Tuesday, September 3, 2013

दोनच मिनिटांत बरा झालो

भैरप्पा मल्लिकार्जून पाटील, शिर्पनहळ्ळी, ता. द. सोलापूर. 9325306283
सात वर्षांपूर्वीची घटना आहे. शेतात काम करताना अचानक माझ्या पाठीत कळ आली आणि तीव्र वेदना होऊ लागल्या. तेव्हा मी 58 वर्षांचा होतो. सोलापूरपासून 18 किलोमीटरवर शिर्पनहळ्ळी हे माझं गाव, पण आडवळणी. त्यामुळे वाहनांची सोय नाही. माझा मुलगा शहरात पत्रकार आहे. त्याने सोलापुरातूनच रिक्षा केली. मला काहीच हालचाल करता येत नव्हती. बसलेल्या स्थितीतून उठायचे म्हटले तरी पाठीत जीवघेणी कळ. हळूवार उचलून रिक्षात बसवण्यात आले. पाय थोडे जरी हलले तरी तीव्र वेदना होत.

 सोलापुरातील नामवंत अस्थिरोग तज्ज्ञाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक्स -रे आणि अन्य तपासण्या झाल्या. औषधंही सुरू होती. विशिष्ट प्रकारच्या उपकरणाने मणक्यांना मुंग्या (स्टिम्युलेशन) आणत होते. 6 दिवस झाले तरी परिणाम काही जाणवत नव्हता. कधीही दवाखान्याची पायरी न चढलेला मी धसकाच घेतला होता. जेवण केले की शौच वगैरे कटकटी सुरू होतील, म्हणून केवळ दोन-चार बिस्किटांवर दिवस ढकलत होतो. मी पुन्हा पुन्हा डॉक्टरांना विचारत होतो की, आजार कमी व्हायला किती दिवस लागतील? नेमका कालावधी सांगण्यास डॉक्टरही असमर्थ होते. आणखी एक-दोन आठवडे तरी काही सांगू शकत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. स्थिती गंभीर होत चालली होती. अक्कलकोटच्या शिवपुरी येथे कायरोप्रॅक्टिक शिबिर सुरू असल्याची माहिती मुलाने आणली. त्याने तिकडे नेण्यासाठी आग्रह धरला. समजा शिवपुरीच्या शिबिरात नेले आणि काही उपयोग झाला नाही तर काय करायचे, अशी भीतीही त्याला सतावत होती आणि मलाही. हो नाही करत अखेर शिवपुरीला जायचे ठरले.
शिवपुरीच्या शिबिरात नेणार असे सांगितल्यावर ‘हा शिकला सवरलेला मुलगा मूर्खासारखा का विचार करत आहे’ अशा चेह-याने डॉक्टरांनी मुलाकडे पाहिले. शेवटी त्यांनी परवानगी दिली. शिबिरात 4 ते 5 हजार लोकांची रांग होती. पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी तिथे स्वतंत्र व्यवस्था होती. त्यामुळे मला लगेच मोटारीतून उचलून तंबूतील टेबलवर झोपवण्यात आले. कायरोप्रॅक्टिक उपचार करणा-या तिथल्या अमेरिकन व्यक्तीने रिपोर्ट पाहिले आणि काही जुजबी माहिती विचारली. पालथे झोपवले. कमरेजवळ एका विशिष्ट ठिकाणी हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी जोरात दाब दिला. कट् असा आवाज झाला. विव्हळलो. दुस-याच क्षणी उठायला सांगितले. काय आश्चर्य मी उठून चालू लागलो.

पाचच मिनिटांपूर्वी ज्या माणसाला उचलून आणले तो चालत येतोय हे पाहून तेथील सारेच अचंबित झाले. या उपचार पद्धतीने मला दोनच मिनिटांत बरे केले होते. आजही मी पिकाला पाणी देणे, बैलांना चारापाणी आणि शेतातली इतरही बरीच कामे करतोय. मी ठणठणीत आहे. माझी पाठ त्यानंतर कधीच दुखली नाही. कायरोप्रॅक्टिक ही पारंपरिक उपचारपद्धती आहे. अन्य उपचार पद्धतीच्या डॉक्टरांनीही यातील तंत्र का समजून घेऊ नये ? यामुळे संबंधित डॉक्टरच्या ज्ञानात भरच पडेल की नाही? आपल्याला माहीत नसलेल्या काही गोष्टी सत्य असू शकतात, असे डाक्टर मंडळींना का वाटू नये? रुग्णाला बरे करणे, यालाच प्राधान्य हवे असे वाटते, परंतु माझ्यावर उपचार करणा-या सोलापुरातील अस्थिरोग तज्ज्ञाने कायरोप्रॅक्टिकने बरे झाल्याचे सांगूनही ती पद्धत समजून घेण्याविषयी अनास्था दाखवली, त्याबद्दल वाईट वाटते.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-within-two-minutes-bhairappa-mallikarjun-recovery-4364093-NOR.html 
Sep 03, 2013,  divya marathi.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी