Friday, May 15, 2009
पत्रकार परिषद झाली आहे. गेल्या 20 वर्षांपासून सोलापुरात इतके भव्य निर्माणकार्य सुरू आहे आणि आपल्याला याची काहीच कल्पना नाही, याबद्दल काहीजण नवल व्यक्त करीत आहेत. भव्य मंदिर आणि शिल्पकलेतील बारकावे पाहण्यातच काहीजण थकून गेले आहेत. त्यामुळे 450 × 150 इतका भव्य मंडप, याशिवाय यज्ञमंडप, भोजन मंडप पाहायची तसदी न घेता काही पत्रकार मंदिराच्या तळमजल्यावर विसावले आहेत.
ज्यांच्या प्रेरणेने आणि नेतृत्वाने बृहन्मठ होटगी मठाने हा व्याप उभा केला आहे, त्या मठाधीशांना भेटण्यासाठी सारेच पत्रकार उत्सुक आहेत. पत्रकारमित्र महेश अंदेली यांच्यासोबत मठाधीशांच्या कुटीकडे पावलं वळतात. 8-10 पत्र्यांची साधी खोली आणि समोर दोन खांबांवर 8-10 पत्रे. जमीन गायीच्या शेणाने सारवलेली. ही स्वामींची कुटी आहे. बाहेरच्या बाजूस चटईवर स्वामी बसले आहेत.
स्वामींसोबत सारे पत्रकार बसले आहेत. सर्वांसमोर दुधाचा पेला येतो. भव्य मंदिर आणि तेथील वातावरणाने भारावलेले पत्रकार महाराजांच्या कार्याबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत. यावर महाराजांची प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल श्रद्धा उत्पन्न करणारी आहे.
राज्यघटनेची निर्मिती कोणी केली? स्वामींच्या या प्रश्नावर कोणी म्हणतं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यावर स्वामींचा दुसरा प्रश्न. फक्त बाबासाहेब? समोरून उत्तर येतं, बाबासाहेब हे घटना निर्माण करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या 250-300 विद्वानांचा चमू होता. अपेक्षित उत्तर मिळालेलं पाहून स्वामीजींच्या मुखावर स्मित उमटते. ते म्हणतात, मी तर काहीच करीत नाही. सारे भक्तगणच करतात. मी तर येथे बसलेलो आहे.
स्वामींची मोठी मुलाखत घेऊ, असे ठरवून आलेल्या पत्रकारांसाठी इतकीच पाच मिनिटांची मुलाखत बरंच काही सांगून जाते. तोवर स्वामींच्या दर्शनासाठी दूर गावांहून आलेले भक्त प्रतीक्षेत असतात. स्वामी त्यांच्याकडे वळतात. एवढ्याच मुलाखतीवर पत्रकार तृप्त झालेले असतात. त्यांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतात.
हे स्वामी प्रसिद्धीपराङ्मुख आहेत. एका अर्थाने ते मौनी साधू आहेत. ते कर्मयोगी आहेत. त्यांच्या कार्यातूनच त्यांचा परिचय होतो. सिद्धेश्वर मंदिरामध्ये लक्षदीपोत्सव करणारा साधू म्हणून काहीजण त्यांच्याकडे पाहतात. महाराष्ट्रातील एका अग्रगण्य शिक्षण संस्थेचे प्रवर्तक म्हणून शिक्षण क्षेत्रात त्यांची ओळख आहे. गावोगावच्या शेकडो पालख्या सिद्धेश्वर यात्रेसाठी सोलापूरकडे कूच करतात, यामागची प्रेरणा स्वामींचीच असते. शाळेतली एखादी अस्वच्छ खोली स्वत: खराटा हाती घेऊन स्वच्छ करणारेही हे साधूच असतात. शिक्षक, शिपाई, मुख्याध्यापक यांच्यामध्ये संस्थेबद्दल जिव्हाळा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची गरज पडत नाही. स्वामीजी हे स्वत:च एक प्रशिक्षण केंद्र आहेत.आध्यात्मिक क्षेत्रात स्वामींचे स्थान उच्च आहे. अध्यात्मजगताने त्यांना तपोरत्नं ही उपाधी बहाल केली आहे. स्वामींचे शिष्य आज वीरशैव धर्मपीठांच्या जगद्गुरूपदी आरूढ आहेत. होटगी मठाधीश्वर श्री ष.ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींचा हा अल्पपरिचय.
6 फेब्रुवारी 1956 रोजी वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज शिवैक्य झाले. होटगी मठाच्या गादीवर 25 वर्षांचे योगीराजेंद्र स्वामीजी आरूढ झाले. त्याआधी ते शिंगणापूर येथील मठात होते. वीरतपस्वींच्या कार्याला तपोरत्नं महास्वामींनी गती दिली. शैक्षणिक व धार्मिक कार्याने गती घेतली. स्वामींनी सर्वप्रथम होटगी मठाच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. त्यानंतर खानापूर (ता.आळंद), तळवारगेरी (ता. सुरपूर), दिल्ली, तुळजापूर अशा ठिकाणी नवीन मठांचे बांधकाम सुरू केले. अक्कलकोट रोडवरील चन्नवीर नगर येथे 1990 साली वीरतपस्वी मंदिराचे बांधकाम सुरू झाले. हळूहळू शक्य होईल त्याप्रमाणे बांधकाम सुरू राहिले आणि मंदिर आज पूर्णत्वास जात आहे. या वीरतपस्वी मंदिराचे महाद्वार दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. या 7 मजली महाद्वाराची उंची 108 फूट आहे. महाद्वाराच्या बांधकामासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च आला आहे.
वीरतपस्वी मंदिराचे 3 भाग आहेत. तळमजल्यावर विशाल ध्यानमंदिर आहे. एकाच वेळी 1 हजारजण ध्यानाला बसू शकतील अशी व्यवस्था आहे. पहिल्या मजल्यावर शिवलिंग आणि वीरतपस्वींची मूर्ती आहे. दुसऱ्या मजल्यावर पंचाचार्यांच्या पाचही पीठांच्या लिंगोद्भव मूर्त्या आहेत.
पहिल्या मजल्यावरील वीरतपस्वी मंदिरासमोर दोन्ही बाजूला 14-14 लहान देवळे आहेत. हिंदू धर्मातील सर्व प्रमुख देवतांची प्राणप्रतिष्ठा येथे करण्यात आली आहे. मंदिरासमोर गे्रनाईटमधील भव्य नंदी आहे. नंदी आणि महाद्वार यामध्ये दुतर्फा बाग आहे. नंदीच्या शेजारी 41 फूट उंचीच्या ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात येत आहे. वीरतपस्वी मंदिराच्या भोवताली 12 ज्योतिर्लिंग, नवग्रह आणि देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
मंदिराचे शिखर अतिशय देखणे झाले आहे. जमिनीपासून कळसापर्यंतची उंची 108 फूट आहे. असे भव्यदिव्य मंदिर आणि महाद्वार महाराष्ट्रात अन्यत्र आढळून येत नाही.
पंचजगद्गुरू आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. 15 रोजी "श्रीं'च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण, पूर्णाहुती, 132 सामुदायिक विवाह सोहळा, लक्षदीपोत्सव, शोभेचे दारुकाम होऊन धर्मसोहळ्याची सांगता झाली.
दिल्लीश्वर औरंगजेबाचा सरदार मिर्झाराजे जयसिंग हा मोठा शिवभक्त होता. दररोज अनेक तास तो शिवपूजा करायचा. आजच्या घडीला वीरशैव समाजामध्ये असे अनेक मिर्झाराजे आहेत. धर्मविरोधी सत्ताधीशांची लाचारी पत्करण्यात त्यांचे आयुष्य चालले आहे. या "मिर्झाराजां'मध्ये धर्माबद्दलचा अभिमान येईल याची शक्यता कमी आहे, परंतु होटगी मठाच्या धर्मसोहळ्याने वीरशैवांमध्ये धर्मचेतना निश्चितच जागी होईल, अशी आशा वाटते.
विशेष नोंदी
होटगी मठांतर्गत आज पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय, डीएड व बीएड महाविद्यालय, वसतिगृहे, वाचनालये अशा 40 संस्था कार्यरत आहेत. देशभरात विविध मठमंदिरांचा जीर्णोद्धार आणि धर्मकार्यही सुरू आहे.
तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज यांच्या नावे साहित्यनिर्मिती नाही, पण स्वामीजींना वाचनाचा छंद आहे. स्वामीजी संस्कृतचे अभ्यासक आहेत. अन्य भक्तांना मार्गदर्शन करून त्यांना स्वामीजी लिहिण्यास प्रवृत्त करतात. श्री धानय्या मठपती यांनी स्वामींच्या मार्गदर्शनानुसार वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज यांचे चरित्र लिहिले आहे.
बृहन्मठ होटगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णप्पा कुंभार हे 7 जून 1971 पासून सेवेत आहेत. दीर्घकाळ मुख्याध्यापक म्हणून कार्य केलेल्या कुंभार सरांचा मठाच्या कार्यात सक्रिय सहभाग राहिला आहे. 31 डिसेंबर 2004 मध्ये निवृत्त झाल्यापासून कुंभार सर विनामानधन सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत.
महाराजांबद्दल बोलताना कुंभार सर म्हणतात, ""पू. महास्वामींनी हुशार आणि तल्लख विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांचे सहाय्य केले आहे. संस्थेकडे खर्चायलाही पैसे नसताना स्वामींनी ही मदत केली आहे. स्वामीजींचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशाल आहे.''
अक्कलकोट रोडवरील शेतात पूर्वी छोटे शिवलिंगाचे मंदिर होते. रस्त्यावरून सायकलीवरून जाणारे, एसटीतून जाणारे सारेच क्षणभर नमस्कार करूनच पुढे जायचे. महाराज एकदा शेतात बसले होते. लोकांच्या भावनेचा कदर करण्यासाठी या छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. 1989 साली केलेला संकल्प आज पूर्णत्वास जाताना दिसत आहे.
महास्वामीजी स्वत: शेतात कष्ट करतात. बैलांची देखरेख करतात. जातीने लक्ष देतात.
No comments:
Post a Comment