Sunday, November 18, 2012

सिंहस्त...

आम्हा घरी धन शब्दचीच रत्ने... हे खरे असले, तरीही काही व्यक्तींना शब्दांच्या रत्नांमध्येही तोलता येत नाही. संपादकीय नि:शब्द होतात असे त्यांचे कर्तृत्व असते. शब्दांच्या चिमटीत त्यांना पकडता येत नाही. आधुनिक संगणक प्रणालीत अक्षरे आणि मधली मोकळी ‘स्पेस’ यांचे ‘कॅरेक्टर’ होते. असे कितीही कॅरेक्टर खर्च केले तरी त्यांच्या जगण्याची मूल्यं तोलता येत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांना अशा कुठल्याच उत्कट शब्दांमध्ये बांधता येत नाही. कितीही अन् काय-काय सांगून झालं तरीही बरंच काही उरतंच... ते एका भारलेल्या, सामाजिक कळवळ्यानं पेटलेल्या सुसंस्कारित कलंदर कलावंताचे जगणे होते. कलावंतांच्या पंखांनी आभाळही झाकता येते अन् मग प्रतिज्ञा पूर्णत्वास जाऊ शकली नाही म्हणून गलितगात्र झालेला एखादा पार्थ अग्निकाष्ठ भक्षण करायला निघाला असताना आपल्या पंखांनी सूर्य झाकोळून सांज उभी करत हा पूर्णपुरुष कलावंत निराश पार्थाला सांगतो, ‘‘हा सूर्य अन् हा जयद्रथ...!’’ बाळ केशव ठाकरे नामक कलावंताने विझलेल्या मराठी पार्थांना उपेक्षेने झाकोळलेल्या सांजेला आपल्या तेजस्वी कुंचल्याने सूर्य साकारून सांगितले, ‘‘हा सूर्य अन् तुम्हाला उपेक्षेने संपविणारे हे सारे जयद्रथ!’’


कलावंत कुठलाही असो, कुठल्याही काळातला असो. तो बासरी वाजविणारा गवळ्याचा पोर असो, की प्रबोधनकारांच्या पोटी आलेला, सत्यशोधक चळवळीने प्रेरित झालेला कुंचला चालविणारा ठाकरेंंचा लेक असो. तो पेटून उठतो तेव्हा प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो. बाळासाहेब ठाकरे नामक एका अशाच कुंचल्याच्या धन्याने, कुंचला मराठी समाजाच्या तळमळीच्या रंगात बुडवून काढला अन् आजचा महाराष्ट्र उभा झाला. महाराष्ट्राच्या समाजकारणाचे, राजकारणाचे रंग त्यांनी बदलून टाकले.

संस्कृतीवर चढलेली परप्रांतीय अन् पाश्‍चात्त्य जळमटे त्यांनी तेजस्वी फटकार्‍याने उडवून, मराठी संस्कृती, हिंदू संस्कृती परत उजळून टाकण्याचा प्रयत्न केला. अंगभूत कलागुणांचा उपयोग समाजकारणासाठी अन् समाजकारणाधिष्ठित राजकारणासाठी इतक्या बुलंदपणे करण्याचा यशस्वी प्रयत्न या आधी कधीच झाला नव्हता. कलाप्रांतात मिळालेल्या प्रभावळीचा वापर राजकारणातून सत्ता मिळविण्यासाठी या आधीही अनेकांनी केला; पण बाळासाहेबांनी त्यांच्या राजकारणाला सत्तेचा ओषटवाणा स्पर्श कधी होऊ दिला नाही. मतांच्या राजकारणासाठी त्यांची वाणी कधीच मिंधी झाली नाही, म्हणून त्यांच्या राजकारणाची धारही कधीच बोथट झाली नाही. त्यांच्या राजकारणाला अन् सार्वजनिक वावरालादेखील कलात्म स्पर्श होता. त्यामुळे त्यांचे राजकारण कधीच बेसूर अन् भेसूर झाले नाही. त्यांच्या घराण्यातच कलेचा वारसा होता. चित्रकला, लेखन, गायन असा त्रिवेणी संगम झाला होता. त्यात बाळासाहेबांकडे असलेला नैसर्गिक अभिनय, विनोदबुद्धी, वक्तृत्व या कलागुणांचीही जोड त्याला मिळाली होती. एखाद्या व्यंग्यचित्रकाराच्या कुंचल्यांच्या फटकार्‍यांनी सामान्यांची हरविलेली अस्मिता गवसतेच नव्हे, तर ती पेटून उठते, असा प्रकार जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ महाराष्ट्रातच घडला!

‘मार्मिक’मधील त्यांच्या व्यंग्यचित्रांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतरही निजलेली अन् विझलेली मराठी मने चेतविली. जागी झालेली ही मराठी माणसं अस्वस्थ, पेटती मने घेऊन ठाकरेंच्या दाराशी येऊ लागली. लोकांची गर्दी वाढतच गेली तेव्हा प्रबोधनकारांनी आपल्या या गुणी बाळाला कुंचल्याला कृतीची जोड देण्यास सांगितले अन् शिवसेनेचा जन्म झाला. महाराष्ट्राचे कुलैदवत शिवाजी महाराजांच्या तेजातून शिवसेनेचा जन्म झाला. १९६० साली मुंबईत मराठी माणसांचा टक्का घसरला होता. लढून मिळविलेल्या राज्यातून मराठी माणूसच परागंदा होतो की काय, अशी स्थिती होती. बाळासाहेबांचे राजकारण मुळात ‘मराठी माणसांची बुद्धिनिष्ठ चळवळ’ या रूपातच सुरू झाले. सत्तेची आस त्याला कधीच नव्हती. सत्तेचे वळण मग आडवळणाने आलेच. राजकारणात ते अनुस्यूत असते. मराठी आणि जाज्वल्य हिंदुत्वाच्या मार्गावर या कलावंताचे राजकारण सुरू राहिले. कुठल्याही अधिष्ठानात अंतर्भूत असे काही गुण-अवगुण असतात. राजकारण करीत असताना मुत्सद्देगिरी आवश्यक असते. आपले म्हणणे मांडण्यासाठी शब्दांचा खेळही करावा लागतो. पण, बाळासाहेब नेहमीच त्यांच्या ठाकरी शैलीत, त्यांना जे पटलं आहे ते अगदी ठामपणे अन् अगदी स्पष्ट शब्दांत मांडत राहिले. मग पाकिस्तानी संघाला भारतात खेळू देण्याचा मुद्दा असो, की कर्नाटकसोबतचा सीमावाद असो! इंग्रजी भाषा भारतातून संपविली पाहिजे, असे ते म्हणाले तेव्हा नव्या पाश्‍चात्तीकरण झालेल्या उच्चभ्रूंनी, ठाकरे असंवैधानिक बोलतात, अशी टीका केली. भारताच्या संविधानातच, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २० वर्षांत भारतातून इंग्रजी हद्दपार झाली पाहिजे, असे स्पष्ट लिहिले आहे. बाळासाहेब घटनेतलेच बोलत होते. त्यांना जे पटेल ते त्यांच्या भाषेतच बोलणे, हा बाळासाहेबांचा स्वभावधर्म होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी तो पाळला. अगदी आताही, भारतात पाकड्यांचा संघ खेळणार नाही, असा दम त्यांनी मृत्युशय्येवरून दिला होता. बाळासाहेब अगदी परखड मराठमोळ्या शैलीत वावरत होते म्हणून इंग्रजी सोवळे नेसलेल्या तथाकथित उच्चभ्रूंना त्यांची भाषा शिवराळ वाटत होती. एवढे मात्र नक्की की, शिवाजी महाराज या महाराष्ट्रात झाले नसते, तर मराठी मुलखाचे मुस्लिमीकरण झाले असते. बाळासाहेब झाले नसते, तर महाराष्ट्र मराठी माणसांचा राहिला नसता.

बाळासाहेबांच्या कलाधिष्ठित राजकारणावरही सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता. विज्ञाननिष्ठ अन् वर्तमानाला तर्कसंगत अशा विचारांनी ते वागत राहिले. मराठीबाणा अन् हिंदुत्व हे त्यांच्या राजकारणाचे पैलू होते. त्यांनी खर्‍या अर्थाने जातीच्या पलीकडे जाऊन हिंदू चेतना जागी केली. महाराष्ट्रातील माणूस त्यांनी मराठी म्हणून हिंदुत्वाच्या तेजस्वी माळेत गुंफला. इथल्या अठरापगड जातीतल्या तरुणांना त्यांनी राजकारणात आपल्यालाही ‘करीअर’ आहे हे दाखवून दिले. लोकशाहीत सत्तेत येण्यासाठी राजवंशीच असणे आवश्यक असते, असा काहीसा भ्रम अजूनही आहे, पण बाळासाहेबांनी त्यापलीकडच्यांनाही सत्तेत बसवून दाखविले! बहुजनांची एक पिढीच्या पिढी त्यांच्या नेतृत्वात भगवा खांद्यावर घेऊन सत्तेची पायरी चढली. विदर्भात अमरावतीला सर्वप्रथम शिवसेनेची शाखा उभी झाली. त्या भागात कुणबी-मराठ्यांचेच राजकारण चालत होते. बाळसाहेबांनी तिथे, जुन्या पुस्तकांचे दुकान चालविणार्‍या अनंत गीते यांना लोकसभेचे तिकीट दिले. मत देताना जातीच्या पलीकडे जाऊन विचार करा, असे आवाहन केले. लिंगायत समाजाचे गीते खासदार झाले. हेच सार्‍या महाराष्ट्रात घडले. सहसा राजकारणात जातीचा आधार नसल्याने बाजूला पडलेल्या हिंदूंना त्यांनी नेतृत्व दिले. ते राणे, भुजबळ असोत की जोशी असोत... बाळासाहेबांच्या हिंदुत्वाने जातीयतेच्या भिंती पाडल्या. ‘मराठी तितुका मेळवावा,’ हा प्रयोग याच महाराष्ट्रात त्यांनी पुन्हा एकवार सिद्ध करून दाखविला. सर्वांना एक सूत्रात बांधणारी त्यांची संकल्पना म्हणजे हिंदुत्व होते. हा शाहू महाराजांचा अन् सावरकरांचादेखील महाराष्ट्र आहे, आगरकरांचा अन् आंबेडकरांचादेखील महाराष्ट्र आहे, हे बाळासाहेबांच्या राजकारणाने परत एकदा दाखवून दिले. कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या कार्याचे मोजमाप करताना त्याला मिळालेले पुरस्कार, पदे, सत्तेतला वाटा, संपत्ती, सत्कार, स्वीकार यांच्या तराजूतच ते व्यक्तिमत्त्व तोलण्याची बाळबोध पद्धत आपल्यात आहे. तसेच करायचे झाले तर बाळासाहेबांचे मूल्यमापन कशात करायचे? आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांच्या व्यंग्यचित्रांचा समावेश झाला. अगदी ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांच्या आत्मचरित्रात बाळासाहेबांनी काढलेल्या त्यांच्या व्यंग्यचित्राचा समावेश आहे, हे बाळासाहेबांच्या व्यंग्यचित्रकाराचे यश आहे. आपल्या वडिलांची प्रबोधनाची परंपरा त्यांनी आपल्या लेखणी, वाणी आणि कृतीतूनही चालविली, याची अनेक उदाहरणे वानगीदाखल देता येतील. हे त्यांच्यातल्या सत्यशोधकाचे यश आहे का? महाराष्ट्रात पाच वर्षे आलेली सत्ता हे त्यांच्या राजकारणाचे यश मानायचे का? माणसांना जिवलग म्हणून काळजाशी लावून घेण्याचे त्यांचे कसब म्हणून आज लता मंगेशकर, महानायक अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, राष्ट्रनेते अटलजी हे आणि अनेक मोठी माणसे त्यांचे भक्त आहेत. अशी गोडवे गाणारी माणसांची फौजच्या फौजच त्यांच्या भोवती सतत उभी होती, हे त्यांच्या लोकसंग्रहाचे यश मानायचे का?

त्यांच्या कारकीर्दीला उतरती कळा आलीच नाही. आजच त्यांच्या नावाने शिवतीर्थ भारावलेल्या माणसांच्या तुडूंब गर्दीने भरून जाते. थोडी क्षीणता आली होती. ते अगदीच नैसर्गिक आहे. चुकलेल्यांना फटकारतानाही त्यांनी राजकारणी चाणक्यगिरी केली नाही. कलावंतांना जवळ केले. नाना पाटेकर असो की मग दादा कोंडके. चुकले असे वाटले तेव्हा फटकारलेही. फटकारे त्यांच्या कुंचल्याचे होते अन् शब्दांचेही. नानाला ते म्हणाले होते, ‘‘गेला उडत...’’ नाना म्हणाला, ‘‘असेच म्हणत जाल तर एक दिवस तुमच्या पाठीशी कुणीच उरणार नाही...’’ आज तोच नाना विकल झालेला आपण पाहिला. भुजबळ, राणेच नव्हे, तर राज ठाकरेही त्यांच्यापासून, राजकारण म्हणून दूर झाले, पण त्यांचा पांडुरंग मात्र बाळासाहेबच होते, आहेत, राहतील... त्यांच्यानंतर शिवसेनेचे भवितव्य काय, असाही एक प्रश्‍न मराठी माणसांना अन् मराठीच्या शत्रूंनादेखील पडला आहे. काय होईल हे आताच सांगता येत नाही. पण, महाराष्ट्राला एक बाळासाहेब नेहमीच हवा आहे. बाळासाहेबविना आलेले हे पोरकेपण मराठी माणसांना पेलवणार नाही. त्यांनी महाराष्ट्र त्यांच्या विचारांनी हिंदुत्वाच्या सूत्रात बांधला, बहुजनातील सत्तेपासून दूर असणार्‍या जातीतल्या माणसांनाही स्वाभिमान अन् सत्ता दिली, हे त्यांच्या राजकारणाचे यश आहे. त्यांच्या कुंचल्याने मराठी निखार्‍यावरची राख झटकली अन् मराठी संस्कृतीची राख होण्यापासून वाचविली, हे त्यांच्यातल्या कलावंताचे यश आहे. परखडपणे बोलून गावातील, मनातील घाण दूर केली, हे त्यांच्यातल्या वाणीबहाद्दराचे यश आहे. त्यांच्या प्रकृतीचे कळताच आपली सगळी व्यवधाने बाजूला सारून माणसे मातोश्रीभोवती कोटींचे कडे करून तहानभूक विसरून उभी होती, हे त्यांच्या लोकसंग्रहाचे यश आहे. ‘‘बाळासाहेब ठाकरे हा या महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा अन् त्यासाठी काहीही करू पाहणारा मनसोक्त कलावंत नेता होता. या देशावर, इथल्या माणसांवर त्याची भक्तीच होती.’ त्यांच्या समाधीवर मात्र लिहावेच लागेल- सिंहस्त...

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी