Thursday, June 28, 2012

नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी

रवींद्र दाणी, 26 जून, तरुण भारत
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक चूक केली. त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करून, 2014 चे पंतप्रधानपदाचे उमेदवार, दावेदार, वारसदार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, असे सांगितले असते, तर ‘मोदी हे धर्मनिरपेक्ष आहेत,’ असे लॅमिनेटेड केलेले प्रमाणपत्र पाटण्यातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आतापर्यंत जारी झाले असते. मोदी यांनी ते केले नाही आणि त्यांना धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र मिळाले नाही.

देशात राष्ट्रपतिपदाची निवडणूक होत असताना, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी अचानक 2014 च्या पंतप्रधानपदाचा मुद्दा उपस्थित करावा, मोदींवर धर्मनिरपेक्ष नसल्याचे बॉम्बगोळे सोडावेत आणि जनता दल-यू ने राष्ट्रपती निवडणुकीत संगमा यांच्याऐवजी कॉंग्रेस उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा द्यावा, हा घटनाक्रम काहीसा गूढ वाटणारा असला, तरी तो सहज लक्षात येण्यासारखा आहे.
नवा मार्ग, नवी दिशा
जनता दल-यूवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पकड आहे. नितीशकुमार यांना पंतप्रधान व्हावयाचे आहे. त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता ‘असहज’ वाटत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडून मुलायमसिंग, नवीन पटनायक यांच्यासारखे राजकारण करण्याची त्यांची इच्छा आहे. त्या इच्छेची अभिव्यक्ती त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत केली. त्यांना संगमा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता येत नव्हते. म्हणून त्यांनी मोदी, गुजरात दंगली, धर्मनिरपेक्ष पंतप्रधान हे सध्या संदर्भहीन असलेले मुद्दे उपस्थित केले. अर्थात असे करणारे नितीश कुमार हे पहिले नेते नाहीत. भाजपाने आपल्याला पंतप्रधान होण्यासाठी मदत करावी, असे वाटणारे अनेक नेते होऊन गेले.
जनता पार्टी-सेक्युलर
नितीशकुमार, त्यांच्या पक्षाचे नेते शिवानंद तिवारी, मोदी हे सेक्युलर नसल्याचे सांगत आहेत. हाच शब्द 1977 मध्ये चौधरी चरणसिंगांनी जनता पार्टीचे विभाजन घडविण्यासाठी वापरला होता. भारतीय जनसंघाचे सदस्य जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा दुहेरी सदस्यत्वाचे आहेत, असा मुद्दा स्व. मधू लिमये, चरणसिंग प्रभृतींनी उपस्थित केला होता. यावर जनता पार्टीचे विभाजन झाले. चरणसिंग गटाने स्थापन केलेला पक्ष जनता सेक्युलर ठरला.
मथुरेतील नाटक
चौधरी चरणसिंगांनी जे 1979 मध्ये केले त्याचीच पुनरावृत्ती व्ही.पी. सिंगांनी 10 वर्षांनी 1989 मध्ये केली. मथुरा हे शहर कृष्णजन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, देशाच्या राजकारणात मथुरेचा एक वेगळा संदर्भ आहे. 1989 ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली होती. बोफोर्स दलालीच्या मुद्द्यावर सरकारमधून बाहेर पडलेले व्ही.पी. सिंग व तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यात संघर्ष जुंपला होता. व्ही.पी. सिंगांच्या जनता दलाने भाजपाशी अनौपचारिक जागावाटप केले होते. मतदान केवळ आठ दिवसांवर आले होते. व्ही.पी. सिंग मथुरेच्या सभेसाठी शहरात पोहोचले. सभास्थानी आले. ‘राजा नही फकीर है, जनता की तकदीर है’ अशा घोषणा सुरू होत्या. व्ही.पी. सिंगांची नजर व्यासपीठावर फडकणार्‍या भाजपाच्या झेंड्यावर गेली. व्यासपीठावरून भाजपाचे झेंडे उतरविले जाईपर्यंत आपण व्यासपीठावर जाणार नाही, असे व्ही.पी. सिंगांनी आयोजकांना सांगितले. अर्धा तास व्ही.पी. सिंगांची समजूत काढण्यात गेला. पण, ते राजी झाले नाहीत. भाजपा धर्मनिरपेक्ष नाही, असे ते सांगत होते. अखेर भाजपाचे झेंडे काढण्यात आले.
भाजपा धर्मनिरपेक्ष झाला
निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि व्ही.पी. सिंग भाजपाचा पाठिंबा मागण्यासाठी तेलुगू देसम्‌चे नेते पी. उपेंद्र यांना घेऊन भाजपा मुख्यालयात गेले. कारण, भाजपा धर्मनिरपेक्ष झाला होता! मथुरेची सभा होत असताना भाजपा धर्मनिरपेक्ष नव्हता, निवडणूक निकालानंतर भाजपा धर्मनिरपेक्ष झाला.
आता नितीशकुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर डागलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तोफगोळ्यानंतर धर्मनिरपेक्षतेची व्ही.पी. सिंगांची व्याख्या ताजी झाली आहे. व्ही.पी. सिंगांना मथुरेच्या सभेत सत्ता दिसत नव्हती, म्हणून भाजपा धर्मनिरपेक्ष नव्हता आणि निकालानंतर त्यांना राष्ट्रपती भवनातील शपथविधी दिसू लागताच, भाजपा त्यांच्यासाठी धर्मनिरपेक्ष झाला. नितीशकुमार यांनाही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. यासाठी भाजपाचा पाठिंबा आवश्यक आहे, याची त्यांना कल्पना आहे. म्हणून त्यांनी भाजपावर टीका केलेली नाही, तर आपल्या मार्गातील मुख्य अडथळा नरेंद्र मोदी हे असतील, हे गृहित धरून पंतप्रधान हिंदुत्ववादी असता कामा नये, धर्मनिरपेक्ष असावा, अशी चाल खेळली. उद्या, नरेंद्र मोदींनी, नितीशकुमार यांनीच पंतप्रधान व्हावे, असे एक विधान केल्यास नितीशकुमार मोदींना धर्मनिरपेक्षतेचे ‘प्रमाणपत्र’ जारी करतील. कारण, या सर्व नेत्यांसाठी धर्मनिरपेक्षता व सांप्रदायिकता यांच्यातील एकमेव फरक म्हणजे सत्ता!
पासवान-शरद यादव
रामविलास पासवान व शरद यादव हे दोघेही व्ही.पी. सिंगांच्या मंत्रिमंडळात होते. देवेगौडा व गुजराल सरकारमध्येही त्यांचा समावेश होता. 1998 पासून देशाच्या राजकीय क्षितिजावर केसरिया रंग दिसू लागताच या दोघांनीही रंग बदलला. भाजपाला सांप्रदायिक ठरविणारे हे नेते भाजपाला धर्मनिरपेक्ष म्हणू लागले. व्ही. पी. सिंगांच्या दरबारात दिसणारे हे दोघे नेते अचानक लालकृष्ण अडवाणींच्या पंडारा पार्कमधील निवासस्थानावर दिसू लागले. भाजपा त्यांच्यासाठी धर्मनिरपेक्ष झाला होता.
पासवान यांचा राजीनामा
रामविलास पासवान यांना वाजपेयी सरकारमध्ये दळणवळण, नागरी विमान ही मलाईदार मंत्रालये मिळाली. 2002 मध्ये गुजरात दंगल झाली. रामविलास पासवान यांनी विरोधाचा एक स्वर काढला नाही, पण एका खातेबदलात त्यांचे मलाईदार मंत्रालय काढून त्यांना साधे मंत्रालय देण्यात आले. पासवान यांनी सरकारमधून राजीनामा दिला. अर्थातच, गुजरात दंगलींचे कारण सांगून. पासवान यांचे मलाईदार मंत्रालय गेले नसते, तर त्यांनी ना राजीनामा दिला असता, ना गुजरात दंगलींचा मुद्दा उपस्थित केला असता.
नितीशकुमारांची खेळी
नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी, धर्मनिरपेक्षता, गुजरात दंगली हे जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यात त्यांचे 2014 नंतरचे राजकारण दडले आहे. 2014 मध्ये कॉंग्रेस सत्तेवर येणार नाही, हे त्यांनी गृहित धरले आहे. भाजपा येईलच, हे ठामपणे आज कुणालाही सांगता येत नाही. त्या स्थितीत मग देशाचा पंतप्रधान कोण असेल, हा जो प्रश्न उपस्थित होणार आहे, त्याचे उत्तर नितीशकुमारांच्या या खेळीतून मिळू शकते. भाजपाला म्हणजे मोदींना रोखण्याची ताकद आपल्यात असल्याने देशातील मुस्लिम-कॉंग्रेस यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे ‘दूरदृष्टी’चे राजकारण नितीशकुमार यांनी या खेळीतून सुरू केले आहे. म्हणजे त्यांना 2014 चा व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर व्हावयाचे आहे. भाजपासोबत राहून आपल्याला पंतप्रधानपद मिळू शकत नाही, याची खात्री पटल्याने त्यांनी (धर्मनिरपेक्षतेचा जुना राग आळवीत) ‘नवा मार्ग’ निवडण्याचे ठरविले आहे. त्या मार्गावरील पहिले पाऊल त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा उपस्थित करून टाकले आहे. कॉंग्रेसशी त्यांचे शत्रुत्व नाही. 2009 च्या लोकसभा निवडणूक प्रचारातही नितीशकुमार यांनी असेच ‘नाटक’ केले होते. राहुल गांधींनी त्यांची प्रशंसा केली होती. निवडणुकीनंतर नितीशकुमार कुणीकडे जाणार, हा प्रश्न त्या वेळी उपस्थित झाला होता. पण, युपीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कॉंग्रेसने नितीशकुमारांसाठी ‘गळ’ लावला नाही. कॉंग्रेसने नितीशकुमारांसाठी प्रयत्न केले असते, तर नितीशकुमार आज जी भाषा बोलत आहेत, ती भाषा 2009 मध्ये ऐकू आली असती.
तिसरी आघाडी
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात गैरकॉंग्रेसी सरकार स्थापन होईल, त्याचे नेतृत्व आपण करू शकतो, असे भरपूर संकेत नितीशकुमार देत आहेत. बिहारमध्ये त्यांच्या सरकारला भाजपाचा पाठिंबा असला, तरी वेळ पडल्यास ‘ओरिसा पॅटर्न’ची पुनरावृत्ती ते बिहारमध्ये करू शकतात. भाजपाला बाजूला करून स्वबळावर सत्ता मिळविण्याची ताकद त्यांच्याजवळ आहे. दुर्दैवाने भाजपा ज्या ज्या ठिकाणी सत्तेतील दुय्यम- कनिष्ठ भागीदार राहिला, तेथे पक्षाला आपली ताकद उभी करता आली नाही. ओरिसात भाजपा नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलाच्या बरोबरीचा होता. आज पक्ष कुठेच नाही. बिहारमध्ये तसे होण्याची शक्यता नसली, तरी नितीशकुमार स्वबळावर राज्यात सरकार स्थापन करू शकतात. कारण, राज्यातील जनतेला लालूप्रसाद यादव नको आहेत. कॉंग्रेसाठीही लालूप्रसाद यादव ‘बोझे’ ठरत आहेत. कॉंग्रेस पक्षालाही नितीशकुमार चालू शकतात. फक्त त्यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ असले पाहिजे, ही कॉंग्रेसची अट राहणार आहे. जी प्रक्रिया नितीशकुमार यांनी दोन वर्षांपासून सुरू केली आहे. 2010 मध्ये पाटण्यात भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असताना, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या गुजरात सरकारच्या जाहिरातींनी नितीशकुमार नाराज झाले होते. पूरग्रस्तांसाठी मोदींनी दिलेली रक्कमही त्यांनी परत केली होती. बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाने मोदींना बिहारमध्ये आणू नये, असे नितीशकुमारांनी सांगितले होते. आता त्यांनी त्याहीपुढे जात, भाजपाने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार वगैरे घोषित करू नये, असे सुचविले आहे. नितीशकुमार यांची ही भाषा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहण्याची नाही. याचा अर्थ ते लगेच आघाडीबाहेर पडतील असे नाही. मात्र, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संगमांसारखा आदिवासी ‘धर्मनिरपेक्ष’ उमेदवार उभा असतानाही नितीशकुमारांनी प्रणव मुखर्जींना पाठिंबा देणे, त्यांच्या 2014 च्या राजकारणाचा प्रारंभ मानला जातो. येणार्‍या काळात नितीशकुमार ‘धर्मनिरपेक्षतेचे’ आणखी कोणते ‘नवे धडे’ मोदींना शिकवितात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी