Friday, September 21, 2012

चर्चचे वास्तव - १८

गैरव्यवहारांनी उखळ पांढरे करणारे पदाधिकारी

चारुदत्त कहू
नागपूर, १८ सप्टेंबर
चर्च म्हणजे कुणाच्याही व्यक्तिगत बाबीत नाक न खुपसता, त्यांच्या धर्मकार्याच्या मार्गात नाकाच्या शेंड्याने सरळ चालणारे प्रतिष्ठान वा जगाला सन्मार्गाची दिशा देणारी एक चळवळ अथवा येशूच्या मार्गाने मुक्ती देणारे तत्त्वज्ञान आहे, असा जो भास होतो, तोदेखील चर्चबद्दलची पैशांचा दुरुपयोग करण्याची प्रकरणे कानावर आली की गळून पडतो आणि मनात प्रश्‍न निर्माण होतो की, मोठमोठ्या चमत्कार करणार्‍या संतांचे नाव घेणारी ही चळवळ मानवाला विशेषतः रंजल्या-गांजल्यांना प्रतिष्ठेचे कोंदण लावू इच्छिते की गैरव्यवहाराच्या मार्गाने जाण्याचे नवे फंडे त्यांच्यापुढे उघड करते.

मे २०११ मध्ये तामिळनाडू पोलिसांच्या केंद्रीय गुप्तचर विभागाच्या गुन्हे शाखेने ५०० पानांचे एक आरोपपत्र कोइम्बतूरच्या मुख्य न्याय दंडाधिकार्‍यापुढे सादर केले. कोइम्बतूरच्या चर्च ऑफ साऊथ इंडियाचे बिशप माणिकचंद दोराई, त्यांचे दोन बंधू आणि चार सहकार्‍यांनी मिळून डायोसीसला ४ कोटी २५ लाख रुपयांनी लबाडीने लुबाडल्याचे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. बिशप माणिक्कम दोराई यांचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचा अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकेल सलढाणा, कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक ए. जे. आनंदन आणि बँकेचे अंकेक्षक सी. ई. सारासम यांच्या अंकेक्षण समितीने ऑक्टोबर २०१० मध्ये सादर केल्यानंतरच त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. बिशप दोराई यांनी डायोशियनची बँकेची खाती, ट्रस्टचा निधी आणि सेवानिवृत्ती निधी व्यक्तिगत कर्जासाठी तारण ठेवल्याचे, डायोशियनच्या शाळांना प्रवेश विकल्याचे, इमारतीच्या कंत्राटासाठी लाच स्वीकारल्याचे आणि डायोशियनच्या निधीची व्यक्तिगत स्वार्थासाठी उधळपट्टी केल्याचे आढळून आले. या बिशप महोदयांनी डायोशियनची मालमत्ता बाजारमूल्याच्या अंदाजे २० टक्के दराने विकण्याचे अधिकार बांधकाम व्यावसायिकांना देऊन टाकले आणि त्याबदल्यात बांधकाम व्यावसायिकांकडून समितीच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारली. चर्च ऑफ साऊथ इंडियामध्ये झालेले व्यवहार हा निव्वळ गैरव्यवस्थापनाचा प्रकार नसून अप्रामाणिकता आणि गुन्हेगारीचे कृत्य असल्याचे मत समितीने नोंदवून या बिशपच्या पांढर्‍या कोटामागील काळ्या कहाण्यांवर प्रकाश पाडला आहे. परिणामी भ्रष्टाचारी बिशप माणिक्कम दोराई यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. (क्रमशः)
(उद्याच्या अंकात भ्रष्टाचाराची न संपणारी मालिका)

 चर्चचे वास्तव - १९

भ्रष्टाचाराची न संपणारी मालिका

चारुदत्त कहू
नागपूर, १९ सप्टेंबर
भ्रष्टाचाराची ही प्रकरणे वानगीदाखल देण्यात आली आहेत. अशा शेकडो प्रकरणांचा तपास देशातील निरनिराळ्या पोलिस ठाण्यांमध्ये सुरू आहे. मेडकचे बिशप निवृत्त रेव्हरंड टी. सॅम्युअल कनक प्रसाद यांच्यावरही २०१२मध्ये त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल सीएसआय सायनॉड संचालन समितीने निलंबनाची कारवाई झाली आहे. अध्ययनतर्ते मिलींद ओक यांनी भ्रष्टाचाराची अशी शेकडो प्रकरणे संकेतस्थळांवरून हुडकून काढली. तथापि अध्ययनाचा भाग म्हणून केवळ बिशप आणि त्यापेक्षा मोठ्या हुद्यांवरील चर्चच्या अधिकार्‍यांच्याच गैरव्यवहारांवर प्रकाश टाकला आहे. ही सारी मंडळी अतिशय मोठ्या हुद्यावरील असल्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या त्यांच्यावरील केसेसकडे बघता चर्च आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये कुठेतरी माशी शिंकतेय असाच निष्कर्ष यातून काढला जाऊ शकतो.
वर्ष २००९ मध्ये मद्रास पोलिसच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या गुप्तहेरांनी चर्च ऑफ साऊथ इंडियाचे (सीएसआय) माजी महासचिव आणि त्यांच्या कुटुंबातील तिघांना अटक केली. २००४च्या त्सुनामीग्रस्तांच्या मदतीसाठी इपिस्कोपल रिलीफ ऍण्ड डेव्हलपमेंटने (इआरडी) पाठविलेल्या २.२ मिलियन पाऊंडपैकी ८ कोटी ५० लाख रुपये डॉ. पाउलीन सत्यमूर्ती यांनी चोरल्याचा आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल १० महिने केलेल्या सखोल चौकशीनंतर डॉ. सत्यमूर्ती, त्यांचे पती, मुलगी आणि भाच्याला १३ ऑक्टोबरला अटक केली. डॉ. सत्यमूर्ती यांच्यानंतर २००७ मध्ये रुजू झालेले सीएसआयचे नवे महासचिव रेव्हरंड मोझेस जयकुमार यांच्या कार्यकाळात ही चोरी उघडकीस आली. त्सुनामीग्रस्तांसाठी पाठविलेला निधी कुठे आणि कसा वापरला, याचे विवरण वारंवार मागूनही डॉ. सत्यमूर्ती यांनी इआरडीला दिले नव्हते. त्यामुळे अखेरीस नाईलाजास्तव इआरडीने अपूर्ण अंकेक्षणाचा शेरा नोंदवून सीएसआयच्या पुढच्या देणग्या थांबवल्या.
सीएसआयने या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. कनंगराज यांना केली. पण डॉ. सत्यमूर्ती यांनी त्यांना सहकार्य करण्यास नकार दिला. तथापि, कनंगराज यांना आढळलेली तथ्ये चर्चच्या अनुयायांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. त्सुनामीच्या तडाख्यातून वाचलेल्या नागरिकांसाठी सुरू असलेल्या घरबांधणीची देखरेख डॉ. सत्यमूर्ती यांनी त्यांच्या पतीराजांवर सोपविली होती. त्यांच्या मुलीवर वैद्यकीय मदतीच्या सुरू असलेल्या कार्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती. तर त्सुनामीग्रस्तांच्या पूनर्वसन कार्यासाठी लायसन अधिकारी म्हणून दस्तुरखुद्द त्यांचा भाचाच काम पहात होता. विशेष म्हणजे या तिघांच्याही नियुक्त्‌या नेहेमीपेक्षा कितीतरी जास्त वेतनावर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले.
डिसेंबर २००८ मध्ये फ्रा. जयकुमार यांनी न्या. कनंगराज यांचा अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केला. या प्रकरणाची गुन्हेगारी अंगाने चौकशी होऊन चोघांविरुद्ध २००९ मध्ये अटक वॉरंट जारी झाले. सीएसआयच्या तत्कालीन मॉडरेटरची मुलगी आणि तिरुची-तंजावरच्या बिशप डॉ. सॉलोमन दोराईस्वामी, डॉ. सत्यमूर्ती आणि त्यांच्या सह-प्रतिवादींना अटक करून मद्रासमधील पुझाल तुरुंगात पाठवण्यात आले.
वाढत्या गैरव्यवहारांबद्दल चिंता
गोव्याची राजधानी पणजी येथे झालेल्या एका उच्चसस्तरीय बैठकीत अनेक गणमान्य ख्रिस्ती नेत्यांनी आणि धर्मोपदेशकांनी चर्चमधील वाढत्या गैरव्यवहारांबद्दल जाहीरपणे चिंता व्यक्त केली. भारतातील चर्चच्या अनुयायांची संख्या एकूण लोकसंख्येच्या २.५ टक्के असताना, या समुदायाविरुद्धच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणांची रेलचेल आहे, याकडे ऑल इंडिया कॅथॉलिक असोसिएशनचे अध्यक्ष रेमी डेनिस यांनी लक्ष वेधले.
भारतीय नौदलाच्या वार्षिक तरतुदीएवढ्या निधीचा चर्चचे पदाधिकारी व्यवहार करतात. त्याचप्रमाणे भारत सरकारनंतर देशात क्रमांक दोनवरील सर्वात जास्त लोकांना नोकरी देणारी संस्था कोणती असेल तर ती चर्च आहे, ही बाबही रेमी डेनिस यांनी अधोरेखित केली. गोव्याचे माजी मंत्री एडवर्ड फालेरो आणि प्रो. डेनिस यांच्यासह अनेक कॅथॉलिक ख्रिस्तानुयायांना चर्चच्या संपत्तीच्या देखभालीकरिता आणि पारदर्शी कारभाराकरिता सशक्त अशा कायद्याची गरज वाटते. चर्च हे सत्तेचे केंद्र नसून सेवेचे आगार आहे, त्यामुळे लोकशाहीला पूरक असलेले सर्व कायदे येथेही लागू झाले पाहिजे. देशातील सर्व धर्मियांना एकाच तराजूतून तोलले गेले पाहिजे, असे वक्तव्य एडवर्ड फालेरो यांनी एका परिसंवादात व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के.टी. थॉमस यांचे या मागणीला समर्थन आहे. देशातील सर्वच धर्मांच्या अनुयायांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कसा करायचे यासाठी कायदे आहेत. हिंदूंची मंदिरे ज्या ट्रस्टमार्फत चालविली जातात, त्या ट्रस्टच्या बायलॉजनुसार ती नियंत्रित केली जातात आणि त्यांच्या अकाऊंट्सचा प्रसंगी न्यायालये आढावादेखील घेऊ शकतात. देशातील संख्येने लहान असलेल्या शीख धर्माची गुरुद्वारेही शिख गुरुद्वार कायद्याद्वारे संचालित होतात. मुस्लिमांच्या ट्रस्टची संपत्ती वक्फ कायद्यानुसार संचालित होते. आपण करीत असलेला खर्च आणि आपल्याजवळची अमाप संपत्ती जगजाहीर होण्याच्या भीतीमुळेच चर्च त्यांच्या अकाऊंट्सच्या न्यायालयीन आढाव्याला विरोध आहे, याकडे थॉमस यांनी लक्ष वेधले आहे. (क्रमशः)
(उद्याच्या अंकात अमेरिकेतील योहानन परिवाराचे भारतातील साम्राज्य)

चर्चचे वास्तव - २०

अमेरिकेतील योहानन परिवाराचे भारतातील साम्राज्य

चारुदत्त कहू
नागपूर, २० सप्टेंबर
undefinedविदेशी देणगी नियमन कायद्यांतर्गत जगात महाकाय म्हणून गणली जाणारी वर्ल्ड व्हिजन ही सर्वात जास्त विदेशी देणग्या मिळणारी संस्था ठरते. तथापि कॅथॉलिक चर्चद्वारे संचालित संस्थांच्या पदरात सरासरी सर्वात जास्त विदेशी देणग्या पडतात ही वस्तुस्थिती आहे. आणखी एक ध्यानात घेण्यासारखी बाब म्हणजे धर्मोपदेशक के. पी. योहानन यांनी स्थापन केलेल्या संघटनांना त्यातल्या त्यात सर्वात जास्त (वर्ल्ड व्हिजनहूनही अधिक) विदेशी देणग्या मिळालेल्या आढळतात. गॉस्पेल फॉर एशिया, बिलिव्हर्स चर्च, लव्ह इंडिया मिनिस्ट्री आणि लास्ट अवर मिनिस्ट्री या सार्‍या संस्थांनी त्यांचा अधिकृत पत्ता मांजाडी, केरळ, पीन कोड - ६८९१०५ किंवा त्याच्या आसपासचा दिला आहे. या सार्‍या संस्थांना अमेरिकेतील गॉस्पेल फॉर एशिया या एकमेव संस्थेकडून विदेशी देणग्या मिळालेल्या आहेत. या संस्थांना २००७ ते २०११ या कालावधील एकूण १ हजार १४५ कोटी रुपयांच्या विदेशी देणग्या मिळाल्या आहेत.
गॉस्पेल फॉर एशिया ५४ बायबल कॉलेजेसच्या माध्यमातून मिशनरी प्रशिक्षणाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम राबविते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मिशनरी कामासाठी पगारी नियुक्त केले जाते. एखाद्या खेड्यात ज्यावेळी अनुयायांची पुरेशी संख्या झाल्याची खात्री पटते त्यावेळी तेथे बिलिव्हर्स चर्चची स्थापना केली जाते. सध्या या ५४ बायबल महाविद्यालयांमधून ९००० विद्यार्थी ख्रिस्पोपदेशाचे धडे घेत आहेत. अथमिया यात्रा ही संस्था बिलिव्हर्स चर्चअंतर्गत कार्य करते. रेडिओ आणि टीव्ही धर्मोपदेशन मालिका, पुस्तक प्रकाशने, धार्मिक संमेलनांचे आयोजन, जनजागरण कार्यक्रम, मदत आणि पुनर्वसन कार्यक्रम हे कार्य पार पाडण्याची जबाबदारी अथमिया यात्रा या संघटनेची आहे. आजघडीला या संस्थेमार्फत ११० भाषांमध्ये रेडिओ संदेश आणि २४ भाषांमधील साहित्यामार्फत येशूचा संदेश प्रसारित केला जात आहे.
ख्रिश्‍चनांच्या संघटनांना मदत करणार्‍या इसीएफए या अधिकृत संस्थेनुसार गॉस्पेल फॉर एशिया (युएसए) या संस्थेचा २०१० सालचा वार्षिक महसूल २८९ कोटी ९४ लाख ७ हजार ४०० रुपये आहे. जीएफए युएसए ही एक धार्मिक आणि ना नफा तत्वावरील कॉर्पोरेट कंपनी असून, ती अरिझोना स्टेटमधून धर्मप्रसाराचे कार्य करते. के. पी योहानन हे या कंपनीचे संचालक आहेत. त्यांची पत्नी जिसेला पुन्नोस आणि मुलगा डॅनियल पुन्नोस हे या कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. मांजाडी, थिरुवल्ला, केरळ येथील गॉस्पेल फॉर एशिया या ट्रस्टमध्येदेखील के. पी योहानन हेच व्यवस्थापकीय विश्‍वस्त आहेत. यावरून असे स्पष्ट होते की, योहानन आणि त्यांचा परिवार अमेरिकेत दाता असून, हाच योहानन परिवार भारतात देणगी स्वीकारणारा आहे. वर्ष २०१० मध्ये योहानन यांच्या भारतातील चार संस्थांना २४२ कोटी १० लाख ९३ हजार ९४८ रुपयांच्या घसघशीत देणग्या मिळाल्या आहेत. जीएफएचे कार्य संपूर्ण आशियात चालते, असे भासविले जात असले तरी त्यांचे कार्य प्रत्यक्षात फक्त भारतातच सुरू असल्याचेही यावरून निदर्शनास येते.
जे लोक ख्रिश्‍चन धर्म स्वीकारतात त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहात नाही, असा जीएफएचा नेहेमीच दावा असतो. मात्र खरा चमत्कार या संस्थेच्या संकेतस्थळाबाबतच आढळतो. या संघटनेच्या संकेतस्थळाला भारतातून भेट दिली असता ते रंजल्या गांजल्या लोकांना मदत करीत असल्याचे दिसते. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला ते धावून जातात, असे त्यांच्या एका पानाच्या माहितीपत्रात स्पष्ट केले आहे. निरनिराळ्या भाषांमधील साहित्य प्रसारात ते अग्रेसर असल्याचे संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे. व्यक्तिमत्व विकास आणि लोकांना येशू ख्रिस्ताचा संदेश पोहोचविण्याचे कार्य आम्ही इमानेइतबारे करतोय्, असा दावाही केलेला दिसतो. तथापि, या संघटनेच्या संकेतस्थळाला भारताबाहेरून भेट दिली असता, या संघटनेची लपवाछपवी, फसवणूक आणि ढोंगीपणा उघड झाल्याशिवाय राहात नाही. जीएफएचे धर्मोपदेशक आजवर कुणीही न पोहोचलेल्या भागात येशूचा प्रसार करण्यात कसे यशस्वी होत आहेत, याच्या शेकडो यशोगाथा तेथे बघायला मिळतात. चर्चच्या पुढाकारामुळे लोकांच्या जीवनात चमत्कार घडून, ते क्रूसवासी कसे होत आहेत, यावरही या संकेतस्थळावर प्रकाश टाकण्यात आला आहे. जीएफएच्या प्रयत्नांमुळेच हजारो लोकांनी येशूलाच आपला भाग्यविधाता मानणे सुरू केले आहे, असे सांगून या संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली पाठ थोपटून घेतली आहे.
जीएफए ही कॉर्पोरेट कंपनी केवळ धर्मांतरणाचाच अजेंडा राबवत नाही तर या संस्थेची येथील रियल इस्टेटमध्येही विशेष रुची असल्याचे आढळून आले आहे.
वर्ष २००५ मध्ये जीएफएने २ हजार २६३ एकरची रबराची शेती मेसर्स हॅरिसन मल्याळम लिमिटेडकडून ६३ कोटी रुपयांत खरेदी केली. इंडियन एक्सप्रेस या दैनिकात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार या संस्थेच्या नावावर चेरुवेल्ली इस्टेट ही केरळमधील अतिशय सुपिक रबराची शेती म्हणून प्रसिद्ध असलेली इस्टेट आहे. याशिवाय गॉस्पेल चर्चजवळ शेकडो एकर जमिनींचे पट्टे, धानाच्या शेतीचे पट्टे आणि मध्य केरळमध्ये पर्यटनाच्या विकासाला वाव असलेली व सौंदर्याने मुसमुसलेली अनेक बेटे आहेत. योहानन यांच्या नेतृत्वाखालील या संस्थेने बिलिव्हर्स चर्चचे केंद्रीय प्रशासकीय अधिकारी जॅकब पोथान यांच्यामार्फत या सार्‍या जमिनी, शेती आणि बेटे खरेदी केली आहेत, असे इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. १९९० सालापासून या चर्चला १ हजार ४० कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. तथापि चर्चेने केवळ १४४ कोटी रिअल इस्टेटकडे वळवले आहे. एकूण आकडेवारीची गोळाबेरीज केली असता योहानन यांच्या संस्थांच्या ताब्यात केरळमधील ४ हजार ५०० एकरची जमीन असल्याचे स्पष्ट होते. (क्रमशः)

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी