Saturday, August 4, 2012

न झालेली ब्रह्मगिरी परिक्रमा

नोंदी, 3 ऑगस्ट 2012
28 जुलै रोजी बिदर त्र्यंबक गाडीने रात्री 9.30 वाजता सोलापूरहून निघालो. झोप येत नव्हती म्हणून खिडकीतून बाहेर न्याहाळत होतो. नगर, शिर्डी मागे सिन्नर तालुक्यात कुठे गवताचे  हिरवे पातेही दिसले नाही. जणू मेअखेरचे वातावरण. पहाटे नाशिक शहर मागे पडले. त्र्यंबक रस्त्याला लागताच पावसाळी वातावरणाचा स्पर्श झाला.

अंजनेरी 

अंजनेरीचेदर्शन झाले. डोंगरमालिका. कड्यांना अलिंगन देत बरसणारे ढग. डोंगरमाथ्यावरून कोसळणारे छोटे छोटे धबधबे. धबधब्यातून कोसणारे पाणी गुरुत्वाकर्षणाचा नियम विसरून कारंजाप्रमाणे वरच्या दिशेने उडतानाचे अद्भुत दृश्य एसटीतून पाहायला मजा येते. सकाळचे नऊ वाजले होते. त्र्यंबकला पोचलो. सूर्य नेहमीप्रमाणे (पावसाळा असल्याने) रजेवर होता. मनोमन ब्रम्हगिरीला वंदन केलं. त्र्यंबकपासून पिंपळदकडे पावलं वळवली. (की जिथे विवेकानंद केंद्राचे प्रकल्प आहे). निसर्गाशी गट्टी जमवता यावी यासाठी नेहमीच मी पिंपळदला चालत जातो. या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यात आता जागोजागी बरीच घरे झालीत. काही ठिकाणी डोंगरांचा पाया माणसांनी कुरतडल्याच्या खुणा दिसल्या. गणपत बारी आली. श्रीगणेशाला वंदन केलं. तेथील साधू महाराज पूजेसाठी फुलं वेचत होते. त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा झाली, पण त्यांचं ध्यान भंग करणं उचित वाटलं नाही. म्हणून पुढे निघालो. विवेक आश्रम हाकेच्या अंतरावर असताना पावसाची जोरदार सर आली. आश्रमात पोचलो. बैठकीत सहभागी झालो. संध्याकाळी चित्राताईने नाशिकच्या केंद्रात सोडलं. साडेपाच वाजताविवेक विचार वाचक मेळाव्याला सुरुवात झाली. कार्यक्रमानंतर वाचकांशी गप्पा आणि चांडक सर्कलजवळील दिव्य मराठी कार्यालयात गेलो. समीर देशमुख अन्  आनंद देशमुख यांची भेट झाली. रात्री जयेश आणि पराग दोघांनी पिंपळदला आणून सोडलं. दुस-या दिवशी दुस-या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी परिक्रमा करण्याचा निश्चय करून झोपी गेलो. तिसºया श्रावण सोमवारी परिक्रमेसाठी लाखांनी गर्दी असते, म्हणून दुस-या सोमवारी फेरी करायची योजना होती.

त्र्यंबकचे दर्शन 
पहाट झाली. सतत कोसळणारा पाऊस अन् घों घों करणा-या वा-याने मला परिक्रमेपासुन परावृत्त करायला कधीच सुरुवात केली होती. सुनील, मदगोंडा आणि श्रीकांतही सोबत नव्हते, परिणामी परिक्रमेऐवजी दिवसभर ग्रंथालयातल्या ग्रंथांशी गट्टी करायचा विचार मनात प्रबळ होऊ लागला. पुढील वर्षी फेरी करण्याचं आश्वासन देऊन सुटका करून घेतली. आश्रमातील 30-35 मुलं, डॉक्टर आणि धनंजयदादा भर पावसात फेरीला निघाले. सुमारे 28 ते 32 किलोमीटरची ही फेरी असते. संपूर्ण ब्रह्मगिरीला परिक्रमा.
आश्रमातंलं ग्रंथालय खूपच समृद्ध आहे. काय  नाही तिथं..? समग्र अरविंद, समग्र विवेकानंद, तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, अरुण शौरींची काही पुस्तकं, मराठी अन् इंग्रजी साहित्यातील दुर्मिळ पुस्तके. सततच्या पावसामुळे पुस्तकंही ओल धरल्यासारखी गिळगिळी झालीत. कपाटात उभ्या पद्धतीने मांडल्याने वेडीवाकडी झालेली. दिवसभर सारी पुस्तके एकावर एक या पद्धतीने रकान्यात मांडली. यानिमित्ताने धावती पुस्तक यात्रा घडली. दुपारी फेरी संपवून वानरसेना आली. त्यांच्यासोबत भोजन करून पुन्हा पुस्तकांच्या राशीत डोके खुपसलं. खूप समाधान वाटलं. हजारो पुस्तकांच्या संगतीत एकट्याने काम करण्याचा आनंद काही औरचं.ब्रह्मगिरी परिक्रमा 
न केल्याची रूखरुख मनात राहिली. ती पुढच्या वर्षी पूर्ण करण्याचा मनी निश्चय केलाय.
ब्रह्मगिरी 
शेवटच्या श्रावण सोमवारी जयेश आणि अन्य काही दोस्त मंडळी प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा गोळा करत दरवर्षीप्रमाणे परिक्रमा करणार आहेत. ही फेरी त्र्यंबकच्या भोलेनाथाला अधिक प्रिय असणार, नाही का ?
*************
राखी पौर्णिमेच्या सायंकाळी नागणसूरच्या बहिणीकडे (ता. अक्कलकोट) गेलो. शुक्रवारी सकाळी तिथून कणबसच्या बहिणीकडे मार्गस्थ झालो. जेऊरच्या आधी तीन किमीवर एक पाच एक वर्षांचा चुणचुणीत शाळकरी मुलगा हात लांबवला अन् मी बाईक थांबवली. त्याला घेतलं. सागर रोज या शिवारातून शाळेला  चालत जातो. त्याचे बाबा एका द्राक्ष बागाइतदाराकडे सालगडी म्हणून कामास आहेत. जेऊरला येईपर्यंत त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. मला तो खूप हुशार अन् आत्मविश्वास असलेला वाटला. त्याला सोडून पुढे निघालो. खेडे आणि शहर येथील शिक्षणाच्या दर्जेत असलेली दरी, खेड्यातली गरिबी, आणखीही खूप विचार मनात आले. कणबसपासुन तीन किमीवर शेतात ताईचं घर. घरामागे असलेल्या राखीव वनात जावं वाटलं. पावसाळी वातावरण, दाट झाडी प्रसन्न वाटत होतं. अचानक समोर मोर दिसला. जागीच थबकलो. पाहतो तर आजूबाजूला पाच मोर मुक्तपणे सकाळची न्याहरी करत होते. हालचाल न करता पाहतच राहिलो. त्यात पाऊण तास कसा गेला कळालेच नाही... राखी बांधून झाल्यानंतर सोलापूरकडे निघालो.
************

अंजनेरी

अंजनेरी - दुर्गदर्शन

ब्रम्हगिरी

विवेक विचार - सांस्कृतिक मराठी मासिक

 


.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी