एकनाथजी रानडे |
सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून माननीय एकनाथजी रानडे जन्मशती वर्षाला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने…
स्वामी विवेकानंदांचे स्मारक |
भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शिलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक आता सार्या देशाला माहीत झाले आहे. तीन सागरांच्या संगमस्थळी असलेल्या या स्मारकाला
दरमहा दीड लाखाहून अधिक लोक भेट देतात. सर्व स्तरातून प्रचंड
विरोध होऊनही या स्मारकाच्या उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती
माननीय एकनाथ रानडे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन नवी
दिल्ली येथे नुकतेच, ९ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
स्मारक उभारणीचा इतिहास मोठा चित्तथरारक आहे. एकनाथजींनी अडचणींचे संधीत रुपांतर करण्याची कला जणू आत्मसात केली होती. त्यामुळे समोर आलेल्या प्रत्येक अडचणींबरोबर स्मारक अधिकाधिक विशाल आणि आकर्षक होत गेले. ३ दिवसांत ३२३ सर्वपक्षीय खासदारांच्या सह्या घेणे, ३५ लाख लोकांकडून (तेव्हांच्या भारताच्या लोकसंख्येच्या १ टक्के) कमीतकमी १ रुपयाची देणगी एकत्रीत करणे यातून एकनाथजींची कार्यकुशलता दिसते. भारतातील सर्वच राज्य सरकारांनी देणग्या दिलेले हे एकमेव स्मारक. आजवर ६ कोटीहून अधिक लोकांनी भेट देलेले हे स्मारक आणि त्याचा इतिहास पाहिल्यानंतर ध्यानात येते की एकनाथजींनी फक्त स्मारक उभारणी केली असती तरी त्यांचे कार्य देशभक्तीची दृष्टी असलेले म्हणून अतुलनीय ठरले असते. पण त्यांनी याहूनही उल्लेखनीय काम केले आहे ते विवेकानंद केंद्राच्या स्थापनेचे. स्वामी विवेकानंदांचे जिवंत स्मारक.
बहुआयामी व्यक्तिमत्व
'कॉंग्रेस पक्षामध्ये एक एकनाथजी जरी असते तरी मी कॉंग्रेस बदलून
दाखवला असता', ही लालबहादूर शास्त्री यांची टिपण्णी
बोलकी आहे. आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारे
प्रमुख नेते कारागृहात होते. असे असताना संघाचे अतिशय प्रभावी
प्रचारक असलेले एकनाथजी बाहेर कसे, इंदिराजी एकनाथजींच्या पाठिशी
कसे याचे कोडे कॉंग्रेसच्या नेत्यांना कधीच उलगडले नाही. कम्युनिस्ट
नेते ज्योती बसू यांच्या घरी राहून, त्यांच्या पत्नीचा सक्रीय
सहभाग स्मारक निर्मितीत घेणारा आरएसएसचा हा कडवा प्रचारक डाव्या चळवळीतही चर्चेचा विषय
बनला असल्यास त्यात नवल ते काय?
१९४८ मध्ये गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली. ती बंदी उठवण्यामध्ये एकनाथजी हे प्रमुख भूमिकेत
होते. संघाची घटना लिहून तत्कालिन केंद्र सरकारला सादर करण्यातही
एकनाथजींचा वाटा प्रमुख राहिला. या चर्चांदरम्यान सरदार वल्लभभाई
पटेल हे एकनाथजींमुळे खूपच प्रभावित झाले. त्यांनी एकदा विधान
केले, ‘लोक मला लोहपुरुष म्हणतात, पण एकनाथ रानडे तर पोलादी पुरुष आहेत.’
तसे पाहायला गेले तर एकनाथजी देशवासीयांना अपरिचितच आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून त्यागमय जीवन जगणार्या एकनाथजींचे नाव कन्याकुमारीच्या
त्या विख्यात स्मारकावर कोठेच कोरलेले नाही, हे स्वाभाविकच होते. एकनाथजींचा जन्म महाराष्ट्राच्या
अमरावती जिल्ह्यातील टिमटाला गावी झाला. बालपणीच ते राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या
सानिध्यात आले आणि नि:स्वार्थ देशसेवेचे या वयातील संस्कार त्यांच्या
जीवनाला वळण देणारे ठरले. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशकार्यात
स्वत:ला झोकून दिले. पुढे ते संघाचे सरकार्यवाहही
होते.
दिव्य मराठी, |
स्मारक कार्याशी जोडले गेले
स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ ला झाला. १२ जानेवारी १९६३ रोजी या घटनेस शंभर वर्षे
पूर्ण होत होती. ही जन्मशताब्दी कशी साजरी करावी हा विचार कन्याकुमारी
येथील काही विवेकानंदप्रेमी मंडळी करत होती. त्यांच्या मनात आले
की त्रिसागराने वेष्टित श्रीपादशिलेवर जेथे स्वामीजींना आपले जीवनध्येय सापडले त्या
स्थानी एक सुंदर स्मारक उभे करावे. एक ‘स्मारक समिती’ गठित करण्यात आली.
निधी संकलन सुरू झाले. १२ जानेवारी १९६३ ह्या दिवशी
समारंभपूर्वक श्रीपादशिलेवर एक स्मृतिशिला स्थापित करण्यात आली. त्यावर कोरले होते, ‘या ठिकाणी दि. २५ डिसेंबर १८९२ ते २७ डिसेंबर १८९२ या काळात
स्वामी विवेकानंदांनी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येअखेर स्वामीजींना
आपले जीवितध्येय गवसले.’कोणत्याही चांगल्या कार्यात
विघ्न आणणारे विघ्नसंतोषी लोक प्रत्येक समाजात असतातच ! येथेही तसेच घडले. त्यावेळी
स्मारक समितीला खंबीर नेतृत्वाची आवश्यकता होती. त्यांच्या नजरेसमोर
नाव आले - श्री. एकनाथ रानडे यांचे.
श्री. एकनाथ
रानडे हे एक कुशल संघटक होते. आपले सारे जीवन त्यांनी राष्ट्रार्पण
केले होते. स्वामी विवेकानंद हे त्यांचे श्रद्धास्थान होते.
जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली म्हणून त्यांनी विवेकानंद विचारांचा संग्रह
‘राऊझिंग कॉल टू हिंदू नेशन’ (हिंदुतेजा, जाग
रे!) हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. स्मारक
समितीचे लोक एकनाथजींना भेटले. त्यांनीही स्मारक समितीचे ‘संघटन सचिव’ हे पद स्वीकारले
व कार्यास आरंभ केला.
सामान्य माणसापासून ते राष्ट्रपतींपर्यंत सर्वांना एकनाथजी भेटले. स्मारकासाठी सामान्य माणसाच्या एक रुपयापासून
निधिसंकलन करावयास सुरुवात केली. राज्य सरकारे व केंद्रशासन तसेच
उद्योगपतींच्या सहकार्याने दीडकोटी रुपये जमविले. या निधिसंकलनात
तीस लाख सामान्य जनतेचा सहभाग होता. संसदेतील बहुसंख्य सदस्यांनी
हे स्मारक श्रीपाद शिलेवरच झाले पाहिजे अशी आग्रही विनंती पंतप्रधानांकडे केली.
श्री. नेहरूंनीही मागणीला पाठिंबा दर्शवला.
स्मारकाच्या कामाला उत्साहाने सुरुवात झाली.
आज कन्याकुमारी येथे उभे असलेले स्मारक हे भारतीय स्थापत्य कलेतील
एक महान आश्चर्य तसेच वास्तुशास्त्राचा
आगळा आविष्कार आहे. भारतातील सर्व
पवित्रतम गोष्टींचा सुंदर संगम तेथे आहे. हे स्मारक तीन विभागात
उभारण्यात आले आहे. देवी पार्वतीने उभ्याने तपश्चर्या केल्यामुळे ज्या शिलेवर
तिच्या पायाचा ठसा उमटला, त्यावर मंदिर
उभारून त्याचे जतन केले आहे. दुसरा स्वामी विवेकानंद यांचा अखंड
पुतळा आणि तिसरा स्वामीजींना अभिप्रेत असलेले ओमकार प्रतीकासह ध्यान मंदिर.
हे स्मारक २ सप्टेंबर १९७० रोजी तत्कालीन राष्ट्रपतींच्या उपस्थितीत
रामकृष्ण मठाच्या अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले. लक्षावधी देशी आणि विदेशी जिज्ञासू पर्यटक स्मारकाला प्रतिवर्षी भेट देऊन विवेकानंद
विचारांनी प्रेरित होतात.
शिवभावे जीवसेवा
नुसत्या दगडमातीचे स्मारक राष्ट्र पुनरुत्थानाला
पुरे पडत नसते. स्वामीजींना प्रत्यक्ष
कार्य करणारे जिद्दीचे तरुण-तरुणी अभिप्रेत होते. केवळ भारतीय समाजाचेच परिवर्तन नव्हे तर अखिल मानवजातीचा उत्कर्ष स्वामीजींना
अपेक्षित होता. ‘विवेकानंद केंद्र’ स्थापनेमागे हेच विचार प्रेरणा देत होते.
आणि तेच खर्या अर्थाने विवेकानंदांचे स्मारक ठरणार होते. स्वामीजींचे ‘मानवसेवा हीच माधवसेवा’ हे तत्त्व आपले
अंतिम ध्येय समजून विवेकानंद केंद्राची स्थापना ७ जानेवारी १९७० रोजी कन्याकुमारी येथे
झाली. केंद्र कार्यासाठी ३० वर्षांपर्यंतच्या अविवाहित,
पदवीधर तरुण-तरुणींची ‘जीवनव्रती’ म्हणून निवड केली
जाते. पहिल्या वर्षी त्यांना सेवाकार्याचे प्रशिक्षण देऊन नंतर
पुढील तीन वर्षे प्रत्यक्ष कार्यानुभवासाठी केंद्राची कामे सुरू असलेल्या मागास आदिवासी
भागात पाठविण्यात येते. जीवनव्रतींच्या उदरनिर्वाहाचे उत्तरदायित्व
केंद्राकडे असते. पण या कार्यकर्त्यांना साध्या राहणीमानात वावरण्याची
तयारी ठेवावी लागते. जीवनव्रतींच्या मदतीला समाजाचे ऋण मानणारे
स्थानिक कार्यकर्ते असतात. शिवाय सेवाकार्येच्छु मध्यमवर्गीयांनाही
केंद्राच्या कामात सहभागी होता येते.
केंद्राची सेवाकार्ये
एकनाथजींच्या द्वारे लावलेल्या एका छोट्याशा
रोपट्याने - ‘विवेकानंद केंद्रा’ने आज अरुणाचल, आसाम, नागालँड,
अंदमान, तमिळनाडू या ठिकाणी एका बहुआयामी संघटनेचे
रूप धारण केले आहे.शाखा, प्रकल्प व सेवा
यांची संख्या ८१३ वर पोहोचली आहे. ६ भाषांमधून ९ नियतकालिके,
२२० बालवाड्या, मुलांसाठी अनौपचारिक शिक्षण देणारी
५२ आनंदालये, स्त्रियांसाठी व्यावसायिक शिक्षण देणारी ६ केंद्रे,
४ रूग्णालये. तामिळनाडूतील ५ दक्षिणी जिल्ह्यातील
असंख्य गावांमध्ये तसेच कर्नाटक व झारखंडच्या प्रत्येकी एका जिल्ह्यात ग्रामीण विकास
प्रकल्प. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वरजवळ वनवासी तसेच ग्रामीण बालकांसाठी
वसतिगृह आणि लगतच्या गावांमध्ये ग्रामीण विकास कार्य तसेच विविध क्षेत्रात प्रशिक्षण
दिले जात आहे.
याशिवाय केरळमध्ये कोडुंगलूर येथे वेदांचे
अध्ययन आणि आपल्या देशातील प्राचीन विद्यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने एक संस्था
कार्यरत आहे. नवी दिल्ली येथे विवेकानंद इंटरनॅशनल ङ्गाउंडेशन,
गोवाहाटी येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑङ्ग कल्चर अशा संस्थांच्या माध्यमातून
भारतयत्व जपणे, राष्ट्रीय धोरण ठरवताना सहाय्यभूत ठरेल,
जगातील संस्कृतींमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने संशोधनकार्य,
संवादासाठी व्यासपीठ अशा स्वरूपाचे काम सुरू आहे. बायोगॅस तंत्रज्ञान, कमी किमतीची घरे, जलसंवर्धन, औषधी वनस्पती यांचा प्रसार तसेच नैसर्गिक
साधन संपत्ती विकासाची कामे सुरू आहेत.
सामान्य माणसांची असामान्य संघटना
विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रतींसमोर
एकनाथजी म्हणतात, ‘‘मागील काही
शतकांच्या इतिहासाकडे नजर टाकली, तर तुमच्या
लक्षात असे येईल की, जेव्हा एखादे महान कार्य सुरू होते तेव्हा
त्यामागे एखादा महापुरुष असतोच. एक थोर आत्मा पुढे येतो,
एखादी कल्पना मांडतो, संघटना किंवा आंदोलन उभे
करतो आणि काहीतरी महान कार्य घडते. जोपर्यंत तो तिथे असतो,
तोपर्यंत त्या आंदोलनाचा वेग कायम राहतो. जेव्हा
तो मरण पावतो किंवा या कामापासून दूर जातो, तेव्हा त्यांचा नंतरचा
थोडा फार परिणाम काही वर्षे शिल्लक राहतो व हळूहळू ते आंदोलन मृतवत होते.
राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक जीवनात हे सतत सिद्ध
झालेले दिसते. स्पष्टपणे दिसते.
कोणत्याही थोर पुरुषाच्या आगमनाची प्रतीक्षा न करता आपल्याला
संघटना उभी करावयाची आहे. आपल्याला एक महान
विचार देण्यात आला आहे, हे आपल्याला माहीत आहे, हे विचार देणारे निघून गेले आहेत, मरण पावले आहेत.
पण विचार आहेत. या विचारांची आपल्याला धारणा करावयाची
आहे. आपण जरी सामान्य असलो तरी आपल्या मर्यादित क्षमता,
पात्रतांसह एकत्र येऊन आपण मोठे काम उभे करू शकतो. हाच आपला आधार असायला हवा आणि आपले काम उभे करीत असताना आपण संघटित कार्याची
कलादेखील शिकायला हवी. एखाद्या निसरड्या जागेवरून लोक जसे एकमेकांचे
हात धरून पुढे जातात, सर्वजण एकाच वेळी घसरतील असे क्वचितच घडते.
एखाद्या विशिष्ट जागी एखादा कदाचित घसरेल; पण त्याला
उठवावयाला बाकी सगळे असतील. त्यामुळे जेव्हा १०-१५ लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांची खाली पडण्याची शक्यता
राहत नाही. जर एखादा एखाद्या विशिष्ट क्षणी, विशिष्ट जागी पडला, तरी बाकीचे भक्कम पायावर उभे असतात
आणि त्या माणसाला पकडण्याच्या स्थितीत असतात, तेव्हा आपण सर्व
एकत्र असले पाहिजे - एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक.’’
थोडक्यात : मनुष्य
निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान हे ब्रीद समोर ठेवून शिवभावे जीवसेवा या विचाराने कार्य
करणार्या संघटनेची - विवेकानंद केंद्राची स्थापना एकनाथ रानडे यांनी
केली. विविध सेवाप्रकल्प आणि योग, संस्कार
व स्वाध्याय या माध्यमातून देशभरात विवेकानंद केंद्राचे कार्य सुरू आहे. एकनाथजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९ नोव्हेंबार २०१४ ते १९ नोव्हेंबर २०१५
या कालावधीत ५ लाखाहून अधिक तरुणांपर्यंत विवेकानंदांचे मनुष्यघडणीचे विचार पोहोचवण्याची
योजना करण्यात आली आहे. आपले संपूर्ण जीवन केंद्राच्या माध्यमातून
देशसेवेसाठी वाहिलेल्या कार्यकर्त्यांना जीवनव्रती म्हणतात. शिक्षण पूर्ण
झाल्यावर किंवा नोकरी-व्यवसायातून 'रिटायर्ड' पण शरीर-मनाने 'नॉट टायर्ड'
असे तरुण काही वर्षांसाठी केंद्राच्या माध्यमातून सेवा करतात त्यांना
सेवाव्रती म्हटले जाते. याशिवाय सर्वसामान्य स्त्री-पुरुष नियमित ठराविक
वेळ देऊन या कार्यात आपले योगदान देत असतात.
‘राउझिंग
कॉल टु दी हिंदू नेशन’ या पुस्तकाची निर्मिती करताना एकनाथजींनी
स्वामीजींचे सगळे विचार वाचले आणि त्यातल्या काही विचारांनी प्रभावित झाले.
आपल्याला हे विचार कळणे हा आपल्या आयुष्यातला ‘यूरेका’
क्षण आहे असे एकनाथजी म्हणत असत. ते विचार असे होते, ‘‘धर्म हा भारताच्या
जीवनाचा केंद्रबिंदू आहे. ते भारताचे रक्त आहे. आपली धर्माबाबतची समजूत
गैरसमजांनी आच्छादित झाली तेव्हा भारताचे राष्ट्रीय जीवन चैतन्य गमावून
बसले. त्यातली गतिशीलता हरवली. भारताचा अध:पात धर्मामुळे झाला असे सांगितले
जाते पण ते सत्य नाही. आपला अध:पात धर्माविषयीच्या भ्रांत कल्पनांमुळे
झाला आहे. धर्म हा मंदिरातल्या पूजापाठापुरता मर्यादित नसतो. धर्म तर
सर्वत्र ईश्वर पहायला सांगत असतो आणि या विराट शक्तीची पूजा सेवा करायला
सांगत
असतो. तो जित्या-जागत्या देवाची पूजा करायला सांगत असतो. माणसाची सेवा हीच
ईश्वराची पूजा. धर्म आपल्याला ईश्वर एकच असल्याचे सांगतो आणि
उत्स्फूर्तपणे इतरांना मदत करण्यास तसंच आपली कर्तव्ये प्रेमाने बजावायला
सांगत असतो. त्याग आणि सेवा हे भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत. या
आदर्शानुसार भारतमातेची सेवा करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक होतील.
प्रत्येक देशाचा मानवतेला एक विशिष्ट संदेश असतो. एक भागध्येय असते आणि
एखादी विशिष्ट कामगिरी असते. भारतावर एक जबाबदारी आहे. ईश्वराच्या
एकत्वाच्या तत्वावर काम करणारा समाज जगाला देणे ही ती जबाबदारी होय. जो या
देशात जन्माला आला त्याची जबाबदारीही तीच झाली. तेव्हा आपल्याला ऋषीमुनींनी
केलेले आदर्श समाज निर्मितीचे कार्य पुढे सुरू ठेवायचे आहे.''
स्वामीजींच्या याच विचारांनी एकनाथजी प्रभावित झाले.
- सिद्धाराम भै. पाटील
No comments:
Post a Comment