Thursday, December 15, 2011

लोकपाल नको, जल्लाद हवा

औरंगाबाद - लोकपालप्रकरणी जंतर मंतरवर देशभक्तीची गाणी वाजवून काय होणार? 'भारतमाता की जय' याचा अर्थ भारतमातेवर हल्ला करणार्‍यांना जिवंत ठेवू नका. तुमचा तो लोकपाल हे सर्व करणार आहे काय? न्यायालयाने एका राष्ट्रद्रोह्यास फाशी ठोठावली. त्याला फाशी द्या. लोकपालापेक्षा देशाला एका जल्लादाची गरज आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तोफ डागली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' या दैनिकातील अग्रलेखातून शिवसेनाप्रमुख लिहितात, http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-bal-thakare-on-lokpal-and-afazal-guru-2641802.html?HT1=

'संसदेवरील हल्ल्यास काल १० वर्षे पूर्ण झाली. या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त सर्वत्र श्रद्धांजलीचे जंगी कार्यक्रम साजरे झाले. संसदेतही मान खाली घालून मूक श्रद्धांजली वाहण्यात आली, पण संसदेचे रक्षण करताना जे जवान शहीद झाले त्यांच्या आत्म्यास अशा मौन श्रद्धांजलीने चिरशांती लाभणार आहे काय? अतिरेकी संसदेच्या आवारात अंदाधुंद गोळीबार करीत होते. या अतिरेक्यांना पाहून त्या शूर जवानांनी खाली माना घालून 'मौन' बाळगले असते तर काय झाले असते याचा विचारही आज खाली मुंड्या घालून श्रद्धांजली वाहणार्‍यांनी केला असता तर बरे झाले असते.'
जनतेने धनशक्तीलाच निवडून दिले
भ्रष्टाचाराविरोधात लढणार्‍यांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच उभी राहिली आहे, असे सांगून शिवसेनाप्रमुख पुढे म्हणतात की, 'आमचे म्हणणे इतकेच आहे की, देशातील सर्वच यंत्रणांना भ्रष्टाचाराची कीड लागली आहे हे खरेच, पण म्हणून ही संपूर्ण व्यवस्था मोडीत काढण्याचा आग्रह धरला पाहिजे असे नाही. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासाठी लोक गर्दी करत असतात. मात्र त्याच भ्रष्टाचाराचा 'इश्यू' मतदानाच्या वेळी बाजूला ठेवतात हे राज्यातील कालच्या नगरपालिका निवडणुकीतही दिसून आले. जनतेने थैलीशाही आणि धनशक्तीलाच निवडून दिले. भ्रष्टाचारविरोधी लढा देणार्‍यांना यावर काय म्हणायचे आहे? वास्तविक, या देशात भ्रष्टाचार वगैरे रोखण्यासाठी लोकपालपेक्षाही कठोर कायदे आहेत. त्या कायद्यांची नीट अंमलबजावणी झाली तरी भ्रष्टाचाराचे नामोनिशाण आमच्या देशात उरणार नाही, पण कायद्याची बूज राखायची नाही. ते हवे तसे वाकवायचे व मोडायचे. मतांच्या सौदेबाजीतील हत्यार म्हणून कायद्यांचा हवा तसा वापर करायचा. त्यातूनच मग नको नको त्या आंदोलनांची भुताटकी उभी राहते. आमचा आजचा विषय लोकपाल नसून सत्ताधार्‍यांनी त्या अफझल गुरूबाबत जो बेकायदेशीर गोंधळ घालून ठेवला आहे, तो आमच्यासाठी प्रखर चिंतेचा विषय ठरला आहे.'
... का कचरत आहेत?
कायद्यानेच अफझल गुरूवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा खटला भरला. कायद्यानुसारच त्याच्यावर खटला चालला. कायद्यानेच त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. मग त्याच कायद्याची अंमलबजावणी का बरे होत नाही? सर्व कायदेबाज राजकारणी आज लोकपालाच्या नव्या कायद्याबाबत जी धांदल करीत आहेत, त्या सगळ्यांची तोंडे अफझलच्या फाशीप्रकरणी कायद्याची अंमलबजावणी करा असे सांगताना का कचरत आहेत? संसदेचे रक्षण करताना जे जवान शहीद झाले त्यांचे नातेवाईक अफझल गुरूच्या फाशीची मागणी करीत आहेत. शहिदांच्या कुटुंबीयांनी सरकारी श्रद्धांजलीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून निषेध केला. कायद्याने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. अफझल देशाचा गुन्हेगार असताना त्याची फाशी टाळली जाते हासुद्धा भ्रष्टाचारच आहे. लोकपालवाले ठणठणपाळ लोकपालाच्या मसुद्यासाठी जी धांदल करीत आहेत त्यांनी श्रद्धांजलीसाठी खाली घातलेल्या मुंड्या वर करून सरकारला विचारावे, 'अफझल का जिवंत ठेवला? तो तुमचा कोण लागतो? कायदा पाळा, त्याला फासावर लटकवा!' आणि लोकपालप्रकरणी जंतर मंतरवर देशभक्तीची गाणी वाजवून काय होणार?'

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी