Wednesday, August 28, 2013

Published: Wednesday, August 28, 2013
नक्षलवाद्यांना साधनसामग्रीचा पुरवठा करण्याच्या आरोपावरून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकणाऱ्या हेम मिश्रा या विद्यार्थ्यांला गडचिरोली पोलिसांनी अटक केल्यामुळे नक्षल चळवळीच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. हेम मिश्रा निर्दोष असल्याचा जोरदार प्रचार सध्या सोशल नेटवर्कीगच्या माध्यमातून या समर्थकांकडून सुरू असला तरी हा विद्यार्थी कट्टर नक्षलवादी असून, तो नियमितपणे अबूजमाड परिसरातील नक्षलवाद्यांना भेटत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या अटकेमुळे चळवळीचे ’दिल्ली कनेक्शन’ समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

जेएनयूच्या भाषा विभागात चिनी भाषेचा अभ्यास करणारा हेम केशवदत्त मिश्रा मूळचा उत्तराखंडचा आहे. हे विद्यापीठ नक्षलवादी चळवळीच्या वैचारीक प्रसाराचे मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते. गेल्या शनिवारी हेम मिश्रा एटापल्ली तालुक्यातील दोन आदिवासी तरुणांच्या मदतीने सध्या अबूजमाडच्या पायथ्याशी तळ ठोकून असलेल्या जहाल नक्षलवादी नर्मदाला भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत असलेल्या हेम मिश्राकडून पोलिसांनी या चळवळीविषयीचे भरपूर साहित्य जप्त केले आहे. शिवाय त्याच्याकडे विशिष्ट ’कोड’ मध्ये असलेली संगणकाची चीपसुद्धा सापडली आहे. ही चीप त्याने ओळखपत्रात दडवून ठेवली होती. त्याचा उलगडा करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या अटकेमुळे या विद्यापीठातील विद्यार्थी तसेच नक्षलवादी चळवळीचे समर्थक खवळले आहेत. 
हेम मिश्रा हा विद्यापीठाच्या वर्तुळात रंगकर्मी म्हणून सर्वाना ठावूक आहे. त्याला जाणीवपूर्वक नक्षलवादी ठरवण्यात येत असल्याचा आरोप त्याच्या समर्थकांनी सध्या फेसबुक व व्टिटर वरून चालवला आहे. दिल्लीच्या तरूणाने आदिवासी भागात फिरायचे सुद्धा नाही काय असा सवाल या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे. या विद्यापिठातील विद्यार्थी संघटनेने हेम मिश्रा उपचारासाठी हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पात जात होता असा युक्तिवाद सुरू केला आहे. गडचिरोली पोलिसांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हेम मिश्रा या आधी दोन ते तीनदा अबूजमाड परिसरात जहाल नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी गेला होता. तेव्हापासूनच त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. त्याच्या जवळ सापडलेली माहिती राष्ट्रद्रोहाशी संबंधित आहे म्हणूनच त्याला अटक करण्यात आली असे पोलिसांचे म्हणणे आहे.
 मध्य भारतातील जंगलात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांना दिल्लीतील त्यांच्या समर्थकांकडून भरपूर मदत केली जाते. नक्षलवाद्यांचे हे दिल्ली कनेक्शन या अटकेमुळे उघडकीस येण्याची शक्यता असल्यानेच या समर्थकांनी सध्या गोंधळ करणे सुरू केले आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. येथील चौकशी पूर्ण झाल्यावर मिश्राला दिल्लीला नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान हेम मिश्रा निर्दोष आहे असा दावा करत काल सोमवारी जेएनयुमधील विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतर समोर निदर्शने केली. त्याच्या सुटकेसाठी स्वाक्षरी मोहीमसुद्धा राबवली जात आहे. या घडामोडींचा कोणताही परिणाम चौकशीवर होणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेमलकसाला जाण्याची गरज काय?
हेम मिश्रा उपचारासाठी हेमलकसाला जात होता, हा दावाही पोलिसांनी फेटाळून लावला आहे. देशभरातले नागरिक उपचारासाठी दिल्लीला जात असताना या विद्यार्थ्यांला हेमलकसाला जाण्याची गरज भासण्याचे कारण काय, असा सवाल गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केला. त्याच वेळी कदम यांनी चौकशीविषयी काहीही सांगण्यास नकार दिला.
http://www.loksatta.com/maharashtra-news/gadchiroli-police-get-strong-evidence-of-naxal-connection-with-delhi-183022/4/

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी