Saturday, June 15, 2013

शरत्चंद्र बसू यांना सुभाषचंद्र बोस यांचे पत्र

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म आणि शालेय शिक्षण कटक येथे पूर्ण झाले. ज्यावेळी ते कटकमधील रेविनशा शाळेत दहावी इयत्तेत शिकत होते, त्यांच्यापेक्षा मोठे असलेले त्यांचे मधले भाऊ लंडनमध्ये शिकत होते. मॅट्रिक परीक्षेच्या तयारीदरम्यान सुभाषने त्यांना एक पत्र लिहिले, ज्यात त्यांनी भारताच्या चिंताजनक स्थितीचा उल्लेख केला होता आणि भारताच्या पुनरुत्थानाविषयी विश्वास प्रकट केला होता. सुभाषचे सर्व पत्रे त्यांच्या मोठ्या भावाने सांभाळून ठेवली आणि आपल्या मृत्यूच्या आधी त्या पत्रांना `नेताजी रीसर्च ब्युरो'कडे सोपवले. बांग्लामध्ये लिहिलेल्या एका पत्राचा अनुवाद आम्ही येथे देत आहोत.
http://www.thesundayindian.com
 
८ जानेवारी १९१३, कटक
परमपूज्य मधल्या दादांस,
एक वर्ष लोटले. बारा महिन्यांत झालेली प्रगती आणि अवगतीचा लेखा-जोखा आपल्याला ईश्वरासमोर मांडावा लागेल. गत वर्षातील कार्याचा विचार केल्यानंतर जीवन-ध्येयाविषयी प्रश्न उपस्थित केल्याशिवाय मी राहू शकत नाही. कवी टेनिसन दृढ आशावादी आहेत. त्यांचा विश्वास आहे की संसार क्षणा-क्षणाला प्रगती करत आहे. आपला देशही प्रगती करत आहे का? माझ्यामते तर करत नाहीये. संभव आहे, की तो पापाच्या मार्गावरून शांती आणि प्रगतीच्या मार्गावर येत आहे. विचार केल्यावर चारी बाजूंना अंधार, गहन अंधारच दिसत आहे. केवळ निष्ठावान देशभक्तांना प्रेरीत करण्यासाठी कुठे-कुठे क्षीण आशेचे किरण दिसतात. ते आशा-किरण कधीतरी चमकून उठतात तर कधी अंधारात लुप्त होऊन जातात. भारताच्या भविष्याचा इतिहास अंधारभरल्या आणि वादळाने विक्षुब्ध झालेल्या आकाशासमान आहे. भारतवर्षाची स्थिती कशी होती आणि आता कशी झाली आहे? किती दयनीय परिवर्तन आहे हे. कुठे आहेत ते परम ज्ञानी, महर्षी आणि तत्त्वज्ञ! कुठे आहे ते आमचे पूर्वज ज्यांनी ज्ञानाच्या सीमेला स्पर्श केला होता. कुठे आहेत त्यांचे दैदिप्यमान व्यक्तित्व? कुठे आहे त्यांचा स्वाभिमान, ब्रम्हचर्य आणि भगवद-अनुभूती, ज्याची आम्ही स्तुतिगान करत असतो. सर्व काही संपले. आता वेदमंत्रांचे पठण होत नाही. 
 पवित्र गंगा तटावर आता साम-गानचा आवाज घुमत नाही. पण आम्हाला अजूनही आशा आहे की आमच्या ह्दयातला अंधकार दूर करण्यासाठी आणि अनंत दीप-शिखा प्रज्वलित करण्यासाठी आशादूत अवतरीत झाले आहेत. ते आहेत - विवेकानंद. ते दिव्यकांति, मर्मवेधी-दृष्टीयुक्त संन्याशाच्या वेषात विश्वभरात हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठीच आले आहेत. आता भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. परमेश्वर करुणामय आहेत. पाप, अधर्म, अनैतिकता यांपासून हटवून तो आपल्याला ध्येयाकडे घेऊन जात आहे. ईश्वरच आदी-शक्ती आहे. त्याच्याच चारी बाजूंनी सृष्टी परिक्रमा करत आहे. आपल्याला प्रगती करावी लागेल. मार्ग काट्यांनी भरलेला असू शकेल, यात्रा कष्टप्रद असू शकेल, पण आम्हाला चालत राहावेच लागेल. कदाचित तो दिवस वेळाने येईल पण येईल नक्की, ही माझी एकमात्र आशा आहे. आपण असा अनुभव करत नाही का की ईश्वर आपल्याला त्याचप्रकारे स्वत:कडे आकर्षित करतो, जसे लोहचुंबक लोखंडाला. माझ्यामते आपण जरूर अनुभव करत असाल. त्याने आपल्या चारही बाजूला निसर्गाची अनेक रूपं सादर केली आहेत, ज्यातून आपल्याला त्याच्या सत्तेचे ज्ञान होते. अनंत आकाश आणि अगणित नक्षत्र आपल्याला त्याची आठवण करून देतात. तो तर करुणामय आहे, आम्हीच अधर्मी, पापी आहोत. दादा, हे सर्व मी का लिहीत आहे? मी पाहिले आहे की आपल्या हदयाचा भार हलका करण्यासाठी आपल्या भावनांना व्यक्त करणे आवश्यक होऊन जाते. माझ्यासाठी हा क्षण असाच आहे. काही दिवसांपासून अनुभव करतो आहे की परदेशातील अंतराने आपल्यादरम्यानही अंतर निर्माण केले आहे, पण आपल्या पत्राने त्या भावनेला निर्माण होऊ दिले नाही.
दरम्यान आमच्या टेस्ट चालू आहेत. पेपर चांगले जात आहेत. आम्ही सकुशल आहोत. आशा आहे, आपणही कुशलतापूर्उाक असाल. नमस्कार.
आपला परमस्नेही
सुभाष

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी