हिंदूहृदयसम्राट, योद्धा संघटक बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...
योद्धा सम्राटासारखेच जगले बाळासाहेब
एका व्यंग्यचित्रकारापासून हिंदुहृदयसम्राटापर्यंतचा प्रवास गाठणार्या बाळासाहेब ठाकरेंनी आठवणींचा अनंत ठेवा मागे ठेवला आहे. या आठवणी स्वतःच वैशिष्ट्यपूर्ण ठरतील, यात शंकाच नसावी. ते आपल्याच मस्तीत जगत आले. ते जे बोलायचे ते लोक मन लावून ऐकत असत आणि ते जे लिहीत ते आवर्जून वाचत असत. कुणी त्यांच्या मुद्यांशी सहमत असोे अथवा नसो, त्यांनी त्याची कधीच फिकीर केली नाही. राजकीय समझोत्यासाठी वा हवा पाहून भूमिका बदलणार्यांप्रमाणे वक्तव्ये करणे त्यांना कधीच मंजूर नव्हते. ते जे म्हणत, ती काळ्या दगडावरची रेघ होऊन जात असे. १९७५ च्या आणिबाणीत त्यांनी इंदिरा गांधींची सशर्थ साथ केली. मात्र, त्यानंतर अयोध्या आंदोलनाशी जुळल्यानंतर प्रखर हिंदुत्वाचे ते इतके पुरस्कर्ते झाले की, लोकांनी त्यांना हिंदुहृदयसम्राट या उपाधीनेच गौरविले. वादग्रस्त बाबरी ढांचा जमीनदोस्त झाल्याबद्दल त्यांनी उगाच नक्राश्रू ढाळले नाहीत. उलट कारसेवकांना सन्मानित करण्याची घोषणा केली. राष्ट्रपतिपदाच्या गेल्या निवडणुकीत मराठी स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला आणि यंदा शालीनता आणि विद्वत्तेच्या मुद्यावरून ते प्रणव मुखर्जी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हिंदुत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सैनिकांच्या सन्मानाच्या मुद्यावरील त्यांची वक्तव्ये प्रक्षेपणास्त्राप्रमाणे दशदिशांना आदळत आणि संपूर्ण आशिया खंडात त्याचे पडसाद उमटल्याचे बघायला मिळत असे.
पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना भीती कोणाची
वाटत असे, हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर निश्चितच शिवसेना आणि
बाळासाहेब ठाकरे हेच होते. लाहोरमधील वरिष्ठ संपादक असलेले माझे एक मित्र
म्हणाले, हिंदूंची खुजी, धोतर आणि शेंडी तसेच व्यापारी मनोवृत्तीवाली
प्रतिमा बाळासाहेबांनी पूर्णतः बदलली आणि त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याला
जबरदस्त ताकदीने प्रत्युत्तरदेखील दिले जाईल, अशा वातावरणाची निर्मिती
केली.
काही वर्षांपूर्वी पाञ्चजन्यचा संपादक या
नात्याने बांद्रेस्थित त्यांच्या सुप्रसिद्ध मातोश्री या बंगल्यात त्यांची
भेट घेण्याचा योग आला. हिंदू संघटनांच्या आजच्या स्थितीबाबत ते अतिशय नाखुष
होेते. मुस्लिम मतांच्या भीतिपोटी तडजोड करण्याची मानसिकता बदलली नाही, तर
भविष्यात त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील, असे त्यांचे ठाम मत होते.
त्यांच्या या शब्दांचा आजही मला विसर पडलेला नाही. ते म्हणायचे,
कॉंग्रेससारखे होऊन कॉंग्रेसचा पराभव केला जाऊ शकत नाही. आपले वेगळेपण आणि
स्वतंत्र ओळख ठेवूनच आपण विजय मिळवू शकतो. म्हणूनच देशातील कुठल्याही
राष्ट्रीय घटनेवरील त्यांचे वक्तव्य आणि सामनामधील संपादकीय आगळेवेगळे आणि
सर्वाधिक धारदार राहात असे. त्यांच्या शब्दात ताकद होती. कारण ते जे बोलत,
ते करून दाखवण्याची हिंमत आणि सामर्थ्य त्यांच्यात होते. तथापि,
त्यांच्यावर अति मराठीभक्त, मुस्लिम विरोधी आणि प्रांतीयतावादी असे ठपके
ठेवून सेक्युलर जमातीच्या लोकांनी त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह
उपस्थित केले होते. पण बाळासाहेबांच्या प्रगाढ मैत्रीचे विराट वलय प्रांत,
भाषा आणि धर्माच्या सीमारेषांपलीकडचे होते. दोस्तीची नाती टिकवून
ठेवण्यासाठी ते जगाच्या कोणत्याही टोकापर्यंत आणि कोणत्याही सीमा उल्लंघून
जाण्यास तयार असत. अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत आणि संजय दत्तपासून
सलमान खानपर्यंत सारेच त्यांच्या दिलदारपणाची खात्री देऊ शकतील. केवळ
भारताबद्दल अगाध निष्ठा आणि सन्मान याच एकमेव निकषावर त्यांच्याशी मैत्री
शक्य होती. भारतापुढे प्रांत आणि संप्रदाय याचे स्थान गौण होते.
प्रारंभीच्या काळात महाराष्ट्रात शिवसेना अमराठींविरुद्ध उभी ठाकली होती,
हे सर्वविदित आहे. पण बाळासाहेबांनी त्याबाबत महाराष्ट्राची संस्कृती आणि
पारंपरिक वातावरणाच्या जपणुकीचे सामाजिक संदर्भ देऊन देशवासीयांची समजूत
काढली. निरनिराळ्या प्रांतांचे वैशिष्ट्य आणि जमिनीच्या सुगंधाचे रक्षण हाच
त्यांच्या आंदोलनांचा मूळ हेतू होता.
ज्या सेक्युलर मंडळींना काश्मिरी हिंदूंचे
अस्तित्व मान्य नाही, ज्यांना अरुंधती रॉय, गिलानी, यासीन मलिक यांच्या
शब्दात सेक्युलरवादाची व्याख्या परिभाषित करण्याची गरज भासते आणि ज्यांना
कसाब आणि अफजल गुरूच्या मानवाधिकारांची चिंता वाटते, तेच त्यांना कट्टर
हिंदुत्ववादी आणि पाकिस्तानविरोधी संबोधत असत. या सेक्युलर तालिबान्यांच्या
कुठल्याही आरोपांची बाळासाहेबांनी कधी तमा बाळगली नाही. हिंदुत्वासाठी
लढणार्या संघटनांमध्ये फूट पडू नये आणि हिंदूंच्या मुद्यांवर लढा देताना
तडजोडीची, गुडघेटेकू मानसिकता स्वीकारली जाऊ नये, याकडे त्यांचा कटाक्ष
असायचा. पाकिस्तान आमच्यावर सातत्याने हल्ले करीत राहील, आतंकवाद्यांना
आश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देत राहील आणि आपण त्यांच्यासोबत क्रिकेट
खेळत राहू, यात कुठले आले देशप्रेम? देशभक्तीची ही व्याख्या त्यांना मुळीच
मान्य नव्हती आणि त्यांच्या या प्रश्नाचे उत्तरही कुणाजवळ नव्हते. भारतीय
लोकांनी मार खायचा आणि आनंदाने पाकिस्तानी लोकांसोबत मनोरंजनाच्या
कव्वाल्या गाव्या, हे त्यांनी तहहयात मान्य केले नाही.
त्यांनी आपला मार्ग आणि नशीब हे स्वतःच
निश्चित केले. हिंदूंच्या मतांची विभागणी होऊ नये आणि त्याचा लाभ
कॉंग्रेसला मिळू नये, याच एकमेव चिंतेपायी त्यांनी भारतीय जनता पार्टीशी
अतिशय दृढ असे मैत्री संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळेच हे राजकीय
समीकरण युती कशी असावी, याचे एकमेवाद्वितीय उदाहरण होऊन बसले आहे. दोन्ही
पक्षांमध्ये मतभेद होते, कार्यक्रमांबाबत शंभर टक्के मतैक्य कधी झाले नाही,
तथापि त्यातून कधी मनभेद आणि युती तोडण्यापर्यंतची मजल गाठली गेली नाही.
त्यामुळेच अनेक प्रकारचे अडथळे पार करून संसदेपासून विधानसभेपर्यंत ही युती
अबाध्य राहून आपला प्रभाव कायम ठेवू शकली.
जीवनाच्या संध्याकाळी बाळासाहेबांना राज
ठाकरे यांनी वेगळी चूल मांडल्यामुळे मोठा मानसिक धक्काही बसला. पण याकडे
त्यांनी केवळ कॉंग्रेसची एक खेळी म्हणून पाहिले. राज ठाकरे यांच्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या मतपेटीला धक्का पोहोचवलाच आहे.
अखेरच्या दिवसात बाळासाहेबांचा स्वभाव थोडा शांत आणि सर्वसमावेशकही होत
गेला. ते बरेच आध्यात्मिकही झाले होते. त्यांचे वडील महाराष्ट्राचे
प्रख्यात प्रबोधनकार आणि थोर पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. बाळासाहेबांना
धर्मपत्नी मीनाताई यांच्या निधनानंतर आयुष्यातील पहिला मोठा मानसिक धक्का
बसला होता. तेव्हापासून त्यांनी स्वतःला एकांतातील चिंतनात गुंतवून घेतले
होते. तथापि, सामनामधून त्यांचे संपादकीय आणि प्रक्षेपणास्त्रांसारखी
प्रहार करणारी मते-मतांतरे प्रसिद्ध होतच होती. त्यांच्या फटकार्यातून ना
सहयोगी पक्षांचे नेते बचावले ना अन्य राजकीय पक्षांचे नेते.
सावरकरांनीही त्यांच्या कार्यकाळात प्रखर
हिंदुत्वाचे विचार कुठल्याही तडजोडींचा मुलामा न देता, परखडपणे आपल्या
लेखणीने मांडले होते. बाळासाहेबांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष
करीत, त्यांचेच अनुकरण करत अखेरपर्यंत हिंदुत्वाची तत्त्वे आग्रहाने
मांडली. त्यांच्या शब्दांनी आणि लेखणीने देशातील लाखो लोक प्रभावित झाले,
हे कुणीच नाकारू शकणार नाही. ते एखाद्या ढाण्या वाघासारखे जगले आणि जीवनाचा
भरपूर आनंद घेऊन योद्धा सम्राटासारखा या मोहमयी दुनियेचा त्याग केला.
त्यांची कमतरता वास्तवात भरून निघणे अशक्यकोटीतील आहे.
तरुण विजय
(लेखक राज्यसभा सदस्य आहेत)
अनुवाद : चारुदत्त कहू
No comments:
Post a Comment