Monday, January 2, 2012

श्रीधरन यांच्यात विश्वेश्वरैयांचा शोध

सर्वच चांगल्या गोष्टींना कधी ना कधी विराम घेणे भाग पडते. भ्रष्टाचाराच्या वादळात गेल्या अनेक वर्षांपासून कणखरपणे तेवत राहणाऱ्या एका ज्योतीने २०११ च्या शेवटच्या दिवसाचा मुहूर्त साधून असेच स्तब्ध होण्याचा निर्णय घेतला.
दिल्लीच्या भ्रष्ट वातावरणापासून मेट्रो रेल्वेला मुक्त ठेवणारे ई. श्रीधरन यांना वाढत्या वयामुळे व्यवस्थापकीय संचालकपदावरून निवृत्त व्हावे लागले, ही नव्या वर्षांत देशासाठी निश्चितच सकारात्मक बातमी ठरणार नाही.
केरळातील पलक्कडमध्ये शाळेत बुद्धिमान सहकारी टी. एन. शेषन यांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावण्याच्या काळापासून निकोप, सकारात्मक स्पर्धा हा श्रीधरन यांचा स्थायीभाव ठरला. स्थापत्य अभियंता झाल्यानंतर त्यांनी अकारण विलंबामुळे प्रकल्प खर्चाचा ताळेबंद बिघडविणाऱ्या वेळेशीच स्पर्धा आरंभिली ती व्यावसायिक कारकीर्दीच्या शेवटपर्यंत. १९६३ साली चक्रवातात वाहून गेलेला रामेश्वरम् आणि तामिळनाडूला जोडणारा पम्बन पूल सहा महिन्यांत उभा करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले. श्रीधरन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे लक्ष्य तीन महिन्यांवर आणले आणि हे आव्हान स्वीकारत श्रीधरन यांनी श्रीरामाची वानरसेनाही थक्क होईल एवढय़ा विक्रमी वेळेत, अवघ्या ४६ दिवसांमध्ये हा सेतू पुनस्र्थापित केला. वेळेशी स्पर्धा करून विजय मिळविण्याचे श्रीधरन यांचे वैशिष्टय़ तेव्हापासूनच सर्वश्रुत झाले होते.
कर्माशी एकरूप झालेल्या उच्च दर्जाच्या साधकाप्रमाणे श्रीधरन यांच्या कार्याला तत्त्वज्ञानाची बैठक लाभली होती. पहाटे सव्वा-दीड तासात प्राणायाम, योगासने, ध्यानधारणा, भगवद्गीतेचे अध्ययन आणि त्यानंतर पाऊण तासाचा मॉर्निग वॉक अशी दिवसाची सात्त्विक सुरुवात करून ते साडेआठ-पावणेनऊच्या सुमाराला कार्यालयात दाखल व्हायचे. त्यांच्या कार्यालयात उलटी गिणती करणारे घडय़ाळ सतत स्मरण करून देत राहायचे, हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण व्हायला किती दिवस शिल्लक आहेत याची. सायंकाळी साडेपाच-पावणेसहाच्या सुमाराला ते कार्यालयाबाहेर पडायचे. पण या नऊ तासांतील एकूणएक मिनीट सत्कारणी लावला तर काय चमत्कार घडू शकतो, हे श्रीधरन यांनी दिल्लीला, देशाला आणि जगालाही दाखवून दिले. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची त्यांनी अचूक निर्णयप्रक्रियेशी सांगड घातली. अर्जुनाप्रमाणे त्यांना एकच लक्ष्य दिसत होते, मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे. याकामी उपयुक्त ठरणारी कल्पना कधीही सुचू शकते म्हणून ते नेहमीच कागदपेन जवळ ठेवायचे आणि सुचणारी प्रत्येक कल्पना त्यावर तत्परतेने उतरवायचे. त्यामुळेच पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांमधील बहुतांश मेट्रो प्रकल्प निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण करण्याची किमया त्यांना साधता आली.
आमच्या राजकीय नेत्यांप्रमाणे त्यांच्यापाशी चालढकल, वेळकाढूपणा करण्यासाठी वेळ नव्हता. म्हणायला मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आणि त्यांचे अनेक सहकारी दिवसाचे १८ तास काम करतात, कधी त्यापेक्षाही जास्त. पण निर्णय घेण्यासाठी लागणारा कणखरपणा आणि वेळेचे नियोजन यांअभावी त्यांची व्यग्रता निर्थक ठरली आहे. कर्म करताना समर्पणाची वृत्ती बाळगावी लागते. बौद्धिक पातळीवर दक्ष राहवे लागते. यशापयशाची पर्वा न करता मनाचा समतोल राखावा लागतो. हा निष्काम बुद्धियोग या साधकाने साधला होता. दिवसाचे अठरा तास काम करून राजकारणातील आमच्या नेत्यांना जे जमले नाही त्याच्या निम्म्या वेळात श्रीधरन यांनी दसपट कामगिरी करून दाखविली. कुठलाही गाजावाजा न करता. त्यांनी सत्ताधीशांपुढे कधीही लाचारी दाखविली नाही. एरवी प्रकल्पांत स्वार्थी अडथळे आणणारे सत्ताधीश व नोकरशाहीला हस्तक्षेप करण्याची संधीही दिली नाही.
कोकण रेल्वे प्रकल्पाच्या जबाबदारीतून मुक्त झालेल्या श्रीधरन यांनी ५ मार्च १९९५ रोजी दिल्ली मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकाची सूत्रे हाती घेतली. ७६० किलोमीटरचा, दीडशे पुलांचा, ९३ बोगद्यांचा कोकण रेल्वेचा स्थापत्य अभियांत्रिकीसाठी आव्हान ठरलेला, 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावरील भारतातील पहिला प्रकल्प अवघ्या सात वर्षांमध्ये देशाला समर्पित करून ते दिल्लीत दाखल झाले होते. त्या वेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचे वर्गमित्र टी. एन. शेषन यांचे शेवटचे वर्ष उरले होते. शेषन यांच्यासारखा प्रसिद्धीमाध्यमांत स्वकर्तृत्वाचा गाजावाजा न करता श्रीधरन यांनी पुढची १५ वर्षे दिल्ली व देशावर आपली छाप पाडली.
राजकारण्यांची मनमानी, नोकरशाहीचे अडथळे आणि दिल्लीत माजलेल्या सार्वत्रिक बेशिस्तीवर मात करून कागदावरील मेट्रो रेल्वेची योजना प्रत्यक्षात साकारणे हे स्थापत्य अभियंता म्हणून श्रीधरन यांच्या दीर्घ कारकीर्दीतील सर्वात अवघड आव्हान होते. त्यांनाही त्याची कल्पना होती. म्हणूनच कदाचित दिल्लीच्या कुरुक्षेत्रावर यश मिळवण्यासाठी त्यांनी सतत भगवद्गीतेतून प्रेरणा घेतली. दिल्लीसारख्या ऐसपैस पसरलेल्या शहराच्या उदराखालून, पृष्ठभागावरून आणि अनेक ठिकाणी फ्लायओव्हर्सवरून धावणाऱ्या मेट्रोचे नियोजन अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचे होते. कोणाचाही खोळंबा होणार नाही, अशा पद्धतीने जमिनीखालच्या पेयजल वाहिन्यांचे, मलवाहिन्यांचे, तारांचे जाळे दूर करून मेट्रोचे भुयारी मार्ग तयार करणे, दिल्लीत जागोजागी दिसणाऱ्या ऐतिहासिक वारशांचे महत्त्व अबाधित राखणे, भुसभुशीत मातीत अविचल राहील अशा बांधकामाचे मापदंड निश्चित करणे, कोर्टकचेऱ्यांच्या कचाटय़ात सापडणार नाही, अशा रीतीने प्रकल्पासाठी भूसंपादन, या सर्वच गोष्टी अत्यंत अवघड होत्या. मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला १९९८ साली सुरुवात झाली आणि अवघ्या चार वर्षांत शाहदरा ते रिठाला ही पहिल्या टप्प्यातील मेट्रो रेल्वे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी २५ डिसेंबर २००२ रोजी धावली, ती श्रीधरन यांनी प्रत्येक अडचणीचा खंबीरपणे सामना करीत त्यावर मात केल्यामुळे. आज १३ वर्षांत दिल्लीत सहा मार्गावर मेट्रो रेल्वेचे १९६ किलोमीटरचे असे जाळे उभे झाले ज्याची दहा वर्षांपूर्वी दिल्ली आणि देशही कल्पना करू शकत नव्हता. सकाळी सहापासून रात्री ११पर्यंत दिल्ली मेट्रोच्या १४२ स्थानकांवर(पैकी ३५ भुयारी) न चुकता दर अडीच मिनिटांनी दाखल होणाऱ्या मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्या वीस लाख दिल्लीकरांचे जीवन बदलून टाकले आहे. दिल्लीतील प्रदूषणाची वार्षिक पातळी ६.३ लाख टनांनी खाली आणण्यात महत्त्वाचा हातभार लावला आहे. मेट्रोच्या कामाची दर शनिवारी न चुकता स्वत: दहा-बारा किलोमीटर चालून जातीने पाहणी करताना बांधकामाच्या दर्जाशी झालेल्या तडजोडी, अंमलबजावणीतील दिरंगाई त्यांच्या नजरेतून सुटत नसे.  सहकाऱ्यांविषयी राग-द्वेष न बाळगता वस्तुनिष्ठपणे ते निर्णय घ्यायचे. योजना अमलात आणण्यासाठी निरोगी मन व शरीराची आवश्यकता असते, हे दीर्घ अनुभवांती त्यांनी हेरले होते. त्यामुळेच त्यांनी योग, प्राणायाम, ध्यानधारणेच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांना फिटनेसची प्रेरणा दिली. मेट्रो प्रकल्पांचे निरीक्षण करण्यासाठी अनेक किलोमीटर पायी चालण्यासाठी लागणारी शारीरिक तंदुरुस्ती त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली. वयाच्या ७९ व्या वर्षी श्रीधरन यांच्या वेळेशी स्पर्धा करीत अविरत धावणाऱ्या मेट्रोने ३१ डिसेंबर २०११ रोजी निवृत्तीचे शेवटचे स्थानक गाठले.
श्रीधरन यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचा कलंक लागला नाही. मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे भ्रष्ट सहकाऱ्यांना पाठीशी घातल्याचाही ठपका त्यांच्यावर कधी ठेवला गेला नाही. थोडय़ाशा दिरंगाईने प्रकल्पखर्च वाढीला हजारो कोटींनी चालना देत सहजभावात भ्रष्टाचार करण्याची आसक्ती त्यांच्या मनाला कधीच शिवली नाही. प्रत्येक काम काटेकोरपणाने व निर्दोषपणे पार पाडण्याचा कटाक्ष बाळगणाऱ्या श्रीधरन यांच्या वाटय़ाला वैफल्यही भरपूर आले. ईस्ट ऑफ कैलाशशेजारी जमरुदपूर येथे गर्डर चढविणाऱ्या क्रेन घसरून झालेला अपघात किंवा पूर्व दिल्लीतील लक्ष्मीनगर येथे कोसळलेले काँक्रीटचे अजस्र धूड श्रीधरन यांच्या जिव्हारी लागले. त्यांनी या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून लगेच राजीनामा दिला, पण सरकारने तो तत्परतेने फेटाळला.
भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे श्रीधरन यांचा आत्मा बाल्य, तारुण्य आणि वृद्धत्वातही ध्येयाशी समर्पित राहिला. कर्मात बीजाचा नाश होत नसतो आणि आरंभ झालेल्या कर्माला नष्ट करण्याची शक्ती निसर्गात नसते, याची जाणीव असल्यामुळेच श्रीधरन निवृत्त झाले, ते एक अग्निहोत्र पेटवून. साधकाने निर्धारित काम करावे. दुसऱ्या खोटय़ा कामात भरकटत जाऊ नये, हाच संदेश श्रीधरन यांनी आपल्या कार्यातून दिला आहे. आपल्या देशाने 'चांद्रयान'सारख्या मोहिमांपेक्षा पाणीपुरवठा, मलवाहिन्या, वीजनिर्मिती, दळणवळण, रुग्णसेवा, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांवर सर्वाधिक भर द्यायला हवा, अशी तळमळ ते व्यक्त करतात. पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या भारतात श्रीधरन यांच्या निष्काम कर्मयोगाने हजारो प्रामाणिक व राष्ट्रभक्त अभियंत्यांपुढे उच्च दर्जाचा आदर्श प्रस्थापित केला आहे. दिवसरात्र कार्यरत असल्याचा खोटारडा आभास निर्माण करणाऱ्या, आजचे काम उद्यावर ढकलणाऱ्या दीर्घसूत्री, तामसी राजकीय नेत्यांनाही त्यांच्या वक्तशीर व शिस्तबद्ध सात्त्विक जीवनातून भरपूर शिकण्यासारखे आहे. आसक्तीरहित बुद्धीने काम करीत आपल्या क्षेत्रात सिद्धी प्राप्त करणारे श्रीधरन विश्वासार्हतेच्या शिखरावर पोहोचून निवृत्त झाले.
ज्यांनी महान स्थापत्य अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांना बघितले नाही, त्यांनी भगवद्गीता प्रत्यक्ष आचरणात आणणारे पद्मविभूषण श्रीधरन यांच्यात विश्वेश्वरैयांचा निश्चितच शोध घेता येईल.
साभार - लोकसत्ता
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=202916:2012-01-01-17-05-51&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी