Friday, September 21, 2012

प्रयागमध्ये गंगेचा शोध

तरुण विजय  
काही दिवसांपूर्वी प्रयागला जाणे झाले. रज्जूभय्यांच्या स्मृतिनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे नकार देण्याचे काही कारणच नव्हते. हरिमंगलने संगम आणि अक्षयवटाच्या दर्शनासोबतच मोठ्या हनुमानाला घेऊन जाण्याचे आश्‍वासन दिले होते. सिव्हिल लाईन्समध्ये अनन्दा नामक रज्जूभय्यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्यांचे वडील ब्रिटिशकालीन उत्तरप्रदेशचे मुख्य अभियंता होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. रज्जूभय्या आणि अशोक सिंघल हे दोघे त्या वेळी संगीताचे विद्यार्थी होते. शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वाजवण्यात या दोघांचीही रुची होती. तेथेच त्यांची भेट झाली आणि नंतर आपापल्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त करून ते संघाचे प्रचारक झाले. त्यामुळेच अनन्दा आणि संगम या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी वंदनीय, पूजनीय अशाच होत्या.


कार्यक्रमानंतर संगमावर गेलो आणि तेथील अव्यवस्था, घाण, सांडपाणी, मैला, दुर्गंधी हे सारे पाहून मन अस्वस्थ झाले. सम्राट हर्षवर्धनाच्या मूर्तीची कधीतरी कुणी प्रचंड उत्साहाने स्थापना केली असेल. जर सम्राट हर्षवर्धनाची इतकीच दुर्दशा करायची असेल, तर ती मूर्ती तरी हटविली जावी किंवा ती झाकून तरी ठेवली जावी. सर्वत्र दुर्गंधियुक्त कचर्‍याचे ढीग, वर्षभर मूर्तीच्या गळ्यात टाकण्यात आलेल्या माळा, धुळीने भरलेला त्या महान सम्राटाचा चेहरा आणि चारही बाजूंना प्रचंड दुर्गंधी, असे एकंदरीत दुरवस्थेचे चित्र आहे.

रमेशजी सांगत होते, गंगेकाठी पोहोचेपर्यंत ही दृश्ये पाहूनच घ्या. आचमन करण्यासारखे पाणी तर नाहीच. स्नान कराल तर इन्फेक्शनची भीती. तशीदेखील कानपूरपासून पुढे गंगा नावालाही उरलेली नाही.

दोन-चार मैलांपर्यंत गंगा शुद्धिकरणाचे आवाहन करणारे दोहे, चारोळ्या, संदेश आणि मार्गदर्शनाचे फलक लटकलेले दृष्टीस पडतात. आवाहन फलक तर टांगलेले होते, पण त्यात शुद्धिकरणाच्या नावाने ठळक अक्षरांत निरनिराळ्या व्यक्तींनी आपापली नावे गोंदवून स्वहित साधण्याचाही केलेला प्रयत्न दिसत होता. फलक रंगवणार्‍यांनी किल्ल्यांच्या भिंतीही सोडल्या नाहीत. अक्षयवट जेथून दिसतो, अगदी त्याच्या खालपर्यंत फलकच फलक दिसत होते. त्यांचे नाव आणि आपण गंगा शुद्धिकरण कशासाठी करायचे, हे लिहिलेले संदेश. हे सारे लिहूनही कुणीच त्यावर अमल करताना दिसत नाही. जर केवळ लिहून सारे काही साध्य झाले असते, तर कायद्याची पुस्तके छापून सारे मोकळे झाले असते. पोलिस, प्रशासन आणि लष्कराची गरजच उरली नसती.

छोट्या नौकेत आम्ही सहा जण बसलो होतो. नावाडी होते भारत लाल निषाद. चुकीने त्यांच्या नावाचा उच्चार भरत केला तर रागावले. आमचे नाव भारत आहे, भारत. तो त्वरेने उद्गारला. काय करावे बाबूजी, मला तिन्ही मुलीच आहेत. आम्ही म्हणालो, मग यात नाराजीचे कारणच काय? गंगा, यमुना, सरस्वती आहेत त्या. त्यांना लक्ष्मी, दुर्गा, शारदाही म्हणता येईल. चांगली बाब आहे ही.

तो नाव वल्हवत राहिला. चुपचाप.

नदीच्या मध्यभागी पोहोचलो, तर अथांग जलसागराने मनाच्या गाठी सैल केल्या. आता काहीच वाईट, निराश वाटत नव्हते. गंगा ही एक माताच आहे. फक्त आईच आहे ती. पुत्रो-कुपुत्रो जायेत्क्वचिदपि... आईच्या ममतेला मुलातील अवगुण दिसत नाहीत. पुराने दुथडी भरून वाहणार्‍या भागीरथीच्या काठावरून आईने प्रयागला बोलावून घेतले, यापेक्षा आणखी भाग्य ते कोणते?

संध्याकाळची वेळ होती. दीप प्रज्वलित करून तो गंगेत सोडून दिला आणि धन्य झालो. पुण्याचे एक प्राध्यापक- आठवले त्यांचे नाव. नंतर ते संन्यासी झाले. ते तर गंगेला फक्त माउलीच म्हणतात. गंगामाईसुद्धा म्हणत नाहीत. केवळ माउली. उत्तरकाशीत त्यांनी जलसमाधी घेतली. गंगा ही आईच असल्याने तिच्या नजरेपुढे देह विसर्जित करण्याचे भाग्य पुण्यात्म्यालाच प्राप्त होते.

गेल्या कुंभात अचानक अम्माला प्रयागला घेऊन जाण्याची संधी मिळाली. अपघाताने तेथे मुनव्वर राणा भेटले. त्यांची आमची भेट प्रयागमध्ये संगमावरच झाली. त्या वेळी त्यांनी हे गीत गायिले-

तेरे आगे अपनी मां मौसी जैसी लगती है

तेरी गोद में गंगामय्या अच्छा लगता है

|जिच्या कुशीत आईपेक्षाही जास्त प्रेम आणि वात्सल्य मिळते, जिने आमचे घर, शेती, धन-धान्य, मन, पूर्वज आणि स्वर्ग या सार्‍या गोष्टींची काळजी घेतली, जिचे दोन थेंब पाणी प्राशन केल्याशिवाय आम्ही स्वर्गातही जाणे टाळतो, जी पिढ्यान्‌पिढ्या आपल्या देवघरात एका काचेच्या शिशीत बंद दिसते, तोपर्यंत जिवात जीव असतो, जिच्यामुळे आमची, या मातीची आणि विश्‍वासाची ओळख होते, त्या गंगेला मुसलमानांनी नव्हे तर हिंदूंनीच नासवले आहे, तिचा छळ केला आहे.

कोणत्याही बाबांचा आश्रम, हिंदूंचे कारखाने, कार्यालये, सरकारमध्ये बसलेली सारी मंडळी, ज्यांनी गंगेला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले, ते आपला केर-कचरा, बिनकामाच्या वस्तू गंगेतच सोडून देण्यात धन्यता मानतात. ते शुभ्रवस्त्रधारी, तेजस्वितेचे देदीप्यमान पुंज, शेंडी वागवत टिळा धारण करून धर्माची प्रतिष्ठा वाढवणारे, सकाळ-संध्याकाळ संध्या करणारे, चोवीस तास केवळ राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित, राष्ट्राची दुर्दशा, राष्ट्रावर घोंघावणारे संकट, राष्ट्राची सभ्यता, संस्कृती, राष्ट्रातील समाज आदींवर चिंतन करणारे गंगेमध्ये घाण आणि केर-कचरा प्रवाहित करत असताना दिसतात.

म्हणूनच प्रयाममध्ये केवळ गंगा पाहून घ्या, असे उद्गार रमेशजींना काढावे लागले.

गंगोत्रीमध्ये सर्व पूज्य गंगाभक्तांची उपाहारगृहे आहेत. ते पूजनही करतात आणि उपाहारगृहदेखील चालवतात. हॉटेलमध्ये सांडपाणी आणि शौच वाहून जाण्यासाठी सिवर लाईनची गरजच काय? अरे पहाड आहे पहाड.

म्हणूनच सारे काही गंगेला जाऊन मिळते. पूजेचे सामानही गंगेत सोडून दिले जाते. धूप, अगरबत्ती आणि प्लास्टिकदेखील स्वाहा केले जाते. याशिवाय इतर सारे काही गंगेत सोडले जाते. आता तर गोमुख येथेही हेच होताना दिसत आहे. स्वर्ग हवा, मोक्ष हवा, वैकुंठाला जायचे असेल तर गंगाजीमध्येच देह प्रवाहित केला जातो. संन्याशांचेही पार्थिव देहत्यागानंतर गंगेतच समर्पित केले जाते. पहाडात गंगेचा खळाळता प्रवाह खंडित होऊन गेला आहे. एखाद्या साचलेल्या पाण्याचे स्वरूप तिला आले आहे. तेथे वर्षानुवर्षांची घाण, पुरामुळे वाहून आलेले तृण, वृक्षांच्या फांद्या, मृतदेह, कचरा आदी जमा होत आहे आणि यापुढेही जमा होत राहणार.

एखादा तर दिवस असा येईल, की त्याचा हिशोब मागितला जाईल. निसर्ग की मनुष्य, एवढाच प्रश्‍न बाकी आहे.

आदिशंकरांनी सांगून ठेवले आहे,

देवि सुरेश्‍वरि भगवती गंगे,

त्रिभुवन तारिणी तरल तरंगे
|गंगा तर आजदेखील देवीच आहे, सुरेश्‍वरी आहे आणि त्रिभुवनतारिणी आहे. राक्षस तर आपण आहोत.

संगमात नौकाविहारामुळे मन रोमांचित होऊन जाते. पुलकित होऊन जाते. गंगामय्याचे वैभव आणि वात्सल्याची केवळ अनुभूती घेता येते. परतीचा विचार नसला तरी परतावे लागतेच. भारत लाल यांना मी विचारूनच टाकले- येथून बनारस किती दूर आहे? नावेतून जाता येईल? तो खुशीने म्हणाला वल्हवणार्‍या नावेतून गेलो तर किमान तीन दिवस लागतील. मोटारबोटने कदाचित एका दिवसात पोहोचून जाऊ. जाण्याची इच्छा आहे. पुढच्या वेळी काहीशी अशीच योजना आखू. एक काळ असा होता की, हावड्यापर्यंत गंगेतून नौका आणि जहाज चालत असत. लोक आणि सामान दोघांचीही गंगेतूनच यात्रा होत असे. आता तो सारा इतिहास झाला आहे.

गंगामय भारत. भारतमय गंगा. दोन्हींमध्ये ईश्‍वरीय अंश आहे. आईचे नाव गंगादेवी. वडिलांचे नाव गंगाशरण, आजोबा गंगाभक्तसिंग. पणजोबा गंगाराम आणि मुलगा गंगाचरण.

जगातील एकातरी देशात, एखाद्यातरी समाजात कुठेही एखाद्या नदीबद्दल असे संपूर्ण समर्पण, भक्ती आणि धन्यतेचा भाव बघायला मिळू शकतो? आणि याच वेळी जगात एखाद्या समाजाद्वारे त्याच नदीला इतके प्रदूषित केले गेल्याचे कधी ऐकायला आले आहे? प्रत्यक्षात ज्या वेळी आपल्याला आपली पृथ्वी, आपला आत्मा, आपली भाषा भंग होताना पाहून आनंद व्हायला लागला, तेव्हापासूनच जे काही आमचे आहे, जे वर्षानुवर्षांपासून जपून, सांभाळून ठेवण्यात आलेले आहे, ते सारे नष्ट व्हायला लागले. आम्हाला व्होल्गा प्रिय वाटायला लागली. आम्ही सहाराच्या वाळवंटावर लिहू लागलो. आम्ही थेम्स आणि सीएनवर लिहिलेले साहित्य वाचू लागलो आणि त्याप्रमाणे विचार करू लागलो. पण गंगा राहिली बुटकी, ग्रामीण. तिचा अभ्यास करावासा कुणाला वाटला नाही. कुंभामध्ये गर्दी करणार्‍या धार्मिक लोकांपर्यतच ती सीमित राहिली. जे लोक आपापली आंघोळ करतानाची आणि साधूंची मोबाईलने छायाचित्रे काढायला जातात, त्यांना सभ्य, सुसंस्कृत गंगा कशी समजणार?

इंग्रजीतून गंगा वाचाल तर भाव कसे जागृत होतील? कार्यालये, अधिकारी, मीडिया आणि नेते या सार्‍यांनीच गंगेच्या जाहिराती करून टाकल्या आहेत. भिंतींवर ‘गंगा वाचवा’ असे लिहायचे आणि भिंती रंगवून घाणेरड्या करायच्या. याने थोडीच गंगेचे शुद्धिकरण होणार आहे? विरोधकांवर हल्ला करण्यासाठीही गंगेचा सहारा घ्यायचा. प्रत्युत्तर देण्यासाठीही गंगेचीच मदत घ्यायची. भक्तांना मूर्ख बनविण्यासाठीही गंगा. राजकारणावर फुरसतीने टीका करण्यासाठीही गंगा. मात्र, आचमन, स्नान आणि भारतासाठी गंगा अदृश्य व्हायला लागली आहे. प

तरुण विजय
(लेखक राज्यसभा सदस्य आहेत)

अनुवाद : चारुदत्त कहू

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी