Tuesday, November 6, 2012

मोदी पंतप्रधान झाले तर...

भाऊ तोरसेकर  





   नुकतेच गेल्या रविवारी, विसनगर, गोविंदचकला पटेलवाडीमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या उपस्थितीत सक्रीय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात वाघेला यांनी आपल्या भाषणात एक टिप्पणी केली. ’गुजरातमध्ये गेल्या २० वर्षांपासून कॉंग्रेस हरत आली आहे. अजून एखाद्या वेळी कॉंग्रेस हरेलही, पण जर का गुजरातमध्ये भाजप हरला तर नरेंद्रभाई मोदींचे काय होईल?’


   तशी या घटनेची वा बातमीची राष्ट्रीय म्हणवणार्‍या माध्यमांनी फ़ारशी दखल घेतली नाही. कारण त्यात मोदी यांची टिंगल असली, तरी कुठला गंभीर आरोप वाघेला यांनी केलेला नाही. मात्र स्थानिक गुजराती वृत्तपत्रातुन ही बातमी झळकली. तरीही त्यासंदर्भात कुठला उहापोह करण्याची कोणाला फ़ारशी गरज वाटली नाही. यातूनच आपल्या माध्यमांचा उथळपणा लक्षात येतो. याचे कारण असे आहे, की गेल्या दहा वर्षात गुजरातच्या दंगलीनंतर मोदी याच्या विरोधात देशभर माध्यमे व राजकीय विरोधकांनी सतत रान उठवले आहे. त्या सगळ्या विरोधी प्रचाराला झुगारून मोदी यांनी आपल्याला जे करायचे ते चालूच ठेवले आहे. त्यातून त्यांच्या पक्षातही त्यांचे अनेक विरोधक तयार झाले आहेत. त्यापैकी वाघेला व केशूभाई पटेल यांनी मोदी विरोधात उघडपणे आघाडीवर येण्याची हिंमत दाखवली आणि आयुष्य ज्यासाठी घालवले त्या पक्षाचाही त्याग केला आहे. आता गुजरात बाहेरही मोदी यांचे स्वपक्षात अनेक विरोधक तयार झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्या राजकारणाला पुरक फ़ासे पडत आहेत, तोवर कोणाला दाद देण्याची त्यांना गरज नाही. पण निवडणुकीत पराभव झाल्यास त्यांच्या बाजूने कोण उभा राहिल; हा खरेच गंभीर प्रश्न आहे. त्यामुळेच वाघेला यांनी विचारलेल्या प्रश्नाला मोठाच राजकीय अर्थ आहे. त्याचा साधासरळ अर्थ इतकाच, की सत्ता गेली मग भाजप तरी मोदींना संरक्षण देणार आहे काय? सत्ता गमावल्यास या माणसाच्या हाती काय शिल्लक राहिल, असा तो प्रश्न आहे.

   पण दुर्दैव असे, की कोणीच त्याची गंभीर दखल घेतली नाही. सर्वसामान्य पत्रकारांनी त्या विधानाला विशेष महत्व दिले नाहीच. पण ज्यांना मोदी यांचा पराभव बघायची मोठीच इच्छा आहे; अशा त्यांच्या सर्व क्षेत्रातील विरोधकांनीही वाघेला यांच्या त्या विधानाची चर्चाही करू नये, याचे खरेच नवल वाटते. इतकी अबाधित सत्ता भोगणारा व पक्षातही इतके शत्रू निर्माण करणार्‍या माणसाचा पराभव झाल्यास भवितव्य काय? असे वाघेला का म्हणाले ते आधी बघू. त्याचे कारण उत्तरप्रदेशात मायावतींनी सत्ता गमावली आहे. बिहारामध्ये लालुप्रसाद यांनी सत्ता गमावली आहे. कर्नाटकात येदीयुरप्पा स्वपक्षातही सत्तेसाठी काय कसरती करतात ते आपण बघतच आहोत. तिकडे बंगालमध्ये सत्ता गमावल्यापासून डाव्या आघाडीच्या लढवय्या नेत्यांचे पडलेले, कोमेजलेले चेहरे आपल्यासमोर आहेत. मग त्या सर्वांपेक्षा अधिक उर्मट व उद्धटपणे सत्ता राबवणार्‍या मोदींचे काय होईल; हा खरेच गंभीरपणे विचार करण्याचा विषय नाही का? पण तसे कुठे झाले नाही. गुजरातबाहेर कोणी त्या विधानाची दखलही घेतली नाही. पण एका किरकोळ गुजराती दैनिकाच्या जागरूक संपादकाने त्याची नुसती दखलच घेतली नाही, तर त्यावर सुंदर विश्लेषण केले आहे. तेवढ्याच एका जागरुक वाचकाने तो मजकूर माझ्याकडे पाठवून, त्यावर भाष्य़ करण्यास मला सुचवले. विलास भागवत असे त्या वाचकाने नाव अहे आणि त्यासाठी मी त्याचे मन:पुर्वक आभार मानतो. ‘पंजोकच्छ’ असे त्या गुजराती वृत्तपत्राचे नाव आहे आणि त्याच्या संपादकांनी वाघेला यांच्या विधानावर केलेले भाष्य़ मोठे मार्मिक आहे. ‘मोदीनु सु थशे?’ अशा शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या त्या संपादकीयाचे स्वैर भाषांतर पुढीलप्रमाणे आहे.

   ‘मुख्यमंत्री नरेंद्र मोदी संत आत्मा आहेत.. ज्यांनी संसार, परिवार सोडून स्वत:चे जीवन गुजरात आणि देशासाठी समर्पीत केले आहे. नरेंद्रभाईना संत अशाकरिता म्हणायचे, की खरा संत जेव्हा आपला परिवार आणि कुटुंब सोडून देशसेवेसाठी बाहेर पडतो; तेव्हा तेव्हा तो परिवार आणि कुटुंबाची चिंता करीत नाही. अशा संतासाठी समग्र देशातील जनता परिवार बनून जाते. सद्यस्थितीत जेव्हा आपण अन्य राज्यांच्या मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान यांच्याशी मोदींची तुलना करतो, तेव्हा या लोकानीं सत्तापदे सांभाळल्यानंतर स्वत:चा आणि स्वत:च्या परिवारचा विकासा याशिवाय काही केलेले नाही. नरेन्द्र भाईना संत एवढ्यासाठी म्हणायचे, की त्यांना आपल्या परिवाराप्रति आपुलकीची भावना जरूर आहे. पण त्यांनी सत्तेचा गैरफायदा आपल्या परिवाराला मिळू दिलेला नाही. नरेन्द्रभाईच्या परिवारात सदस्य म्हणून विचार करताना पहिले नाव ज्येष्ठ बंधू सोमाभाई मोदी, यांचे येते. सोमनाथभाई वडनगर येथे वृद्धाश्रम तर अहमदावाद येथे सर्वोदय सेवा ट्रस्ट चालवतात. समाज सेवेचे व्रत त्यांनी अंगिकारले आहे. त्यांच्याकडे आजमितीस स्वत:चे वाहन सुद्धा नाही. दोन क्रमांका्चे भाऊ अमृतभाई मोदी, मिलमध्ये नोकरी करून निवृत्त झाले असून सध्या अहमदावाद येथे सामान्य नागरीकाचे जीवन व्यतीत करीत आहेत. तिसरा क्रमांक नरेन्द्रभाईंचा. क्रमांक चारचे बंधू प्रल्हादभाई रेशनिंगचे दुकान चालवतात. ज्यांच्यात पण दामोदरदास मोदींचे रक्त सळसळते आहे. ते गुजरात राज्य रेशनिंग असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. रेशनिंग दुकानदारांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री भावापुढे लढा देण्यासही ते मागेपुढे पहात नाहीत. पाचव्या क्रमांकाचे बंधु पंकजभाई मोदी गुजरात राज्य माहिती खात्यात नोकरी करतात आणि त्यांना मिळालेल्या सरकारी निवासात सामान्य सरकारी कर्मचार्‍याप्रमाणे रहातात. बंधु मुख्यमंत्री असुनही त्यांनी त्याचा दुरुपयोग करुन कोणत्याही प्रकारचे प्रमोशन मिळवलेले नाही. सर्वात लहान बहिण वासंतीबेन विसनगर इथे आयुर्विमा महामंडळात नोकरी करते आणि हसमुखभाई मोदींची ती धर्मपत्नी आहे. 

   डॉ. मिहिरभाई जोशींचे वडील द्वारकादास जो्शी यांनी स्वेच्छा-मरणासाठी अन्नपाण्याचा त्याग केला; तेव्हा नरेंद्रभाई द्वारकादास काकाना समजावण्यासाठी विसनगर येथे आले होते. त्यावेळी वासंतीबेन सामान्य प्रजेप्रमाणे नरेंद्रभाईंना पहाण्यासाठी गर्दीत उभ्या होत्या. नरेंद्रभाईनीं जेंव्हा आपल्या धाकट्या भगिनीला गर्दीत ओळखले, तेव्हा वहानांचा ताफा थांबवून ते बहीणीला भेटले होते. नरेंद्रभाईंच्या मातोश्री हिराबा मोदी, पंकजभाईकडे गांधीनगर येथे रहातात. नरेंद्रभाईं त्यांच्या वाढदिवशी आणि बेसतु वर्ष (दिवाळी पाडवा) या दोन दिवशी मातोश्रींची आशिर्वाद घेण्यासाठी पंकजभाईकडे गांधीनगर येथे जातात. नरेंद्रभाईंचा परिवार मोठा आहे. भाऊ, बहिण, पुतणे, पुतण्या, जावई, मेव्हणे, भाचे इत्यादी. पण त्यांच्या परिवारतील लोकानीं सत्तेचा कधी दुरुपयोग केला नाही. तसा एकही प्रसंग सांगता येत नाही. दुसरा कुणी एवढा मोठा नेता असता तर त्याचे नातेवाईक, मित्रपरिवार सत्ता राबवून फळे चाखाण्यासाठी जमा होत असतात. जे मुख्यमंत्री नरेंद्रभाईंच्या शासन काळात कधीच पहाण्यास मिळाले नाही.  खर्‍या संतास कधी संपत्तीचा मोह नसतो. नरेंद्रभाईंच्या नावे मोठा बॅंक बॅलन्स आहे असे कधी पहाण्यात वा ऐकण्यात आले नाही. त्यांनी उद्योगपतींना प्रोत्साहन दिले, पण ते गुजरातच्या विकासासाठी. सार्वजनिक कार्यक्रमात मिळणार्‍या भेटवस्तू इतर नेते घरी घेउन जातात. पण नरेंद्रभाईं अशा मिळालेल्या भेटवस्तू गुजरात राज्याच्या कोषात जमा करतात. त्यांचा जाहिर लिलाव होतो आणि लिलावात मिळणारी करोडो रुपयांची रक्कम, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च होते. परिवाराच्या हिताकडे पाठ फ़िरवून देश आणि देशातील लोकांच्या सेवेचा ध्यास घेऊन जे कार्यरत रहातात; त्यांनाच खरे संत म्हणतात. या अर्थाने नरेंद्रभाई खरे संत आहेत. अशा महान पुरुषाच्या शक्तीचा, बुद्धीचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. सत्तेच्या लालची लोकांनी नरेंद्रभाईना दुषणे देण्याचे काहीच बाकी ठेवले नाही. अशा निस्पृह व्यक्तीकडे सत्ता असली काय किंवा नसली काय; त्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. भाजप हरला तर नरेन्द्रभाईंना काहीच फरक पडणार नाही, पण सहा करोड गुजराती जनतेला मात्र जरुर फरक पडणार, हे निर्विवाद सत्य आहे.’  

   इथे त्या संपादकाला आपल्या कर्तबगार मुख्यमंत्र्याचे प्रचंड कौतुक आहे यात शंकाच नाही. त्याच्या साधेपणाने भारावून त्याने मोदी यांचे गुणगान केले आहे. तसेच मोदी यांना संतही ठरवले आहे. असे म्हटल्यावर टिकाकारांना लगेच बाकीच्या गोष्टी बाजूला पडून गुजरातची दंगल आठवणार यात शंकाच नाही. पण ज्यांना दंगल व तो हिंसाचार आठवतो, त्यापैकी कितीजणांनी मोदी यांच्या अशा व्यक्तीगत जीवनाची आजवर जाहिर वाच्यता केली आहे? नसेल तर का केली नाही? या संपादकाला त्याच मुख्यमंत्र्यामध्ये संत बघायचा असतो तर टिकाकारांना संतामधला सैतान बघायचा असतो. पण मला त्या वादात पडायचे नाही. माझा विषय आहे वाघेला यांचे विधान, मोदींचे काय होणार? मोदीनु सू थशे? आणि त्या प्रश्नाचे उत्तर त्या संपादकाने शेवटच्या वाक्यात दिले आहे. ‘अशा निस्पृह व्यक्तीकडे सत्ता असली काय किंवा नसली काय; त्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. भाजप हरला तर नरेन्द्रभाईंना काहीच फरक पडणार नाही, पण सहा करोड गुजराती जनतेला मात्र जरुर फरक पडणार आहे.’

   मोदी यांची सत्ता गेल्यावर काय, असा प्रश्न वाघेला विचारतात, तेव्हा त्यांनी मोदींची तुलना स्वत:शी वा अन्य सत्तालोलुप नेत्यांशी केलेली आहे. राजकारणात जायचे तर त्याचे स्वत:साठी व आपल्या आप्तस्वकीयांसाठी कोणकोणते लाभ उठवता येतील, त्यावरच डोळा ठेवून तिकडे लोक येत असतात. लोककल्याण व लोकसेवेच्या कर्तव्यभावनेने सार्वजनिक जीवनात येण्य़ाची संकल्पना आज कालबाह्य झाली आहे, त्याचाच हा परिणाम आहे. मोदीसुद्धा आपल्यासारखा व इतरांप्रमाणे सत्तेसाठी व त्यातुन मिळणार्‍या लाभासाठी हपापलेला आहे, हे वाघेला यांचे गृहित आहे. तिथेच त्या प्रश्नातली गडबड आहे. कारण वाघेला यांचे गृहितच चुकीचे आहे. सत्ता कशासाठी व कोणासाठी यासंबंधी मोदी व अन्य नेत्यांच्या संकल्पनाच भिन्न आहेत. म्हणूनच दहा वर्षात त्यांच्यावर कुठलेही दंगल व कत्तलीचे आरोप होऊ शकले, तरी पैशाची अफ़रातफ़र किंवा भ्रष्टाचाराचा एकही आरोप कोणी करू शकलेला नाही. त्याचवेळी घराणेशाही किंवा आप्त नातलगांना त्यांच्या सत्तेचा कुठला फ़ायदा मिळाल्याचे उदाहरण नाही. शिवाय ही बाब त्यांच्या व्यक्तीपुरतीच मर्यादित नाही. त्यांनी गुजरातची सत्ता राबवताना आपल्या पक्ष सहकार्‍यांनाही भ्रष्टाचार करू दिलेला नाही. किंबहुना त्यामुळेच केशूभाई किंवा झडापिया यांच्यासारखे त्यांचेच निकटवर्ति सहकारी त्यांच्यापासून दुरावले आहेत. हाच मोठा फ़रक आहे. म्हणूनच ‘मोदीनु सु थशे’ हा प्रश्न खरेच सर्वांनी गंभीरपणे विचार करण्यासारखा आहे.

   ज्याच्या हाताल दंगलीत बळी पडलेल्या मुस्लिमांच्या हत्याकांडाचे रक्त लागलेले आहे, त्याला संत म्हणायचे काय, असा प्रश्न कुत्सितपणे विचारला जाऊ शकतो. तर त्याला उत्तर नाही. कारण असा प्रश्न उत्तरासाठी विचारला जातच नसतो, तर खिजवण्यासाठी विचारला जात असतो. मुद्दा आहे, तो मोदी संत असण्याचा वा नसण्याचा नाहीच. आजच्या परिस्थितीत मोदी हे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जात आहे, तेव्हा अशा प्रश्नाचे महत्व वेगळे आहे. लोक या माणसाकडे इतके आकर्षित का होत आहेत वा त्यांच्याविषयी देशभरातील मोठ्या लोकसंख्येच्या अपेक्षा का वाढत आहेत, याला महत्व आहे. म्हणून मोदींचे वर्णन एका गुजराती संपादकाने संत अशा शब्दात केले तर मी भारावून त्याकडे बघणार नाही. कारण तोंडावर संत म्हणायचे आणि पाठ वळली मग त्याच संताला सैतान ठरवायचे; याला हल्ली ‘अचुक बातमी ठाम मत’ म्हणतात. कायबीइन लोकमत वाहिनीचे मालक विजय दर्डा यांनीच अशा धोरणी पत्रकारितेची अलिकडे साक्ष दिलेली आहे. एका कार्यक्रमात त्यांनीही व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय संत अशी उपाधी दिली होती आणि त्याच्या बदल्यात त्यांचावर पक्षश्रेष्ठींची मोठीच अवकृपा होईल, असे भाकित मोदींनी तिथल्या तिथे केले होते. मग चोविस तास उलटण्यापुर्वी मोदींना संत म्हटल्याबद्दल विजय दर्डा यांना आपल्याच वृत्तपत्रातून लोटांगण घालण्याची वेळ आली होती. मग आपल्याला संत म्हणायचे नव्हते तर सैतानच कसे म्हणायचे होते, त्याचा खुलासा करीत दर्डा यांना दारोदार फ़िरावे लागले होते. म्हणूनच कुठल्या संपादकाने मोदींना संत ठरवल्याने मी त्यांना संतमहंत म्हणत नाही किंवा मानतही नाही. माझ्या दृष्टीने ज्याचे नाव भावी पंतप्रधान म्हणून घेतले जात आहे, म्हणूनच त्यांचे राजकीय व प्रशासकीय चरित्र काय आहे, तेवढी बाब मोलाची.

   आज भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यापासून युपीए व कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी याच्या जावयापर्यंत, प्रत्येकाने राजकीय सत्तेचा फ़ायदा घेऊन देशाची व पर्यायाने सामान्य जनतेची लूट केली; अशा बातम्यांचा रोजच्या रोज भडीमार होत आहे, अशा पार्श्वभूमीवर मोदींबद्दलचे आकर्षण समजून घ्यावे लागेल. त्यासाठी मग सामान्य लोक कसा विचार करतात, तेच मुळात समजून घ्यायला हवे. ज्याला धान्य खरेदी करायचे असते, तो कधी कापडाच्या दुकानात जात नाही आणि कापड खरेदी करायचे आहे तो इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात शिरत नाही. ज्याला टिव्ही घ्यायचा अहे तो पेट्रोल पंपावर जाणार नाही किंवा बस पकडणारा रेल्वेस्थानकात शिरत नाही. दुकान किती चांगले वा आकर्षक आहे, त्याकडे बघून ग्राहक तिथे जात नाही तर त्याच्या गरजेनुसारच तो दुकान निवडतो आणि तिथे जात असतो. सामान्य माणूस तसाच विचार करतो. आज देशातल्या जनतेसमोर ज्या बातम्या व घोटाळे येत आहेत, त्यातुन त्याच्या मनात अनेक विचार घोळत आहेत आणि भविष्यात आपण काय केले पाहिजे त्याचे आडाखे तो मनोमन बांधत असतो. त्याचा थांगपत्ता वातानुकुलीत केबिनमध्ये बसुन पुस्तकांचा अभ्यास करणार्‍यांना नसतो. म्हणूनच ते सामान्य माणसाप्रमाणे विचार करत नाहीत की त्याच्या निवडीचा अंदाज बांधू शकत नाहीत. ज्या घोटाळे, भ्रष्टाचार, अफ़रातफ़री व महागाई, अराजकाने आजचा समान्य माणूस रडकुंडीला आलेला आहे, तो आपली आवडनिवड संपादकाने कुणाला संत म्हटले, म्हणून त्याच्या भक्तीला लागण्याच्या दिशेने सरकू देत नाही. त्याची निवड आपल्या गरजा व त्यानुसार उपलब्धता यादृष्टीने होत असते. आज त्याचे जीवन वैचारिक भूमिकांमुळे गांजलेले नाही, तर त्या वैचारिक भूमिका मांडून सत्ता बळकावणार्‍यांच्या भ्रष्ट वर्तनाने उध्वस्त झालेले आहे. मग त्याचा धर्म वा जात, भाषा, प्रांत कुठलाही असो. त्यातून त्याला मार्ग शोधायचा आहे. त्यामुळेच त्याला सत्तेवर येणारा पक्ष किंवा सत्ता राबवणारा नेता कसा हवा; त्याबद्दल त्याचे ठोकताळे तयार होत आहेत. ते ठोकताळे काय असावेत?

   त्या सामान्य भारतीय जनतेला कोणी संतमहंत, त्यागी पुरूष सत्तेवर हवा आहे काय? त्याला धर्मनिरपेक्ष व पुरोगामी पक्ष हवा आहे काय? तोंडाने आम आदमीची चिंता करणारा व त्याच आम आदमीचे जीवन देशोधडीला लावणारा सत्ताधीश हवा आहे काय? की त्या सामान्य माणसाला त्याच्या गांजलेल्या जीवनातून दिलासा देणारा व स्वच्छ कारभारातून विकासाची हमी देणारा सत्ताधारी हवा आहे? त्याला स्वच्छ चरित्र्याचा पण राजरोस चालू असलेली लुटमार थांबवण्यात अपयशी ठरणारा चारित्र्यसंपन्न नेता हवा आहे, की खंबीरपणे योग्य निर्णय घेऊन सत्ता राबवणारा व पक्षहितापेक्षाही सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारा कोणी पंतप्रधानपदी हवा आहे? ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकत नाही, जो जीवनाला भेड्सावणार्‍या प्रश्नांना थेट भिडतो आणि विकासाची कास धरतो, कठोर निर्णय घेऊ शकतो व प्रसंगी कायद्याचे अवडंबर न माजवता लोकांचे प्रश्न सोडवू शकतो; असाच पंतप्रधान लोकांना हवा आहे का? असेल तर मग उपलब्ध नेत्यांमध्ये असा पर्याय कोणता आहे? ज्याचे नातेगोते सत्तेचा लाभ उठवून लुट करणार नाहीत, ज्याच्या पक्षाच्या नेत्यांना वा सहकार्‍यांना लूटमार करण्याची संधी मिळणार नाही. ज्याच्यावर असे कुठले आरोप दहा वर्षाच्या कारकिर्दीत होऊ शकलेले नाहीत. ज्याच्या राज्यात विकास होतो आहे आणि जनजीवन सुरक्षित व सुसह्य आहे. तिकडे आपोआप सामान्य माणसाचा ओढा असणार. राजकीय, आर्थिक व प्रशासकिय अराजकातून या समाजाला व देशाला वाट काढून देईल आणि ते करताना कोण काय म्हणतो; त्याची फ़िकीर करणार नाही असा खंबीर नेता लोकांना हवा आहे व लोक याच्या शोधात आहेत. आणि गुजरातबद्दल दहा वर्षात जे काही लोकांच्या कानी आले आहे; ते त्यांना मोदींकडे आकर्षित करते आहे. ते विचारवंत वा पत्रकार मंडळींना आवडणारे असो किंवा नसो, लोक तो पर्याय निवडत असतात. त्याचीच प्रचिती मग मतचाचण्यांतून येत असते.

   म्हणूनच वाघेला यांचा प्रश्नच चुकीचा आहे. ‘मोदीनु सु थशे’ असा प्रश्नच नाही. ज्याला स्वत:चे मोह, लोभ नाहीत त्याला सत्ता हाताशी असली किंवा गेली म्हणुन फ़रक पडत नाही. तो फ़रक ज्यांना पडतो, त्यात केशुभाई, वाघेला, लालू, अडवाणी, शरद पवार इत्यादींचा समावेश होतो. मोदींसाठी तो निकषच नाही. प्रश्न उलटा आहे. मोदी पंतप्रधान पदापर्यंत जाऊन पोहोचले, तर मग उर्वरित राष्ट्रीय नेत्यांचे काय होईल? कारण गुजरातप्रमाणे मोदींनी देशाच्या कारभारात सुधारणा व प्रगती करून दखवली, तर वाघेलांसारख्या प्रवृत्तीचे जे डझनावारी राष्ट्रीय नेते दिल्लीत घोटाळत आहेत, त्यांचे काय होणार? गुजरातीमध्ये सांगायचे तर म्हणावे लागेल, ‘अगर मोदी वडाप्रधान थाय, तो बाकी नेतानु सु थशे?’ कारण मोदी नुसता स्वत: स्वच्छ रहात नाही. तो स्वत: पैसे खात नाहीच, पण दुसर्‍यांनाही खाऊ देत नाही ना?
http://panchanaama.blogspot.in/2012/11/blog-post.html

शनिवार 3 नोव्हेंबर 2012

मोदी जिंकले...

 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी