुख शेख मुजीब र्उ रहमान यांनी तत्कालीन राष्ट्रपती याह्या खान यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र पाकिस्तानची सत्तासूत्रे मुजीब र्उ यांच्याकडे सोपवण्यास पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख जुल्फिखार अली भुट्टो यांचा तीव्र विरोध असल्याने, याह्या खान यांनी लष्कराला पाचारण केले व पूर्वपाकिस्तानातून केले जाणारे सत्तास्थापनेचे दावे मोडून काढण्यास सुरुवात झाली. राजकीय नेत्यांची अटकसत्रे सुरू झाली. अनेक दिवस चाललेल्या आंदोलनानंतर पाकिस्तानी लष्कराने 25 मार्च 1971 च्या रात्री ढाका शहर ताब्यात घेतले. अवामी लीगचे प्रमुख मुजीब र्उ रहेमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले. लीगच्या अन्य नेत्यांनी पूर्वपाकिस्तान लगतच्या भारतीय राज्यांमध्ये आर्शय घेतला. पाकिस्तानी लष्करातील झिया र्उ रहेमान या अधिकार्‍याने 27 मार्च 1971 ला मुजीब र्उ यांच्या वतीने स्वतंत्र बांगलादेशची घोषणा केली.
या क्रांतीचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानातील जनतेला प्रामुख्याने बंगाली जनतेला लक्ष्य केले व जीव वाचवण्यासाठी लाखो लोकांचे लोंढे भारतात आर्शयाला येऊ लागले. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सीमावर्ती राज्यांमधून निर्वासितांसाठी छावण्या उभारल्या. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा प्रचंड ताण पडू लागला. पूर्व व पश्चिम पाकिस्तानमधील हा तणाव दूर व्हावा यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक आवाहने केली, परंतु त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 27 मार्च 1971 या दिवशी पूर्वपाकिस्तानच्या स्वातंत्र्यलढय़ाला भारत सरकारचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला. फक्त पूर्वपाकिस्तानातून येणार्‍या निर्वासितांना आर्शय देत राहण्याऐवजी थेट लष्करी कारवाई करून पाकिस्तानी लष्कराचा बीमोड करण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतातील नेतेमंडळींनी घेतला. पूर्वपाकिस्तानातून भारतात आर्शयाला आलेले लष्करी अधिकारी व भारतीय गुप्तचर यंत्रणेने तत्काळ एक विशिष्ट मोहीम हाती घेतली व निर्वासितांच्या सर्व छावण्यांना मुक्ती वाहिनीच्या लष्करी प्रशिक्षण केंद्राचे स्वरूप मिळाले.
भारताच्या या भूमिकेमुळे पश्चिम पाकिस्तानात भारतविरोधी वारे वाहू लागले. 1971 च्या सप्टेंबर महिन्यात तर पाकिस्तानच्या मुख्य शहरांमधून धावणार्‍या अनेक वाहनांवर भारतविरोधी घोषवाक्ये लिहिलेली स्टिकर्स झळकत होती अन् पुढच्या दोन महिन्यांतच 23 नोव्हेंबरला पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती याह्या खान यांनी पाकिस्तानी जनतेला युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. असे असले तरीही भारतीय सैन्याला आक्रमण न करता वाट पाहण्याचे आदेश देण्यात आले होते. पाक सीमेवर तैनात प्रत्येक भारतीय जवान डोळ्यात तेल घालून, पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो दिवस उजाडला. रविवार, 3 डिसेंबर 1971 ला संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी पाकिस्तानी विमानांनी 'ऑपरेशन चंगेझ खान' या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुदलाच्या 11 विमानतळांवर हल्ला केला. सुमारे 50 विमानांनी केलेल्या या हल्ल्याला भारतीय वायुदलाने चोख प्रत्युत्तर दिले, अन् 1971 च्या भारत पाक युद्धाला तोंड फुटले.
पुढचे 13 दिवस तोफा धडधडत होत्या, विमाने घोंगावत होती व भारतीय फौजा पूर्वपाकिस्तानात मुसंडी मारून ढाक्याच्या दिशेने आगेकूच करत होत्या. जनरल सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वात पायदळ, अँडमिरल एस. एम. नंदा यांच्या नेतृत्वात नौदल व एअर चीफ मार्शल प्रताप लाल यांच्या नेतृत्वात वायुदलाने पाकिस्तानी आक्रमणाला सडेतोड उत्तर दिले. अखेर 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए. ए. के. नियाझीने शरणागती पत्करली. त्यावेळी नियाझीसह सुमारे 79 हजार 700 पाकिस्तानी सैनिक, निमलष्करी दल, साडेबारा हजाराहून अधिक नागरिक असे सुमारे 93 हजार लोक भारताचे युद्धकैदी होते. नियाझीने करारावर सही केली, भारताने युद्धकैदी सोडले, अन् युद्ध संपले.
भारताने आंतरराष्ट्रीय दबाव न जुमानता पूर्वपाकिस्तानला केलेल्या मदतीमुळेच जगाच्या नकाशावर बांगलादेशाची निर्मिती झाली. शेख मुजीब र्उ रहमान यांनी ढाक्यात विजयोत्सवाचे आयोजन केले. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. या समारंभात शेख रहमान यांनी भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय शौर्याचे प्रतीक म्हणून एक युद्ध स्मारक उभारण्याचा आपला विचार बोलून दाखवला. इंदिरा गांधींनी मात्र त्यास नकार दिला. युद्धातून उभ्या राहिलेल्या देशाने आपल्या र्मयादित संसाधनांचा असा वापर करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. शिवाय 1971 च्या या युद्धाची ओळख भारत-पाक युद्ध म्हणून न होता, 'बांगलादेशाचा स्वातंत्र्यलढा' म्हणून हे युद्ध ओळखले जावे अशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची इच्छा होती.
विजयाचे शिल्पकार- दुसर्‍या महायुद्धासह पाच मोठय़ा युद्धांमध्ये पराक्रम गाजवणारे फिल्ड मार्शल सॅम 'बहादूर' माणेक शॉ हे खर्‍या अर्थाने 1971 च्या भारत-पाक युद्धाचे शिल्पकार होते. पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींची युद्धात जी भूमिका होती तीच भूमिका फिल्ड मार्शल युद्धभूमीवर बजावत होते.
मुक्ती वाहिनी- पूर्व पाकिस्तानातील सर्वसामान्य जनतेने पुकारलेल्या चळवळीत पाकिस्तानी लष्करातील बंडखोर अधिकारी व सैनिक सहभागी होते. 1971च्या युद्धात भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखालील मित्र वाहिनीला या मुक्ती वाहिनीने सहकार्य केले.
'लोंगिवाला': विजयाची नांदी- भारत पाक सीमेवर राजस्थानच्या रणात असलेल्या लोंगिवाला या चौकीवर पाकिस्तानने 4 डिसेंबर 1971च्या संध्याकाळी हल्ला चढवला. 65 रणगाडे व 2800 सैनिकांनी चढवलेला हा हल्ला, भारतीय तुकडीचे मेजर कुलदीपसिंग यांनी अवघ्या 120 जवानांच्या साथीने दुसर्‍या दिवशी सकाळी वायुदलाची मदत मिळेपर्यंत थोपवून धरला. वायुदलाने प्रतिहल्ला चढवताच पाक सैनिकांनी पळ काढला. 1971 च्या युद्धात तिसर्‍याच दिवशी मिळालेला हा विजय भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.
लष्करी बलाबल- 3,65000 सैनिकांच्या बळावर पाकिस्तानने हे युद्ध पुकारले होते. भारतीय सैन्य व मुक्तीवाहिनी असे मिळून सुमारे 5 लाख सैनिक या युद्धात लढत होते. भारताचे 4 हजार जवान या युद्धात शहीद झाले तर पाकिस्तानच्या 10 हजार सैनिकांना भारतीय फौजेने कंठस्नान घातले.
आयएनएस विक्रांत- 1971च्या युद्धात भारताच्या पूर्व किनार्‍यावर होणार्‍या संभाव्य हल्ल्याचा बीमोड करण्यासाठी आयएनएस ही विमानवाहू युद्धनौका बंगालच्या उपसागरात तैनात केली होती. यावरील लढाऊ विमानांनी शत्रूच्या पूर्व पाकिस्तानातील लष्करी छावण्या उद्ध्वस्त केल्या. या युद्धनौकेवर ताबा मिळवण्याचा पाकचा डाव होता, पण त्याची पीएनएस गाझी ही पाणबुडी विशाखापट्टणम्जवळ समुद्रात बुडवून भारतीय लष्कराने पाकच्या मनसुब्यांवर अक्षरश: पाणी फिरवले.
जीवितहानी - 2,69,000 बांगलादेशी नागरिकांचे पाकिस्तानने शिरकाण केले. विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर या वर्गातील नागरिकांना पाक फौजांनी लक्ष्य केले.
1 कोटी बांगलादेशी नागरिकांनी जिवाच्या भीतीने भारतात आर्शय घेतला होता.
..आणि युद्धाला तोंड फुटले ( कॅप्टन सुरेंद्र सुर्वे )
युद्धसराव आणि प्रत्यक्ष युद्ध यात फरक असतोच. कारण आता सामना खर्‍या शत्रूशी करायचा होता आणि वापर खर्‍या बंदुकीच्या गोळ्यांचा आणि खर्‍या बाँबचा होणार होता. इथे थोड्याशा चुकीलाही क्षमा नसतेच. रणांगणावर एकच गोष्ट पाहायला मिळते आणि ती म्हणजे मृत्यूचे साक्षात तांडव. आतापर्यंत तोफांचे फायरिंग खूप वेळा केले होते आणि तोफा फायर करताना कानांचे पडदे फाटतील असे छाती दडपवणारे आवाज ऐकायची चांगलीच सवय झाली होती; पण तोफांनी फायर केलेले बाँब जेथे पडतात त्या टार्गेटच्या टोकाशी राहायचा आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग.
हवा कापत येणार्‍या बाँबचा आवाज काही क्षण आधी येतो. तो आवाज म्हणजे साक्षात मृत्यूची नांदीच असते. पडणार्‍या प्रत्येक बाँबच्या उडणार्‍या शेकडो ठिकर्‍यांवर स्वार असतो मृत्यू. शेलच्या प्रचंड स्फोटानंतर उष्णतेने लालबुंद झालेल्या उडणार्‍या शेकडो तुकड्यांचा हवेला चिरत जाणार आवाजसुद्धा जिवाचा थरकाप उडवणारा, अंगावर काटा आणणारा असतो. या तुकड्यांनी जर तुमच्या शरीरात प्रवेश केला नसेल तर ते सांगतात की, मृत्यू किती अंतरावरून गेला-इंचावरून गेला की फुटावरून.
काही वेळा पटकन काही कळतसुद्धा नाही कारण झालेली घटना पापणी लवायच्या आतच घडून जाते. सहज खिशातून रूमाल काढायला जावं तर ते जमतच नाही कारण खांद्यापासून हातच गायब झालेला असतो. तो कुठेतरी मागे जाऊन पडलेला असतो. अशा वेळी पटकन विश्वासच बसत नाही की तो हात आपलाच असेल.
घड्याळाचे काटे पुढे पळतच होते. पाकिस्तानच्या तोफा क्षणाचीही उसंत न घेता आमच्यावर आग ओकत होत्या. सरते शेवटी ऑर्डर आली..
माझ्या कमांडपोस्टमधून सबंध गन परिसरात आवाज घुमला..
'बॅटरी टार्गेट..!'
सगळ्या तोफांवरील मरगळ एकदम दूर पळाली आणि गन परिसरातील जवानांच्या अंगातून वीज सळसळली.
प्रचंड तणावाचा क्षण होता तो. आंतरराष्ट्रीय सीमेपार, प्रत्यक्ष शत्रूवर, पहिल्यांदाच तोफा डागायच्या होत्या. एकच क्षण डोळे मिटले. जगन्नियंत्याची क्षमा मागितली, आई भवानीकडे यशासाठी प्रार्थना केली आणि ओरडलो.. 'फायर..'
3 डिसेंबर 1971 च्या रात्री अखेर अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी माझ्या चार मराठा फिल्ड बॅटरीला शत्रूवर प्रहार करण्यासाठी पहिले टार्गेट मिळाले. माझ्या कमांडपोस्टबाहेर जणू काही अनंत काळापासून या क्षणाची वाट पाहणार्‍या बॅटरी हवालदार मेजर गोरे यांनी प्रचंड उत्साहात खच्चून आरोळी दिली..'छत्रपती शिवाजी महाराज की.. जय!' दीडशे जवानांच्या तोंडून एकमुखी जयजयकार झाला. अंगातून रक्त सळसळले. नसानसात वीज चमकली. हा जयघोषांचा आवाज मोठा होता की, त्याच वेळी धडाडणार्‍या रशियन बनावटीच्या सहा तोफांचा कानाचे पडदे फाडणारा दणका.. सांगता येणे मोठे कठीण आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी