संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे, या
खोट्या प्रचाराला त्यांनी जणूकाही उत्तरच दिलेले आहे. ते म्हणतात, ‘‘थोडे
मागे वळून पाहिले किंवा इतिहासाची पाने उलटली, तर रा. स्व. संघावर टीका
करणारे कोण आढळतात? रा. स्व. संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे, ही टीका
प्रथम राष्ट्रसेवा दलाच्या गोटातूनच केली गेलेली आहे. राष्ट्रसेवा दलाच्या
मार्गदर्शकांना ही माहिती असावी, असलीच पाहिजे. याउलट रा. स्व. संघाचे
महाराष्ट्रातील आणि बाहेरचेही स्वरूप मी पाहिले आहे; त्यामुळे या संघटनेत
एकाच जातीचे लोक आहेत, असे मी म्हणू शकत नाही. जनसंघाचेही तेच आहे.
समाजातले निरनिराळे वर्ग त्यात आहेत, याचीही मला माहिती आहे.’’
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्र सरकारात विविध खात्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडणारे आणि मराठी जीवनावर अनेक वर्षे प्रभाव गाजविणार्या यशवंतराव चव्हाणांचे जन्मशताब्दी वर्ष दिनांक १२ मार्च २०१३ ला संपले. या काळात त्यांच्या विचारविश्वावर, कार्यावर, व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे लिखाण मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले. ते यशवंतरावांच्या जीवनाचे समग्र दर्शनच होते.
साधारणपणे जी व्यक्तिमत्त्वे समाजाचे
मार्गदर्शन करतात, समाजधुरीण ज्यांना संबोधले जाते, समाजाच्या, देशाच्या
आदराला जे पात्र ठरतात. त्यांच्या जीवनाचे खरोखर सर्व पैलू उलगडले गेले
आहेत का, की, काहींचा उल्लेख टाळला जातो? असा प्रश्न नेहमी पडतो. यशवंतराव
चव्हाणांसंबंधात हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध मासिकांच्या
२०१२ च्या दिवाळी अंकात त्यांच्यावर मोठमोठे लेख प्रकाशित झालेत. मागील
पिढीला जे यशवंतराव माहिती आहेत त्याचेच दिग्दर्शन लेखात झाले, हे साहजिकच
होते.
या पार्श्वभूमीवर पुण्याहून निघणार्या
‘एकता’ मासिकाच्या दिवाळी अंकात, कै. यशवंतराव चव्हाणांच्या
जन्मशताब्दीच्या निमित्ताने दोन लेख प्रकाशित झाले आहेत. ते एकदम वेगळे
वाटतात. राजकारणातले यशवंतराव व राजकारण वगळून यशवंतराव या लेखांत दृष्टीस
पडतात. त्यातला एक लेख आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक व
यशवंतरावांशी जवळून परिचय असणारे डॉ. न. म. जोशी यांचा. लेखाचे शीर्षक आहे-
‘देवराष्ट्र ते दिल्ली.’ दुसरा लेख ‘सौ. वेणुताई यशवंत चव्हाण’ या
शीर्षकाचा सौ. वसुधा ग. परांजपे यांनी लिहिला आहे. या दोन लेखांशिवाय
यशवंतराव चव्हाणांची रा. स्व. संघासंबंधी धारणा कोणती होती, हे स्पष्ट
करणारा मजकूरपण आहे.
त्यापैकी ‘देवराष्ट्र ते दिल्ली’ या डॉ. न. म. जोशींच्या लेखातील काही अंश येथे देत आहे-
‘‘स्वातंत्र्यआंदोलनात यशवंतराव ठिकठिकाणी
जनजागृतीसाठी हिंडत होते. रत्नागिरीस जाऊन स्वा. सावरकरांची भेट घ्यायची,
असा त्यांनी (यशवंतरावांनी) निश्चय केला होता. रत्नागिरीबद्दल
यशवंतरावांना दोन आकर्षणे होती. समुद्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वा.
सावरकरांना यशवंतरावांनी पाहिलं. त्यांचं ते वर्णन करतात-
‘‘मध्यम उंचीचे, काहीसे किरकोळ बांध्याचे,
डोळ्यांवर चष्मा आणि त्या पलीकडे त्यांची भेदक नजर अशी ती मूर्ती समोर
आली. अंगात स्वच्छ पांढरा सदरा, तितकेच स्वच्छ पांढरे सैलसे धोतर, पायात
साध्या वहाणा अशा घरगुती वेशात स्वातंत्र्यवीर होते.’’ सावरकरांनीच त्यांना
विचारले, ‘‘तुम्हाला काही मला विचारायचं आहे का? ‘‘निदान मला तरी काही
विचारायचे नाही. मला फक्त आपणांस डोळेभरून पाहायचे होते.’’ -यशवंतरावजी
म्हणाले.
‘‘सागर आणि सावरकर हे रत्नागिरीत एकाच
वेळी पाहण्याचं भाग्य लाभल्यामुळे रत्नागिरीची माझी आठवण या भेटीशी संलग्न
आहे,’’ असं यशवंतरावजींनी ‘कृष्णाकाठ’मध्ये आवर्जून लिहिलं आहे.
सावरकरभेटीबद्दल यशवंतराव लिहितात, ‘‘ज्या
घटनेने मला काही शिकविले आणि माझ्यावर कायमचा परिणाम झाला, अशा १९३०
सालच्या माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अशा घटनांपैकी सावरकर-भेट ही एक घटना
आहे.’’ (कृष्णाकाठ)
एकता मासिकाच्या याच अंकात, यशवंतराव
चव्हाणांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचे प्रांजळ मत उलगडून दाखविणारा
मजकूर प्रकाशित झालेला आहे. ‘यशवंतराव चव्हाण यांचे प्रांजळ आत्मकथन’-
‘संघात सर्व जातींचा समावेश’ या शीर्षकाखाली संघासंबंधातली यशवंतरावांची
भूमिका स्पष्ट केली आहे. यशवंतरावांच्या ‘भूमिका’ या पुस्तकातून मजकूर
घेतला आहे, हेही लेखाच्या शेवटी सांगितले गेले आहे. त्यात यशवंतरावच संवाद
साधत आहेत, हे लक्षात येतं.
यशवंतराव म्हणतात, ‘‘जातीय नावावर
चालणार्या वसतिगृहात राहण्याचे माझ्या मनाने नाकारले. लहान खोलीत राहिलो,
शिक्षण घेतले. योगायोेग असा की, त्या खोलीत जो जोडीदार मिळाला, तोही एक
माझा ब्राह्मण मित्रच निघाला.’’
‘‘जातीयवादाचा विषारी विचार लहानपणापासूनच
मला कधी शिवला नाही. गरीब घरातल्या शेतकर्यांशी, हरिजन वर्गातल्या
मंडळींशी जेवढे माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तेवढेच पुढारलेल्या ब्राह्मण
वर्गातील लोकांशीही आहेत.’’ एवढे सांगून यशवंतराव हे स्पष्ट करतात की,
‘‘जनसंघ आणि रा. स्व. संघ यांच्याशी राजकीयदृष्ट्या मतभेद असले, तरी
त्यांच्यापैकी अनेकांशी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. इतकेच कशाला,
मनातले दु:ख कुणाला सांगायचे ठरवले, तर चारातले तीन ब्राह्मण असतात.’’
संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे, या
खोट्या प्रचाराला त्यांनी जणूकाही उत्तरच दिलेले आहे. ते म्हणतात, ‘‘थोडे
मागे वळून पाहिले किंवा इतिहासाची पाने उलटली, तर रा. स्व. संघावर टीका
करणारे कोण आढळतात? रा. स्व. संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे, ही टीका
प्रथम राष्ट्रसेवा दलाच्या गोटातूनच केली गेलेली आहे. राष्ट्रसेवा दलाच्या
मार्गदर्शकांना ही माहिती असावी, असलीच पाहिजे. याउलट रा. स्व. संघाचे
महाराष्ट्रातील आणि बाहेरचेही स्वरूप मी पाहिले आहे; त्यामुळे या संघटनेत
एकाच जातीचे लोक आहेत, असे मी म्हणू शकत नाही. जनसंघाचेही तेच आहे.
समाजातले निरनिराळे वर्ग त्यात आहेत, याचीही मला माहिती आहे.’’
यशवंतराव आपला व्यक्तिगत अनुभव या ठिकाणी
कथन करतात. ते म्हणतात, ‘‘पुण्याला जेव्हा मी वकिलीचा अभ्यास करायला आलो,
त्या वेळी लॉ कॉलेजसमोर, जिथे मी राहत असे, तेथे माझा ‘रूमपार्टनर’ हा रा.
स्व. संघाचा सचोटीचा कार्यकर्ता होता. माझ्या मित्रमंडळीतही अशांचा भरणा
होता. तेव्हा जनसंघावरील माझी टीका म्हणजे ब्राह्मण वर्गावर किंवा जातीवर
टीका, असे भासविण्याचा प्रयत्न जेव्हा माझ्या बाबतीत होतो, तेव्हा त्याचे
मला हसू येते.’’
यशवंतराव चव्हाणांसंबंधी त्यांच्या
जन्मशताब्दीवर्षात ठिकठिकाणी लेख आहेत. परंतु, ‘एकता’ मासिकाच्या दिवाळी
अंकात त्यांच्यावर जे लिखाण प्रकाशित झाले ते वेगळ्या पैलूंचे दर्शन
घडविणारे आहे, म्हणून त्यातील काही अंश दिलेले आहेत.
(तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रा. श्रीकांत वि. देशपांडे यांच्या 'यशवंतराव चव्हाणांचे प्रांजळ मत' या लेखातून साभार ) ९९२२१७१५८७
No comments:
Post a Comment