Friday, September 21, 2012

इजिप्तमध्ये जादूटोणा

विश्‍वसंचार- मल्हार कृष्ण गोखले 

तारीख: 9/18/2012 11:54:42 PM

जादूटोणा, तंत्रमंत्र, जारणमारण, चेटूक, वशिकरण, करण्या, मुठी, ताईत, उतारे, गंडेदोरे यावर तुम्ही विश्‍वास ठेवा अगर ठेवू नका, पण सृष्टिरचनेत याचंही काही स्थान आहे. त्यांचंही एक स्वतंत्र विश्‍व आहे. भारतीय अध्यात्मशास्त्रात या विद्यांना तंत्रमार्ग असं सर्वसाधारण नाव आहे. कुणाही संताने, दार्शनिकाने या विश्‍वाचं अस्तित्व नाकारलेलं नाही. पण सर्वसामान्य माणसाने या अतिशय धोक्याच्या मार्गाकडे न जाता भक्तिमार्ग धरावा असाच संदेश त्यांनी देऊन ठेवलेला आहे.

पण संकटांनी, दु:खांनी त्रासलेली, गांजून गेलेली माणसं बरेचदा या नको त्या वाटेलाच जातात. आणखीनच संकटात अडकतात. अनेक जण जाणूनबुजून इकडे वळतात. त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं. कुठे कुठे पुरून ठेवलेली गुप्तधनं वगैरे त्यांना हस्तगत करायची असतात. आपल्या शत्रूच्या पाठी भुतं लावायची असतात. दावेदारांचा उच्छेद करायचा असतो. मांत्रिक-तांत्रिकांचं अघोरी विश्‍व चालतं ते या तामसी वृत्तीच्या लोकांच्या बळावरच.
सुमारे एक हजार वर्षांपूर्वी भारतात या तांत्रिक पंथीयांनी फार जोर केला होता. शाक्त, कापालिक, मानभाव, कानफाटे अशांचा नुसता बुजबुजाट झालेला होता. नेमके त्याच वेळेस भारताच्या प्रत्येक प्रांतात अनेक संत अवतीर्ण झाले आणि त्यांनी या वामपंथी तांत्रिकांचा समाजावरला प्रभाव संपुष्टात आणून निर्मळ असा भक्तिमार्ग समाजाला दिला.
हे असं फक्त भारतातच घडतं म्हणून भारतभूमी ही धर्मभूमी मानली जाते. अन्य देशांमध्ये असं घडवून आणायला श्रेष्ठ आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती नाहीतच मुळी. मग तेथे हे अघोरपंथ फोफावतात. युरोपातल्या विविध देशांचा गेल्या काही शतकांचा इतिहास पाहिला, तर या लोकांना माणूस म्हणावं की राक्षस असाच प्रश्‍न पडतो. उदाहरणार्थ ख्रिश्‍चन धर्मच घ्या. येशू ख्रिस्ताचा प्रेमाचा संदेश जगभर वितरित करण्याच्या नादात रोमन कॅथलिक पंथाने जे अनन्वित अत्याचार केले, ते राक्षसांना आणि यमदूतांना देखील लाजवतील असे आहेत.
पण भारतीय आध्यात्मिक परिभाषेत ज्यांना श्रेष्ठ साधक म्हणता येईल, असेही काहीजण ख्रिश्‍चन धर्मात होऊन गेले. त्यांच्याच बळावर तर ख्रिश्‍चन पंथातला अध्यात्मविचार क्षीण स्वरूपात का होईना, तग धरून आहे. पण गांजलेल्या, त्रासलेल्या ज्या सामान्यांना अशा श्रेष्ठ साधकांचं मार्गदर्शन मिळू शकलं नाही, त्यांनी आपलं दु:ख विसरायचं ते कुणाच्या आधाराने? त्यामुळे युरोपात चेटके, जादूगार अशांचा सुळसुळाट असे.
चौदाव्या-पंधराव्या शतकात पोपला या जादूगारांची स्पर्धा जाणवू लागली. लोकांच्या आत्म्यांची व्यवस्था पाहण्याचा संपूर्ण एकाधिकार परमेश्‍वराने आपल्याला दिलेला असताना त्यावर गदा आणणारे हे चेटके कोण? असा प्रश्‍न पोपला पडला आणि पोपच्या फतव्यासरशी अनेक स्त्री-पुरुष चेटक्यांना जिवंत जाळून मारण्यात आलं. यात अनेक निरपराध लोक हकनाक मेले. ही येशूची करुणा! आणि हे शहाणे आम्हा भारतीयांना रानटी आणि असंस्कृत म्हणणार! वा रे संस्कृती! रेनेसॉं म्हणजे पुनरुज्जीवन वगैरे होऊन भौतिक प्रगती झपाट्याने करून घेणार्‍या युरोपची जर ही कथा, तर भुताखेतामागे लागलेल्या मुसलमानांबद्दल काय बोलावं? त्यांच्या एकेक कथा पाहिल्यावर ते भुताखेतांच्या पाठी लागणारे लोक नसून, भुतंच त्यांच्या रूपाने जिवंत होऊन आली असावीत असं वाटतं. त्यामुळे की काय कुणास ठावूक, जादूटोणे आणि जारणमारणाच्या विश्‍वात मुसलमानांचा वावर फार मोठ्या प्रमाणावर दिसतो. अगदी आजसुद्धा.
सध्या इजिप्त हे एक मुस्लिम राष्ट्र आहे. प्रचलित शालेय इतिहासानुसार इजिप्तची सभ्यता ही सर्वाधिक प्राचीन आहे. तिथले ते चमत्कारिक पिरॅमिड्‌स, हजारो वर्षे जतन करून ठेवलेल्या राजे-राण्यांच्या मम्या (म्हणजे मृतदेह, आया नव्हे!) यामुळे तिथलं वातावरण मुळातच गूढ आहे. सर्वच प्राचीन देशांप्रमाणे तेथेही मंत्र-तंत्र, जादूटोणा वगैरे प्रकार सर्रास प्रचलित आहेत.
पण सध्या तिथल्या मांत्रिक मंडळींना एकदम बरकतीचे दिवस आलेत. भुतं उतरविणारे, मूठ मारणारे, करणी करणारे, कॉफीच्या कपात पाहून भविष्य कथन करणारे, तोडगे सुचविणारे, ताईत देणारे अशा लोकांना सध्या तुफान मागणी आहे. देशातल्या इतर प्रांतांपेक्षा नाईल नदीच्या दुआबात असे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत, असं आढळून आलं आहे.
हे लोक आपल्या कामासाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांचाही वापर करू लागले आहेत. शेख युसुफ बदावीकडे भुतानं झपाटलेले लोक येतात. त्याने भूत उतरविण्याच्या मंत्राची कॅसेट बनविली आहे. झपाटलेल्या माणसांच्या कानावर हेडफोन्स बसवून त्यांना तो ही कॅसेट ऐकवतो. शेख इब्राहिम नावाचा दुसरा एक मांत्रिक तर इतका फॉर्मात आहे की त्याच्याकडे नट-नट्या, मोठमोठे सरकारी अधिकारी आणि आखाती देशांमधील गब्बर अरब उद्योगपती येत असतात. तन्ना नावाच्या खेड्यात तो राहतो. त्याच्याकडे येणारी काही बडी धेंडं चक्क हेलिकॉप्टरने येतात.
या मांत्रिकांच्या मंत्र-तंत्राच्या पद्धती आपण नेहमी ऐकतो, वाचतो तसल्याच आहेत. झपाटलेल्या माणसांना चाबकाने झोडपणे, मंत्रवलेलं पाणी वा तेल अंगाला चोळणे, लिंबांना टाचण्या टोचून छा-छू करणे, बाहुल्या टांगणे इत्यादी. असल्या उद्योगांमुळे नेहमीच घडणार्‍या गुन्हेगारी घटनाही अर्थातच वाढल्या आहेत. भूत उतरविण्यासाठी चाबकाने फोडून काढल्यावर काही नाजूक लोक मरण पावले. त्यांच्या चिडलेल्या नातेवाईकांनी मग मांत्रिकाला धरून बडवला. परिणामी तोही मेला. एका मांत्रिकाने एका इसमाच्या अंगातलं भूत उतरवलं. काही दिवसांनी त्या इसमाचा सावत्र मुलगा आला आणि त्याने मांत्रिकाला ठार मारलं. का, तर म्हणे मांत्रिकाने बापाच्या अंगातलं भूत उतरवून त्या मुलाच्या पाठी लावलं.
राजधानी कैरोतलं अल् अझर विद्यापीठ हे इस्लामच्या सुन्नी पंथाचं सर्वोच्च विद्यापीठ. तिथल्या कुराणतज्ज्ञांच्या मते चांगली किंवा वाईट भुतं अस्तित्वात आहेत. जसे पशुपक्षी, किडेमुंग्या तशी भुतं. पण ती भुतं माणसाला झपाटू शकतात, हे मात्र इस्लामला मान्य नाही.
शाहिदा-अल्-बाझ नावाची समाजशास्त्रज्ञ महिला एक अभ्यास म्हणून मुद्दाम नाईल नदीच्या दुआब प्रदेशात हिंडली. मंत्र-तंत्राच्या आहारी गेलेल्या, भुतांनी झपाटलेल्या, गुप्तधनाच्या मागे लागलेल्या आणि स्वत:च मांत्रिक असलेल्या अशा अनेक व्यक्तींच्या मुलाखती तिने घेतल्या. त्यातून निघालेला निष्कर्ष असा की गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित असे सर्व थरातले लोक या जादूटोण्याच्या मागे लागलेले आहेत आणि मांत्रिक असलेल्यांपैकी बहुसंख्य लोक चक्क सरकारी नोकर आहेत. पगाराच्या चौपट पैसे ते या उद्योगातून कमावतात.
डायलॉगबाजी
उत्तम चित्रपटासाठी अत्यावश्यक असलेली पहिली गोष्ट म्हणजे उत्तम पटकथा. पटकथा जितकी बांधीव, पकड घेणारी तितकं चित्रपटाचं यश निश्‍चित. अर्थात दिग्दर्शक, नटनट्या यांचं महत्त्व कमी नव्हे, पण पटकथाच ठिसूळ असली, तर बाकी सगळं उत्तम असूनही चित्रपट बोंबलणार हे नक्की असतं.
उत्तम पटकथेत जान येते ती खटकेबाज संवादांनी. संवादांमुळे प्रसंगांमधलं नाट्य अधिक खुलत जातं. परिणामकारक होत जातं. खटकेबाज संवादांनी रंगलेले प्रसंग अक्षरश: हजारांनी सांगता येतील. आपल्या हिंदी चित्रपटात दिलीपकुमार, सोहराब मोदी, राजकुमार, अमिताभ बच्चन ही मंडळी त्यांच्या विशिष्ट संवादफेकीसाठीच प्रसिद्ध आहेत. शोले चित्रपटातल्या अमजदखानच्या संवादाच्या तर ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि लाखोंनी खपल्या. अनेक चित्रपटशौकिनांना आपल्या आवडत्या नटांचे अनेक संवाद धडाधडा तोंडपाठ असतात. पण यातला सर्वात आवडता संवाद म्हणजे डायलॉग हो- कोणता असं विचारलं तर?
हा उपक्रम ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने केला. अर्थात अमेरिकन. ‘तुम्हाला सर्वाधिक आवडणारा संवाद कोणता?’ असं गिनेस बुकने चित्रपटशौकिनांना विचारलं. यासाठी काळ, नट, नटी असं कोणतंही बंधन नव्हतं. फक्त एकच बंधन होतं ते म्हणजे, हा संवाद एकाच वाक्याचा असला पाहिजे.
गिनेस बुकवर लक्षावधी पत्रांचा पाऊस पडला. उत्तरांचं विश्‍लेषण सुरू झालं आणि त्यातून सर्वाधिक पसंतीचा, पहिल्या क्रमांकाचा ठरलेला संवाद ठरला. ‘आय ऍम बॉंड, जेम्स बॉंड,’ हा १९६२ सालच्या डॉ. नो. या चित्रपटातला अभिनेता शॉन कॉनरीचा संवाद.
हॉलीवूडचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता हंफ्रे बोगार्ट याचा ‘कॅसाब्लांका’ या तितक्याच गाजलेल्या चित्रपटातला संवाद अगदी अल्पशा मतांनी पिछाडीवर राहून दुसर्‍या क्रमांकावर गेला. त्यानंतर मग मिया वेस्ट, ग्रेटा गार्बो, अर्नोल्ड श्‍वार्झनेगर, ग्राऊचो मार्क्स, क्लार्क गेबल, रॉबर्ट डी निरो यांच्या संवादाचे क्रम लागले.
बॉंडच्या या सर्वाधिक लोकप्रिय संवादाचं रहस्य कदाचित हे असू शकेल की, प्रत्येक बॉंडपटात तो संवाद, ते वाक्य हमखास असतंच, मग बॉंडच्या भूमिकेत शॉन कॉनरी असो, रॉजर मूर असो वा पिअर्स ब्रॉसनन असो.
हिंदी चित्रपटाबाबत अशी मतं मागवली तर कोणत्या एका वाक्याच्या संवादाला सर्वाधिक मतं मिळतील बरं?
चंद्र बचावला
१९६९ साली पहिला अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला. चंद्रावर माणूस उतरवण्याची अमेरिका आणि सोव्हिएत संघात लागलेली स्पर्धा अमेरिकेने जिंकली. सोव्हिएत अध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव्ह हे क्रमाक्रमाने संतप्त, निराश आणि शांत झाले. मग त्यांनी अंतराळ शास्त्रज्ञांची एक बैठक घेतली आणि त्यांना फर्मावलं. ‘जे झालं ते झालं. पण आता आपले अंतराळवीर सूर्यावर पाठवण्याची तयारी सुरू करा.’ शास्त्रज्ञ चाचरत म्हणाले, ‘पण सर, ते कसं शक्य आहे? अंतराळयानासकट सगळ्यांची राख होईल.’ ब्रेझनेव्ह शेरलॉक होम्सच्या थाटात उद्गारले. ‘प्रिलिमिनरी, माय डियर! आपण त्यांना रात्री पाठवू!’
सोव्हिएत राजवटीच्या काळातले अनेक खरे-खोटे किस्से चवीने सांगितले जातात. त्यातलाच वरचा एक किस्सा. पण परवाच युरो चेर्तोक या वरिष्ठ रशियन शास्त्रज्ञाने याच जातीचा एक धमाल (खरा) किस्सा सांगितला.
स्टालिनच्या मृत्यूनंतर क्रुश्‍चेव राष्ट्राध्यक्ष झाले. यावेळी अमेरिका-सोव्हिएत शीतयुद्ध ऐन भरात होतं. क्रुश्‍चेव यांची अफलातून कल्पना अशी की, चांद्रभूमीवर अणुस्फोट घडवून आणायचा आणि त्याद्वारे सोव्हिएत संघाच्या जबर सामर्थ्याचा दिमाख सगळ्या जगाला दाखवायचा. क्रुश्‍चेव यांना स्वत:लाच ही कल्पना सुचली की कुणा रिकामटेकड्या सल्लागाराने त्यांच्या डोक्यात घुसवली, कोण जाणे! पण क्रुश्‍चेवना ती भलतीच पसंत पडली. अणुबॉम्बच्या स्फोटाने तयार झालेला छत्रीसारखा प्रचंड ढग पाहायला ते मोठे उत्सुक होऊन गेले. त्यांनी अंतराळ शास्त्रज्ञ आणि अणुशास्त्रज्ञ यांना ताबडतोब चांद्रभूमीवर अणुस्फोट करण्याचे आदेश दिले.
ही अफाट कल्पना ऐकून बिचारे शास्त्रज्ञ हतबुद्ध झाले. हा निव्वळ आचरटपणा आहे. हे क्रुश्‍चेवना सांगणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? चेर्तोक सांगतात की, अखेर आम्ही क्रुश्‍चेवना पटवण्यात यशस्वी झालो. आम्ही त्यांना सांगितलं की, ‘चांद्रभूमीवर आपण अणुस्फोट करू, पण धुराची ती प्रचंड छत्री पृथ्वीवरून दिसणार नसेल तर उपयोग काय?’ हा मुद्दा क्रुश्‍चेवना पटला आणि त्यांनी आपला आदेश मागे घेतला. सगळ्यांनीच सुटकेचा श्‍वास सोडला. चंद्रासकट!

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी