हिंदुत्वाच्या विचारांची डरकाळी
घुमविणारा वाघ आज
आपल्यातून गेला आहे.
झंझावात या शब्दाचे मूर्तिमंत रूप
असलेला नेता, राजकारणाची दिशा
बदलण्याचे सामर्थ्य असणारा
लोकनेता, समाजजीवनावर आपल्या
संघटनकौशल्याने
दबदबा निर्माण करणारा
संघटक, जनतेच्या मनातले
विचार सडेतोड शब्दांत मांडणारा जनतेचा
आवाज, समाजात चुकला
की ठोकला, अशा
शैलीत काढलेली व्यंग्यचित्रे म्हणजे
रंगकुंचल्याचे
फटकारे कसे असतात
ते रूढ करणारा
अलौकिक कलाकार, समाजातील दैन्य,
देशद्रोही आणि समाजविरोधी तत्त्वांवर ठाकरी
भाषेत प्रहार करणारा
एक झुंझार पत्रकार, जनतेच्या वेदना
शब्दांचे चाबूक फटकारत
मांडणारा सव्यसाची संपादक
आज हरपला आहे.
जीवनातील सुसंगती कळल्याशिवाय विसंगती मांडता
येत नसते, हे
विनोदाचे तत्त्वज्ञान व्यंग्यचित्रकाराच्या अंगात
भिनले, तरच तो
कमीत कमी रेषांमध्ये व्यंग्य मांडू
शकतो. बाळासाहेब ठाकरे
हे मूळ व्यंग्यचित्रकार होते.
जीवनातील व्यंग्यावर नेमके
बोट ठेवण्यासाठी लागणारे सुसंगतीचे आकलन
त्यांना होते. त्याचा
प्रत्यय नंतर त्यांच्या राजकीय
नेतृत्वाच्या कामगिरीत वारंवार येत
गेला. जनतेची नेमकी
नाडीपरीक्षा असलेला नेता
असल्यानेच, भारतीय राजकारणाला कलाटणी
देणारे सामर्थ्य ते
राजकारणात दाखवू शकले.
भारतीय राजकारणाची कार्यक्रमपत्रिकाच बदलून
देशाच्या समाजजीवनाचा, सांस्कृतिक राष्ट्रवादाचा केंद्रबिंदू असलेला
हिंदुत्वाचा विचार हा
राजकीय क्षेत्रातील मुख्य
विषय होण्यासाठी ज्या
गोष्टी कारणीभूत ठरल्या,
त्यात मोठे योगदान
हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे यांचे
आहे! मुंबईतील मराठी
माणसाचे हित जपण्याचा संकुचित विचार
अंगीकारण्याऐवजी
मराठी अस्मितेला मुंबईबाहेर नेऊन
तिला राजकारणाच्या मुख्य
प्रवाहात प्रस्थापित करायचे
असेल, तर मूळ
राजकीय तत्त्वज्ञान व्यापक
करावे लागेल, ही
गरज त्यांनी लक्षात
घेतली. महाराष्ट्रात बेरजेच्या राजकारणात कॉंग्रेसच्या यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांनी डाव्या
विचारांची चळवळ मोडीत
काढलेली होती. हिंदुत्वाची जी
चळवळ राजकीय क्षेत्रात हिंदू
महासभा, भारतीय जनसंघ
हे चालवत होते
त्यांना गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात जातीय
मर्यादा घालण्याचे कारस्थान यशस्वीपणे खेळले
गेले. वेदोक्त प्रकरणापासूनच हिंदुत्व म्हणजे
ब्राह्मणत्व अशा प्रकारचे चुकीचे
सामाजिक समीकरण रूढ
करण्याचा प्रयत्न झाला
होता. गांधीहत्येनंतर ब्राह्मणांच्या विरोधात आगडोंब
उसळला, त्याला महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात
वेदोक्त प्रकरणाची पार्श्वभूमी होती.
अनेक प्रयत्नांनंतरही राजकीय
जीवनात हिंदुत्वाचा विचार
समाजाच्या कानाकोपर्यात
पोहोचत नव्हता. हळूहळू
राजकारणात जातीय समीकरणे फायद्याची ठरू
लागल्यामुळे, जातीय अस्मिता आणि
त्यानुसार राजकीय व्यूहरचना सर्व
पक्ष करत होते
आणि जातींपेक्षा व्यापक
असा हिंदुत्वाचा विचार
मांडणार्या भारतीय
जनसंघाला मात्र जातीयवादी अशा
शब्दांत हिणवले जात
होते. आणिबाणीत अपरिहार्यता म्हणून
इंदिरा गांधीविरोधी राजकीय
धु्रवीकरणात भारतीय जनसंघाला बरोबर
घेतले, तरी जनता
पक्ष फोडताना जातीयवादी अशा
शिव्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांना घालतच
जनता पक्ष फुटला.
मात्र, त्यानंतर मराठी
अस्मितेकरिता स्थापन झालेल्या शिवसेनेने भाजपाशी युती
केली. बाळासाहेबांनी आपल्या
राजकीय चळवळीला हिंदुत्वाचा व्यापक
परीघ देण्याचा निर्णय
घेतला. त्यानंतरच खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी
मिळण्याला सुरुवात झाली.
महाराष्ट्राच्या
राजकारणात एक राजकीय
पोकळी निर्माण झाली
होती. शरद पवारांचा पुलोद
आणि समाजवादी कॉंग्रेसचा प्रयोग
कॉंग्रेसला पर्याय ठरू
शकला नाही. इंदिरा
गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत
पवारांच्या पक्षाचा आणि
त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी
पक्षांचा प्रभाव वाहून
गेला. हतबल शरद
पवार संभाजीनगरला राजीव
गांधींच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश
करते झाले. मात्र
१० वर्षे निवडणुकांमागून निवडणुका पवारांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसविरुद्ध संघर्ष
करत लढणारा गावागावांतील तरुण
दिशाहीन झाला होता.
ही राजकीय पोकळी
शिवसेनेने भरून काढली.
गावोगावी तरुणांनी शिवसेनेच्या शाखा
स्थापन करत, सेनेत
प्रवेश करण्याला सुरुवात झाली.
हे बदलते वारे
बाळासाहेब ठाकरे यांनी
अचूक ओळखले. शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारांचे अधिष्ठान देऊन,
शिवसेना मुंबईबाहेर घेऊन
जाण्याची हीच वेळ
आहे, असा निर्णय
घेऊन त्यांनी सेनेचा
झंझावात मुंबईबाहेरही आणला.
विलेपार्ले येथे १९८६
च्या अखेरीस झालेली
पोटनिवडणूक शिवसेनेेने भाजपाला मागे
टाकत जिंकली. गांधीवादी समाजवाद स्वीकारलेल्या भाजपाला हिंदुत्वाचा मुद्दा
सोडता कामा नये,
याचा इशाराच जणू
या निवडणुकीने दिला
होता. बाळासाहेबांच्या व्यापक
भूमिकेमुळेच हिंदुत्वाचा विचार
महाराष्ट्राच्या
राजकारणात मोठी लोकमान्यता घेऊन
प्रस्थापित झाला. जाती-पातीच्या मर्यादा तोडून
महाराष्ट्राचे
समाजजीवन हिंंदुत्वाच्या व्यापक
विचाराने गतिमान झाले.
त्यामुळेच महाराष्ट्राच्या सत्तेच्या सिंहासनावर हिंदुत्व विराजमान झाले!
१९८८
हे वर्ष कलाटणी
देणारे ठरले. या
वर्षात संभाजीनगरला महापालिकेची पहिली
निवडणूक झाली आणि
या निवडणुकीत ६०
पैकी २७ जागा
शिवसेनेने जिंकल्या. मोरेश्वर सावे
हे शिवसेनेचे पहिले
महापौर म्हणून संभाजीनगर महापालिकेत निवडून
आले. शिवसेना मुंबईपुरती, हे
समीकरण संपले. शिवसेना हिंदुत्वाचा विचार
प्रखरपणे मांडणारा पक्ष
म्हणून महाराष्ट्राने स्वीकारल्याची द्वाही
संभाजीनगरच्या
महापालिकेच्या
निवडणुकीने फिरविली. तिथून
बाळासाहेबांच्या
प्रखर शब्दांत मांडल्या जाणार्या विचारांनी आणि
देशात चाललेल्या रामजन्मभूमीच्या आंदोलनाने महाराष्ट्राचे समाजजीवन ढवळून
निघाले. बाळासाहेबांचे प्रखर
विचार, शिवसेनेचे संघटन,
रा. स्व. संघ,
विश्व हिंदू
परिषद यांनी हिंदुत्वाची तयार
केलेली पार्श्वभूमी,
भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे
यांची संघर्ष यात्रा
अशा सर्व प्रयत्नांनी महाराष्ट्रात चमत्कार घडला.
१९९५ साली महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले
संपूर्ण गैरकॉंग्रेसी पक्षांचे सरकार
महाराष्ट्रात सत्तारूढ झाले.
मंत्रालयावर भगवा फडकला!
या सगळ्या बदलाचे
खरे, सर्वोच्च आणि
निर्विवाद नेते बाळासाहेब ठाकरे
हेच होते.
बाळासाहेब ठाकरे
यांची शैली बेधडक,
स्पष्ट आणि थेट
भिडणारी होती. विनाकारण संदिग्धता, भिडभाड,
गुळमुळीतपणा त्यांच्या स्वभावात नव्हता.
एक घाव दोन
तुकडे असा त्यांचा धडाका
होता. ताकाला जाऊन
भांडं लपविण्याचा त्यांचा स्वभाव
नव्हता. त्यांचा हा
स्पष्टवक्तेपणा
आणि सडेतोडपणा हाच
लोकांना आवडणारा होता.
लोकांच्या मनातले विचार
कसे बरे उघडपणे
मांडायचे, असा प्रश्न जेव्हा
जेव्हा लोकांना पडत
असतो, तेव्हा त्याच
वेळी बाळासाहेब अत्यंत
धडकपणे आणि स्पष्ट
शब्दांत मांडत. त्यांचा हा
धडाकाच लोकांना जिंकून
टाकत असे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचे नाव
देण्याचा विषय जेव्हा
वादाचा विषय झाला
होता, तेव्हा हे
नामांतर अनेकांना अनेक
कारणाने मान्य नव्हते.
मात्र, उघडपणे भूमिका
घेण्याचे धैर्य अनेकांकडे नव्हते.
मात्र, त्याच वेळी
बाळासाहेबांनी
सडेतोडपणे या नामांतराला विरोध
केला. राजकीय फायद्या-तोट्याचा विचार
त्यांनी कधी केला
नाही. त्यांचा हा
प्रांजळपणाच लोकांना भावणारा होता.
जरी त्यांची भूमिका
पटत नसली, तरी
ती त्यांनी सडेतोडपणे आणि
पारदर्शीपणे मांडली, यावर
लोक प्रेम करत
असत.
निवडणुकांमध्ये बाळासाहेबांची एक
सभा त्या मतदारसंघातील चित्र
बदलून टाकत असे.
असा वक्ता, असा
नेता अलीकडे भारतीय
राजकारणात झाला नाही.
एकतर बाळासाहेबांची सभा
लाखांच्या वर गर्दीची होत
असे. सभेतील वातावरण टाळ्या,
शिट्ट्या वाजवत
भाषणाचा जणू लोक
आनंद घेत, बाळासाहेबांच्या विचाराने भारून
जात. त्या सभेचा,
त्या वातावरणाचा प्रभावच इतका
जबरदस्त असे की,
त्या मतदारसंघातील राजकीय
चित्रच बदलून जात
असे! जेम्स लेनच्या विषयाचा राजकीय
फायदा घेत, महाराष्ट्रात मराठा
कार्ड खेळले जात
होते. त्या निवडणुकीत बाळासाहेबांची सभा
संभाजीनगरच्या
सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होती.
खचाखच मैदान भरलेले
होते. बाळासाहेबांनी आपल्या
भाषणात शिवरायांना स्वराज्य निर्मिती करताना
मराठ्यांनीही विरोध केला
होता हे सांगत,
एका सहकार्याला
इतिहासाच्या पुस्तकातील एक
उतारा वाचायला लावला.
या उतार्यात
शिवाजी महाराजांना विरोध
करणार्या खंडोजी
खोपडे, चंद्रराव मोरे,
गणोजी शिर्के अशा
मराठा सरदारांची नावे
होती. त्याने ती
नावे वाचली. ती
यादी संपताच बाळासाहेब चटकन
नाट्यमय रीत्या म्हणाले, ‘‘अरे,
दोन नावे राहिली
वाटतं- शरद पवार
आणि आर. आर.
पाटील!’’
आणि
या वाक्याबरोबर जो
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट
झाला, त्यात जेम्स
लेनच्या विषयावर आपली
राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न वाहून
गेला! बाळासाहेबांचे भाषण
म्हणजे एकपात्री प्रयोगच असे.
भाषणात ते जेव्हा
अनेक नामवंत नेत्यांच्या चालण्याची, बोलण्याची नक्कल
करीत, तेव्हा समोरची
उसळणारी तरुणाई मग
टाळ्या-शिट्ट्यांनी मैदान
डोक्यावर घेत असे.
सडेतोड स्पष्टवक्तेपणा, हे
त्यांचे वैशिष्ट्य होते.
सामना
या दैनिकात बाळासाहेबांची काही
काळानंतर येणारी मॅरेथॉन मुलाखत,
हेही एक वैशिष्ट्य होते.
अशी मुलाखत प्रसिद्ध होते
आणि लाखो लोक
ती रुचीने, उत्सुकतेने वाचतात,
हे चित्र केवळ
बाळासाहेबांच्या
बाबतीतच दिसत असे.
महाराष्ट्राच्या
राजकारणात जातींचा प्रभाव
अनेक वर्षांपासून होता
व तो आजही
अनेकदा जाणवतो. ‘वुई
डोण्ट कास्ट व्होट,
वुई व्होट द
कास्ट’ असे या
संदर्भात गमतीने म्हटले
जाते. मात्र, लोकशाहीत घुसलेला हा
दुर्दैवी पायंडा बदलण्याचे काम
बाळासाहेबांनी
केले. अनेक मतदारसंघात जातींची समीकरणे न
पाहता लोकांसाठी झटणार्या सामान्य तरुणांना बाळासाहेबांनी निवडणुकीत उभे
करून त्यांना आपल्या
समर्थ नेतृत्वाने निवडून
आणले. अगदी मंत्रिपदी त्यांना विराजमान केले.
नगर येथे अनिल
राठोड हे शिवसेना शाखाप्रमुख झाले
तेव्हा पावभाजीचा गाडा
चालवत असत. त्यांच्या जातीची
नगरमध्ये अवघी दोन
घरे! मात्र, शिवसेनेच्या प्रभावाने अनिल
राठोड नगरहून आमदार
म्हणून सतत निवडून
येत आहेत. युतीच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषविले. औरंगाबादला चंद्रकांत खैरे
अशाच अल्पसंख्य समाजातले असून,
सतत हिंदुत्वाचा झेंडा
खांद्यावर घेऊन विजयी
होत आहेत. एका
जातीचे कार्ड वापरून
राजकारण करणार्यांना,
जातीय द्वेष करत
राजकारण करणार्यांना,
लांंगूलचालनाचे
राजकारण करणार्यांना
बाळासाहेबांनी
आपल्या धडाक्याने तडा
दिला. हिंदुत्वाला जातीय
मर्यादा घालण्याचे प्रयत्न बाळासाहेबांच्या झंझावातात कुठल्या कुठे
उडून गेले.
राजकारणातील उमदेपणाला मोकळेपणाने दाद
देणारे बाळासाहे䤬 ठाकरे
हे एक उदार
व्यक्तिमत्त्व
होते. आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही.
मुसलमानांमध्येही
चांगले लोक आहेत.
अझरुद्दीन आहेत, सिंकदर
बख्त आहेत. मोठा
दिलदार माणूस. असे
वर्णन त्यांनी भाषणात
केेले होते. भारतीय
जनता पक्षातले प्रमोद
महाजन, गोपीनाथ मुंडे,
नितीन गडकरी यांना
सतत दाद दिली.
नितीन गडकरी यांच्या, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री
म्हणून केलेल्या कामाची
त्यांनी मुक्तकंठाने स्तुती
केली. शरद पवारांशी त्यांची मैत्री
होती. राजकीय मतभेद
हे राजकारणापुरते ठेवून
वैयक्तिक पातळीवर दिलखुलास मैत्री
सुहृदयतेने जपणारा विशाल
मनाचा हा नेता
होता.
प्रखर,
जळजळीत, कडवट, कट्टर,
सडेतोड, स्पष्ट, थेट
अशा प्रकारचा स्वभाव,
भाषा, राजकारण, संबंध
ठेवणारा हा नेता
आज हरपला आहे.
त्यांच्या अनुयायांनी, हिंदुत्वाचा विचार
राजकारणात मागे पडता
कामा नये, यासाठी
प्रसंगी स्वतःकडे कमीपणा
घेत एकत्र आले
पाहिजे आणि एकसंधपणे महाराष्ट्रात येत्या
भविष्यकाळात सगळीकडे भगवा
फडकवत ठेवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न
साकार केले पाहिजे.
तीच त्यांना खरी
श्रद्धांजली ठरेल! प
- दिलीप धारुरकर
९४२२२०२०२४
साभार - तरुण भारत
No comments:
Post a Comment