Thursday, June 28, 2012

सोनिया गांधी - शिवसेनेचे नवे दैवत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिली दोन दशके सेनाप्रमुख म्हणून ओळखले जात. मात्र गेली दोन दशके हिंदू हृदयसम्राट या नावाने ते संबोधले जातात. ही नवी उपाधी त्यांच्या स्वभावाप्रमाणे अगदी स्पष्ट आहे. बाळासाहेबांनी 35-40 वर्षांत एकच चूक केली. भारतीय लोकशाहीला कलंक आणि लांछन असलेल्या 1975 च्या आणीबाणीस त्यांनी का पाठिंबा दिला हे कळले नाही.
आणीबाणीचा हा एक अपवाद वगळला तर बाळासाहेबांचा प्रत्येक निर्णय सुस्पष्ट आणि बेधडक होता. कलामानपरत्वे बाळासाहेब थकले. कदाचित सहधर्मचारिणी मीनाताई यांच्या परलोकवासाचाही परिणाम असेल. ते एवढे विकलांग झाले की, शिवसैनिकांना भेटणे बंद झाले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवतीर्थावर भाजप-शिवसेनेचा संयुक्त मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे हे मुख्य वक्ते होते. मात्र ठाकरेंना 5 मिनिटांसाठीही व्यासपीठावर येता आले नाही. आडवाणी यांच्या भाषणानंतर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा ठाकरे यांनी निवासस्थानातील खोलीतूनच 5 मिनिटांचे भाषण केले. ठाकरेच बोलत होते. मात्र त्यात ठाकरी जोष नव्हता. साहजिकच जगरितीनुसार चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे आली. बाळासाहेब हयात असल्यामुळे सेनाप्रमुख न होता कार्याध्यक्ष झाले. मात्र सर्वाधिकारी तेच होते. शिवसेनेत उद्धवसाहेब म्हणतील ती पूर्वदिशा अशी स्थिती गेली काही वर्षे आहे. नवा गडी म्हणजे नवे राज्य. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतानुसार शिवसेनेचा गाडा हाकायला सुरुवात केली. त्यातून काही चांगले निष्पन्न झाले असते तर भाग वेगळा. मराठी मनाने बुचकळ्यात पडावे असेच निर्णय शिवसेनेच्या कार्याध्यक्षांकडून घेतले जात आहेत.5 वर्षांपूर्वी राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली. त्या वेळी प्रतिभा पाटील आणि भैरवसिंह शेखावत यांच्यात लढत झाली. राष्ट्रपती होण्यास या दोघांपैकी कोण लायक हे स्पष्ट होते. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असल्यामुळे आघाडीधर्म म्हणूनही सेनेने शेखावत यांना पाठिंबा देणे अपेक्षित होते, पण सेनेला एकदम मराठी बाणा आठवला. सेनेची मते कॉंग्रेसला पडली. संकटसमयी मिळालेल्या मदतीचा मोबदला कॉंग्रेस पक्ष कसा चुकवतो हे लोकसभेच्या पटलावर आलेल्या नोटांच्या थप्प्यांनी दाखवून दिले आहे. मात्र मराठी बाणा हे जालीम उत्तर असल्यामुळे शिवसेनेचा प्रतिभा पाटीलना पाठिंबा हे शंका मनात न येता काही जणांना पटले. मात्र आता रा.लो.आ.चा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरण्याआधीच शिवसेनेने कॉंग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा देणे हे आश्चर्यकारक आणि सशंयग्रस्त ठरले आहे. उमेदवार निवडीवरून रालोआत घोळ झाला म्हणून हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण कार्याध्यक्ष देतात. प्रणव मुखर्जींच्या नावाबाबत कॉंग्रेसनेही घोळ घातलाच होता. मनमोहनसिंग यांना पंतप्रधान करताना किंवा प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती करताना दोन नावे आली नाहीत. प्रणव मुखर्जी यांच्याच वेळी कॉंग्रेसने मुखर्जी आणि हमीद अन्सारी ही दोन नावे पुढे केली. हा घोळ नव्हता? शिवसेनेला कॉंग्रेसचा पदर धरायचाच होता. केवळ निमित्त हवे होते; फुसके असले तरी. आता बातमी आहे की, बाळासाहेब हे संगमा यांना भेट नाकारणार. पाकिस्तानचा जावेद, मियॉदाद हा क्रिकेटपटू, मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांची भेट मिळवू शकतो. संगमा हे मियॉदादपेक्षा नगण्य झाले का? या भेटी मान्य वा अमान्य कोण करते हे ठाऊक आहे. बाळासाहेब सोडा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठीही मिनतवार्‍या कराव्या लागतात. संगमा येऊन सदिच्छा भेट घेऊन गेले. या गोष्टीचे भय वाटण्याजोगी शिवसेना डरपोक केव्हापासून झाली.हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना नव्या निर्णयाने सेक्युलर झाली. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना कनिष्ठ मनसबदारांच्या रांगेत उभे करताच महाराज संतापले होेते. त्यांच्या स्वाभिमानाचा अविष्कार दरबारात दिसला. छत्रपतींचे नाव घेणारी शिवसेना आता कोणत्या रांगेत आहे. मुलायमसिंह आणि मायावती, शरद यादव आणि एच.डी. देवेगौड या चौघांच्या रांगेत शिवसेना कशी दिसते. ही सर्व सेक्युलर मंडळी आणि हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना एकदम समविचारी झाले आहेत. हे चौघे बदलणे शक्य नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच आता भपंक सेक्युलरांच्या मेळाव्यात सामील झाली आहे. आता दिल्लीत एखादा मेळावा होऊन मुलायम, देवेगौडा, शरद यादव आणि उद्धव ठाकरे हे एकमेकाचे हात धरून उंचावत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध होऊन दिसेल तेव्हा शिवसैनिक धन्य पावतील. एवढे केलेच आहेच तर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन देशाला आपली नवी ओळख करून द्यावी. राज ठाकरे यांनी गुजरातेत जाऊन नरेंद्र मोदी यांचे काम पाहून त्यांची स्तुती केल्यावर उद्धव ठाकरे सेक्युलॉरिझमी वाट चोखाळणार ही भाऊबंदकी लक्षात घेतलीच पाहिजे.राजकारण बाजूला ठेवले तरी बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी त्याची कशी दशा केली याचे एक विदारक उदाहरण आहे. वसंत ढोबळे नावाचा मुंबईत एक पोलीस अधिकारी आहे. दुर्लक्षित समाजसेवा शाखेचे इन्स्पेक्टर. मुंबईतील अवैध डॉन्सबार, मद्यालये यांच्याविरुद्ध त्यांनी मोहीम उघडली. किरकोळ छोट्या डान्सबारवर कारवार्ई झाली तेव्हा सर्व गप्प होते. ढोबळे यांनी मोठे मासे पकडायला सुरुवात करताच प्रथम जुलाब झाले ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला. एक मराठी पोलीस अधिकारी मुंबईतील श्रीमंताचा माज कमी करत आहे याचे खरे तर शिवसेनेला कौतुक वाटायला हवे. मुंबईचे पोलीस आयुक्त अरुण पटनाईक यांच्या पाठिंब्यापेक्षा शिवसेनेचा पाठिंबा ढोबळे यांना खूप बळ देऊन गेला असता, पण ढोबळेंच्या कारवाईला शिवसेनेनेच विरोध केला. व्यक्तिस्वातंत्र्य, मनोरंजनाचा हक्क असली तद्दन खोटी कारणे दिली. प्रत्यक्षात असे लक्षात आले की, उद्धव ठाकरे यांच्या घरातील एकाचा डान्सबार आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेच्या एका आमदाराचा डान्सबार आहे. ढोबळे यांच्या कारवाईचा तडाखा या दोन डान्सबारना बसला. ढोबळंेंना विरोध करण्याचे हे खरे कारण आहे. वसंत ढोबळे हा मराठी अधिकारी आहे. हा विचार आता करायचा नाही. प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना दिलेल्या पाठिंब्याला एकवेळ तात्विक मुलामा देता येईल. मात्र निकटवर्तींनी नियम मोडून डान्सबारसारख्या गलिच्छ उद्योग करायचा. त्यावर कारवाई होताच कारवाईला विरोध करायचा हे शिवसेनेचे नवे रूप आहे. परिवर्तन आवश्यक असते, पण हे भलतेच होत आहे. सेक्युलर आणि डान्सबार चालक अशा भूमिकेनंतर उद्धव ठाकरेेंच्या शिवसेनेने शिवाजी महाराजांचे नाव घेणे थांबवावे. सोनिया गांधी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नवे दैवत. अगदी शोभून दिसेल.
26 जून, तरुण भारत, अग्रलेख

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी