Friday, November 9, 2012

मावळत्या दहशतवादाचे प्रतीक बनेल का मलाला?

मुजफ्फर हुसेन
मिहिलांच्या संदर्भात मुस्लिम देशांमध्ये अलीकडे कोणती ना कोणती घडामोड होतच असते. पाकिस्तान तर प्रारंभापासूनच या विषयात सर्वांच्या समोर आहे. मुख्तारन बी चे प्रकरण जेव्हा घडले, तेव्हा संपूर्ण जग स्तंभित झाले होते. एका कबिल्याने, एका महिलेवर आठ जणांनी बलात्कार करावा, असा फतवा काढला आणि त्या असहाय महिलेवर आठ जणांनी अत्याचार केला. पाकिस्तानात अजूनही कबिल्यांचे जागोजागी प्रस्थ असल्यामुळे, तेथे असे फतवे निघणे ही नित्याचीच बाब झाली आहे.
मुख्तारन बी चे प्रकरण इतके गाजले की, अमेरिकेलाही त्याची दखल घ्यावी लागली! अमेरिकेने त्या महिलेला आपल्या देशात येण्याचे आवाहन केले आणि व्हिसाही दिला. त्यावेळचे बेशरम हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी यावर असे व्यंग्य केले होते की, ज्या कुणा महिलेला अमेरिकेचा व्हिसा हवा आहे, तिने स्वत:वर, मुख्तारन बनून बलात्कार करवून घ्यावा. वनी आणि कुराणच्या आधारावर विवाहासारख्या अमानवीय घटनांमुळे तेथील महिला सतत आक्रोश करीत आहेत. काही दिवसांपूर्वी मलाला नावाच्या १४ वर्षांच्या एका मुलीवर तालिबान्यांनी गोळीबार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही बातमी जंगलात लागलेल्या वणव्यासारखी संपूर्ण जगभर पसरली. पाकिस्तानी मीडियात तिच्या वयाबाबत मतभेद आहेत. काहींचे म्हणणे आहे की, ती १४ वर्षांची आहे, तर काहींचे म्हणणे आहे की, ती केवळ ११ वर्षांचीच आहे. काहीही असले, तरी एका अल्पवयीन मुलीवर अतिशय अन्याय आणि अत्याचार करण्यात आला, हे स्पष्ट झाले. दुसरी सर्वांत महत्त्वाची बाब अशी की, तालिबान्यांसारख्या क्रूरकर्म्यांचा विरोध करण्यासाठी ती एखाद्या अभेद्य भिंतीसारखी उभी ठाकली, ज्या तालिबान्यांनी सातत्याने महिलांचा छळ चालविला होता. या घटनेनंतर पाकिस्तानसोबत संपूर्ण जग मलालाच्या बाजूने उभे झाले. मलाला ही स्वात खोर्‍याची सुपुत्री असून, तिने, मुलींना शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे, असा निर्धार करून प्रभावीपणे आंदोलन चालविले होते. पाकिस्तानात महिलांवर जे अत्याचार होत आहेत, ती तेथे नवी बाब नाही. अनंत काळापासून तेथील महिलांच्या नशिबी हा अत्याचार आला आहे. पण, नवी बाब अशी की, मलालासारखी एक चिमुरडी तालिबान्यांसोबत लढण्यासाठी मर्दानी म्हणून उभी झाली. तालिबान्यांचा असा फतवा होता की, आम्ही आखून दिलेल्या सीमा पार करून जर कुणी आत शिरले, तर त्याचा खात्मा निश्‍चित आहे. यावेळी तसेच घडले. स्वात खोर्‍यात, मलालाला तालिबान्यांनी डोक्यावर गोळी झाडून रक्तबंबाळ केले. मुलींनी, महिलांनी शिक्षण घेण्यास तालिबान्यांचा कट्टर विरोध आहे. असे असताना, मलालाबाबत ते गप्प कसे राहू शकले असते? निर्लज्ज तालिबान्यांनी या हल्ल्याची जबाबदारी तर घेतलीच, पण मलाला स्वस्थ होऊन पुन्हा स्वात खोर्‍यात आली, तर तिला मारून टाकू, अशी पुन्हा धमकी दिली. मलालाच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. तालिबान्यांचा नेता मुल्ला फजलुल्लाह खुलेआम त्या भागात फिरत आहे आणि सांगत आहे की, हे काम आम्हीच केले आहे. परंतु, पाकिस्तानाचे लष्कर आणि पोलिस एवढे षंढ आहेत की, ते त्याला पकडू शकत नाहीत. हाच मुल्ला फजलुल्लाह २००७ साली शरियते मोहम्मदीच्या झेंड्याखाली स्वात खोर्‍याचा सरदार बनला होता.
मलालाला पाकिस्तानची दुसरी बेनझीर असे म्हटले जात आहे. तिथल्या मीडियाचे म्हणणे आहे की, मलालावर प्रारंभापासूनच बेनझीरचा प्रभाव आहे. मलालाचे स्वत:चे असे स्वप्न आहे की, तीसुद्धा बेनझीरसारखी धाडसी बनावी. बेनझीर ज्याप्रमाणे तेथील लष्करशहांच्या समोर एक आव्हान म्हणून उभी ठाकली, त्याचप्रमाणे मलाला ही तालिबान्यांच्या डोळ्यात खुपली. म्हणूनच ते तिची हत्या करू इच्छित होते. बेनझीरला जसा संपूर्ण जगाने सन्मान दिला होता, अगदी तसाच सन्मान मलालाला मिळत आहे. मलालाच्या या धाडसाचे संपूर्ण जगात मुक्तकंठाने कौतुक होत आहे आणि अमेरिकेसारखा देशही तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. मलालावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने पेशावर विमानतळावर मलालासाठी खास विमान ठेवले होते आणि जोपर्यंत मलाला पूर्णपणे स्वस्थ होत नाही, तोपर्यंत आम्ही तिच्यासाठी वाट्टेल ती मदत देऊ, अशी ग्वाही दिली होती. अमेरिका, ब्रिटन या देशांची मदत कामी पडली आणि आता मलाला बेशुद्धावस्थेतून बाहेर आली आहे. पण, या घटनेमुळे एक नवल घडले. ते असे की संपूर्ण पाकिस्तान पहिल्यांदाच तालिबान्यांच्या विरोधात उभा ठाकला! मलालाच्या धाडसाने हा संदेश दिला आहे की, आता तालिबान्यांचे दिवस भरत चालले आहेत. जगाला विश्‍वास आहे की, मलाला पूर्णपणे स्वस्थ होईल आणि आपले आंदोलन पुढे सुरूच ठेवेल.
मलालासारखीच आंदोलने पाकिस्तानात कमीअधिक प्रमाणात काही लोक चालवीत होते. पण, मलालाने जे अभूतपूर्व साहस दाखविले त्यामुळे अतिरेक्यांच्या विरोधात संपूर्ण पाकिस्तान उभा झाला आहे. पण, असे कोणते कारण आहे की, पाकिस्तान तालिबान्यांच्या विरोधात उभा झाला? पाकिस्तानात अस्मा जहांगीर आणि अन्य महिला संघटना स्त्रियांना स्वातंत्र्याचा, आधुनिक शिक्षणाचा संपूर्ण अधिकार मिळावा यासाठी लढा देत आहेत. छोट्या-मोठ्या घटनांनंतर अतिरेक्यांच्या विरोधात आवाजही उठत आहे.
पण, अचानक असे काय घडले की, इस्लामच्या नावावर जे काही होत आहे, त्याविरोधात पाकिस्तानी जनता संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी तयार झाली आहे? दहशतवाद्यांच्या कारवायांची झळ संपूर्ण पाकिस्तानला पोचली आहे का? आता लष्कर आणि सरकार अतिरेक्यांविरोधात लढा देणार आहे का? सत्य हे आहे की, मलाला केवळ निमित्त आहे, पण मलालाचा आवाज आज संपूर्ण पाकिस्तानचा आवाज बनला आहे. अतिरेक्यांच्या अत्याचारामुळे तेथील महिला ग्रासून गेल्या आहेत. आता तेथे तिथल्याच ‘तंग आयद ब जंग आयद’ची म्हण मूर्त रूपात साकारताना दिसत आहे.
पाकिस्तानातील वर्तमानपत्रे कोणती भूमिका मांडत आहेत, हे येथे आवर्जून लक्षात घेणे गरजेचे आहे. पाकिस्तानचे दैनिक ‘जसारत’- ज्याची ओळख जमाते इस्लामीचा प्रवक्ता म्हणून आहे- त्याने लिहिले आहे की, ‘मलालावर झालेल्या क्रूर हल्ल्यावर तेच लोक आता आरडाओरड करून अश्रू ढाळीत आहेत, ज्यांचे हात जगभरातील अशा हजारो मलालांच्या रक्ताने माखलेले आहेत.’ दैनिकाने मलालासोबतच शिक्षणाच्या प्रसारासाठी काम करणार्‍या आफिया या महिलेचीही दखल घेतली आहे. आफिया ही संपूर्ण पाकिस्तानात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करीत होती. तिचे म्हणणे होते की, पाकिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षणप्रणालीत दोष आहेत. खर्‍या अर्थाने पाकिस्तानला आधुनिक शिक्षणाची नितान्त गरज आहे. ज्या वेळी लष्कराने तिची गोळ्या झाडून हत्या केली, त्या वेळी एवढे वादळ का उठले नाही? मूठभर लोक वाटेल त्यांना शिक्षणतज्ज्ञ बनवू शकतात. पण, मलाला आणि आफिया या दोन महिलांबाबत मीडिया आणि बुद्धिजीवी वर्गाचा हा दुजाभाव, अन्याय का? दैनिक ‘जंग’ने लिहिले आहे की, मलालाबाबत सहानुभूती नाही. तिला कुठल्या तरी मोठ्या कटाचा प्यादा बनवण्यात आले आहे. शिक्षणासाठी आंदोलन करणे, ही बाब पाकिस्तानात काही नवीन नाही. पण, तरीही मलालावर झालेल्या हल्ल्यावरून एवढे वादळ कशासाठी उठविले जात आहे? दैनिक ‘एक्सप्रेस कराची’ लिहितो, संपूर्ण पाकिस्तान दोन गटांत विभाजित झाला आहे. जे बरेलवी आणि शिया मुसलमान आहेत, ते मलालाला नायिका बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत; तर दुसरीकडे देवबंदी, तालिबानी आणि त्यांचे समर्थक मलालावर झालेला हल्ला हा उचित होता, असे म्हणत आहेत. पाकिस्तान या विषयावर कसा विभाजित झाला आहे, हे संपूर्ण जगानेही बघितले आहे. असे तर होणार नाही ना की, येणार्‍या काळात या दोन विचारधारांच्या आधारावर संपूर्ण देशाचे दोन तुकडेच होतील? पाकिस्तानचे राष्ट्रपती, मलालावर झालेल्या हल्ल्यावर शोक प्रकट करीत आहेत. परंतु, पाकिस्तान पीपल्स पार्टीत काय सुरू आहे, ही बाब काही लपून राहिलेली नाही. दैनिक ‘जिन्ना’ने लिहिले आहे की, जो आपल्या पत्नीच्या हत्येत सहभागी लोकांना पकडू शकला नाही, तो मलालासाठी कोणते तीर मारणार? पाकिस्तानातील मीडियात या बाबीचीही चर्चा आहे की, मलालासारख्या एक १४ वर्षाच्या मुलीत एवढी बुद्धी आणि धाडस असू शकते काय, की ती शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रणी बनून संपूर्ण जगापुढे आदर्श निर्माण करेल? सध्या तिचे वय शिकण्याचे आणि काही अनुभव प्राप्त करण्याचे असताना, ती नेता बनून संपूर्ण जगाला पाठ शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानचे काही बुद्धिजीवी लोकही या विषयावर आपापली मते मांडत आहेत.
पाकिस्तानातील जनता जरी दोन समुदायांत विभागली गेली असेल, मलाला अल्पवयीन असल्यामुळे तिच्याविषयी सहानुभूतीची लाट आली असेल किंवा टीकाही होत असेल, पण एक बाब मात्र या घटनेने स्पष्ट दिसत आहे की, पाकिस्तानातील बहुतांश लोक तालिबानी आणि दहशतवाद्यांविषयी आपला क्षोभ जाहीरपणे व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानच्या हे पुरते ध्यानात आले आहे की, मलालाच्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही लोक आक्रोश करीत आहेत आणि पाकिस्तानची संपूर्ण जगात छी थू! झाली आहे. पण, मलालाने आपल्या प्राणाची पर्वा न करता, पाकिस्तानी महिलेची मान जगात उंचावली आहे. आता पुढे हे पाहायचे आहे की, आज जे लोक मलालासोबत आहेत, ते भविष्यात दहशतवाद्यांच्या भीतीमुळे आपली भूमिका तर बदलणार नाहीत? पाकिस्तानातील वर्षानुवर्षांपासून चिरडल्या गेलेल्या, केवळ उपेक्षा आणि अत्याचाराचा सामना करणार्‍या महिलांच्या मनात एक आत्मविश्‍वास आज निर्माण झाला आहे आणि मलालाने केलेला हाच सर्वांत मोठा चमत्कार आहे.

अनुवाद : बबन वाळके
साभार - तरुण भारत 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी